माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. गणपती बाप्पाचा जन्म या दिवशी झाला. हा दिवस माघी गणेश चतुर्थी, माघी विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी अशा नावाने ओळखला जातो.
यंदा गणेश जयंतीचा उत्सव 15 फेबुवारी रोजी साजरा होत आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या बाप्पाच्या जयंतीचा उत्सव दरवर्षी जोरात साजरा केला जातो. या वर्षी मात्र कोरोनामुळे उत्सवाला मर्यादा आल्या आहेत. कोविड नियमावलीचे पालन करून सर्वत्र उत्सव साजरा होणार आहे.
माघी गणेशोत्सव हा भाद्रपद महिन्यातील उत्सवाएवढा मोठय़ा प्रमाणात साजरा होत नाही. असे असले तरी अलीकडच्या काही वर्षांत अनेक घरांमध्ये माघी गणेशाची प्रतिष्ठापना होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही सार्वजनिक मंडळांमध्ये गणराय वाजतगाजत आणले जातात.
गणेश जयंतीच्या पूजेबद्दल अधिक माहिती देताना अशी माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण म्हणाले, सोमवारी गणरायाच्या पूजेचा मुहूर्त सकाळी 11.44 आणि दुपारी 2 वाजून 2 मिनिटांपर्यंत मध्यान्हकाळी आहे. जे लोक धुंडीराजव्रत करतात, त्यांनी प्रदोषकाली म्हणजे संध्याकाळी 6 वाजून 38 मिनिटांपासून रात्री 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत पूजा करावी. या गणेश जयंतीला धातूची मूर्तीची पूजा सुद्धा चालते. आणि गणेशोत्सव किती दिवस साजरा करावा हे कुठेही शास्त्रात लिहिलेले नाही.
प्रथा- परंपरेप्रमाणे उत्सव साजरा केला जातो, असेही सोमण म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे, यावर्षी कोरोनामुळे सर्व भक्तांनी शिस्त पाळून संयमाने उत्सव साजरा करायला पाहिजे. धोका टळलेला नाही. हात धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे जे नियम सरकारने पाळावयास सांगितले आहेत. त्याचे पालन करून गणेश जयंती साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.