‘जॉनी जॉनी येस पापा’च्या जमान्यात मुलांना ‘या बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया’ अशा बालगीतांकडे खेचून आणणारा उपक्रम चेंबूरच्या शाळेत साकारण्यात आला आहे. बालकवितांची बाग असे या उपक्रमाचे नाव आहे. या बागेत 30 प्रख्यात कवींच्या कविता बालमनावर संस्काराचे सिंचन करणार आहेत.
चेंबूर येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूल आणि सुधा मोहन वेरणेकर प्राथमिक शाळा येथे 5 जानेवारी रोजी बालकवितांच्या बागेचे उद्घाटन होणार आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, विजया वाड यांच्यापासून डॉ. निशिगंधा वाड, डॉ. विनोद इंगळहळ्ळीकर, एकनाथ आव्हाड असे एपूण 30 कवींच्या कविता बागेत लावण्यात आल्या आहेत. त्यांच्या गोडगोड बाळगाण्यावर छत्र धरणारी रंगीत छत्री! अशा 30 छत्र्या म्हणजेच 30 बालगीते, असा हा उपक्रम आहे. या बागेच्या मुख्य माळीणबाई आहेत डॉ. विजया वाड आणि आशा कुलकर्णी तर माळीबुवा आहेत विश्वनाथ खंदारे.
आपल्या मराठी साहित्यकांनी लहान मुलांसाठी समृद्ध केलेली साहित्यिक परंपरा परत त्यांच्यापर्यंत पोहचवणे हा उपक्रमाचा हेतू आहे. यातून साहित्याचा अनुभव घेण्याबरोबरच ती जोपासण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. अधिकाधिक साहित्यरसिकांनी तसेच बालकांनीही यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. विजया वाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मंगेश पाडगांवकर यांची अडम तडम, इंदिरा संत यांची गवतफुला रे गवतफुला, कुसुमाग्रजांची हळूच या हो हळूच या अशा 30 कविता फ्रेम करून बागेत प्रत्येक झाडांसमोर उभ्या करण्यात आल्या आहेत.
बालगीतांवर आधारित विविध स्पर्धां
सध्या शाळा बंद आहेत. पण जेव्हा इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या मुलांचे वर्ग सुरू होतील. तेव्हा त्यांना या अनोख्या बागेची भेट मिळेल. शाळा सुरू झाल्यानंतर या बालकवितांवर आधारित विद्यार्थ्यांची पाठांतर स्पर्धा, चित्रकला किंवा गायन स्पर्धा घेतली आहे. याशिवाय बालकवितांचा विषय घेऊन मुलांकडून लेखन करून घेतले जाईल, असे संस्थेचे शिक्षण समिती अध्यक्ष एकनाथ आव्हाड यांनी सांगितले.
सौजन्य : दैनिक सामना