‘मार्मिक’ हे नावही प्रबोधनकारांची देणगी आहे. बाळासाहेब ‘फ्री प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून काम करीत होते. पण मालकांकडून याच्यावर व्यंगचित्र काढू नको, त्याच्यावर काढू नको, असे वरचेवर व्हायला लागले. बाळासाहेबांमधला कलावंत बंड करून उठला. त्यांनी व्यंगचित्र साप्ताहिक काढायचे ठरवले. दादांनी त्याचे नाव ठेवले ‘मार्मिक.’ दादा-प्रबोधनकार ‘घाव घाली निशाणी’ हे भल्याभल्यांचे वस्त्रहरण करणारे सदर आणि ‘जीवनगाथा’ लिहीत.
महाराष्ट्राच्या परतंत्र इतिहासातील सर्वात वादळी कालखंडात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी ‘प्रबोधन’ काढले. आज त्याचा नमुना दुर्मिळ आहे.
प्रबोधनकार म्हणजे एका कृश शरीरात वेगवेगळी कित्येक विलक्षण माणसे एकत्र आली होती. पण सगळ्यांत एक धागा सारखा होता. अभद्रावर हल्ला, चांगल्याचे समर्थन. त्यांच्या या वृत्तीने त्यांना पत्रकार बनवले.
ते पत्रकार झाले. त्या वेळी पेशवाई बुडून भिक्षुकशाही मातली होती. धार्मिक बहिष्काराचे अस्र त्यांच्या हातात होते. त्या काळात प्रबोधनकारांनी कोदंडाचा टणत्कार, म्हणजे धनुष्याची दोरी ओढून सोडल्यावर जो आवाज होतो तसा आवाज उठवला. जातिभेद आणि त्यातून उदयास आलेले अन्याय, भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध त्यांनी दणदणीत मोहीम उघडली. भल्या भल्या धर्ममार्तंडांना ठोकून काढले. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे ते लिहीत होते. ‘खरा ब्राह्मण’ हे नाटक लिहून त्यांनी ब्राह्मण कसा असावा आणि धर्म कसा असावा हे दाखवून दिले. त्यांचे सारे तारुण्य धर्ममार्तंडांना शब्दचोप देण्यात गेले. त्यांना भयंकर त्रास देण्यात आला, पण ते हरले नाहीत की हटले नाहीत. त्यांचा लढा चालूच राहिला. म्हातारपण सुरू झाले. त्या वेळी महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन चालू होते. ते त्या लढ्यात उतरले. त्यांनी विलक्षण जळजळीत भाषणे करून महाराष्ट्रातला मराठी माणूस पेटवला. तो इतका पेटला की मोरारजी कसायाच्या सरकारने गोळीबार करून १०६ मराठी माणसांना ठार केले. (एका परदेशी पत्रकारिणीने हा आकडा १६९ दाखवला) पण महाराष्ट्र हटला नाही. नेहरू आणि त्यांचे महाराष्ट्रद्वेष्टे कोंडाळे यांच्या नाकावर टिच्चून त्याने मुंबईसह महाराष्ट्र परत मिळविला.
‘मार्मिक’ १९६० साली म्हणजे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्याच वर्षी अत्रे साहेबांच्या वाढदिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते सुरू झाला. अनेकांना कल्पना असेल, पण ‘मार्मिक’ हे नावही प्रबोधनकारांची देणगी आहे. बाळासाहेब ‘फ्री प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून काम करीत होते.
पण मालकांकडून याच्यावर व्यंगचित्र काढू नको, त्याच्यावर काढू नको, असे वरचेवर व्हायला लागले. बाळासाहेबांमधला कलावंत बंड करून उठला. त्यांनी व्यंगचित्र साप्ताहिक काढायचे ठरवले. दादांनी त्याचे नाव ठेवले ‘मार्मिक.’
