जात, धर्म, विचारसरणी यापलीकडे जाऊन मदत देण्याचे काम शिवसेनेच्या छत्राखाली ही माणसे करत आहेत. कोरोनाच्या काळात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. `कोरोना वॉरिअर्स’ असे आपण वारंवार माध्यमातून ऐकत आहोत, परंतु मला माझ्या मामासाठी हे कोरोना काळातले (खरेखुरे) आप्तच आहेत!
गेल्या आठ महिन्यांच्या काळात आपण सर्वच जण कोरोनाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सामोरे गेलो आहोत व त्या प्रत्येक अनुभवातून आपल्या सर्वच समजुती व समजांची उलथापालथ, काही सकारात्मक तर काही नकारात्मक झालेली आहे. असाच काहीसा अनुभव मलाही आला.
माझे मामा वय वर्षे ८०, मिरा रोड येथे गेले काही वर्षे एकटेच वास्तव्यास असतात. साधारण सहा महिने पूर्ण घरात काढल्यानंतर दसर्याच्या सुमारास त्यांनी `आप्तां’च्या भेटी घेण्यास सुरुवात केली. सार्वजनिक वावराबद्दलचे सर्व नियम पाळूनही त्यांना दिवाळीनंतर लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली व ती अचानक इतकी बळावली की, त्यांना दम लागू लागला. आम्ही त्यांचे नातेवाईक असूनही, त्यांच्या सोसायटीत राहणारे, शेजारी हेच त्यांचे खरे `आप्त’. त्यांनी लगबगीने हालचाली करून त्यांना मिरा-भाईंदरच्या महानगरपालिकेच्या इस्पितळात दाखल केले व लगेच त्यांच्यावर उपचार सुरू झाले.
डॉक्टर अतिशय उत्तम रीतीने परिस्थिती हाताळत होते, तरी वय जास्त असल्याकारणाने मामाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती व त्यांना प्लाझ्माची गरज लागली. त्यातही रक्तगट ओ पॉसिटीव्ह.
डॉक्टरांनी रुग्णाच्या रक्ताच्या नातेवाईकांशी संपर्क केला व व्यवस्था करण्यास सांगितले. माझ्या स्वत:च्या घरीदेखील अडचणीची परिस्थिती असल्याने मला प्रत्यक्ष कुठेही जाणे शक्य नव्हते. अर्थातच माझी भिस्त ही माझ्या मित्रांवर होती. एका मैत्रिणीद्वारे शिवसेनेच्या `मंगेश चिवटें’चा नंबर मिळाला आणि मी त्यांना माझी गरज सांगितली.
मंगेश चिवटे हे सध्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. माझा मेसेज गेल्याबरोबर जणू त्यांची अदृश्य यंत्रणा प्रचंड वेगाने काम करू लागली. मला चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून फोन तर आलेच, शिवाय त्या प्रत्येक फोन नंतर लक्षात घेण्याजोगी कृतीसुद्धा नजरेस येऊ लागली.
माझा फोन नंबर, माझी गरज या माहितीबरोबरच हे काम करण्यामागची विलक्षण आस्था व माझ्या अनेक फोन व मेसेजना दिलेले संयत उत्तर यातून दिसत होते. या काळात त्यांच्या आवाजातून मला धीर तर मिळालाच, परंतु ही यंत्रणा इतक्या सुनियोजित पद्धतीने काम करू शकेल याचा विश्वास आणि आश्चर्य असे दोन्ही वाटले.
शिवसेनेचा मी कार्यकर्ता नाही, परंतु माणूस म्हणून मला हवी असणारी निकड व वैद्यकीय मदत हे सर्व जण अत्यंत आपुलकीने करत होते. त्या अर्थाने एक सामाजिक मैत्र व नाते त्यांनी तयार केले होते. पुढे काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अरविंद मांडवकरांचा मला फोन आला व प्लाझ्माची व्यवस्था झाल्याचे कळले. त्यांनी रक्तपेढीस माझी व मामांची सर्व माहितीसुद्धा पुरविली होती. त्या काळात ओ पॉसिटीव्ह प्लाझ्मा मिळणे खरे म्हणजे कठीण काम होते.
जात, धर्म, विचारसरणी यापलीकडे जाऊन मदत देण्याचे काम शिवसेनेच्या छत्राखाली ही माणसे करत आहेत. कोरोनाच्या काळात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. `कोरोना वॉरिअर्स’ असे आपण वारंवार माध्यमातून ऐकत आहोत, परंतु मला माझ्या मामासाठी हे कोरोना काळातले (खरेखुरे) आप्तच आहेत!