
अजित पवार
पिंपरी-चिंचवड-पुण्यानेही
फाटकन् आमच्या थोतरीत मारली
अंगात जेवढी होती मस्ती
एका क्षणात सगळी जिरली

काकांबरोबर कट्टी करून
त्यांचाच हात धरला मी
घड्याळासह तुतारीचाही
आवाज मातीत पुरला मी
पक्ष गेले खड्ड्यात तरीही
कुटुंब आमचे एक आहे
घोटाळ्यांना लपवू आम्ही
हाच इरादा नेक आहे
देवेंद्र फडणवीस
मित्रपक्षांना वेठीस धरून
फेकून देणे आमची रीत
मलाही कुणाची नाही पर्वा
नाही कुणाला कधीच भीत

भ्रष्ट नेतेही कामास येतात
अडीनडीला साथ देतात
तरीही वाकड्यात शिरले जर ते
खरपूस आमचा मार खातात
मित्र-मित्र म्हणता म्हणता
शिंदे-अजितनी दावला इंगा
खाल्ल्या अन्नास जागत नाहीत
कोण भुलेल यांच्या ढोंगा
एकनाथ शिंदे
एवढी चाकरी करूनसुद्धा
भाजपा देई मलाच दोष
माझे उमेदवार पाडूनसुद्धा
शांत होईना त्यांचा रोष

मुंबईत गेलो तीन नंबरला
पोटात माझ्या आला गोळा
यांच्यापुढे झुकलो नाही तर
करतील माझा चोळामोळा
आत्ता जमवून घेण्याशिवाय
माझ्यापुढे पर्याय नाही
साफ बरबाद होण्यापेक्षा
दुसरा नामी उपाय नाही
रवींद्र चव्हाण
माझी वायफळ बडबड नडली
लातूरात तर गाडीच अडली
विलासरावांवर केली कॉमेंट
भाजपाची मग खाटच पडली
रावणासारखा दहा तोंडाने
वाट्टेल ते मी बोलत होतो
आपलीच माणसं दुखावली मी
अहंकाराने डोलत होतो

अतिरेक तो पाहून माझा
फडणवीसांनी मारली थप्पड
गाल गोबरे चोळत बसलो
दिल्लीतूनही बसली झापड
जनता
सगळ्यांना काठावर ठेवून
दाखवून दिला माझा तोरा
कुणीही गमजा करू नये कधी
माझ्या तालावर नाच रे मोरा

कुणीही कधीही ओलांडू नये
लक्ष्मणरेषा ती पक्षाची
फुका फुशारकी मारु नये
स्वबळाच्या ताकदीची
फोडाफोडी करूनसुद्धा
फासे कधीही पडतात उलटे
भलेभलेही पडती उताणे
अंदाज सारे होती सुलटे

