अमेरिकेचे मावळते (किंवा खरंतर मावळलेले) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीआधीच जाहीर केलं होतं की लोकांच्या मनातला अध्यक्ष मीच आहे, ते मलाच निवडून देणार आहेत, तर उगाच निवडणुकीचे सोपस्कार कशाला करायला हवेत? निवडणूक जाहीर झाली तेव्हा म्हणाले, मी जिंकलेलोच आहे. मी चुकून हरलोच तर तो निवडणूक घोटाळाच असेल. मी हरूच शकत नाही. आपण पराभव मान्यच करणार नाही आणि व्हाइट हाऊस सोडणारच नाही, असे संकेत त्यांनी दिले होते.
असा प्रकार कोणी ऐकलेला नाही? ट्रम्प आजही धोरणात्मक ठरतील असे निर्णय घेतायत, जे त्यांनी घेणं अपेक्षित नाही. ते माथेफिरू आहेत. ते व्हाइट हाऊसमधून बाहेरच पडले नाहीत तर?
हा प्रसंग विरळा आहे, पण पहिला नव्हे.
चार मार्च १८०१ या तारखेला, २२० वर्षांपूर्वी हा प्रसंग होऊन गेलेला आहे. तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष जाॅन ऍडम्स यांनी असाच अडेलतट्टूपणा केला होता. जाॅर्ज वाॅशिंग्टन यांच्यानंतरचे ते दुसरेच अध्यक्ष होते यूएसएचे. व्हाइट हाऊस या अधिकृत निवासस्थानी निवास करणारे ते पहिलेच अध्यक्ष होते. १८०० सालातली निवडणूक थाॅमस जेफरसन जिंकले होते. पण, अध्यक्षांचं कार्यालय त्यांच्याकडे सोपवायलाच नकार दिला ऍडम्सनी. त्यावेळी ‘रूल ऑफ मिडडे जॅन्युअरी २०’ लिहिला जायचा होता. या नियमानुसार अध्यक्षीय निवडणुकीनंतरच्या वर्षात २० जानेवारीच्या दुपारी मावळत्या अध्यक्षांचं सगळं सामानसुमान व्हाइट हाऊसमधून हलवलं जातं आणि नव्या अध्यक्षांचं सामानसुमान आणून लावलं जातं. हा नियम नसलेल्या काळात नेमकं काय होणार असा प्रश्न होता… पण, ऍडम्स कार्यालय सोडत नाहीत म्हटल्यावर कार्यालय त्यांना सोडून गेलं!
थाॅमस जेफरसन यांच्या शपथविधीलाही ऍडम्स हजरही राहिले नाहीत. ऍडम्स बधत नाहीत, हे कळल्यावर व्हाइट हाऊसच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं बिऱ्हाड हलवायला सुरुवात केली. सुरक्षा विभागांनी सर्व प्रकारचा अधिकृत संपर्क तोडला. अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांनी ऍडम्स यांच्याकडून सूचना घेणंच थांबवलं. ऍडम्स हे जणू अस्तित्त्वातच नाहीत किंवा पारदर्शक बनले आहेत, अशा प्रकारे व्हाइट हाऊसचा सगळा कारभार सुरू झाला.
त्या घटनेनंतर ही अशी मानहानी सहन करायला लागू नये म्हणून सगळे मावळते अध्यक्ष २० जानेवारीच्या आधीच सगळी आवराआवर करून घेतात. अन्यथा, लष्कर, गुप्तचर संघटना, सीआयए, एफबीआय आणि व्हाइट हाऊसचा स्टाफ मावळत्या अध्यक्षाकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. ज्याच्या पाठिशी लोकेच्छा तो आपला बाॅस असं त्यांचं सिंपल सूत्र आहे.
बायडेन हे आता नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत म्हटल्यावर गुप्तचर संस्था मावळते आणि नवनिर्वाचित या दोन्ही अध्यक्षांना ब्रीफिंग करायला लागतील. सीआयएही तेच करील. कमांडर इन चीफ म्हणजे अध्यक्षांसाठीच असलेली टाॅप सिक्रेट माहितीही नवनिर्वाचित अध्यक्षांना दिली जाईल. सीआयएवर लक्ष ठेवणारी काउंटर इंटेलिजन्स टीमही दोघांना ब्रीफ करू लागेल. व्हाइट हाऊसचे कर्मचारी नवनिर्वाचित अध्यक्षांच्या अभिरुचीनुसार त्यांचं निवासस्थान सजवू लागतील. २० जानेवारीच्या दुपारी ट्रम्प यांच्या सगळ्या वस्तू बाहेर काढतील आणि नव्या अध्यक्षांच्या सगळ्या वस्तू आत आणल्या जातील- यासाठी त्यांना कोणाच्याही सूचनांची गरज नाही, तसा कायदाच आहे.
जानेवारीत ट्रम्प यांच्या पगारातून व्हाइट हाऊसच्या भाड्याची वजावट होणार नाही, ती बायडेन यांच्या पगारातून होईल. २० जानेवारीच्या दुपारी मेलेनिया ट्रम्प या व्हाइट हाऊसच्या बाॅस असणं थांबेल आणि जिल बायडेन या व्हाइट हाऊसच्या बाॅस बनतील. २० जानेवारीच्या दुपारपासून पेंटॅगाॅन ते एफबीआय सगळेच्या सगळे ट्रम्प यांच्याशी सर्व प्रकारचा संपर्क तोडतील. द बीस्ट आणि एअरफोर्स वन ट्रम्प यांना अखेरचा सलाम ठोकून बायडेन यांच्याकडे वळतील.
हे सगळं आपोआप होईल, कोणाच्याही सूचनांशिवाय. तशीच तरतूद आहे. त्यामुळे ‘मी जाणारच नाही, मी जाणारच नाही,’ या ट्रम्प यांच्या वल्गना पूर्णतया निरर्थक आहेत.