• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

काकांचा खून पचणार का?

इन्स्पेक्टर प्रधान (पंचनामा)

marmik by marmik
February 2, 2026
in पंचनामा
0
काकांचा खून पचणार का?

अनुपच्या वडिलांचे निधन झालेले होते. एकत्र कुटुंब असल्यामुळे सर्वजण एकाच घरात होते. दहावा आणि सर्व विधी होऊन गेले होते. त्यांचे खानदानी होलसेल किराणा दुकान देखील सुरू झाले होते. मागील दोन वर्षापासून भांडण करून सोडून गेलेली बायको देखील समाजाच्या भीतीने सासर्‍याचं कार्य करायला आली आणि ते संपवून परत गेली. त्यामुळे सर्वकाही आलबेल होऊ लागले होते.

अनुप मात्र कासावीस होऊ लागला होता. वडिलांच्या मृत्यूमुळे त्याने कसाबसा स्वतःवर कंट्रोल केला होता. त्याच्यात असलेली अक्काबाई म्हणजे इतक्या वर्षांची दारूची सवय त्याला शांत बसू देत नव्हती. त्यात डान्स बारमधील रिटाचाही सारखा मेसेज येत होता. माझ्या वडिलांची तब्येत ठीक नाही, टेस्ट करायची आहे, पैसे पाठवा… त्याला कळत नव्हतं की आता काय करावं? वडील हयात होते तेव्हा मागेल तेव्हा पैसे मिळत होते, रोज स्वतःच्या कारशिवाय कुठे जात नव्हतो, गावात सगळे आपल्याला शेठ म्हणत होते, रिटाच्या बारमध्ये आपली पत आहे. मित्र देखील आपण ओपनिंग केल्याशिवाय पार्टी सुरू करीत नव्हते… आता हे सर्व कसे होणार, या विचाराने त्याचे डोके भणभण करायला लागले होते.

रमेश काका अनुपच्या वडिलांना रागावायचे, पण पप्पा लपून पैसे देतच होते. अनुप विचार करत होता, मागच्या दिवाळीला दुकानातील पैसे चोरताना काकाने पकडले नसते तर आज आरामात दुकानातूनच रोजचे पैसे काढता आले असते. आता तर त्यांनी दर महिन्याला आईला पैसे देणार आहोत, असे स्पष्टच सांगून टाकले आहे. दादाला दुकानात बसायला सांगितलं आहे आणि मला दुकानाच्या गल्लीत जरी दिसलो तरी सोडणार नाहीत, असे निक्षूनच सांगितले आहे. आता काय करायचं?.. काका तर भूत बनून दुकानाचा ताबा घेऊन बसला आहे… तो गेल्याशिवाय काय आपलं काही खरं नाही… असे नाना विचार त्याच्या मनात घोळत होते…

दहावा झाला आता उद्यापासून काकाला मस्का मारून दुकानात प्रवेश मिळवू, थोडा इमोशनल ड्रामा करू, पाहिजे तर पाय पकडू… नंतर तर आपलं ठरलं आहे त्याप्रमाणे काकालाच दुकानात पाय ठेऊ द्यायचा नाही, असे स्वप्न रंगवत अनुप झोपी गेला. सकाळी अचानक आईने त्याला उठवलं, ती बोलली, तुला काका बोलावत आहे, जा लवकर… अनुपला वाटले, देवच पावला.. काका बोलावतो आहे म्हणजे आजपासूनच दुकानात जायला मिळणार… तो लगेच अंथरुणातून उठला. वायुवेगाने आवरून काकांकडे गेला.. काकांनी आधी भरपूर उपदेश पाजला. त्यानंतर म्हणाले, तुला आता दारू सोडावी लागेल नाही तर घर… काय ते तू ठरव…. चल आपण घोडके डॉक्टरांना विचारून तुला व्यसनमुक्ती केंद्रात काही दिवस ठेवू… मला जर वाटले की तू सुधारला आहेस, तर मगच मी पुढचा विचार करेन… चल आपली कार काढ… ११ वाजेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे.

