
१९८० ते १९८८
लष्करातले लोक आणि नागरिक मिळून सुमारे १७ लाख माणसं मेली.
***
युद्धपूर्व स्थिती
इराणचं क्षेत्रफळ १६.४८ चौ.कि.मी., लोकसंख्या ३.९ कोटी. इराकचं क्षेत्रफळ ४.३८ लाख चौ.कि.मी. लोकसंख्या १.३ कोटी.
इराकमध्ये ३० टक्के सुन्नी असतात, बाकीचे शिया व इतर. इतरांना वाटतं की बहुसंख्य नसून सुन्नी आपल्यावर दादागिरी करतात.
इराणमध्ये ९० टक्के प्रजा शिया.
युद्ध झालं तेव्हा इराकमध्ये सद्दाम हुसेन प्रेसिडेंट होते, इराणमध्ये खोमेनी सर्वोच्च नेते होते. दोघांमध्ये वितुष्ट होतं. एक कारण धार्मिक, सुन्नी वि. शिया. दुसरं कारण सांस्कृतिक. सद्दाम अरब आणि खोमेनी फारसी. सद्दामला अरब-आखाती जगाचं नेतृत्व होतं आणि इराणवर मात करायची होती. खोमेनीना त्यांची शिया क्रांती इराकमध्ये आणि एकूणच इस्लामी जगात पसरवायची होती.
वितुष्ट तात्विक होतं आणि वैयक्तिकही होतं.
दुसरी भानगड जलवाहतुकीची. तैग्रीस-युफ्रेटिस ही संयुक्त नदी इराण आणि इराकमधून वाहते. दोन नद्यांचा संगम झाल्यापासून शत अल अरबपर्यंतचा नदीचा प्रवास इराक-इराणला सामाईक आहे. शत अल अरबनंतर नदीचा प्रवाह इराकच्या मालकीचा होतो. संगम ते शत अल अरबपर्यंतच्या नदीवर दोन्ही देश हक्क सांगतात. त्यावरून इतिहासात अनेक मारामार्या आणि लढाया झाल्या आहेत. आजही ते भांडण शिल्लक आहे. भांडण झालं की इराक इराणी जहाजांना परवानगी देत नाही. मग लढाई सुरू. दोन्ही देशांचं उत्पन्नाचं मुख्य साधन तेल. युद्ध सुरू झालं की एकमेकांच्या तेलविहिरी उद्ध्वस्त करायच्या.
अशा एकूण दीर्घ किचकट भांडणातला एक टप्पा म्हणजे १९८० सालचं युद्ध. इराककडं दोन लाखांचं खडं सैन्य होतं; रणगाडे, तोफा आणि चिलखती गाड्यांची संख्या सहा हजारपेक्षा जास्त होती. इराककडं ८० हजार लढाऊ विमानं होती. इराणकडं १.५ लाख सैनिक आणि ७० हजार विमानं होती. इराणकडली विमानं अमेरिकेनं दिलेली होती, आधुनिक होती. पण इराणनं त्यांची काळजी घेतली नव्हती. विमानाच्या सुट्या भागांचा साठा इराणजवळ नसल्यानं इराणची विमानं कार्यक्षम नव्हती.
इराककडं रशियानं पुरवलेली मिग विमानं होती. जुनाट होती. परंतु इराकनं त्यांची नीट काळजी घेतला असल्यानं ती कार्यक्षम होती. सद्दाम हुसैनला लष्करी अनुभव होता. इराकचं सैन्य बरंच व्यावसायिक होतं. सद्दाम जनरलना गोळा करून, त्यांच्याशी चर्चा करून रणनीती ठरवत असे. त्यामुळं लष्कराच्या हिशोबात इराकची स्थिती चांगली होती.
पण इराकचा एक प्रॉब्लेम होता. सद्दाम हुसैन. सद्दाम हुसैन विलक्षण आत्ममग्न होता. आपल्याला सारं समजतं, आपण राजकारण आणि लष्कर दोन्ही बाबतीत हुशार आहोत अशी त्याची समजूत होती. त्याला एकहाती सत्ता हवी होती. कोणीही त्याच्या जरासा जवळ आला आणि सत्तेत वाटा मागू लागला की सद्दाम त्याचा काटा काढत असे. प्रत्येक हुकूमशहाला एक असुरक्षिततेचा गंड असतो. जग आपल्या विरोधात आहे, जगातला प्रत्येक माणूस आपल्याला सत्तेतून हाकलायच्या प्रयत्नात आहे, असं हुकूमशहाला वाटत असतं. हुकूमशहा संशयी असतो, तो कोणावरही विसंबून राहात नाही, कोणावरही विश्वास ठेवत नाही. हुकूमशाहीची ही सर्व लक्षणं सद्दाममध्ये होती. त्याचा भाऊ लष्करातला एक निष्णात जनरल होता. सद्दामनं त्याचाही खून केला होता.