त्या वेळी द. पां. खांबेटे कार्यकारी संपादक होते. संपादकीय आणि इतर विनोदी लेखन करीत. दादा-प्रबोधनकार ‘घाव घाली निशाणी’ हे भल्याभल्यांचे वस्त्रहरण करणारे सदर आणि ‘जीवनगाथा’ लिहीत. दि. वि. गोखले ‘मोरावळा’ आणि नरेंद्र बल्लाळ, अनिल नाडकर्णी, विजय कापडी विनोदी कथा लिहीत. बाळासाहेब कव्हर आणि जत्रा करीत. श्रीकांतजी दोन अर्धी पाने व्यंगचित्रे, अंधेर नगरी आणि सिनेप्रिक्षान ही सदरे लिहीत. इतका सज्जड सरंजाम असल्यामुळे ‘मार्मिक’ बघता बघता प्रचंड लोकप्रिय झाले. खांबेटे सोडून गेल्यानंतर अग्रलेखही दादा लिहू लागले. त्यामुळे त्यात आक्रमकपणा आला.
महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात नोकर्यांच्या बाबतीत दक्षिण भारतातले लोक सर्वत्र आणि सुशिक्षित मराठी तरुण ‘अप्लाय अप्लाय नो रिप्लाय’ अशा अवस्थेत बेकार म्हणून रस्त्यावर अशी अवस्था आली. बाळासाहेबांनी हा प्रश्न ‘मार्मिक’मधून लावून धरला. त्यातून शिवसेना जन्माला आली. तिचे नामकरण ‘शिवसेना’ हेसुद्धा प्रबोधनकारांनीच केले.
दादा कामाच्या बाबतीत शिस्तबाज होते. प्रत्येक कामाची त्यांची वेळ ठरलेली असे. सात वाजल्यापासून वर्तमानपत्रे वाचणे, ९ वाजता गोदरेजच्या मुद्दाम बनवून घेतलेल्या टाइपरायटरवर अग्रलेख, लेख ठोकणे! संध्याकाळी चार वाजल्यानंतर कलानगरच्या फाटकापर्यंत चालून येणे, येणार्यांना भेटणे अथवा हाकलून देणे, काही माणसे त्यांना अजिबात आवडत नसत. त्यांना दादांच्या मठीत प्रवेश नसे. पण शिरीष पै अत्र्यांच्या मृत्युपत्राचे प्रकरण घेऊन आल्या. त्यावेळी त्यांना अगत्याने बोलावून मृत्युपत्र नीट वाचले. तिसरा कागद खोटा होता. त्यांनी असा कडकडीत अग्रलेख लिहिला की बाळासाहेब देसाई, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष यांनी त्यातून माघार घेतली. फक्त कॉ. डांगे उरले. शेवटी ते मृत्युपत्र अत्रेसाहेबांच्या मुलींच्याच बाजूने झाले. दादा पराकोटीचे रागीट होते. बेशिस्त, अनीतिमान, अप्रामाणिक, संधीसाधू माणसे त्यांच्या कडकपणाचा अनुभव घेत. बाकी शिस्तीने, नीतीने चालणार्यांसाठी गांजलेल्यांसाठी दादा प्रेमळ होते.
आता या अंकापासून त्यांच्या ‘प्रबोधन’च्या पहिल्या अंकाचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. दादांनी महाराष्ट्राला राजकीय अस्तित्व दिले. दोन विलक्षण प्रतिभावान मुलगे दिले. शिष्य दिले, लेखक दिले, देत राहिले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन.
प्रबोधनकारांच्या दोन गोष्टी प्रबोधनकारांच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभी त्यांच्या कर्तृत्वाच्या दोन गोष्टी सांगितल्यावाचून राहावत नाही.
