पाऊस आणि चक्रीवादळाचा तडाखा प्रत्येक जीवाला बसला आहे. यातून दरवर्षी कोकण किनारपट्टीवर हजेरी लावणारे सीगल पक्षी तरी कसे सुटतील.
चक्रीवादळामुळे भरकटलेल्या स्थलांतरीत पक्ष्यांचे पाय अखेर कोकण किनारपट्टीला लागले. त्यांच्या किलबिलाटाने किनारपट्टी गजबजून गेली आहे.
सीगल पक्ष्यांचे आगमन झाले असले तरी दरवर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी संख्या घटलेली दिसून येत आहे. हिवाळ्यामध्ये विविधांगी देशीविदेशी पक्षी कोकण समुद्रकिनारपट्टीवर येतात. त्यामध्ये सीगल पक्ष्यांसह विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा समावेश आहे.
अवकाळी पाऊस आणि त्यानंतर चक्रीवादळामुळे स्थलांतरित होऊन दरवर्षी येणाऱ्या पक्ष्यांचे आगमन या वर्षी काहीसे लांबणीवर पडलेले होते. स्थलांतरित होण्याच्या निमित्ताने प्रवासाला निघालेले हे पक्षी चक्रीवादळ वा अन्य वादळामुळे काही प्रदेशांमध्ये अडकून पडल्याचा अंदाजही पक्षीप्रेमींकडून वर्तविला जात आहे.
काही दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीवर सीगल पक्ष्यांचे आगमन झाले आहे. समुद्रकिनाऱ्यासह आकाशामध्ये थव्याने फिरणाऱ्या सीगल पक्ष्यांचा किलबिलाटाने सागर किनारा गजबजून गेला आहे. त्यातून सीगल पक्ष्यासह परदेशी पक्ष्यांची छबी कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासह त्यांच्या अवकाशातील सैर अनुभवण्यासाठी पक्षीप्रेमींसह निसर्गप्रेमींची पावले आपसूकच समुद्रकिनाऱ्याकडे वळताना दिसत आहेत.