बरोबर शंभर वर्षांपूर्वी १६ ऑक्टोबर १९२१ला `प्रबोधन’चा पहिला अंक निघाला. मार्च १९३०ला शेवटचा अंक निघाला. या दरम्यान ९५ अंक निघाले. यातला प्रत्येक अंक हा संघर्षाचा नवा अध्याय होता. त्यासाठी प्रबोधनकारांनी स्वतःला पणाला लावलं होतं. प्रबोधनकारांनी `प्रबोधन’ घडवलं आणि `प्रबोधन’ने प्रबोधनकारांना. त्याचा प्रवास अद्भुत होता. शंभर वर्षांनंतरही रस्ता दाखवणारा.
—
गरिबी त्या घरात तीन पिढ्यांपासून तरी ठाण मांडून वस्तीला होती. घरातल्या थोरल्या मुलाच्या हुशारीचं कौतुक सार्या गावाला होतं. मुलगा वकील बनणार याची खात्री होती. पण मॅट्रिकच्या परीक्षेला फी भरण्यासाठी दीड रुपया कमी पडला आणि सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. अशा घरात सरकारी नोकरी ही खूप मोठी गोष्ट होती. कितीतरी वर्षांनंतर जरा स्थैर्य आलं होतं. दादरमध्ये बिर्हाड स्थिरावलं होतं. शंभर वर्षांपूर्वी अडीचशे रुपये पगार मिळत होता. घरात दोनाचे चार हात झाले. चार सुखाचे दिवस आले. वंशवेल विस्तारत होती. पण या सगळ्या सुखाला ठोकर मारत आई मुलाला सांगत होती, भीक माग, पण इंग्रज सरकारची नोकरी करून नकोस.
ठाकरेंच्या घरातलं जगण्याचं व्याकरण इतरांपेक्षा बरंच वेगळं होतं. वडील-आजोबांच्या निधनानंतर साधारण पंचवीस सव्वीस वर्षांचे केशव सीताराम ठाकरेच आता घरातले कर्ते पुरुष होते. पण आई म्हणजे सीताबाई आणि आजी- बय म्हणजे जानकीबाई याच ठाकरे कुटुंबाचं सर्वस्व होत्या. स्वतः खूप हाल सोसून या दोघींनी ठाकरेंच्या घरात संस्कारांचं स्वाभिमानी बियाणं पेरलं होतं. त्यात पांढरपेशा नाकारून हुन्नराला महत्त्व देणार्यार वडिलांचे संस्कार होतेच. त्यामुळे केशवरावांना सरकारी नोकरी करायची नव्हतीच. पण पहिल्या महायुद्धातल्या मंदीत दुसरा पर्यायही उरला नव्हता. नवा संसार होता. कुटुंबाच्या जबाबदार्या होत्या. पण म्हणून सरकारी नोकरीच्या ओझ्याने ते दबून राहणार्यातले नव्हते.
केशवरावांच्या डोक्यात रोज नव्या चळवळी जन्म घेत होत्या. त्यांना लागलेलं बुकबाजीचं व्यसन होतंच तसं बेफाम. दर महिन्याला पगार झाला की यांची स्वारी लॅमिंग्टन रोडवरच्या `मे. एस. गोविंद अँड सन्स बुकसेलर्स’ या ‘बार’मध्ये पोचायची. मग पगारातले किती रुपये पुस्तकांवर उधळले जातील, याची सीमा नसायची. त्यावर आजीकडे एक तोडगा होता. दादरच्या कुंभारवाड्यात राहणारे महिपतराव तावडे केशवरावांच्या ऑफिसात कामाला होते. महिन्याच्या पहिल्या तारखेला आजी सकाळीच तावडेंकडे जायची. सांगायची, `हे बघा महिपतराव, आज पगार होणार. तेव्हा दादाला गप्पागोष्टींत गुंगवून ग्रँटरोडकडूनच घरी घेऊन या. गिरगावाकडे जाऊ देऊ नका.’ ही युक्ती कधी लागू पडायची, कधी नाही. पण बुकबाजीच्या व्यसनाने केशवरावांच्या सरळमार्गी झालेल्या आयुष्याचा रस्ता बिघडवला होता, हे मात्र खरं. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांना ते कोळून प्याले होते. मेंदूत `केमिकल लोच्या’ करायला यातला एक पुरेसा होता. इथे तर दोघे होते. त्यात इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा पाय स्वजातिभिमानाच्या सालीवरून घसरला आणि कोदंडाचा टणत्कार झाला.
