अलीकडे नानाला कधीमधी फोन केला की नानाकडून एकच उत्तर असायचे.. शेतावर आहे..
नानाचे शेत, म्हणजे नानाची वाडी.. आणि त्या वाडीत पसरलेले विविधांगी शेत.. त्यात मळे तर आहेतच, वाफे आहेत… छान सुंदर रस्ते आहेत.. एक तलाव आहे.. त्यात मासे बदके सोडलेली आहेत, जवळच विहीर आहे, फळाफुलांनी बहरलेली झाडे आहेत, सुशोभित खुराडी आहेत, त्यात कोंबड्या आहेत. प्रशस्त आणि सुसज्ज गोठे आहेत, त्यात गाई गुरे आहेत, खिल्लारी उंचीपुरी बैलजोडी आहे, त्यांच्यासाठी बैलगाडी आहे. त्या बैलगाडीच्या जोखडाच्या पुढच्या टोकावर `नानाची वाडी’चा डिझाईन केलेला सिम्बॉल आहे. जणू काय मर्सिडीजच आहे. तितक्याच डौलाने तो
सिम्बॉल तिथे विराजमान आहे.
स्वतःच्या गाड्यांसाठी आणि पाहुण्यांसाठी पार्किंग शेड्स आहेत..
हे सर्व झालं शेताचं..
त्यात एक टुमदार बंगला आहे. त्याची बांधणी अप्रतिम आहे. वाडाच जणू… अत्यंत मोजक्या पण कलात्मक ऐवजांनी सजवलेला बंगला.. त्याला लागून एक अद्ययावत अशी जिम…
असायलाच हवी ना?
पहाटे पाचलाच तिथली मशिनरी खणखणीत आवाजात जागी होते मालकाच्या हस्तक्षेपाने…
या शेताचे प्रवेशद्वार भक्कम किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखे आहे. तिथे २४ तासाच्या ड्युटीवर कोणी वॉचमन नाही… तर त्या शेतात फिरत असतात मालकाच्या जिव्हाळ्याचे पाचेक कुत्रे.. विना परवानगी आत घुसणार्याची वर्दी त्यांच्या डरकाळ्यांनी आतल्या मालकापर्यंत जाते.. मग आतून मालकाचा त्याहीपेक्षा मोठ्या आवाजात आदेश जातो..
‘एऽऽऽ येऊ दे त्यांना आत…’ तेव्हा ते पंचवॉचमन शांत होतात…
रात्री अपरात्री चोरीच्या उद्देशाने कोणी आत शिरलाच तर जिवंत बाहेर पडेल याची गॅरंटी नाही. शिवाय मालकाकडे परवानाधारक लांब पल्ल्याच्या बंदुका आहेत ते वेगळेच…
हे सर्व सिंहगडाच्या पायथ्याशी आहे… आणि याचा मालकही सिंहगडाच्या पायथ्याला शोभेल असाच आहे.. त्याचं नाव नाना पाटेकर…
नाना आणि रजनीकांत
दक्षिणेतला सुपरस्टार रजनीकांत आणि नाना पाटेकर यांच्यात बरंच साम्य आढळतं. रांगडेपणा आणि मातीशी असलेलं नातं. याची सांगड प्रत्यक्ष जीवनात दोघांनीही जबरदस्त घालून ठेवलेली आहे. जसे आहोत तसे दाखवायला दोघांच्याही आड त्यांचा सुपरस्टार असल्याचा स्टारडम येत नाही. अलीकडच्या काळात तुम्ही राजनीकांतना पाहिलं असेल… गेलेले केस, दाढी वाढलेली… सफेद झब्बा, लुंगी हा प्रादेशिक लिबास, रजनीकांत याच वेशात तुम्हाला कुठेही दिसेल. नानाच्याही अंगावर असेच काहीतरी प्रादेशिक दिसेल… मराठमोळा लेहंगा, गुडघ्यापर्यंत पायघोळ झब्बा…. त्याला समोर दोन फ्लिपवाले खिसे.. एकात स्केच पेन वगैरे.. आणि एकात चष्मा वगैरे. शेतात असताना हातात पांढरा स्वच्छ नॅपकिन अथवा उपरणं. नाना हॉलिवुडमध्ये असो,
बॉलिवुडमध्ये असो, अलीकडे तो सगळीकडे असाच दिसेल…
ड्रायव्हर नाही, मेकअपमन नाही, छत्री धरायला बॉय नाही. तारखा बुक करायला
मॅनेजर नाही. नाना पाटेकर.. म्हणजे वन मॅन इंडस्ट्री..
