रजत शर्माच्या ‘आप की अदालत’मध्ये मेरी कोमनं तुच्छपणे आपला माजी पती करूंग ओन्लर कोम याच्याबाबतीत केलेलं भाष्य समाजमाध्यम आणि माध्यमांवर टीकेचं लक्ष्य ठरलं. मेरी-ओन्लर दांपत्य काही वर्षांपूर्वी साथसोबतीच्या पाठबळासाठी ओळखलं जायचं; पण आता मेरी सांगतेय की तो माझ्या कमाईवर जगत होता. मग आत्मचरित्र आणि चरित्रपटातला ओन्लर खरा की आताचा? मोठ्या खेळाडूची कारकीर्द घडत असताना त्याच्यासाठी आपल्या कारकीर्दीचा त्याग करणारी सचिन-अंजली, आनंद-अरुणासारखी उदाहरणंही आठवतात…
****
‘त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, मला सांगा तुमचं काय गेलं?’ ही ख्यातनाम कवी मंगेश पाडगावकर यांची गाजलेली कविता. पण पाडगावकर आज हयात असते, तर सद्यस्थितीवर त्यांनी अशी कविता केली असती की, ‘त्यानं घटस्फोट घेतला किंवा तिनं घटस्फोट घेतला, मला सांगा तुमचं काय गेलं?’ कोणत्याही दांपत्यानं घटस्फोट घेणं, हा त्यांचा खासगी प्रश्न. पण ही व्यक्ती एखादी ‘सेलिब्रेटी’ दर्जाची व्यक्ती असेल, तर चर्चा ही होणारच! ती व्यक्ती आहे, एमसी मेरी कोम. जागतिक बॉक्सिंगच्या रिंगणात साम्राज्य प्रस्थापित करणारी ही सुवर्णकन्या. तिचा घटस्फोट होऊन आता तशी तीन वर्षं लोटली. तो सामोपचारानं झाल्यानं दोघांनाही मान्य असलेला मसुदाच त्यात होता. खरं तर दोघांनी आपापली वाट धरायला हवी होती. पण तसं घडलं नाही.
रजत शर्माच्या ‘आप की अदालत’च्या ताज्या भागात मेरी कोमनं तुच्छतेने माजी पती करूंग ओन्लर कोमबद्दल केलेलं भाष्य समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांवर टीकेचं लक्ष्य ठरलं. मेरी तावातावानं म्हणाली, ‘ओन्लरची कसली यशस्वी कारकीर्द? तो गल्लीतला फुटबॉलपटू होता. लग्नाच्या वेळी तो एक रुपयाही कमावत नव्हता. त्यानं काय त्याग केला? एका बाईच्या कमाईवर तो जगत होता, याचं मला खूप वाईट वाटतं. मी खूप मेहनत करून पैसे कमावले. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. पण नंतर मला लक्षात आलं की माझं बँक खातं पूर्णपणे रिकामं झालं आहे.’
ओन्लरनं आपली बाजू मांडत मेरीचे सर्व आरोप फेटाळून लावत प्रतिप्रश्न केले. ‘आम्ही भेटलो, तेव्हा मी ‘यूपीएससी’ची तयारी करत होतो आणि शिलाँगच्या अबकारी विभागात हंगामी फुटबॉलपटू म्हणून नोकरीला होतो. पण मेरीनं तिची कारकीर्द घडवण्यासाठी माझी कारकीर्द बाजूला ठेवण्याची विनंती केली. तिच्या बॉक्सिंगवरील प्रेमापोटी मी मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आनंदानं स्वीकारली. मग मेरीनंच मला राजकारणात उतरायला भाग पाडलं. २०१६मध्ये तिचा राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ संपत आला, तेव्हा तिनंच मला निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला.’

या आरोप-प्रत्यारोपांचा समाचार घेण्याआधी मेरी कोमचा मोठेपणा समजून घेऊया. २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला. याशिवाय जागतिक स्पर्धेत सहा सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी आठ पदकांची मक्तेदारी. त्याचमुळे अर्जुन पुरस्कार, खेलरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे सर्व मानाचे पुरस्कार तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे. या यशोप्रवासामुळे राज्यसभेची खासदारकीसुद्धा तिला प्राप्त झाली होती. ‘सेव्हन सिस्टर्स’सारख्या (आता अष्टलक्ष्मी) भागातून पुढे सरसावत परिस्थितीवर मात करून बॉक्सिंगसारख्या खेळात नाव कमावणारी मेरी कोम या असामान्य यशामुळे देशातली प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून नावारूपास आली.
