• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

का रे वेड्या मना तळमळसी?

(टोचन) - टोक्या टोचणकर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 22, 2021
in कारण राजकारण
0
का रे वेड्या मना तळमळसी?

(चिन्मय आढ्याकडे नजर लावून बसला आहे. मध्येच उसासे टाकतो आहे. कूस बदलतो आहे. पलीकडे बसलेला तन्मय त्याच्याकडे उत्सुकतेने पाहतो आहे. शेवटी न राहवून तो विचारतोच.)
तन्मय : काय रे, झोपत का नाहीयेस?
चिन्मय : काय होणार देशाचं काही कळत नाहीये.
तन्मय : काय व्हायचंय? आता बरंच होईल की. हटवादी ट्रम्प तात्यांना लाथ दिली की आपण. आता बायडेन आलेत, चिंता कशाला?
चिन्मय : या देशाचं नाही रे बोलत, आपल्या देशाबद्दल बोलतोय…
तन्मय : आपला देश? अरे, इथलं ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी तनमनधनाने अमेरिकन होऊन राहण्याची, एकनिष्ठतेची शपथ घेतली ना आपण. आता हाच आपला देश. की भारताला अच्छे दिन आले आहेत, असं समजून तू परत निघालायस तिकडे?
चिन्मय : नाही रे. मी कसला जातोय तिथे. काय अवस्था आहे ते माहिती नाहीये का?
तन्मय : काय अवस्था आहे? सगळं मस्त आहे की! विकासगंगा वाहते आहे. देश प्रगती करतो आहे. बलवान होतो आहे. ज्याची इतकी वर्षं तुला लाज वाटत होती, तो देश आता एकदम प्रिय झाला आहे, अभिमानास्पद झाला आहे. हौडी हौडी करत नाचत होतास की दीड वर्षापूर्वी.
चिन्मय : ते सगळं बरोबर आहे. पण तिथे गुणवत्तेला वाव आहे का? सगळी आरक्षणबाजी. म्हणून तर इकडे यावं लागलं.
तन्मय : कुणाचाही भक्त असलास तरी असा फेकू नकोस. तुझा आणि आरक्षणाचा संबंध काय? आरक्षण आहे सरकारी नोकर्‍यांत. ती तू करणार होतास? तिथेही तुला गुणवत्तेच्या आधारावर संधी मिळालीच असती. आपण सगळे त्या देशात आपल्या राहण्यायोग्य वातावरण नाही, सुखसुविधा नाहीत, त्या इथे आपल्या गुणवत्तेच्या आधारावर मिळतात म्हणून आलो आहोत. आणि हेही लक्षात घे की ज्यांच्या आरक्षणाच्या नावाने तू बोटं मोडतोयस, त्यांच्यातलेही अनेक जण विना आरक्षणाचे इथे आलेले आहेतच.
चिन्मय : हे बघ. देश सोडला म्हणजे सगळं सोडलं का? माझेतुझे आईबाबा आहेत तिथे.
तन्मय : ते त्यांच्या निवडीने तिथे आहेत आणि आपण त्यांना इथे आणत नाही म्हणून तिथे आहोत. इथे त्यांचं मन रमत नाही, त्यांच्यावरचे औषधोपचार इथे परवडत नाहीत, त्यांच्याशी पटत नाही, म्हणून ते तिथे आणि आपण इथे आहोत. त्याचा देशाशी काय संबंध?
चिन्मय : अरे पण आपण लहानाचे मोठे झालो तिथे. तिथे हे काय चाललंय? अंबानींच्या घरासमोर स्फोटकं भरलेली गाडी? तिकडे ममतादीदीची प्लास्टरबाजीची नौटंकी!
तन्मय : भावा, तुझं नाव किरीट आहे की आडनाव पात्रा आहे. की तू अख्खाच्या अख्खा अर्णब गोस्वामी आहेस? अंबानींच्या घरासमोर जिलेटिनच्या काड्यांची गाडी म्हणजे काडेपेटीच आहे रे साधी. ती कोणी आणि का ठेवली आहे, याचा तपास होण्याच्या आत कुंकू पुसून बांगड्या फोडून घ्यायला तू काय विरोधी पक्षनेता आहेस का? त्यांच्या दारात गाडी ठेवून कोणाचं भलं होणार आहे, ते दिसत नाहीये का तुला? सुशांत सिंगच्या वेळेलाही असाच नाच नाच नाचत होतास, फुटाण्यासारखा तडतडत होतास. कंगनासारखा बेकाबू झाला होतास. नंतर थंड कसा पडलास? काय निघालं तो डोंगर पोखरून?
चिन्मय : अरे पण केवढे मोठे उद्योगपती आहेत ते.
तन्मय : व्यावसायिक म्हणतात त्याला. उद्योगपती वेगळे असतात. शिवाय त्यांची काळजी वाहायला त्यांनी वरपर्यंत माणसं नेमलेली आहेतच की. ती दिवसरात्र दुसरं काय करत असतात. नसत्या चिंता वाहण्यात प्रवीण आहेत की इतर लोक. तू कशाला वाहतोस त्या?
चिन्मय : बरं बाबा, धीर धरतो थोडे दिवस. पण ममताच्या नाटकांबद्दल तरी माझं बरोबर आहे की नाही?
तन्मय : भावा, कोणाच्याही नाटकांबद्दल काही बोलणं तुला शोभतं का रे? तू साक्षात नटसम्राटांचा चाहता आहेस. रोज नवनवे खेळ, नवनवे प्रयोग, नवनव्या वेशभूषा, केशभूषा, कधी हसू, कधी हुकमी रडू, असा सगळा भारत नाट्यमंदिर झाले आहे देशाचे. त्यात तू पिटातला प्रेक्षक. तिकडे चीनला नकली ढिशुम् दिलं की तू इकडे भिंतीवर हात आपटून तो सुजवून घेतोस. जिथे पाया पडतील तिथला पाया उखडणार, हेही तुझ्या लक्षात येत नाही. तो बेमालूम अभिनय गोड वाटतो की नाही? मग कुठेतरी, कधीतरी जैसे को तैसा मिळतोच रे बाबा! दीदीने केली तर ती नौटंकी आणि…
चिन्मय : बस बस बस. एक शब्द बोलू नकोस. तू मायभूमीला विसरलास. तिच्याविषयी काहीच कर्तव्यभावना नाही राहिली तुझ्या मनात.
तन्मय : नाही मित्रा, चुकीचं बोलतोयस तू. मातृभूमीबद्दल मला प्रेम आहे आणि ती सोडून आल्याची खंतही. पण आता त्या देशात जे काही सुरू आहे, ते निभावून न्यायला, केलेल्या चुकांतून सावरायला तिकडेच राहिलेले लोक समर्थ आहेत. त्यांची इथे बसून आपल्या सोयीने काळजी वाहायची गरज नाही. तुला आणि मला ट्रम्प की बायडेन यातूनच निवड करायची आहे. ती नीट करू या. आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यलढ्यात नाही लढले आपले पूर्वज. आपण निदान दत्तक देशाशी तरी एकनिष्ठ राहून त्यांच्या पापांचं तरी परिमार्जन करू या थोडं फार.

Previous Post

माणूस भलाच होता, पण…

Next Post

कसा पण टाका

Next Post
कसा पण टाका

कसा पण टाका

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.