‘नाना.. तू तुझा स्टारडम कसा मॅनेज करतोस?’
‘म्हणजे? ‘
‘गर्दीचा त्रास होत नाही…? ‘
‘छे रे.. कोणी पुढेच येत नाही… प्रेमाने आलं तर गळाभेट, अंगावर आलं तर देतो एक ठेवून…’
नानाने त्याच्या स्टाईलने उत्तर दिलं..
खरंय.. नानाच्या एकूण प्रथमदर्शनी व्यक्तिमत्वाचा हाच दरारा आहे. व्यक्तिमत्वात इतक्या वर्षांच्या अनुभवातून एक परिपक्वता आलेली आहे. नाहीतर एखाददुसर्या सिनेमांत हिट झालेल्या स्टार लोकांचे तोरे बघा… नसलेल्या गर्दीला खेचून घेण्याची स्पर्धा असते…
याउलट नाना…
‘पुर्ष्या… कामाठीपुरा बघूया जाऊन…’
‘चालेल.. कधी जाऊ या? ‘
‘उद्या सकाळी ११ वाजता… दादरला जिप्सीत भेटू..’
एका मित्राच्या ड्रायव्हरला गाडीसकट बोलवून घेतले… छोटीच गाडी होती… लोकेशनवर कळू नये म्हणून… मी, नानाचा मुलगा मल्हार, तो ड्रायव्हर आणि नाना.. असे चौघेच निघालो.. मल्हारच्या चेहर्यावर टेन्शन दिसत होतं.. कामाठीपुरासारख्या भर गर्दीत नाना खाली उतरला, तर पुरेशी सिक्युरिटीसुद्धा नाही… पण नाना भायखळा, कामाठीपुरा, खेतवाडी, गिरगावात चांगलाच रमला होता. गोलपिठ्याजवळच्या गोलदेवळाच्या बाजूच्या गल्लीत काही वर्षे नानाचे बालपण गेले होते. त्याच वयाचा होऊन नाना एकेक बारकावे दाखवत होता… फार देखावा न करता, खाली न उतरता, शांतपणे तो विभाग आम्ही फिरून आलो… मधला बराच काळ लोटला होता… नानावर त्या विभागाचे झालेले संस्कार त्याच्या अनेक भूमिकांतून पुढे कधी कधी डोकावले… त्याच्या गाजलेल्या भूमिकांमधून कुठे न कुठेतरी त्या संस्कारांची रग दिसून येतेच.
नानाबरोबर सिनेमा म्हणजे शिवधनुष्यच!
आजही नानाने आपल्या सिनेमांत काम करावं म्हणून निर्माते धडपडतात… पण त्यांना नानाच्या अनेक परीक्षेला तोंड द्यावे लागतं.. तेव्हा कुठे त्यांना नाना मिळतो.. नानाला घेऊन एखादं प्रोजेक्ट करायचे म्हणजे शिवधनुष्यच… नाना त्यात इतका घुसतो की समोरचा अवाक होऊन जातो… तो त्यासाठी त्याचा वेळ घेतो… समोरच्याला वाटतं .. हा करेल की नाही? की उगाच वेळ काढतोय?..
पण एवढा कीस काढल्यानंतर लोकांच्या समोर येतं ते ‘अब तक छपन्न’सारखं काही तरी भन्नाट..
