यकृताला झेपणार नाही एवढा अल्कोहोल हातातून जाईल, असं कित्येकांना स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं तर काहींना मुखपट्टी आवडायला लागली आहे. कारण ज्यांच्याकडून उधारी घेतलेली आहे ती मंडळी समोर आली तरी धड ओळखतदेखील नाहीत. वॉशिंग मशीनमध्ये जीन्स धुवायला घातल्या तर मेसेज येतो: `घरी राहा, सुरक्षित राहा’.
कोविड-१९ महामारीच्या काळात कित्येक वैज्ञानिक गोष्टींची ऐशी की तैशी करून टाकलेली दिसते. करोंना बंदिवासात माणसे डोळ्यांनी ऐकायला नि बोलायला शिकत आहेत. मुखपट्टीच्या आडून बोललेले धड ऐकू येत नाही, तेव्हा हाच पर्याय सकलांपुढे उपलब्ध असतो.
एखादा मेसेज व व्हीडियो सगळीकडे भन्नाट वेगाने पसरू लागला की त्या प्रक्रियेला `व्हायरल’ झाला असे म्हणतात. हा शब्द ‘व्हायरस’वरून आलाय नि ते किती खरं आहे हे आपल्याला करोना विषाणूने दाखवून दिलं आहेच.
आधी माणसाने आपल्या चंगळवादाची हौस भागविण्यासाठी निसर्गाला प्लास्टिकमध्ये गुंडाळले आणि आता निसर्ग माणसाला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळत आहे. निसर्गाला तोंड दाखवायला लाज वाटू लागलीय, जणू नि त्यामुळे माणसाला मास्कखाली तोंड लपवायची वेळ आली आहे. समाजमाध्यमातून 24*7 मध्ये नातेवाईक, मित्रमंडळीकडून धोक्याचे अनाहूत, अग्रेषित केलेले सल्ले तसेच तथाकथित तज्ज्ञ डॉक्टरांचे दावे ऐकायला मिळतात व आपण भयभीत होतो, चक्रावून जातो. त्यावरून pandemic (महामारी)च्या धर्तीवर infodemic (माहितीमारी) हा नवा शब्द प्रचलित झाला आहे. ट्रकच्या मागे लिहिता लिहिता, आता माणसाच्या पाठीमागे लिहायची वेळ आलीय: `सुरक्षित अंतर ठेवा’ (तरुणाईच्या टी-शर्टवर हा प्रयोग होईल).
केवळ हात धुवून नि सॅनिटायझर वापरून करोना विषाणू दूर ठेवता येत असेल तर त्यावर रामबाण लस का नाही, हा प्रश्न सामान्य माणसाला छळतोय. शिवाय या महामारीवर लस उपलब्ध नसतानादेखील रुग्णावर उपचार करताना लाखोंचा खर्च कसा येतो हेही एक गौडबंगाल आहे. या सार्यावर कहर म्हणून `कुठे गेली तुमची ती फायटर विमाने, क्षेपणास्त्रे नि अण्वस्त्रे?’ छद्मी हसत तो सूक्ष्म जिवाणू कुजबुजतोय.
यंदाच्या एस.एस.सी. परीक्षेतील भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला नि लोक म्हणू लागले. ‘इतिहासात प्रथमच भूगोलाची परीक्षा रद्द झाली… आणि तीही सूक्ष्मजीवशास्त्रामुळे… याचा परिणाम समाजशास्त्रावर होत आहे… त्यामुळे सर्वांचे अर्थशास्त्र कोलमडले, म्हणून बर्याच जणांचे मानसशास्त्र बिघडत आहे… ते सावरण्यासाठी रसायनशास्त्राचा वापर केला जात आहे… लसीचा शोध जारी आहे.
जीवनात बदल अपरिहार्य आहे, कारण बदलातून प्रगती घडते. पण करोना विषाणूने लादलेल्या महामारीत हे बदल विरोधाभासी ठरले आहेत, कसे ते बघा:
– २०१९: माणसामाणसातील अंतर कमी करा, नाती जोडा.
– २०२०: भौतिक अंतर राखा, नाती जपा
– २०१९: पॉझिटिव्ह (विचाराने सकारात्मक) व्हा
– २०२०: निगेटिव्ह राहा (विषाणूपासून अबाधित असा)
– २०१९: नकारात्मकता सोडा (कोरोनाची भीती नको)
– २०२०: स्वीकारात्मकता वाढवा (कोरोनासोबत जगायला शिका)
– २०१९: सोशलायझेशन
– २०२०: सोशल डिस्टन्सिंग
– २०१९: `ठेव तो मोबाईल, बस अभ्यासाला!’
– २०२०: `घे तो मोबाइल, बस अभ्यासाला!’
– २०१९: युनायटेड, वुई स्टँड (एकजुटीने जिंकू या)
– २०२०: डिव्हायटेड, वुई सरवाईव्ह (दुरावा ठेऊन जगू या)
– २०१९: मुलं घरात कंटाळली की मैदानातील मोकळ्या हवेत खेळत.
– २०२०: तोंडावर मुखपट्टी लावून मैदानात खेळत असलेली मुलं अस्वस्थ होऊन, थोड्याच वेळात खेळ आटोपून मोकळी हवा घेण्यासाठी घरात परततात.
अन्, ह्या बदलांसोबतच, करोनावासातील विविध वैज्ञानिक घटनांचे समाजजीवनावर नर्मविनोदी परिणाम होत आहेत. तोंडावर मुखवटा लावून बँकेत पैसे आणण्यासाठी जायची वेळ येईल असं कधी कुणाला वाटलं नव्हतं.
यकृताला झेपणार नाही एवढा अल्कोहोल हातातून जाईल, असं कित्येकांना स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं तर काहींना मुखपट्टी आवडायला लागली आहे कारण ज्यांच्याकडून उधारी घेतलेली आहे. ती मंडळी समोर आली तरी धड ओळखतदेखील नाहीत. वॉशिंग मशीनमध्ये जीन्स धुवायला घातल्या, तर मेसेज येतो: `घरी राहा, सुरक्षित राहा’. या कोरोनवासात आपल्या हातात काहीच नाही, तरी हात वारंवार धुवावे लागतात त्यामुळे कित्येकांनी २०२० हे साल आपल्या वयात ऍड न करण्याचे ठरविले आहे
मग, एका मोठ्या रांगेत उभ्या असलेल्या त्या वयोवृद्ध गृहस्थाने मोठ्याने आवाज करत मागून गॅस सोडला. त्यांनी मागे वळून पाहयले नि किळसवाण्या नजरेने पाहणार्या मागच्या तरुणाला उद्देशून म्हणाले, `तुम्हाला आवाज ऐकू आला असेल, तर तुम्ही भौतिक अंतर पाळलेले नाही आणि घाण वास आला असेल तर तुमच्या तोंडावरील मास्क चांगल्या दर्जाचा नाही.’ आता बोला!