एका ग्रीक राजाची त्याच्याच एका महापराक्रमी योद्ध्यावर खप्पामर्जी झाली.
सम्राटाने नेहमीप्रमाणे सगळ्या नगरवासीयांना मनोरंजनासाठी ऍरेनामध्ये पाचारण केलं. गोलाकार ऍरेनामध्ये सर्व बाजूंना चेकाळलेले प्रेक्षक चीत्कारत असताना या योद्ध्याला साखळदंड बांधलेल्या अवस्थेत ऍरेनाच्या मध्यभागी भिरकावून देण्यात आलं आणि चहूबाजूंनी दारू पाजून मत्त झालेले हत्ती त्याच्यावर सोडण्यात आले.
ते महाकाय हत्ती त्याचा चेंदामेंदा करणार इतक्यात त्या चपळ योद्ध्याने अदमास घेऊन क्षणार्धात दोन हत्तींच्या मधून झेप घेतली आणि साखळदंडासकट स्वत:ला गुंडाळत गुंडाळत तो हत्तींच्या हल्ल्यातून सुटला.
प्रेक्षागृहातून चीत्कार उमटले. राजाच्या कपाळावर आठी उमटली.
आता योद्धा साखळदंडांमधून मुक्त करण्यात आला होता. चहूबाजूंनी भुकेलेले सिंह त्याच्यावर सोडण्यात आले. पण, योद्धा बलदंड होता. जगण्याच्या प्रबळ ऊर्मीने त्याच्यात प्रचंड ताकद निर्माण केली होती. त्याने एकेका सिंहाला दोन्ही कानांनी धरून मांजरांसारखं भिरकावून दिलं. चार सिंहांची ही अवस्था झाल्यावर बाकीचे शेपूट घालून पळून गेले.
प्रेक्षागृहात आता हर्षोत्फुल्ल हलकल्लोळ माजला होता.
राजाच्या कपाळावर दुसरी आठी आली.
आता योद्ध्याला जमिनीत मानेपर्यंत पुरलं होतं. राज्यातले पाच सर्वश्रेष्ठ तलवारबाज त्याच्याभोवती उभे होते. ते सपासप वार करत होते आणि तो फक्त मान इकडेतिकडे वळवून, वाकवून त्या वारांपासून बचाव करत होता.
प्रेक्षागृह आता उसळून, दारं तोडून ऍरेनामध्ये प्रवेश करायचंच राहिलं होतं…
तेवढ्यात राजा उठून उभा राहिला…
त्याबरोबर सगळे बसले…
वार करणाऱ्यांचे हात थबकले…
राजाने सगळ्या प्रेक्षागृहावर संथपणे एक थंडगार नजर फिरवली…
टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता निर्माण झाली…
राजाने आपल्याला अंतर्बाहय निरखून पाहिलं आहे, असं प्रेक्षागृहातल्या प्रत्येकाला वाटलं…
राजा खाली बसला…
वार करणाऱ्यांच्या तलवारी सपासप चालू लागल्या…
योद्धा जिवाच्या कराराने ते वार चुकवू लागला…
प्रेक्षागृहातली पाळीव प्रजा ओरडू लागली, डोकं हलवण्याची चलाखी करणाऱ्या बदमाष, बेईमान, नामर्द इसमा, हिंमत असेल, खऱ्या आईचं दूध प्यायला असशील, तर डोकं स्थिर ठेवून लढून दाखव मर्दासारखा!
(मूळ कथा : तत्त्वचिंतक ओशोंच्या संग्रहातून)
तुर्कस्तानात जन्मलेला एपिक्टेटस हा तत्त्वज्ञ मुळात गुलाम होता. ‘ज्याचं मन स्वतंत्र आहे, त्याला कोणी गुलाम बनवू शकत नाही,’ असा त्याचा सिद्धांत होता. त्याचा एक पाय अधू होता. काही चरित्रकार, संशोधक मानतात की तो जन्मजात अधू होता. काहींच्या मते त्याच्या मालकाने त्याचा पाय पिरगळून तोडला होता. त्यातूनच ही कथा जन्माला आली असावी.
एपिडेक्टस कलंदर फकिरासारखा रानोमाळ भटकत असताना दरोडेखोरांच्या एका टोळीने त्याला घेरलं. हा धट्टाकट्टा देखणा नवजवान गुलामांच्या बाजारात चांगली किंमत मिळवून देईल, हे त्यांच्या लक्षात आलं. ते त्याचे हातपाय बांधून नेऊ लागले. तो म्हणाला, हातपाय कशाला बांधताय? मी तुमच्याबरोबर येतो म्हणालोय तर येईनच. त्यांनी त्याला गुलामांच्या बाजारात नेऊन उभा केला. तर हा ओरडू लागला. गुलामांच्या बाजारात स्वतंत्र माणूस खरेदी करण्याची संधी चुकवू नका.
एका माणसाने खरोखरच ती चुकवली नाही. त्याला खरेदी करून घेऊन आला.
एपिक्टेटस त्याला सांगायचा की जो माणूस मनाने स्वतंत्र असतो, तो कोणाचाही गुलाम नसतो. मी तुझा गुलाम नाही. मालकाने त्याला धडा शिकवून त्याचा साक्षीभाव निपटून काढण्यासाठी इतर गुलामांना त्याचा पाय पिरगळून तोडायला सांगितला.
एपिक्टेटस त्याला म्हणाला, हे बघ. तू मला चांगली किंमत देऊन खरेदी केलंयस. माझ्याकडून काम करून घ्यायचं असेल, तर माझा पाय मोडून तू स्वत:चंच नुकसान करून घेणार आहेस.
मालकाने गुलामांकरवी पाय मुरगळून तोडला, तेव्हा एपिक्टेटस जराही न कण्हता शांतपणे म्हणाला, तोडलास ना माझा पाय, करून घेतलंस ना आपलंच नुकसान?
(मूळ कथा : तत्त्वचिंतक ओशोंच्या संग्रहातून)