तीन वर्षे नाना त्यावर घासत होता.. निर्माता हवालदिल झाला होता… त्याचा पार्टनर राम गोपाल वर्मा, त्याला नानाची सवय होती… पण निर्माता अस्वस्थ होता… दिग्दर्शक शिमित अमीन न्यूयॉर्क रिटर्न उच्चशिक्षित… त्याच्या डोक्यात अमेरिकन क्राइम…. आणि नाना या मातीतला… अख्खा सिनेमा या मातीत कसा मुरेल यासाठी नाना कंबर कसून होता.. अखेर सिनेमा झाला… दीर्घकाळ वाट पाहून जेव्हा रिलीज झाला तेव्हा निर्मात्याचे उखळ पांढरे झाले.. तुफान रिस्पॉन्स.. अगदी मुंबईतल्या रस्त्यावरचा सिनेमा.. रसिकांनी डोक्यावर घेतला.. दोन भाग निघाले त्यानंतर… दॅट्स नाना…. पेशन्स ठेवा.. नानाबरोबर काम एन्जॉय करा… जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये आमच्या तीनएक वर्ष पुढे होता नाना. कॉलेजमधल्या निवडणुकीत आपल्या सहकार्यांबरोबर छोटी छोटी भाषणे करुन धमाल उडवणारा नाना, कॉलेज संपताच आपल्यातल्या कमर्शिअल आर्टिस्टला व्यवसायासाठी काही स्कोप मिळतो का, याच्या प्रयत्नात होता. पण बोलण्यावरची हुकूमत, विचारांमधला पक्केपणा आणि रांगडं रुपडं या भांडवलावर हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीकडे ओढला गेला. आविष्कारच्या नाटकांमधून दिसू लागला… आणि एके दिवशी…
पहिला ब्रेक
विजय तेंडुलकर यांच्या ‘पाहिजे जातीचे’ या नाटकात नानाचे कास्टिंग झाले बबन्याच्या भूमिकेसाठी… दिग्दर्शक अरविंद देशपांडे यांनी त्याच्यावर विशेष काम करून नानामधला तो बेफिकीर आणि द्वाड तरुण, जो वरवर बघितलं गेलं तर जमीनदार बापाच्या धाकातला, पण बाहेर त्याला न जुमानता बेदरकारपणे वावरणारा बबन्या, तुफान लोकप्रियता मिळवत गेला…
रंगमंच अक्षरश: कवेत घेऊ शकेल असे गुण नानामध्ये अनेक दिग्दर्शकांना दिसू लागले.. आणि व्यावसायिक रंगभूमी नानाला खुणावू लागली. विजयाबाई मेहता यांच्यासारख्या दिग्दर्शिकेचे संस्कार नानावर झाले आणि हमीदाबाईची कोठी, महासागर, पुरुषसारखी नाटके नानाच्या कारकीर्दीला पक्की दिशा देऊ लागली.
दुसरा ब्रेक
‘पुरुष’मधल्या गुलाबराव या पुढार्याच्या स्त्रीलंपट, पण धूर्त आणि बेरकी व्यक्तिरेखेने नाना नाट्यरसिकांच्या गळ्यातला ताईत झाला. अफाट लोकप्रिय गर्दीत ‘पुरुष’ नाटक पहिले जाऊ लागले. या नाटकाने नानाला मराठी आणि हिंदी चित्रपटाचे दरवाजे उघडून दिले…
तिसरा ब्रेक
एन. चंद्रा या तरुण मराठी दिग्दर्शकाने नवीन नटांची फौज घेऊन ‘अंकुश’ हा हिंदी सिनेमा केला. त्यात एका अस्वस्थ मराठी तरुणाच्या भूमिकेत नाना पाटेकरला घेतले. सर्वांनी या सिनेमासाठी अपार कष्ट केले. परिणामी हा कमी बजेटचा हिंदी सिनेमा त्यातल्या लाव्हारसयुक्त विचारांमुळे प्रचंड यशस्वी झाला. त्यातूनच मराठीव्यतिरिक्त इतर हिंदी भाषिक दिग्दर्शकांना नानातले अनेक गुण दिसले.
आणि एके दिवशी हिंदी सिनेमाला एक थंड डोक्याचा, पण गरम विचारांचा तिरसट आणि खुनशी असा लोभस ‘अन्ना’ सापडला… ‘परिंदा’ सिनेमातला ‘अन्ना’… त्यानंतर मात्र नाना पाटेकर हे नाव भारतीय चित्रपट विश्वात चर्चिले जाऊ लागले.