डॉक्टरांचा फोन लागत नाही, आपण डायरेक्ट जाऊ या, चल लवकर… अनुप एकदम हादरून गेला… त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

तो गोंधळलेल्या स्थितीत खाली आला आणि कार काढली. गावापासून साधारण नऊ किलोमीटर अंतरावर डॉक्टरांचे हॉस्पिटल होते… रस्त्यात अनुपच्या मनाचा गोंधळ उडालेला होता. राग, द्वेष, मनस्ताप सगळे एकावेळी दाटून आल्याने त्याने रागाच्या भरात अचानक काकांकडे दुकानात आणि शेतात वाटणी मागितली… काका भडकले… तुझ्या बापाची देखील माझ्याकडे कधी वाटणी मागायची हिम्मत झाली नाही आणि तू मागतोस?.. बेवड्या… आधी सुधार… नाही तर मुस्काटात देईन… त्यावर अनुपच्या रागाचा पारा चढला, त्याने कार बाजूला घेतली आणि काकावर हल्ला चढवला. काकाच्या तोंडावर जोरजोराने ठोसे लगावले. आधीच कृश आणि वयोवृद्ध असलेले काका वेदनेने कळवळू लागले होते. त्यांचा विव्हळण्याचा आवाज ऐकून अनुप भानावर आला.. त्याच्यातील सैतान त्याला सांगत होता की आता जर काका वाचला तर दुकान, घर सगळ गेलं, काका जिवंत असेपर्यंत भीक मागावी लागेल… तो घाबरला, त्याने पॅन्टचा पट्टा काढून शेवटी मनातील सैतानाचे ऐकायचे ठरविले. दोन्ही हाताने पट्ट्याने काकाचा गळा पूर्ण शक्तिनिशी आवळला. काकाची तडफड बंद होईपर्यंत त्याने गळा सोडला नाही…

त्यानंतर काही क्षणात अनुप भानावर आला, त्याच्या लक्षात आले की आपल्या हातून खून झालेला आहे… तो घाबरला, त्याने काही वेळ विचार केला, आम्ही डॉक्टरकडे जाणार हे घरात कोणालाच माहीत नाही, त्यामुळे आपण सांगू की नामगाव फाट्यावर त्यांनी सोडायला सांगितले, माझे काम आहे, काम झाले की काही वेळाने फोन करतो मग मला घ्यायला ये… त्यामुळे मी त्यांना सोडले आणि परत आलो… तिथे काही सीसीटीव्ही कॅमेरा नाही, त्यामुळे काका उतरताना दिसणार नाही. पण मी सांगतो ते खरे आहे, याचा पुरावा लागेल… सर्वांना खात्री पटवून द्यावी लागेल… त्याचे मन खुनी आणि पोलिस दोन्ही बाजूने विचार करू लागले… मग त्याने विचार केला की गांधी चौकात डायमंड परमिट रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, आपण नेहमीच तिथे जातो, आता सकाळी ते उघडलेले नसणार, त्यामुळे तिथे कोणी नसणार, त्या कॅमेर्‍यासमोर जाऊन पुरावा तयार करू या.

त्याने काकाचे मृत शरीर जणू काही जिवंत आहे असे सेफ्टी बेल्टने बसलेल्या  स्थितीत ठेवले आणि कॅमेर्‍यात दिसेल अशी कार उभी करून समोर त्याला ओळखत असलेल्या मेडिकलमध्ये जाऊन डोकेदुखीची गोळी घेतली आणि कारच्या ड्रायव्हरच्या बाजूने येऊन काही हातवारे करून बोलून परत मेडिकलमध्ये जाऊन सांगितले की काका कारमध्ये बसले आहेत, त्यांना ताप पण आहे… तर ही गोळी चालेल का? त्यावर मेडिकलमधील व्यक्तीने त्याला अजून एक गोळी दिली… त्यानंतर तो कारमध्ये बसला… काही अंतर गेल्यावर शिवानी वाडीकडे जाणार्‍या फाट्यावर निर्मनुष्य ठिकाणी कार थांबवून काकांची बॉडी पूर्ण तपासली. खिशातील पैसे कागद काढून घेतले आणि मोबाईल स्विच ऑफ केला. काकाच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि अंगठी काढून घेतली. कोणतीही ओळख राहिली नाही याची खात्री करून बॉडी कारच्या डिकीत ठेवली.

