नामवंत राजकीय नेते आणि त्यांच्या काही गमती या मला ‘मार्मिक’मध्ये वाचायला मिळायच्या. त्याच्या जोडीला शेवटच्या पानावर श्रीकांत ठाकरेंनी लिहिलेलं सिनेमाचं परीक्षण… ते कुठल्याही दैनिकापेक्षा जरा वेगळ्या वळणाचं होतं. ‘शुद्ध निषाद’ या टोपण नावाने ते लिहित असत. ते वाचायला आम्ही अत्यंत उत्सुक होतो. पत्रकारितेत खूप लवकर आल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंसारख्यांची मुलाखत मला १४ वेळा घेता आली. पहिली मुलाखत मी त्या ‘मार्मिक’च्या बहराच्या काळात म्हणजे १९७४च्या जुलै महिन्यात घेतलेली आहे.
मराठीमध्ये व्यंगचित्रांना प्राधान्य देणारं एखादं साप्ताहिक सुरू करावं ही कल्पनाच मुळात एकदम भारी होती… अशा कल्पनेवर आधारित साप्ताहिक आणि त्यात राज्य आणि देशपातळीवरचे नामवंत राजकीय नेते, त्यांचे बाळासाहेब ठाकरेंनी काढलेले नेमके चेहरे यांनी धमाल आणली. या व्यंगचित्रांच्या साप्ताहिकाची म्हणता म्हणता ६० वर्षे झाली.
१९६० साली सुरू झालेलं ‘मार्मिक’ माझ्याकडे १९७० सालापासून येतंय. मला अप्रूप कसलं होतं तर राज्य स्तरावरचे, केंद्र स्तरावरचे सगळे नामवंत राजकीय नेते आणि त्यांच्या काही गमती या मला ‘मार्मिक’मध्ये वाचायला मिळायच्या. त्याच्या जोडीला शेवटच्या पानावर श्रीकांत ठाकरेंनी लिहिलेलं सिनेमाचं परीक्षण… ते कुठल्याही दैनिकापेक्षा जरा वेगळ्या वळणाचं होतं. ‘शुद्ध निषाद’ या टोपण नावाने ते लिहित असत. ते वाचायला आम्ही अत्यंत उत्सुक होतो. या सगळ्यापलीकडची एक विशेष आणि माझ्या भाग्याची गोष्ट अशी की, पत्रकारितेत खूप लवकर आल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंसारख्यांची मुलाखत मला १४ वेळा घेता आली. पहिली मुलाखत मी त्या ‘मार्मिक’च्या बहराच्या काळात म्हणजे १९७४च्या जुलै महिन्यात घेतलेली आहे.
मी बाळासाहेबांना आठवणीच्या ओघात विचारलेलं आहे की, तुमचे त्या काळातले मॉडेल कोण होते? तर ते म्हणाले, ६० साली ‘मार्मिक’ सुरू झाले आणि सुरुवातीच्या टप्प्यात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार यांच्या जोडीला देशपातळीवर पं. जवाहरलाल नेहरू होते. पुढच्या टप्प्यावर चरणसिंग आणि इंदिरा गांधी हे माझे मॉडेल होते. त्यामुळे यांच्यावरची माझी चित्रं ही अधिक उत्तमोत्तम होत गेली.
‘मार्मिक’ आणि ‘मार्मिक’च्या निमित्ताने व्यंगचित्रांविषयीच्या बाळासाहेब माझ्याशी गप्पा मारताना, या सगळ्या आठवणी उलगडत असताना कलावंतांचा विषयही राजकारण्यांइतकाच निघाला.
ते म्हणाले, पु. ल. देशपांडे हे माझे चांगले मित्र होते. त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांना मी आवर्जून जात होतो. तर म्हणे, खरं सांगू का… तो म्हणजे शब्दांचा व्यंगचित्रकार आणि मी रेषांचा व्यंगचित्रकार… एवढाच आमच्यात फरक करता येईल. बाकी खट्याळपणा आम्हा दोघांकडे सारखाच…
मोरारजींच्या दहीहंडीमध्ये गाढवाच्या पाठीवर बसून त्या गाढवाला गाजर दाखवत त्याचा मालक पुढे पुढे नेत असतो, तसं मोरारजीभाई देसाई यांनी सरकारी नोकरांना वाढीव वेतनश्रेणीचं गाजर त्या सरकारी नोकराच्या मानगुटीवरच बसून लांब दहीहंडी धरत वेतनश्रेणीचं गाजर त्याला दाखवत त्याला पुढे पुढे नेल्याचे दाखवले होते. सेनापती बापट सीमाप्रश्नासाठी आमरण उपोषणाला बसले होते. त्यावेळी इंदिराजींनी एका ठरावीक वेळेत हे उपोषण नक्की सुटेल असं सांगितलं होतं. त्यावर एक अत्यंत मार्मिक चित्र बाळासाहेबांनी काढलेलं होतं की, इंदिराबाईंच्या हातात घड्याळ आहे, पण त्या घड्याळाला काटेच नाहीत. सेनापती बापट आपल्या उपोषणाच्या जागेवर बसून म्हणताहेत की बाई, या घड्याळाला काटेच नाहीएत. मर्यादा ठरवणार कशी वेळेची?
काही राजकीय वादक असं म्हणत ‘मार्मिक’मध्ये त्या काळातील नेत्यांचं चित्रण ‘वाद्ये आणि वादक’ याच्या साथीने बाळासाहेबांनी घडवलं होतं.
उदा. चीनच्या तालावर डॉ. स्वामींचं भरतनाट्यम… नंतर चरणसिंगांचा सॅक्सोफोन… शरद पवारांचा जलतरंग… अनेकजणांवर टण टण टण… नंतर जनता पक्षाच्या बाजूने असं म्हणत ‘ठीक आहे दादा, तुम्ही साथ देणार नाही म्हणता? मग मी एकटाच वाजवत बसतो’ असं सांगत सतार छेडत बसलेले यशवंतराव चव्हाण… आणि राज नारायण यांचा स्वत:चाच ते ढोल बडवत असताना मार्मिक चित्र…
ते चेहरे फार नेमके काढत असत त्यांच्या नेमक्या वैशिष्ट्यासह… असं मी बोलताना म्हटलं होतं. इंदिरा गांधींचं नाक हे नेमकं सगळ्यांच्या लक्षात होतं. या नाकाच्या अनुषंगाने काढलेलं एक अप्रतिम व्यंगचित्र बाळासाहेबांनी काढलं आहे. त्यावेळी इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर प. बंगाल, तमीळनाडूसकट वेगवेगळ्या नऊ राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाखेरीज अन्य पक्षांची सरकारं सत्तेवर आली. तर बाईंचं मोठ्ठं नाक दाखवत त्या नाकावर सर्व राज्यातले नेते बसवत बाईंच्या नाकी नऊ आले असं म्हणत काढलेलं हे चित्र आहे.
वाचा, थंड बसा… वाचा, उठा… अशा प्रकारे आवाहन करत त्या काळातल्या चळवळींना जसं ‘मार्मिक’ने तोंड फोडलं तसं नव्या टप्प्यावरच्या सर्व घडामोडींनाही वाचा ‘मार्मिक’मधून फोडली गेलीच पाहिजे असा आमचा आग्रह राहील.