यापूर्वी थंडपणे निर्घृण कत्तली करत फिरणारा गब्बरसिंग लोकांनी पहिला होता.. त्याला डोक्यावर घेतले होते… तरीही तो दर्याखोर्यात वाढलेला, घोड्यावरून फिरणारा डाकूच होता. सहसा जनसामान्यांत न वावरणारा.. पण तुमच्या-आमच्यातला एक थंड डोक्याचा अत्यंत हुशार खलपुरुष एकदा नाही दोनदा… म्हणजे ‘पुरुष’ नाटकात एकदा आणि दुसर्यांदा ‘परिंदा’मध्ये. सहज पटेल असा, सहजासहजी मुंगी मारावी तसा वाटेत येणार्या अडथळ्यांचा खात्मा करणारा सो कॉल्ड व्हिलन नानाच्या रूपाने पडद्यावर वावरला… इतका परिणामकारक की प्रत्यक्ष नानाच्या आईने त्याला निक्षून सांगितले, की ही असली कामं करून मोठ्या दिमाखात माझ्या पाया पडायला येणार असशील तर येऊ नकोस, हाकलून देईन…
आई गुरू, सहकारी, मैत्रीण
नानाची आई हा नानाचा सर्वात मोठा गुरु, सहकारी, मैत्रीण आणि सर्व काही… तिने त्याला दिलेले एकेक शिक्षणाचे बाळकडू, नानाला आयुष्यभर पुरले. आईचा शब्द नानासाठी अंतिम. कारण त्या आईने काढलेल्या आपल्या मुलांसाठीच्या खस्ता नानाला बरंच काही शिकवून गेल्या होत्या. नानाच्या आईचे माहेर म्हणजे जणू गॉडफादरमधली कॉर्लिऑन फॅमिली. मन्या सुर्वे हा नानाचा मामेभाऊ. या सर्व भावंडांचा आपल्या गरम डोक्याच्या लेकावर परिणाम होऊ नये म्हणून या माऊलीने नानाला त्यांच्यापासून लांब ठेवले. त्याच्या शिक्षणात रस घेतला. शिकवले.
वर वर नास्तिक वाटणारा नाना केवळ आईला दिलेल्या शब्दाखातर दरवर्षी घरात येणार्या गणपतीबाप्पाची मनोभावे सेवा व पूजा करीत असे. स्वतः फुलांची आरास तयार करुन त्या मखरात मोठ्या डौलात बाप्पा विराजमान होत. पारंपरिक वेशात आगमन व विसर्जनाच्या मिरवणुका नानाच्या उपस्थितीत होत. हे सर्व नाना त्याच्या आईला दिलेल्या शब्दाखातर करीत असे.
ब्रेक के बाद…
मधुर पाण्याचे झरे जसे खडकाळ ओढ्यातून वाहतात तसे नानाचे आहे. हा रांगडा पहाडी व्यक्तिमत्त्वाचा खडकाळ माणूस आतून प्रेम भावनेने ओथंबलेला आहे. त्याचे सामाजिक कार्य बघितले की हे लक्षात येते. बाबा आमटे यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या शेतकर्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आधार देण्यापर्यंत नाना तन, मन आणि धन यांच्यासह हिरीरीने उतरतो. उत्पन्नातला खूप मोठा भाग या कार्यासाठी वापरण्याची धमक नानामध्ये आहे… तीच गोष्ट मला रजनीकांत यांच्यामध्येही दिसते. अशी माणसं मग लोकांच्या गळ्यातला ताईत होऊन फिरतात त्याचे आश्चर्य वाटायला नको.
लार्जर दॅन लाइफ
अगदी आमच्यात सहजपणे वावरणारा नाना, गेल्या तीस चाळीस वर्षांत कधी लार्जर दॅन लाईफ झाला कळलेच नाही. नानाने जितके सिनेमे केले त्याच्या दुप्पट तिप्पट त्याने नाकारले. न आवडलेली कुठलीच गोष्ट दयेपोटी नानाने केल्याचे जाणवत नाही. ज्या मूळ स्वभावावर, म्हणजे पंजाब्यांची हाजी हाजी करणे, उठता बसता सलाम ठोकणे आणि कामे मिळवत राहणे, हे सर्व करण्याची वेळ नानावर कधी आलीच नाही. उलट शब्दांचे फटकारे आणि सडेतोड उत्तरे देऊन प्रसंगी हातघाईवर येऊन समोरच्याचे बिनडोक विचार जमीनदोस्त करण्याचा बुलडोझर घेऊनच नाना हिंदी सिनेसृष्टीत वावरला. अनेक आरोप झाले, प्रकरणे झाली, पण नानाच्या कर्तृत्वाला खिंडार पडले नाही. ते बुलंदच राहिले. एखादी गोष्ट आवडली की मनापासून दाद देण्याची वृत्ती मात्र नानामध्ये आजही दिसून येते.
अलीकडे मी ‘क्लोज एनकाऊन्टर’ या माझ्या कथासंग्रहातील एकेक कथा लिहून झाली की सर्व मित्रांना पाठवीत असे. त्यात नाना अग्रक्रमाने होता. कथा वाचून झाली की नानाची प्रतिक्रिया येत असे. ‘छान’… ‘उत्तम’… एवढेच त्यात असे. पण तेवढीही पुरेशी असे. त्यातच सर्व काही असे. या पुस्तकाच्या प्रकाशनाला नाना उपस्थित राहिला आणि त्याच्याच हस्ते प्रकाशन झाले… इतकेच नव्हे तर यातल्या एका कथेवर एखादी कलाकृती सादर करण्याची व त्यात भूमिका करण्याची घोषणाही नानाने केली.
