• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

द ग्रेट महाराष्ट्र सर्कस!

मर्मभेद

marmik by marmik
February 3, 2026
in मर्मभेद
0
द ग्रेट महाराष्ट्र सर्कस!

गेली जवळपास १२ वर्षे देशात ग्रेट इंडियन सर्कसचे खेळ जोरात चालले आहेत. या सर्कसचे प्रोप्रायटर हेच त्यातले प्रमुख कसरतपटू आहेत. ते स्वत: सर्कशीतली सगळी वाद्यं वाजवतात, चित्तथरारक कसरती करतात, रिंगमास्टर बनून भल्या भल्या प्राण्यांना अग्निगोलातून आपल्या गोटात उड्या मारायला लावतात. कधी मोरांबरोबर खेळतात, कधी चित्त्यांना ढोकळा आणि फाफडा खायला घालतात. कधी प्रेक्षकांच्या मुलांना कान उपटण्याचा खेळही करून दाखवतात. या सर्कशीशी ते असे एकजीव झालेले आहेत की बकरीबरोबर एका ताटात जेवणारा वाघही मीच होतो आणि बालप्रेक्षकांच्या सर्वाधिक टाळ्या खेचणारा विनोदवीर जोकरही मीच होतो, मृत्युगोलात सायकल चालवणाराही मीच आणि ट्रॅपीझवर झोके घेणाराही मीच, असा त्यांचा खाक्या आहे. ट्रॅपीझवर तोकडे कपडे घालून कसरती करणार्‍या कन्या मात्र अजून वाचल्या आहेत…त्या म्हणजेही मीच आहे, असं अजून रिंगमास्टर सांगत नाहीत, हे त्या मुलींचं नशीब!

एखादा व्यवसाय यशस्वी झाला की गावोगाव त्याच्या शाखा काढायच्या हा बेपारी लोकांचा नेहमीचा फंडा. त्यामुळे द ग्रेट गुजरात सर्कस (इथून रिंगमास्टरांच्या व्यवसायाला बरकत आली), द ग्रेट उत्तर प्रदेश सर्कस (इथे बुलडोझरची चित्तथरारक प्रात्यक्षिकं चालतात), द ग्रेट दिल्ली सर्कस (इथे धुरामुळे खेळ दिसत नाही अशी तक्रार करणार्‍या प्रेक्षकांवर पाण्याचा वर्षाव करण्यासाठी तंबूभर स्प्रिंकलर लावलेले आहेत), अशा याच कंपनीच्या अनेक सर्कशी लोकप्रिय आहेत. त्यातलीच एक आहे द ग्रेट महाराष्ट्र सर्कस!

एकदा ही सर्कस एखाद्या राज्यात मुक्कामी आली की साधारणपणे निवडणुकीच्या खेळापासून तिचा शो सुरू होतो. त्यात काही सफारी घातलेली माणसं मंचाच्या मध्यावर येतात आणि जादूचे प्रयोग करून दाखवतात. प्रेक्षकांमधल्या अनेकांची नावं ते त्यांच्याच खिशातल्या सगळ्या कागदपत्रांवरून गायब करून दाखवतात. ५० वर्षांच्या मुलाला १६ वर्षांची आई आणि १२५ वर्षे वयाचे वडील देण्याची ही जादू पाहून अनेकदा प्रेक्षक तंबूत बेशुद्ध पडतात. अशा प्रेक्षकांना जागं करण्यासाठी एक टिल्लू विनोदवीर आपलं वय, आपली उंची, आपली बुद्धी यांचा विचार न करता, गेंगाण्या आणि चिरक्या आवाजात ‘बंगल्यावर बॉस माझा बसलाय रं’ असं गाणं गात प्रेक्षकांतून फिरत असतो. त्याची ती कर्णभेदी अखंड बडबड कानावर पडल्यावर बेशुद्ध पडलेला माणूस तर उठून बसतोच, पण काही वेळा तिरडीवर किंवा सरणावर आडवा पडलेला माणूसही उठून पळून जातो, अशी बेफाट जादू पाहिल्याचं काही प्रेक्षक सांगतात. बोटावर शाई लावून ती बघता बघता गायब करणे, हा हातखंडा खेळ सादर केल्यानंतर ही मंडळी निकालाचा खेळ दाखवतात, याची टोपी त्याला, त्याची याला, इकडचे आकडे तिकडे, तिकडचे आकडे इकडे, असा भयंकर गोंधळ घातल्यावर प्रेक्षकांनी ‘सगळाच पुरता निकाल लागला’ असं म्हटल्याशिवाय हे जादूचे प्रयोग संपतच नाहीत.