इराणमध्येही अली खोमेनी यांची हुकूमशाही होती. पण ती इराकसारखी सेक्युलर हुकूमशाही नव्हती, धार्मिक हुकूमशाही होती. खोमेनीना लष्कराचा किंवा कुठल्याही कारभाराचा अनुभव नव्हता. तरीही जगातल्या प्रत्येक गोष्टींवर त्यांचं उत्तर असे. ते उत्तर धार्मिक होतं. खोमेनीनी लावलेल्या कुराणाच्या अर्थानुसार सार्या गोष्टी घडायला हव्यात असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळं त्यांचा एक प्रकारच्या धार्मिक बेभानपणावर जोर असे. इराणच्या सैन्यात व्यावसायिकतेला महत्व नव्हतं. धर्माचरण करणार्या अधिकार्याना सैन्यात बढती मिळत असे. सैन्याच्या प्रत्येक युनिटमध्ये मुल्ला होते. त्यांचा सल्ला-आदेश सैन्याच्या युनिटला बंधनकारक असे. यात काही वावगं आहे असं सैन्याला वाटत नसे. सैन्य कारवाईसाठी पुढं सरकत असे तेव्हां तुकड्यांसोबत मुल्ला असे. एकूणात असं की लढाई किंवा कोणत्याही संकटकाळात खोमेनी यांचे निर्णय व्यावसायिक नसल्यानं अपेशी ठरत, देशाचं नुकसान होत असे. पण कोणी त्यावर बोलत नसे.

हुकूमशाही आणि धर्मवट या दोन घटकांमुळं युद्धाच्या एकूण कामगिरीत इराणनं खूप चुका केल्या. मुळातच इराकशी केलेलं भांडणंही अयोग्य आणि तर्कहीन होतं. तेच इराकलाही लागू पडतं. इराकचेही निर्णय चुकत होते. दोघांनी व्यावसायिक कौशल्य असलेल्या अधिकार्यांची सैन्यातून व कारभारातून हाकललं होतं. एकूणात सद्दाम हुसैन आणि अली खोमेनी या दोघांचेही बाहू फुरफुरत होते, दुसर्याला संपवण्यासाठी.
********
१९८०च्या मार्च महिन्यात खोमेनी यांनी जाहीर भाषणात इराकी जनतेला आवाहन केलं की त्यांनी सद्दाम हुसैन यांची राजवट उलथवावी. सद्दाम इस्लामी क्रांतीच्या आड येत आहेत आणि इराकमधल्या शियांवर अत्याचार करत आहेत अशी कारणं सांगितली… इराणचे उप पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांच्या खुनाचे प्रयत्न बगदादमध्ये झाले. तेहरान आणि इराणमधल्या अनेक शहरांत इराकी कचेर्यांसमोर निदर्शनं झाली. इराकनं शिया धर्मगुरूला फासावर लटकवलं, शियांची प्रचंड धरपकड सुरू केली. इराणनं संशयित इराकी हस्तकांना फासावर लटकावलं. इराकमध्ये इराण्यांनी दंगे केले, इराणमध्ये इराकींनी दंगे केले. दररोज कुठं ना कुठं तरी दंगा उसळत असे.
सद्दाम हुसैन रियाधमध्ये जाऊन सौदी राजांना भेटले आणि आपण इराणवर लष्करी कारवाई करत आहोत अशी पूर्वसूचना दिली. सौदी राजांनी प्रतिक्रिया जाहीर केली नाही. सौदी आणि इराणमध्ये दुरावा असतोच. इराक परस्पर कारवाई करणार असेल तर बरंच झालं असा विचार सौदीनं केला असणार. त्यांची आक्रमणाला मान्यता आहे असं सद्दाम हुसैन धरून चालले. १७ सप्टेंबर १९८० रोजी सद्दाम हुसैन यांनी जाहीर केलं की ते १९७५ साली केलेला समझौत्याचा अल्जियर्स करार धुडकावून लावत आहेत; शत अल अरबवर इथून पुढे इराकचा पूर्ण ताबा असेल.
२३ सप्टेंबर १९८० रोजी इराकच्या फौजा ठिकठिकाणी इराणमध्ये घुसल्या.
युद्ध सुरू झालं.
*********
१९८०.