परंपरेच्या जोखडाखाली नाना कधी अडकलेला दिसला नाही… पण संस्कृती जपायची वेळी आली की नाना पुढे असतो. आईच्या रूपात तो या भारतमातेलाही पाहतो.
‘प्रहार’ चित्रपटातल्या कमांडोच्या भूमिकेसाठी नाना प्रत्यक्ष कमांडोचे शिक्षण घ्यायला मिलिटरीत दाखल झाला. इतकेच नाही तर कारगिलच्या युद्धात खास परवानगी मिळवून प्रत्यक्ष सहभाग घेतला. कारगिलच्या बर्फाळ माथ्यावर भारतीय सैनिकाच्या खांद्याला खांदा लावून लढला. मुंबईच्या दंगलीत पोलिसांबरोबर लोकांना शांततेचे आवाहन करीत उघड्या जीपमधून फिरला. ‘क्रांतीवीर’ सिनेमात टाळ्या घेणारा नाना केवळ ‘ये हिंदू का खून, ये मुसलमान का खून’ म्हणून गप्प नाही बसला… प्रत्यक्ष त्या विचारांच्या परीक्षेलाही उतरला.
हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अफाट यशाच्या जोरावर ग्लॅमरस आयुष्य एखाद्या आलिशान बंगल्यात घालवणे नानाला सहज शक्य होते.. पण अगदी कारकिर्दीच्या ऐन भरात बाबा आमटे यांच्यासारख्या महात्म्याचे संस्कार नानावर होतात.. आणि विचारांची दिशाच बदलल्याचे जाणवते..
एकेकाळी एखादा मित्र भेटला की त्याच्यावर प्रेमाने शारीरिक अटॅक करून नाना त्याला घुसळून काढायचा.. त्याला शिव्यांची लाखोली वाहून मग प्रेमाने आपुलकीने त्याची चौकशी करायचा.. आज त्या सर्व घुसमुसळेपणाची जागा आदरातिथ्याने घेतलीय… इथेही त्याच्या आईचेच संस्कार…
खरा मित्र
वेबसिरीजच्या निर्मितीच्या चर्चेसाठी कधी लोखंडवाला तरी कधी शेतावर, तर कधी पुण्याच्या घरात.. नाना बोलावत असे.. पण एकदाही हॉटेलातून जेवण मागवले नाही. स्वत: किचनमध्ये उभा राहून त्याच्या हाताने जेवण करून वाढणे यात त्याला अथक आनंद मिळतो… फोडणी देता देता आपली चर्चा सुरु असते.. तशात नाना प्रत्येक पदार्थाचे महत्त्व सांगून ते डायट किती उपयोगाचे हेही सांगत असतो…
‘पुर्ष्या.. घावण (मराठी डोसा) खाल्ले असशीलच ना? त्यात हे असे ओल्या खोबर्याचे तुकडे आणि बारीक अद्रक पेरले आणि जर दाताखाली आले तर मज्जाच येते…’
सराईतपणे नानाने तव्यावर घावण टाकलेले असते.. त्यानंतर दुसर्या बाजूला सांडग्याची भाजी… तिचे महत्त्व सांगत नानाबरोबर जेवण… सोबत मग एखादी नुकतीच वाचलेली कविता… त्याचं रसग्रहण… किंवा एखाद्या सिनेमात दिग्दर्शकाबरोबर झालेलं कडाक्याचं भांडण आणि शेवटी त्याचा अफलातून रिझल्ट…
मीटिंग संपल्यावर गाडीपर्यंत सोडायला आलेला नाना साईड मिररमधून लांब जाताना दिसतो… पण प्रत्यक्षात खूप जवळ आलेला असतो… मित्र या संकल्पनेची प्रचिती तोपर्यंत आलेली असते.. पडद्यावरचा ‘नाना’ व्यक्तिरेखेतला ‘नाना’… आणि प्रत्यक्षातला ‘नाना’… तीन वेगळे ‘नाना’ तोपर्यंत मनाच्या पडद्यावर छापून उरलेले असतात…
(लेखक नाट्य व चित्रपटसृष्टीतील सिद्धहस्त अष्टपैलू कलावंत आहेत)