‘राजकमल’चा जन्म
चित्रपती व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओला वाडिया मुव्हिटोनच्या ‘लवजी कॅसल’ या बंगल्याच्या प्रचंड आवारात जागा कशी मिळाली त्याची ही गोष्ट. इंग्रज जेव्हा मुंबईला आले त्या वेळी त्यांनी जहाज बांधणीसाठी गुजरातमधून लवजी वाडिया यांना आणले. त्यांनी इंग्रजांना मोठमोठी महासागरगामी जहाजे बांधून दिली. त्यांनी परळला वाडिया कॅसल बांधला. त्यातच त्यांच्या वंशजांनी चित्रपट काढण्याचा ‘वाडिया मुव्हिटोन’ स्टुडिओ काढला. शांतारामबापू प्रभात सोडून मुंबईला आले ते ताडदेवचा सेंट्रल स्टुडिओ घेण्याच्या प्रयत्नात होते. मालकांनी नकार दिला. बापू पुण्याला परत जाण्याच्या तयारीत होते. जहांगीर वाडिया शेटना ही बातमी रात्री १० वाजता समजली. त्यांनी शांतारामबापूंना फोन करून सकाळी भेटायला बोलावले. ते बापूंना म्हणाले, ‘‘तुमच्यासारख्या कलावंताला मुंबईत जागा मिळू नये? फार खेदाची गोष्ट. आणा तुमचा सिने संसार इथे. लवजी कॅसल नि त्याचा सगळा परिसर आज मी तुम्हाला दिला.’’ आणि परळच्या लवजी कॅसलमध्ये व्ही. शांताराम यांच्या राजकमल चित्रमंदिराचा संसार सुरू झाला. शांतारामांची ‘गरज’ वाडियांपर्यंत पोचवण्याचे काम गुपचूप प्रबोधनकार ठाकरे यांनी केले होते.
डॉ. आंबेडकरांचा पक्ष समितीत आणला
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालवण्यासाठी सर्व पक्षांनी आपली ध्येयधोरणे बाजूला ठेवून एकत्र यावे, असे डॉ. आंबेडकरांना फार वाटत होते. ते दिल्लीहून मुंबईला आले आणि चर्चगेटला बॅरिस्टर समर्थ यांच्याकडे उतरले. पुढचे दादांच्या शब्दांमध्ये-
‘‘त्यांनी मला चार-पाच वेळा फोन केले, पण मी सारखा भटकंतीवर असल्याने ते मला मिळाले नाहीत. अखेर त्यांनी माझे शेजारी चंद्रकांत भुलेस्कर यांना निरोप पाठवून मला घेऊन यायला आग्रहाचा निरोप दिला. आम्ही दोघे गेलो. डॉक्टर गव्हर्नरच्या भेटीला गेले होते. अर्धा तास थांबले. इतक्यात त्यांचे डॉक्टर शिंदे आणि पत्नी यांनी त्यांना सांभाळून लिफ्टमधून दिवाणखान्यात आणले. त्यांना कोचावर बसवले. त्यांचे पाय काम देत नव्हते. जवळजवळ दहा मिनिटे श्वास सोडीत आमच्याकडे टक लावून पाहात होते. त्याच वेळी वाटले की, डॉक्टर फार दिवस काढण्याच्या अवस्थेत नाहीत. नुसता लोळागोळा. दहा मिनिटांनी त्यांनी बोलायचा प्रयत्न केला.
मी : डॉक्टर, काय ही तुमची अवस्था?
डॉ. : हां अखेरच्या प्रवासाची चिन्हे आहेत. नंतर आम्ही अनेक विषयांवर बोलत होतो. डॉक्टर म्हणाले, हे पहा ठाकरे. सध्या निरनिराळ्या पक्षांमधून विस्तव जाईनासा झाला आहे. अशा अवस्थेत हे मतलबी काँग्रेसवाले तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र चुकूनसुद्धा देणार नाहीत. आपापल्या ध्येयांची गाठोडी खुंटीला टांगून सगळे पक्ष एकवटतील तर त्यात माझा शेड्युल्ड क्लास अगत्य भाग घेईल. माझा शेड्युल्ड क्लास जिब्राल्टरच्या खडकासारखा तुमच्या पाठीशी उभा राहील.
मी : मी हे जाहीर करू का?
डॉ. : अगत्य करा.
डॉ. आंबेडकरांची ही मुलाखत मी प्रसिद्ध केली नि त्याचा परिणाम अनुकूल झाला. सारे पक्ष समितीत एकवटले.” (‘माझी जीवनगाथा’मधून)