कारकीर्द ऐन बहरात असताना २०१३मध्ये मेरी कोमचं ‘अनब्रेकेबल’ हे आत्मचरित्र (डायना सेर्टो सहलेखक) प्रकाशित झालं. तमिळनाडूत अकरावीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात तिच्यावरचा धडाही अभ्यासाला आहे. २०१४मध्ये ओमंग कुमारनं दिग्दर्शित केलेला ‘मेरी कोम’ हा चरित्रपट प्रदर्शित झाला. प्रियांका चोप्रानं शीर्षकभूमिका वठवलेल्या या चित्रपटानं मेरीच्या आयुष्याचा संघर्ष आणि इथवरचा प्रवास जगासमोर आणला. यानंतर ‘गुड नाइट स्टोरीज फॉर रिबेल गर्ल्स’ हे मुलांसाठीचं पुस्तक असो वा ‘वुइथ द रिंग’ हा माहितीपट असो- मेरीची सकारात्मकता कायमच चर्चेत राहिली.
खरा भेद इथेच आहे. विवाहाच्या २० वर्षांनंतर आणि घटस्फोटाच्या दोन वर्षांनी ज्या ओन्लरला मेरी ‘घरचा भेदी’ म्हणतेय, त्याचं या पुस्तकांत आणि चित्रपटात वेगळंच चित्र रेखाटण्यात आलंय. पत्नीची कारकीर्द यशस्वी घडावी म्हणून आपली कारकीर्द बाजूला ठेवणारा पती, जो तिच्या प्रत्येक संघर्षात खंबीरपणे पाठीशी उभा राहिला. घर, चार मुलं यांचा इमाने-इतबारे सांभाळ केला. ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिला असते’ या जुनाट वाक्यप्रयोगाला काटशह देत ‘प्रत्येक यशस्वी महिलेमागे एक पुरुष असतो’ असा नवा वाक्यप्रयोग रूढ करणारं हे दांपत्य. ओन्लरची कुटुंबातील भूमिकाही मेरीनं अनेक मुलाखतींमधूनही ‘माझं पाठबळ’ अशा शब्दांत मांडली होती. पण हे सारं २०२३च्या आधीपर्यंतचं. दोन वर्षांनंतर मेरी मुलाखतीत म्हणते की, ‘माझ्या मुलांचं संगोपन हे ओन्लरनं नव्हे, तर माझ्या कुटुंबीयांनी आणि कर्मचार्यांनी केलं. ओन्लर सकाळ-संध्याकाळ फक्त झोपा काढायचा. बाकी काहीच करायचा नाही.’ ओन्लरची माध्यमांसमोर रेखाटलेली ही दोन्ही रूपं मेरीनेच रेखाटली आहेत. मग प्रश्न पडतो, नेमकं वास्तव काय? ओन्लर कोणता खरा? तिने आधी रंगवलेला की आता ती सांगते आहे तसा?
सेलिब्रिटींनी आत्मचरित्र लिहिण्याची किंवा इतरांनी त्यांच्यावर चरित्रपट काढण्याची घाई करू नये, ते कधी काढावेत, याची काही नियमावली असावी, अशी एक चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे. पण ती निरर्थक आहे. खेळाडूंची कारकीर्द इतर व्यवसायांच्या तुलनेत अल्पजीवी असते. ते स्टारडम सर्वोच्च पातळीवर असतं तेव्हाच त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना किंवा त्यांच्या चित्रपटस्वरूप संघर्षगाथांना प्रतिसाद मिळतो. त्यामुळे ती वेळ साधण्यात गैर काय? पण, मग मेरी-ओन्लर यांनी सामोपचारानं घेतलेल्या घटस्फोटानंतर ही चिखलफेक का व्हावी, एवढाच विषय आहे. इतके आक्षेप होते, तर घटस्फोटाचा खटला चालू ठेवता आला असता. सामोपचाराच्या घटस्फोटात देण्याघेण्याचं नेमकं काय ठरलं? हे गुलदस्त्यात आहे. मेरीचं यश आणि त्याद्वारे मिळवलेली आर्थिक सुबत्ता पाहता तीच ओन्लरला देखभाल खर्च देत असावी. कदाचित त्यामुळेच बाईच्या कमाईवर ओन्लर जगतोय, याची मेरीला आत्ता प्रकर्षानं जाणीव झाली असावी.