सप्टेंबर महिन्यात इराकनं इराणवर सुरुवातीला हवाई हल्ला केला. इस्रायलनं जसा अचानक इजिप्तमधल्या हवाई तळांवर हल्ला करून हवाई दल निकामी करून टाकलं होतं, तसंच या हल्ल्याचं नियोजन होतं. विमानं धावपट्टीवर नष्ट करायची, धावपट्ट्याही नष्ट करायच्या. इराकनं १९२ विमानं वापरली, अनेक हवाई तळांवर हल्ले केले. या हल्ल्याला अपेक्षित यश आलं नाही. धावपट्ट्यांचं काही नुकसान झालं, पण इराणनं रातोरात पट्ट्या दुरुस्त केल्या. पाच विमानंच नष्ट झाली, बाकीची इराणनं दुरुस्त केली. इराकच्या हल्ल्यांमध्ये अचूकता नव्हती.
इराकचा हल्ला संपला. इराकला अनपेक्षित अशी घटना घडली. इराकचा हल्ला संपतो न संपतो तोवर इराण सावरलं. इराणनं २०० विमानं इराक विरोधात लढाईत आणली. त्यापैकी १४० विमानं इराकच्या हद्दीत गेली, इराकच्या विमानतळावर आणि लष्करी तळावर त्यांनी हल्ला केला, खूप नुकसान केलं. इराणच्या विमानांनी इराकच्या तुवैत अॅटोमिक रिअॅक्टरवर हल्ला केला. इराकची अण्वस्त्र तयार करण्याची क्षमता नष्ट करावी असा इराणचा हेतू होता. इराकला इतक्या खोलवर इराणची विमानं जातील अशी अपेक्षा नव्हती. पण इराणी लष्करी निरीक्षणं आणि इंटेलिजन्स सदोष होतं, हल्ला अचूक झाला नाही.
रिअॅक्टरचं बाहेरून नुकसान झालं, इराकनं दुरुस्त्या करून रिअॅक्टर सुरूही केला. पण नंतर पुढल्या वर्षी इस्रायलनं या रिअॅक्टवर अचूक हल्ला केला आणि तो उद्ध्वस्त केला. इराणचं काम इस्रायलनं पूर्ण केलं.
उत्तर इराकमध्ये, इराणच्या हद्दीपासून दूर असलेल्या अल हुरियत या विमानतळावर इराणी विमानांनी हल्ला केला. इराकी विमानं आणि विमानविरोधी शस्त्रांना तोंड देत इराणनं हा हल्ला यशस्वी केला. हवाई तळ नष्ट झाला आणि इराकची काही लढाऊ विमानं पूर्ण नष्ट झाली. या मोहिमेत इराणनं सव्वा लाख सैनिक, तोफखाना आणि रणगाडे इराकमध्ये नेले. खोर्रमशहर इत्यादी महत्वाची ठिकाणं काबीज करणं, शत अल अरब बंदर ताब्यात घेणं, तेहरानपासून पश्चिमेकडली आघाडी तोडणं असा या हल्ल्याचा उद्देश होता. जमल्यास अबादान हे तेलसंस्कार केंद्रही इराणला ताब्यात घ्यायचं होतं. बहुतेक ठिकाणी इराणनं इराकची दौड थांबवली. सद्दाम हुसेनना अपेक्षित नसलेली गोष्ट घडली. इराणनं हौशी सैनिकांच्या लाटाच्या लाटा आघाडीवर पाठवल्या. त्यांनी इराकी सैन्याला रोखलं.
दोन्ही बाजूनी खूप नुकसान झालं.
कधी इराकची मोहीम यशस्वी होई, तर कधी इराणची. पण इराकला इराणकडून एवढा कडवा प्रतिकार होईल हे अपेक्षित नव्हतं. खूप नुकसान झाल्यावर पळवाट म्हणून इराकनं युद्धाच्या तहकुबीचा प्रस्ताव मांडला. युनोच्या या प्रस्तावाला इराणनं नकार दिला.
युद्ध थबकलं, संपलं नाही.
१९८१
दोन्ही बाजू आपापलं नुकसान भरून काढण्यात अडकल्या होत्या. दोघांनीही सैन्यभरती केली, शस्त्रात्रं जमवली. वर्षभरात दोन मोठ्या लढाया झाल्या.
देझफुल हे इराणी गाव इराकच्या हद्दीवर आहे. इराणचे रणगाडे इराकच्या हद्दीत घुसले. इराण रणनीतीत कच्चं होतं. रणगाडे चाल करून गेले, पण त्यांच्या रक्षणासाठी इराणनं पायदळाची योजना केली नव्हती. इराकनं रणगाड्यांच्या डाव्या उजव्या बाजूनं रणगाड्यांना घेरलं. इराणच्या रणगाड्यांना चारही बाजूनी मारा सहन करावा लागला. इराणचे २०० रणगाडे नष्ट झाले. इराणला हा फार मोठा फटका होता.
