चिरंजीव आयसीएसई बोर्डाच्या शाळेत आहेत, अभ्यासक्रम आणि अभ्यास खच्चून असला तरी त्याचे कोणी खच्चीकरण करू शकत नाही. एकदा तिसरीत असताना त्याने मला अगदी खासगी आवाजात सांगितले, आई, त्या अथर्वला भूगोलात वीस पैकी सात मार्क मिळाले आहेत. मी तितक्याच हळू आवाजात विचारले, तुला वीस पैकी आठ आहेत का?
कोरोनामुळे `झूम बराबर झूम शराबी’ होण्याच्या आधी, म्हणजे शाळा सुरू व्हायच्या अगदी सुरुवातीला आमच्या शाळेत (मुलांच्या शाळेला हल्लीच्या आया `आमची शाळा’ म्हणतात), तर `आमच्या शाळे’च्या मुख्याध्यापक आणि पालकांची एक बैठक झाली. त्या एका दिवशी निदान दोन हजार पालकांनी झूम अॅप डाऊनलोड केले. शाळा कधी सुरू होणार, ऑनलाइन शाळा कशी असणार, किती वाजता शाळा भरणार असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात होते. मुख्याध्यापक बाई मोबाईलच्या स्क्रीनवर झळकल्या आणि त्यांना सगळ्या पालकांवर एक बॉम्ब टाकला. ‘आता तुम्हीच तुमच्या मुलांचे सहशिक्षक आहात.’ बाईंचे शब्द माझ्या कानात घुमू लागले. आता माझं कसं होणार? तिकडे `चांगला अर्धा’ (बेटर हाफ) म्हणजे नवरा दिवसभर गुगल टीमवर टिपर्या खेळत असल्याने ही नवी पीडा… आय मीन जबाबदारी माझीच असणार हे स्पष्ट होते.
मी माझ्या मुलाला शिकवू शकत नाही असे माझे स्पष्ट मत आहे. मी शिक्षक म्हणून योग्य आहे असे प्रमाणपत्र यूजीसीने दिले असले तरी याला दोन कारणं आहेत- एक तर माझे सगळे बरोबर आहे असा विश्वास असलेल्या माणसाला मी काय शिकवणार, असे मी म्हणते आणि शिकवणीपुरता विषय मला सीमित (त्याच्या शब्दांत लिमिट) करता येतच नाही अशी त्याची तक्रार आहे. शिकवणी सुरू झाली की आंघोळ केलीस का, असे कपडे का घातलेस, नखं कापून घे अशा माझ्या रास्त चौकशांना तो विरोध करतो. मी बापडी म्हणते, तू माझ्याकडे लक्ष देतो आहेस हे लक्षात आलं की मला काय करू न काय नको असं होतं.
पण चोवीस तास घरात एकत्र वेळ घालवावा लागल्यानं हा प्रश्न टळणं शक्य नव्हतं. शिवाय लेकाची दहावी असल्यानं त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याचं सामाजिक दडपण माझ्यावर आलं आहे. हे दडपण मला आहे, त्याला नाही हे माझ्या लवकरच लक्षात आले. अगदी गोड शब्दांत आईला गप्प कसे करायचे याची कलाही त्याला प्राप्त आहे. त्यामुळे त्याने पहिल्याच दिवशी मला सांगितले, गणिताचा अभ्यास तू कसा घेशील? एक काम कर, गणिताच्या वहीतले हस्ताक्षर तपास. (त्याच्या भाषेत, हँडरायटिंग चेक कर).
आता हा अभ्यास कमी, शैक्षणिक वाटाघाटी जास्त करणार आहे हे माझ्या लक्षात आल्याने मी त्याला जोरात सांगितले, मी फक्त मराठी, इतिहास, भूगोल हे विषय शिकवणार, तू इतर विषयांचा अभ्यास कर. वाद प्रतिवाद न करता कोर्ट केस जिंकल्यावर एखादा वकील आनंदी व्हावा तसा आनंद त्याच्या चेहर्यावर दिसला.
चिरंजीव आयसीएसई बोर्डाच्या शाळेत आहेत, अभ्यासक्रम आणि अभ्यास खच्चून असला तरी त्याचे कोणी खच्चीकरण करू शकत नाही. एकदा तिसरीत असताना त्याने मला अगदी खासगी आवाजात सांगितले, आई, त्या अथर्वला भूगोलात वीस पैकी सात मार्क मिळाले आहेत. मी तितक्याच हळू आवाजात विचारले, तुला वीस पैकी आठ आहेत का? त्यावर, आई तुला कसं कळलं असं त्याने डोळे विस्फारून विचारले, पण मी तुझीच आई आहे असे सांगण्याच्या भानगडीत मी पडले नाही. आपण विद्यार्थीदशेत असताना आपल्या मुलांसारखे होतो हे कितीही खरे असले तरी त्यांना सांगू नये या मताची मी आहे. कारण हे जर त्यांना कळले तर तू माझ्यापेक्षाही आळशी असून तुझे काही फार वाईट झाले नाही तर मला का अभ्यास करायला सांगतेस? या संभाव्य प्रश्नाला द्यायला माझ्याकडे उत्तर नाही. उलट आपण अभ्यास टाळण्यासाठी ज्या उचापत्या करत होतो, त्या चिरंंजिवांनी करू नयेत म्हणून सध्या मी एक गंभीर भाव चेहर्यावर आणला आहे.
तर सांगायचे म्हणजे माझा दहावीचा अभ्यास नियमित सुरू आहे. हे ऐकून माझ्या माता -पित्यांचा ऊर भरून येत आहे. मी अठ्ठावीस वर्षांपूर्वी पण दहावीत होते, त्या वेळी वडिलांनी एकदा फार व्याकूळ आवाजात सांगितले होते, ‘आपल्याला कुठे डॉक्टर, इंजिनीअर व्हायचे आहे, सगळ्या विषयांत पास हो मात्र.’ हीच व्याकुळता माझ्या स्वरात आणून मी माझ्या मुलाला सांगते आहे, ‘आपल्याला कुठे पहिल्या कट ऑफला अॅडमिशन मिळवायची आहे, दुसर्या-तिसरीला मिळाली तरी चालेल, पण त्यासाठी निदान ९३-९४ टक्के तरी मिळवावे लागतील ना.’ हे म्हणताना शाळेतल्या सगळ्या बाईंचे चेहरे मला दिसायला लागतात आणि माझ्याकडे बघून त्या खुदूखुदू हसत आहेत असा भास होतो.