त्यानंतर तो नामगाव फाट्यावर गेला. काही वेळ कार फाट्यावर उभी केली तिथे एकदोन अनोळखी व्यक्ती उभ्या होत्या, त्यांच्यापासून नजर चुकवत काही मिनिटं थांबला. परत येत असताना अजून काय करू, ही बॉडी कुठे लपवू हा विचार करताना त्याला नामा कोळी रोडच्या कडेला बसलेला दिसला. डायमंड परमिट रूममध्ये रोजच असणारा आणि कधी कधी त्याच्याच टेबलावर बसणारा हा गंजेडी पंटर. थोडे पैसे दिले की तो काहीही करायला तयार होतो, याचा आपण उपयोग करून घ्यायचा असे ठरवून त्याने कार थांबविली. त्याने त्याच्याजवळ जाऊन काही वेळ गप्पा मारल्या आणि त्याला विश्वासात घेऊन बोलला की माझ्या वडिलांचे निधन झाले आहे, त्यांना मरताना मी वचन दिले आहे की मी यापुढे दारू पिणार नाही… माझ्याकडे तीन खंबे दारू आहे. आता मला त्याचा उपयोग नाही… तुला पाहिजे आहे का? तुला नको असतील तर दुसर्‍याला देतो… हे ऐकल्यावर नामा लगेच तयार झाला… तो तयार आहे याची खात्री झाल्यावर अनुपने आपला खरा डाव टाकला. तो नामा कोळीला म्हणाला की आता १२ वाजले आहेत, तू मला बरोबर दोन वाजता या फोनवरून माझ्या या फोनवर फोन कर… मी फोन उचलला की मी सांगतो त्या ठिकाणी ये… मी तुला फोनवर ‘काका बोला’ असे बोलेन, हा आपला कोडवर्ड असेल… त्यावर नामा थोडा गोंधळला. असे का हे त्याने विचारल्यावर अनुप याने सांगितले, अरे माझे वडील वारले आहेत ना, त्यामुळे कामाशिवाय बाहेर येता येत नाही… म्हणून मी आईला सांगणार की मित्राचे काका कॉर्पोरेशनमध्ये कामाला आहेत, डेथ सर्टिफिकेट काढायचे आहे, म्हणून कॉल आला आहे… मग मला निघता येईल… तुला जमणार नसेल तर राहू दे, दुसर्‍याला सांगतो… त्यावर नामाने विचार केला की काय करायचं आहे?.. दारू फुकट मिळत आहे ना… बस झाले… असे म्हणून त्याने काकांचा फोन अनुपकडून घेतला…
अनुपला खात्री झाली की आता मला कोणी पकडू शकत नाही… आपण किती स्मार्ट आहोत… या विचारात त्याने कार घरच्या दिशेने घेतली… घरी पोहोचल्यावर काकांची डेड बॉडी तशीच डिकीत ठेवून जणू काही घडले नाही अशा आविर्भावात घरात गेला… हॉलमध्ये काकू आणि आई बसलेली पाहून दोघींना म्हणाला की काकांनी मला नामगाव फाट्यावर सोडायला सांगितलं होतं. त्यांना तिथे सोडून आलो आहे. त्यांचा फोन आला की परत आणायला जायचे आहे… जेवायला वाढ… काकूने विचारले, त्यांचे काय काम होते तिथे?.. त्यावर अनुप म्हणाला, मला काय माहित? त्यांनी सांगितले म्हणून मी सोडले. घरी पोहोचेपर्यंत दीड वाजले होते… अनुपने टाईमपास करत वेळ काढला… दोन वाजायला थोडाच वेळ राहिलेला असताना त्याने आईला सांगितलं, मला खूपच भूक लागली आहे, जेवायला वाढ. मोबाईल फोन चार्जिंगला लावून तो जेवायला बसला… त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते… सगळे लक्ष घड्याळाकडे होते… बरोबर दोन वाजले तरी फोन येत नव्हता, त्यामुळे त्याची घालमेल चालू होती… तेव्हाच फोनची रिंग वाजली… त्याने आईला सांगितले, बघ बरं, कोणाचा फोन आहे. आईने नाव पाहून सांगितलं, दिनू काकांचा फोन आहे. त्याने लगेच स्वतः उठून तिच्या हातातून लगेच फोन घेतला आणि बोला काका म्हणून बोलायला सुरुवात केली आणि मघाशी जिथे सोडलं तिथेच येतो, जेवण झाले की लगेच येतो… येताना घेऊन येतो, असे बोलून फोन ठेवला… कसाबसा जेवला आणि बेडरूममधून काही कागदपत्रे आणि त्याखाली लपवून ठेवलेला दारूचा खंबा लपवून घेत निघाला…