हा साधारण १९१८चा काळ महाराष्ट्राच्या वैचारिक प्रभावाच्या दृष्टीने इतिहासाचार्य राजवाडेंच्याच नावावर लिहिलेला आहे. ते म्हणतील तो इतिहास होता. ते सांगतील तो विचार होता. त्यांच्या अनुयायांचा महाराष्ट्रभर पसरलेला भलामोठा कंपू इतिहासाची मांडणी करत होता. त्याचा प्रतिवाद करण्याच्या फंदात कुणी पडत नसे, इतका त्यांचा दबदबा होता. अशा राजवाडेंनी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या चौथ्या वर्षाच्या अहवालात `कायस्थदीप’ नावाच्या पुस्तिकेवर २२ पानी लेख छापला. त्यात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी समाजावर खोटेनाटे आरोप केले. हे पहिल्यांदाच होत नव्हतं. शिक्षणामुळे नव्याने आत्मविश्वास मिळवू लागलेल्या जातींच्या स्वाभिमानाला ठेचण्यासाठी इतिहासाचा हत्यार वापरलं जात होतं.
महात्मा फुले वाचल्यामुळे केशवरावांना हा डाव कळला नसता तर नवल. त्याच्या जोरावर त्यांनी राजवाडेंना भिडायचं ठरवलं, `मी चांगला वक्ता आहे. खंबीर लेखक आहे. समाजातले अन्याय मी उघड्या डोळ्यांनी पहात आहे. बहुजन समाजाच्या बाजूने लिहिणारा बोलणारा खमक्या वक्ता लेखक कोणीही नाही. मी स्वस्थ का बसावे?’ त्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं. राजवाडेंचे सगळे आरोप खोडून काढले. महाराष्ट्रभर भाषणं दिली. संधी साधून त्यांचा सीकेपी समाज खडबडून जागा केला. आता वेळ होती पुस्तक लिहिण्याची. कशासाठी- `एका काळच्या सत्तामदाने शिरजोर झालेले ब्राह्मण पंडित इतिहास संशोधनाच्या किंवा आणखी कसल्या तरी फिसाटाच्या पांघरुणाखाली कायस्थादी ब्राह्मणेतरांवर आणि अनेक चित्पावनेतर ब्राह्मणांवरही हल्ले चढवायला सवकलेले आहेत. त्यांचा एकदा कायमचा पुरा बंदोबस्त केलाच पाहिजे, या हिरीरीने मी कोदण्डाचा टणत्कार हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले.’
`कोदण्डाचा टणत्कार अर्थात भारत इतिहास संशोधन मंडळास उलट सलामी’ हे तडाखेबंद पुस्तक १७ नोव्हेंबर १९१८ला प्रकाशित झालं. या ग्रंथाच्या सहा हजार प्रती अवघ्या पंधरा दिवसात संपल्या म्हणे. कारण हा प्रतिवाद फक्त सीकेपींचा उरला नव्हता. तो ब्राह्मणी संशोधकांच्या बदनामीमुळे अस्वस्थ असलेल्या सगळ्याच ब्राह्मणेतरांचा झाला होता. केशवराव दुसर्या आवृत्तीच्या प्रास्ताविकात सांगतात तसं हे पुस्तक `ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाचं रहस्य अचूक पटवणारं हँडबुक’ बनलं होतं. हा नेमका काय चमत्कार होता, याचं आचार्य अत्रेंनी फर्मास वर्णन केलंय. ते असं, `राजवाडे यांच्या लिखाणाविरुद्ध किंवा त्यांच्या संशोधनाविरुद्ध ब्र काढण्याचीही त्यावेळी महाराष्ट्रातल्या विद्वानांची छाती नव्हती. पण ठाकरे यांनी ते धाडस करून राजवाडे यांच्यावर पहिले हत्यार उगारले आणि महाराष्ट्रावर एक बाँबगोळा टाकला. या पुस्तकातील ठाकरे यांच्या बिनतोड पुराव्याला आणि कोटिक्रमाला उत्तर देण्याची खुद्द राजवाडे यांचीदेखील प्राज्ञा झाली नाही. मान खाली घालून त्यांना आपला पराभव मुकाट्याने कबूल करणे भाग पडले. सर यदुनाथ सरकार यांनी आपल्या शिवचरित्रात या पुस्तकाचा गौरवपर उल्लेख केलेला आहे. या पुस्तकाच्याच आधारावर भारत इतिहास संशोधन मंडळाची वार्षिक तैनात मुंबई सरकारने अगदी परवापरवापर्यंत बंद केलेली होती. ठाकरे यांचा हा कोदण्डाचा टणत्कार सबंध महाराष्ट्रात कित्येक दिवस तरी गाजून राहिला होता. त्या पुस्तकाच्या हजारो प्रती महाराष्ट्रात घरोघर खपल्या आणि त्यांच्या प्रकाशाने महाराष्ट्रातील निद्रिस्त ब्राह्मणेतर जनता एकदम जागृत झाली. त्यामुळे एक निधड्या छातीचा लढवय्या लेखक आणि प्राणघातक प्रहार करणारा टीकाकार म्हणून ठाकरे यांचे नाव एकदम प्रामुख्याने महाराष्ट्रापुढे आले आणि द्रोणाचार्यांना आपल्या तेजस्वी शरसंधानाने कोदण्डधारी अर्जुनाने जसे हतवीर्य करून टाकले, त्याप्रमाणे महाराष्ट्रातील मी मी म्हणणार्या सुप्रतिष्ठित इतिहासाचार्यांना आणि संशोधकांना आपल्या कोदण्डाच्या टणत्काराने गर्भगळीत करून त्या कोदण्डधारी कायस्थ कलमबहाद्दराने त्यांच्यावर मात केली.’