इराणनं जमिनी लढाईतलं नुकसान हवाई लढाईत भरून काढलं. इराकनं इराणकडून हल्ले होऊ नये म्हणून हवाई तळ उत्तरेला
जॉर्डनच्या हद्दीवर नेला होता. इराणनं लढाऊ विमानामध्ये हवेतच तेल भरण्याचं तंत्र साध्य केलं आणि इराकी तळावर हल्ला केला. इराकची पन्नासेक लढाऊ विमानं या हल्ल्यात नष्ट झाली.
हे दोन हल्ले वगळता लढाई थंड पडली होती.
१९८२
लढाया होत राहिल्या. काही इराणी गावं इराकच्या ताब्यात आली, काही इराकी गावांवर इराणचा कबजा बसला.
खोर्रम शहरची लढाई ही एक महत्वाची लढाई झाली. खोर्रम शहर इराणमध्ये आहे पण तिथली ७० टक्के जनता इराकी आहे. हे शहर आपलंच आहे असा दावा इराक नेहमी करत असतं. लढाईच्या सुरुवातीला १९८० साली इराकनं या शहरावर कब्जा केला होता. ते शहर परत मिळवणं हा इराणच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. इराणनं हल्ला केला. प्रचंड पायदळ होतं. त्याला हवाई संरक्षण होतं. इराणची ताकद एवढी होती की खोर्रम शहर पटकन पडलं.१० हजार इराकी मारले गेले, १९ हजार इराकी शरण गेले, ३० हजार इराकी सैनिक वैâद झाले. इराणची ३० हजार माणसं (व्यावसायिक सैनिक + हौशी धार्मिक) मारले गेले. पण तांत्रिकदृष्ट्या इराकचा पराभव झाला. सद्दाम हुसेन भडकले. त्यांनी काही सेनापतीना जबाबदार धरलं गोळ्या घातल्या. इराकला अधिक मदत करण्याचा निर्णय अमेरिका आणि सौदी अरेबियानं घेतला.

उसंत मिळावी म्हणून सद्दाम हुसेननी दोन आठवड्याची युद्ध तहकुबी मागितली. खोमेनीनी नकार दिला. इराकचा पूर्ण पराभव होऊन तिथं पूर्ण इस्लामी क्रांती होत नाही, इराकमध्ये सत्तांतर घडत नाही (म्हणजे सद्दाम हुसेनना हाकललं जात नाही) तोवर युद्ध संपणार नाही असं त्यांनी जाहीर केलं.
दोन्ही देशांचं खूप नुकसान झालं होतं, अर्थव्यवस्था कोसळली होती, जनता दुःखी आणि नाराज होती. इराकमध्ये काही नेते-सेनापती म्हणत होते की सद्दाम हुसेननी काही काळासाठी पायउतार व्हावं. तसं झालं की इराण युद्ध थांबवेल. परिस्थिती निवळेल. पुढलं पुढं. सद्दामनी त्या नेत्यांना बोलावलं. नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांना बाजूच्या दालनात नेलं. गोळ्या घातल्या.
इराणमध्ये याच नाट्याची वेगळी आवृत्ती झाली. काही नेते आणि सेनापतीनी युद्ध थांबवावं, अशी विनंती खोमेनीना केली.
युद्ध तहकुबी झाली नाही. दोघांनीही नव्या चढाईची तयारी सुरू केली.
१९८३-८४, इराणनं बर्याच लढाया जिंकल्या, इराणचा लढाईवर वरचष्मा राहिला.
१९८५-८६ इराकनं बर्याच लढाया जिंकल्या, इराकचा वरचष्मा राहिला.
शहर आज इराणनं जिंकायचं, उद्या ते इराकनं जिकायचं, परवा पुन्हा इराणनं जिंकायचं, तेरवा इराकनं जिंकायचं. दर वर्षी पंधराएक लढाया व्हायच्या. जिंकत तर कोणीच नव्हतं. दोन्ही बाजूंनी माणसं मरतच होती. दोन्ही ठिकाणच्या जनतेला, लष्कराला लढाई नको होती. सद्दाम आणि खोमेनी सत्ता सोडायला तयार नव्हते. लढाई चालूच राहिली.
१९८८ मध्ये इराकनं रासायनिक बाँब वापरला. बाँबमधून विषारी वायू सोडला. लष्करावर नव्हे, सामान्य माणसं जिथं राहतात त्या शहरावर. हजार माणसं बाँब फुटल्यावर लगेच मरायची, हज्जारो माणसं घुसमटायची, तडफडायची. इराकनं जाहीर केलं की त्यांच्याकडे भरपूर रासायनिक बाँब आहेत, ते अख्खं इराण रसायन फवारून नष्ट करू शकतात.
या धमकीचा परिणाम झाला.
युनायटेड नेशन्सनं मांडलेला युद्धबंदीचा ठराव इराणनं मंजूर केला.युनोचे शांती सैनिक सरहद्दीवर पोचले. युद्ध थांबलं.
(क्रमश:)