त्यानंतर इथल्या सर्कशीचे प्रमुख काही नेत्रदीपक जादू दाखवतात. पोपटलाल नावाचा एक अतिशय लोकप्रिय जोकर सर्कसप्रमुखांना काही प्राणी शिकार करण्यासाठी दाखवतो. हा फार माजलाय तो फार सुजलाय, असं तो नाचत नाचत सांगत असतो. मग सर्कसप्रमुख त्या प्राण्यांवर धावून जातात. सावज टप्प्यात आलं की कधी भाला फेकतात, कधी बंदुकीची गोळी झाडतात. पोपटलाल आनंदाने बेभान होऊन नाचत असताना मंचावरचे, प्रेक्षागृहातले दिवे जातात आणि ते पेटतात तेव्हा सर्कसप्रमुख त्या प्राण्यांबरोबर एकाच ताटात हास्यविनोद करत जेवत असल्याचं दृश्य दिसतं, तेव्हा पोपटलाल अशा काही कसरती करतो की प्रेक्षकांच्या हसून हसून मुरकुंड्या वळतात. त्यानंतर सर्कसप्रमुख आश्वासनं देऊन खंजीर खुपसण्याचा अतिशय लोकप्रिय खेळ करून दाखवतात. यातली सगळ्यात मोठी नजरबंदी म्हणजे ज्याने त्यांच्यावर विश्वास टाकला, मैत्री केली, त्याच्या पाठीत ते प्रेक्षकांसमोर खंजीर खुपसून त्याला रक्तबंबाळ करतात, तो आडवा पडतो आणि मग हेच ओरडायला लागतात, विश्वासघात तर आमचा झालाय अध्यक्ष महोदय! आक्रंदता आक्रंदता ते वळतात आणि प्रेक्षकांचे डोळे विस्फारतात, कारण आता खंजीर त्यांच्या पाठीत खुपसलेला दिसतो. मागे एका घाबरवणार्‍या आवाजात गाणं सुरू असतं… ‘ये नयन डरे डरे… ’ टाळ्यांचा कडकडाटच होतो.

मग पोपटलाल जोकर पुन्हा मंचावर येतो. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, मी आता पुन्हा अ‍ॅक्टिव झालो आहे, अशी वाक्यं तो त्वेषाने बोलतो तेव्हा प्रेक्षागृहातून एकेका वाक्यावर हशा फुटतो. अरे, आधीच्या विषयांचं काय झालं? आम्हाला शिकार दाखवणार होतास आणि काय दाखवलंस? पैसे परत टाक तिकिटाचे असं म्हणत सडके टोमॅटो, अंडी, यांचा वर्षाव ते पोपटलालवर करतात. त्याने ज्यांची शिकार होणार आहे, असं सांगितलं होतं, ते सगळे प्राणी सोनेरी झूल पांघरून ऐटीत येतात आणि हत्ती पोपटलालला सोंडेत धरून आपटतो, वाघ त्याचं नरडं दातांत पकडून त्याला भिरकावून देतो, काही बैल त्याला शिंगावर घेऊन उडवतो, तरी पोपटलाल निर्लज्जासारखा माझ्याकडे पुरावे आहेत, मी अ‍ॅक्टिव्ह होणार, अशा गर्जना करतच राहतो, तेव्हा प्रेक्षागृहात लोक गडबडा लोळू लागतात.
या सर्कसमध्ये वर्षातून एकदा एक चित्तचक्षुचमत्कारिक खेळ दाखवला जातो. सर्कसप्रमुख परदेशातून कांगारू, अ‍ॅनाकोंडा, आप्रिâकन सिंह, अमेरिकेचा खडखड्या साप वगैरे विदेशी प्राणी पक्षी आणून दाखवतो, असं सांगून प्रेक्षागृहात टोपी फिरवून प्रेक्षकांकडून पैसे गोळा करतात आणि बँडच्या तालावर विंगेत जातात. ते बाहेर येतात तेव्हा खरोखरच हे सगळे चित्रविचित्र प्राणीपक्षी त्यांच्यामागे आलेले दिसतात. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो. पण, ही मिरवणूक थोडं अंतर चालली की एकेका प्राण्यावर चिकटवलेले अवयव गळून पडायला लागतात, पट्ट्यांंचे रंग विरू लागतात, पक्ष्यांची रंगीत पिसं गळायला लागतात. प्रेक्षकांच्या लक्षात येतं की इथलेच प्राणी पक्षी रंगरंगोटी करून तिकडून आल्याचं भासवून रिंगमास्टर सर्कसप्रमुखाने आपल्याला फसवलं आहे…प्रेक्षकांचा गोंधळ सुरू असतानाच सर्कशीतला सगळ्यात मोठा प्रयोग सादर होतो… सगळा अंधार होतो आणि उजेड झाल्यावर सर्कसचा तंबूच गायब झाला आहे, असं प्रेक्षकांना दिसतं…
…लोकहो, ही सर्कस पाहताय ना तुम्ही? पाहिलीच पाहिजे. विचार न करता हौसेने तिकीट काढल्यावर आता नशिबाचा खेळ पाहण्याशिवाय गत्यंतरच काय म्हणा!

Previous Post

तीर्थावळीतील तत्त्वज्ञान

Next Post

झाडं मारून प्रगती? शेवटी ठरणार आत्मघाती!

Next Post
झाडं मारून प्रगती? शेवटी ठरणार आत्मघाती!

झाडं मारून प्रगती? शेवटी ठरणार आत्मघाती!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.