सगळं प्लॅनप्रमाणे चालले आहे आता फक्त बॉडीची कशी विल्हेवाट लावायची हा प्रश्न राहिला होता. त्याच्या डोक्यात अनेक विचार चालू होते. त्यावेळी अचानक त्याला आठवले की नामगावजवळच थोडा घाट आहे. तिथे दरीत सहसा कोण जात नाही तिथे लपवून ठेवू. तो लगेच खंडोबाच्या डोंगर घाटात गेला. त्याने घाटातून दरीत बॉडी फेकून दिली. आपल्याला कोण पाहत नाही याची खात्री केली. आता काही धोका नाही या आनंदात नामा कोळी याला भेटला. त्याला दारूचा खंबा देत म्हणाला, याबद्दल कोणाला सांगू नको, माझ्याकडे अजून दारू आहे तुला आणून देतो. तू कोणाला सांगितलं तर ते पण मागतील मग त्यांना द्यावी लागेल, तुला मिळणार नाही. त्याच्याकडून अनुपने काकाचा फोन घेऊन स्विच ऑफ केला. परत येत असताना काकाला जिथे टाकले होते त्या भागात चालत्या गाडीतून फोन दरीत फेकून घराकडे निघाला.

रस्त्यात त्याच्या मनात विचार येत होता, काही राहिले तर नाही ना… पुरावा सुटला तर नाही ना… असे अनेक विचार चालू होते.. अचानक त्याला आठवले की आपण याच गाडीत काकाला मारले आणि बॉडीही ठेवली होती… गाडीत तर काही पुरावा राहिला नाही ना?… कार वॉश करून घेऊ… टेन्शन राहणार नाही. त्याने कार वॉशिंग सेंटरमधून आतून बाहेरून धुवून घेतली. तोपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते. त्याच्या प्लॅनप्रमाणे चालले होते.

अनुप घरी आला आणि त्याने विचारलं, काका आले का, त्यांचा फोन लागत नाही… मी बराच वेळ वाट पाहून परत आलोय. काकू आणि आई काळजीत पडल्या. त्यांनी सगळीकडे फोन केले, माणसं पाठवली. परंतु काही शोध न लागल्याने रात्री १० वाजता पोलीस ठाण्यात काका हरवल्याची तक्रार काकू आणि अनुप यांनीच जाऊन दिली.

(क्रमश:)
(खर्‍याखुर्‍या गुन्ह्यांच्या तपासावर आधारित लेखमाला)

Previous Post

चित्तरंजन कोल्हटकर, माझे स्फूर्तिस्थान

Next Post

प्रेमशून्य नात्याचा कटू शेवट!

Next Post
प्रेमशून्य नात्याचा कटू शेवट!

प्रेमशून्य नात्याचा कटू शेवट!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.