भारत हा शेतीप्रधान देश असूनही आज शेती आणि शेतकरी दोघेही करुणेचा विषय झाले आहेत. शेतीत नवनवे प्रयोग तर दूरच पण, आहे ती शेती कसणेही मुश्कील झाले आहे. ज्यांना शेतीविषयी खरंच नितांत आदर आणि तळमळ आहे असे थोडेफार शेतकरी शेतात काही नवे प्रयोग करत शेती आणि शेतकरी दोघांनाही यातून तारण्यासाठीचे उपाय शोधत आहेत. शेतकऱ्याला एकीकडे अन्नदाता म्हटले जाते आणि दुसरीकडे त्याची उपेक्षाही केली जाते. हा विरोधाभास हीच आजची वस्तुस्थिती आहे.
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड गावाचे दादाजी खोब्रागडे यांना कृषिभूषण, कृषी संशोधक म्हणून ओळखले जाते. दादाजी कष्टाळू आणि संशोधक वृत्तीचे शेतकरी होते, यांनी प्रचंड मेहनतीने तांदळाच्या नऊ नव्या वाणांचा शोध लावला. ज्यांच्यासाठी शेती हीच त्यांची कर्मभूमी होतीपण, दुर्दैव की या कष्टाळू शेतकऱ्याला त्याच्या या संशोधनाचा योग्य मोबदला मिळाला नाही.
केवळ तिसरीपर्यंत शिक्षण झालेले दादाजी खोब्रागडे यांनी आपल्या संशोधनाने महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आसपासच्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी समृद्धीचे द्वार उघडले होते.आज दहा लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रात एचएमटी तांदळाचे पिक घेतले जाते. या एचएमटी वाणाचा शोध खोब्रागडे यांनीच लावला. १९९०च्या आसपास त्यांनी एचएमटी ही तांदळाची नवी जात बाजारात आणली.
तांदळाचे हे नवे वाण तयार झाले तेंव्हा त्यांच्या हातात त्याकाळचे प्रसिद्ध एचएमटी घड्याळ होते म्हणून त्यांनी भाताच्या या नव्या वाणाला एचएमटी हेच नाव दिले.
शेतकऱ्यांनी या नव्या वाणाला प्रचंड प्रतिसाद दिला. इतका की पुढच्याच वर्षी याचे भाव वाढवून दुप्पट करण्यात आले. अनेक प्रदेशातील हवामानाशी मिळते जुळते असल्याने अल्पावधीतच याचा खप वाढला.
एचएमटीचे वाण कसे विकसित झाले याची कथा मोठी रंजक आहे.
१९८० साली शेतातील भाताचे पिक वाढले तेंव्हा दादाजींच्या असे लक्षात आले की यातील एका रोपाला असलेले भाताचे दाणे टपोरे आणि पूर्ण भरलेले असून इतर सर्व रोपांपेक्षा हे रोप काहीसे वेगळे आहे. त्यांनी या एकाच भाताच्या रोपाचे भात बियाणे जपून ठेवले आणि पुढच्या वर्षी त्या भातांच्या बियाण्यांची पेरणी केली. पुन्हा हे बियाणे जपून ठेवत त्याच्या पुढच्या वर्षी त्या बियाणांची पेरणी केली. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात एचएमटीचे पूर्ण वाण विकसित होण्यास काही वर्षांचा कालावधी लागला. १९९०पर्यंत या नव्या वाणाची माहिती आसपासच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. त्यांनीही एचएमटीची मागणी सुरु केली.
१९९४मध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठा (पीव्हीके) अंतर्गत येणाऱ्या जवळच्याच सिंदेवाडी राईस स्टेशनमधून काही अधिकारी आले आणि त्यांनी प्रयोगासाठी या नव्या एचएमटी बियाणांची मागणी केली. दादाजींनी त्यांना पाच किलो बियाणे दिले ज्याची त्यांनी फक्त एक रिसीट दिली. १९९८ साली पीकेव्हीने पीकेव्ही-एचएमटी नावाने नव्या जातीचा शोध लावल्याचा दावा केला. त्याच्या मते हे वाण पूर्वीच्या वाणापेक्षा अधिक शुद्ध होते. परंतु त्यांनी एकदाही याचे मूळ बियाणे आपण कुठून मिळवले याचा जाहीररीत्या उच्चार केला नाही की दादाजींना त्यांचे श्रेय दिले नाही.
२००४मध्ये द हिंदू वृत्तपत्राने दादाजींच्या नवनव्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांनी खोब्रागडेंच्या संशोधनावर प्रकाश टाकला. हळूहळू दादाजींचा संशोधनाची दाखल घेत त्यांना अनेक पुरस्कार आणि मानसन्मान देण्यात आले.
पण, त्यांना त्यांच्या एकाही वाणाचे पेटंट मिळाले नाही.
