एखादी व्यक्ती अचानक गेली की संबधित कुटुंबीय लोकांबद्दल सहसा कुणी वाईट म्हणत नाही. पण चित्रपट काय किंवा एखादा ग्रंथ काय काय, शेवटी त्याविषयी केव्हा ना केव्हा खरं काय ते सांगायचं लागतं मग त्यावेळेस असो अगर काही दिवसांनी असो. सुनिल दत्त यांच्या ‘रॉकी’ या चित्राविषयी जवळ जवळ तसंच घडलंय. नर्गिसने केलेल्या कामगिरीबद्दल ती ‘फॉर्म’मध्ये असतानाच तारीफ केली गेलीय. ‘अनहोनी’, ‘रात और दिन’ ‘मदर इंडिया’ यातील तिच्या अप्रतिम कामाबद्दल तिच्या दुष्मनांचं (जर असेल तर) देखील विरुद्ध एकही मत पडणार नाही. सुनिल दत्तच्या अभिनयाबद्दल मात्र निरनिराळी मतं ऐकू येतील. त्यांनी ‘यादे’ हा चित्रपट १९६४ साली काढला त्यावेळी त्याची मी खूप तारीफ केली होती. तो एक भारतात अभिनव प्रयोग होता पण त्याच्या मुलाच्या कामाबद्दलही खोटं काही सांगावं हे काही खरं नाही. फिल्मी इंडस्ट्रीत सारख्या नव्या नव्या लाटा येत असतात. आता लाटा फेसाळताहेत. पूर्वी हिरोगिरी करणार्यांच्या पोरांना हीरो बनवून पडद्यावर आणण्याच्या कपूर घराण्याची परंपरा वेगळी आहे. या कुटुंबातील मुलांनी आपली कामगिरी इतर ठिकाणी गाजवली. टक्के टोणपे खाल्ले. सगळ्यांच्या बाबतीत ते घडणार नाही. असो. तुम्हाला सांगायचं ‘रॉकी’ या सुनिल दत्त यांच्या चित्राबाबत.
एका कंपनीत शंकर नावाच्या कामगारांच्या हिताचं रक्षण करणारा लिडर असतो. कंपनीचा मालक त्याला बाजूला सारण्यासाठी जे.डी. नावाच्या हस्तकाला सांगतो तर जे.डी. शंकरला जगातूनच कायमचा दूर करून टाकतो तर मालकाचाही खून करतो. मग तो शंकरची विधवा पत्नी पार्वती हिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो, पण दारूचा गुत्ता चालविणारा रॉबर्ट याच्यात एका क्षणात शंकरने बदल घडवून आणलेला असल्याने तो मदतीला धावून जातो. पार्वतीचा छोटा मुलगा राकेश त्याच्या मनावर या झटापटीचा परिणाम होतो. त्याच्या जन्मदात्या आईनं त्याच्यासमोर येऊ नये हा डॉक्टरांचा सल्ला खरा मानून रॉबर्ट आणि त्याची पत्नी राकेशला रॉकी डिसूझा बनवून त्याला मोठा करतात. मोठा झाल्यावर तो तुफान फटफटी चालवून हुंदडक्या करीत असतो तरी परीक्षेत पास होत असतो. मग त्याला रॉबर्ट कश्मीरला पाठवतो तिथे जे.डी.चा पोरगा आर.डी. जायचा असतो. पण हा रॉकी डिसूझा म्हणजे आर्डी तिथे पोहोचतो आणि रेणूशी ‘जंगली’ पद्धतीने मुहब्बत करू लागतो. यात एक लाजवंतीचं जोड कथानक आहे. जे.डी. जे खून करतो त्याला मदत करणारा कंपनीचा मॅनेजर त्याची मुलगी लाजवंती तिच्यावरही जे.डी. बलात्कार करतो. ती जीव द्यायला जाते तर तिला कोठेवाली वाचवते व लाजवंतीची हिराबाई होते. ही हिराबाई आपल्या बापाला त्याच्या दुष्कृत्याची पाढा वाचून दाखवते नि आत्महत्या करते. शेवटी सगळे चांगले विरुद्ध वाईट अशी धमाल फायटींग होऊन सगळं कसं व्यवस्थित होतं.
स्टोरी रायटर बी. बी. भल्ला यांनी भल्याबुर्या पिक्चर्सवर डल्ला मारून ही ‘चालू’गिरी केलीय. यात नवं असं काही नाहीच. फक्त कसंही करून संजय दत्तला खूप वाव मिळावा अशी सगळी व्यवस्था केलेली.
सुनिल दत्त यांनी शंकरचं काम केलंय. ते पडद्यावर मेल्यानंतर राखीच्या पोटी त्यांचाच पुत्र संजय दत्त जन्म घेतो. कंपनीचा मालक यात आपले मेहुणे अन्वर हुसेन यांनाही घेतलंय. अमजद खान प्रथम थोडा व्हिलनी असतो पण त्याला मरण्यापूर्वी सुनिल दत्त ‘गुड मॅन’ बनवतो. रिना रॉय, सत्येन कप्पू, शशिकला, रणजित, शक्ती कपूर या कलाकारांनी कामं चांगली केलीत. राखीनं संवाद न बोलता एक्स्प्रेशन छान दिलंय. यात तीन ‘आर्डी’ आहेत. रणजित आणि संजय दत्त हे आर्डी आणि संगीतकारही ‘आर्डी’ बर्मन. यांनी लव्ह स्टोरी इतकी संगीताची कामगिरी यात केलेली नाही. नुसताच बेंडबाजा नि गाजावाजा वाजवलाय.
संजय दत्त हा मुळातच कलाकारांचा मुलगा. त्याने मोटरबाईक चांगली चालवलीय. फाईट कंपोजरने सांगितल्याप्रमाणे फायटींग चांगली केलीय. पण त्याला संवादाची फेक अजून जमलेली नाही आणि त्याचे डोळे तर अगदी निस्तेज आहेत. अभिनयांत डोळ्याला फार महत्त्व असतं. ज्याचे डोळे बोलके तो डोळ्याने बरेच संवाद सांगून जातो. संजयचे निर्जीव डोळे त्याच्या प्रगतीला अडथळा आणू शकतात. आता त्याच्या वडिलांनीच प्रत्येक चित्रात हीरो बनवलं तर पाहणार्याचा नाईलाज आहे.
नर्गिस गेली तेव्हा तिच्या संदर्भात एक वाक्य वर्तमानपत्रात आलं होतं. ‘हल्लीच्या चित्रपटाचा खालावलेला दर्जा पाहून नर्गिसला फार हळहळ वाटली!’ आणि ती जेव्हा परदेशाहून परत आली तेव्हा ‘रॉकी’ या चित्राचा प्रायव्हेट शो पहात असतानाच तिची तब्येत जी ढासळली ती कायमचीच. हल्लीच्या चित्रपटाचा खालावलेला दर्जा आणि ‘रॉकी’ चित्रपट यात काहीतरी साम्य तिला खचितच दिसलं असलं पाहिजे. त्याशिवाय हा आघात तिच्यावर घडता ना!