आज स्त्री-पुरुष समानतेच्या काळात कुणी तरी कुणाच्या तरी पाठीशी असणारच. एका प्रेरणादायी व्यक्तीची कारकीर्द घडते, तेव्हा दुसर्याला खंबीरपणे पाठबळ देण्यासाठी आपल्या कारकीर्दीचं बलिदान द्यावं लागू शकतं. उदाहरण द्यायचंच तर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विश्वनाथन आनंद यांचं देता येईल. सचिन आणि अंजलीची १९९०मध्ये पहिली भेट झाली. तेव्हा सचिननं नुकताच आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला प्रारंभ केला होता, अंजलीनंही डॉक्टरकीला सुरुवात केली होती. सचिन त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौर्यावरून परतत होता, तर अंजली आईला आणायला विमानतळावर गेली होती. पहिल्या भेटीतच त्यांच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या. मग काही दिवसांतच एका मित्राकडे दोघांची दुसरी भेट झाली आणि मग भेटींची मालिका… १९९५मध्ये दोघांचा विवाह झाला. अंजलीनं प्रथम श्रेणीमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेला; पण सचिनच्या क्रिकेटसाठी तनिं त्या कारकीर्दीचा त्याग केला आणि त्याची कोणतीही खंत तिला आता वाटत नाही. ‘मला क्रिकेटमधील काहीच कळत नव्हतं, तेच सचिनला सर्वात जास्त भावलं असावं. मला सचिन कोण आहे, याची जाणीव काही काळानं झाली,’ असं अंजलीनं म्हटलं होतं. परंतु सचिन देशाचा आहे आणि मग आपला आहे, हे अंजलीच्या मनावर पक्कं कोरलं आहे. सचिननं वानखेडे स्टेडियमवरील निरोपाच्या भाषणात म्हटलं होतं की, ‘अंजलीशिवाय मी मुक्तपणे आणि दडपण न घेता क्रिकेट खेळू शकलो नसतो. माझा राग, निराशा आणि काहीबाही बोलणं सहन केल्याबद्दल धन्यवाद. अंजली, माझ्या आयुष्यातली सर्वोत्तम भागीदारी तुझ्यासोबत झाली आहे.’

सचिन-अंजलीचा प्रेमविवाह तर आनंद आणि अरुणाचा ठरवून झालेला विवाह. आनंदशी विवाह करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अरुणालाही आनंदच्या बुद्धिबळ क्षेत्रातील मोठेपणाची माहिती नव्हती. फक्त त्याचा साधेपणा आणि मोठेपणाचा आव न आणण्याची वृत्ती, यावरच ती भाळली. ‘मधुचंद्राला कुठे जाणार?’ असं अरुणाला तिच्या मैत्रिणीनं विचारलं. अरुणानं शांतपणे उत्तर दिलं, ‘डॉर्टमंड.’ चौसष्ठ चौकडींमध्ये रमणार्या आनंदला विवाहानंतर तिसर्याच दिवशी तिथे बुद्धिबळ स्पर्धा खेळायची होती. त्यामुळे तो अरुणाला सोबत घेऊनच गेला. अरुणाची ती पहिलीच परदेशवारी. पहिल्याच स्पर्धेत अखेरच्या रांगेतील खुर्चीवर ती बसली होती. सामना संपताच टाळ्या वाजल्या. आनंदच्या यशासाठी त्या होत्या. मग परतणार्या आनंदसमोर अरुणा निर्विकार चेहर्यानं उभी होती. पण गेली अनेक वर्षं हाच चेहरा त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरलाय. बुद्धिबळाच्या ध्यासापोटी तिनं आनंदच्या साथीनं जग पालथं घातलं. बुद्धिबळाच्या पटावरील चाली तिला कळत नाहीत; परंतु पतीच्या यशापयशाचं गणित तिला चांगलं कळतं. प्रवास आणि खवय्येगिरीवर दोघांचंही नितांत प्रेम. अरुणा अभियांत्रिकी पदवीधारक. त्यानंतर जाहिरात क्षेत्रातही तिनं नोकरी केली. पण १९९६मध्ये आनंदशी विवाहानंतर ती त्याची व्यवस्थापक या भूमिकेतून साथसोबत करते. अरुणाचे वडील दिल्लीला विदेशी दूतावासात अधिकारी पदावर होते. त्यामुळे अरुणालाही आनंदप्रमाणे अनेक भाषांची गोडी होती. दोघंही अस्खलितपणे स्पॅनिश बोलतात. विवाहाच्या सुरुवातीच्या दिवसांत अरुणा आनंदला ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ म्हणायची. कारण विवाहाची अंगठी आनंदनं चक्क तीनदा हरवली आणि प्रत्येकदा अरुणाच्या कुटुंबियांनी त्याला नवी करून दिली. अखेर आनंदनंच आता पुरे, असं स्पष्ट केल्यानंतर नवी अंगठी करण्याचं सत्र थांबलं.
सचिन-अंजली आणि आनंद-अरुणा ही दांपत्य म्हणूनच आदर्शवत ठरतात. महात्मा गांधी यांच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘जिथे प्रेम आहे, तिथेच जीवन आहे!’ मेरी-ओन्लर यांच्यातलं प्रेमच संपल्यामुळे घटस्फोटाचा पूर्णविराम आला. पण सध्या प्रकाशात आलेलं वास्तव हे दाहक आहे.