हजारो शेतकऱ्यांना बियाणे पुरवणाऱ्या त्यांच्यासाठी समृद्धी आणणाऱ्या दादाजींचे शेवटचे दिवस तर अत्यंत हलाखीत गेले. त्यांच्या संशोधनाची दाखल फोर्ब्जसारख्या आंतरराष्ट्रीय मासिकाने देखील घेतली. तेंव्हा कुठे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कामाची दखल घेत अनेक व्यासपीठांवर त्यांना आमंत्रित केले आणि त्यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
“नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन”ने (एनआयएफ) देखील एचएमटी वाणाचा शोध लावल्याबद्दल त्यांचा सन्मान केला. एनआयएफने त्यांच्याकडून एचएमटी, डीआरके आणि इतर सात त्यांनी शोधलेल्या वाणांचे बियाणे घेतले. प्रोटेक्शन ऑफ प्लांट अँड फार्मर्स राईट ऑथोरिटी (पीपीव्हीएफआरए) यांच्यासह पीपीव्हीएफआर कायदा २००१नुसार त्यांनी या बियाण्यांचा अधिकार देखील आपल्याकडे घेतला.
एनआयएफने एचएमटीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पीपीव्हीएफआरएकडे अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाची चार वर्षाने दाखल घेण्यात आली. ४ एप्रिल २०१२ रोजी त्यांना याचे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रमाणपत्रानुसार त्यांना या बियाण्यांचे उत्पादन, विक्री, मार्केट, वितरण, आयात आणि निर्यात करण्याचे अधिकार देण्यात आले होते. अर्थात, या वाणाची नोंद दादाजी एचएमटी या नावाने करण्यात आली. त्यामुळे पीकेव्हीने आणलेल्या वाणाची नोंद पीकेव्ही-एचएमटी अशा नावाने करणे सोपे झाले. परंतु लोकप्रिय एचएमटी नाव मात्र मागेच राहिले.
एनआयएफने दादाजींच्या एचएमटीसह सर्व वाणाचे अधिकार आपल्याकडे घेतले.
इलेक्ट्रॉनिक स्टॅम्प पेपर डॉक्युमेंटवर त्यांनी आपले अधिकार हस्तांतरित करीत असल्याबद्दल दादाजींची सही घेतली आणि त्याच्या प्रत्येक वाणाचे फक्त ५०,०००/- रु. या दराने दोन वाणांचे त्यांना फक्त १,००,००० रु रक्कम देण्यात आली. एनआयएफने दिलेली ही रक्कम अगदीच तोकडी होती. एचएमटीचे वाण तर आधीच प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यामुळे त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होणार याची खोब्रागडेंना खात्री होती.
एनआयएफने त्यांना पुढील संशोधनासाठी १२.५% दराने ३ लाख रुपयांचे व्याज दिले. यातील एक लाख रुपयांचे कर्ज खोब्रागडे यांनी परत केले. पण, पुढच्याच वर्षी त्यांना सेरेब्रलचा स्ट्रोक आल्याने तब्येत प्रचंड खालावली. दादाजींचा मुलगा मित्राजित याने एनआयएफला किमान व्याजाची रक्कम तरी माफ करावी अशी विनंती केली. पण, एनआयएफने कर्ज माफ करण्यासाठी याचे एचएमटी आणि डीआरके या वाणांचे हक्क खाजगी कंपनीला हस्तांतरित करावे लागतील आणि त्यासाठी थोडा विलंब होईल असे कारण दिले. फक्त एचएमटी आणि डीआरकेच नाही तर खोब्रागडेंनी २००५पर्यंत नांदेड ९२, नांदेड चीनुर, विजय नांदेड, दीपक रत्न, नांदेड हिरा, काटे एचएमटी आणि डीआरके-२ असे आणखी सात वाणांचे बियाणे शोधले होते.
या सर्वांचे हक्क एनआयएफने खोब्रागडेंच्या वतीने स्वतःच्या नावाने रजिस्टर केल्याचे पीपीव्हीएफआरएने कळवले.
एका प्रामाणिक कष्टाळू शेतकऱ्याने प्रचंड मेहनतीने शोधलेले या वाणाचे अधिकार त्याला न मिळता कुठल्यातरी खाजगी कंपनीला मिळाले. हतबल होऊन याकडे पाहण्याशिवाय खोब्रागडे काही करू शकले नाहीत. संशोधक शेतकऱ्याची जर अशी शोकांतिका होत असेल तर, याहून मोठे दुर्दैव ते कोणते. दादाजींचे हे काम एखाद्या विद्यापीठात संशोधक म्हणून गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या देखील लाजवणारे आहे. माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक अब्दुल कलम यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले.
अखेरच्या क्षणी अशा भूमिपुत्राच्या वाट्याला अवहेलनेशिवाय काहीच आले नाही!