कोदंडाचा टणत्कारने केशवरावांच्या आयुष्यातला मोठाच टर्निंग पॉइंट आणला. त्यांच्या सामाजिक क्रांतिकारक जीवनाला खर्या अर्थाने सुरुवात झाली. या पुस्तकातच केशवरावांचा प्रबोधनकार बनण्याची बीजं आहेत. या पुस्तकामुळे महाराष्ट्रभरातल्या ब्राह्मणेतर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांची भाषणं ठिकठिकाणी आयोजित केली. व्याख्यानांच्या दौर्यात त्यांना बहुजन समाजाची हलाखी आणि भिक्षुकशाही पिळवणूक कळत गेली. याच दरम्यान वेदोक्त प्रकरण गाजत होतं. साक्षात छत्रपती शिवरायांची कुळीच क्षत्रिय नसल्याचं हे अहंकारी पंडित म्हणत होते. जातवर्चस्ववादाचं एक हिडीस रूप महाराष्ट्र बघत होता. केशवरावांची विचारचक्रं सुरू झाली. त्यातून ते एका निष्कर्षापर्यंत पोचले, ब्राह्मणेतर समाजाची पहिली गरज भिक्षुकशाहीच्या सापळ्यातून मुक्तता ही आहे. या मनसुब्याला छत्रपती शाहू महाराजांचा दुजोरा मिळाला. केशवरावांचा शाहू महाराजांशी जिव्हाळ्याचा स्नेह निर्माण झाला होता. त्यांनीच केशवरावांना बुद्धिप्रामाण्यवादी अमेरिकन विचारवंत रॉबर्ट इंगरसॉल यांच्या विचारांची दीक्षा दिली. त्या सगळ्यातून केशवराव हळूहळू एका निष्कर्षापर्यंत पोचले. आपण एक वृत्तपत्रं काढायला हवं. केशवरावांतून प्रबोधनकारांचा जन्म होत होता.
पत्रकारितेची दुनिया प्रबोधनकारांना नवी नव्हतीच. शाळेत असतानाच त्यांचे लेख `करमणूक’सारख्या लोकप्रिय साप्ताहिकात येऊ लागले होते. शाळेतच त्यांनी घरगुती प्रेस मशीन बनवून ‘विद्यार्थी’ नावाचं मासिक सुरू केलं होतं. त्यांच्या गावात म्हणजे पनवेलमध्ये नीट चाललेलं पहिलं नियतकालिक जन्माला यायला १९६७ साल उजाडलं. तिथे त्याच्या सत्तरेक वर्षं आधी तरी प्रबोधनकार शाळकरी वयात छापील साप्ताहिक चालवत होते. तेव्हापासून ते सातत्याने विविध नियतकालिकांत लिहित होते. छापखान्याच्या कामाचाही त्यांना चांगला अनुभव होता. जळगावात असताना त्यांनी नारायणराव फडणवीसांच्या मार्गदर्शनात `सारथी’ नावाचं मासिकही चालवलं होतं. इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे ते आता `प्रबोधन’ काढण्यासाठी तयार झाले होते.
एकच अडथळा होता तो सरकारी नोकरीचा. सरकारी नोकरांना पुस्तक लिहिणं, छापणं किंवा वर्तमानपत्रं काढण्याची परवानगी नव्हती. केशवरावांनी राजीनामा द्यायचं ठरवलं. ते तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या
ऑफिसात रेकॉर्ड सेक्शनचे हेडक्लार्क म्हणून काम करत होते.
ऑफिसचं जुनं रेकॉर्ड शिस्तीत राखण्यासाठी पद्धत शोधणं कुणालाही जमत नव्हतं. त्यासाठी गोरे तज्ज्ञही डोकं लावून गेले होते. तो सगळा गोंधळ केशवरावांनी निस्तरला होता. त्यामुळे त्यांना स्टेनोटायपिस्टचं हेडक्लार्क बनवलं होतं. असा कामाचा माणूस कोणत्याही साहेबाला हवाच असतो. तसाच तो सगळ्या मुंबईचे चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर विल्यम स्टुअर्ट मेंटिथ यांनाही हवा होता. त्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी थेट मुंबई इलाख्याच्या सगळ्यात मोठ्या अधिकार्याला, चीफ सेक्रेटरी एल. रॉबर्टसन यांनाच गळ घातली. केशवरावांना फक्त अपवाद म्हणून वर्तमानपत्र काढण्याची खास परवानगी दिली. केशवराव लिहितात, `कर्दनकाळ ब्रिटिश सरकारच्या अमदानीत सरकारी नोकरी असताही वर्तमानपत्र काढण्याची खास परवानगी मिळविणारा मीच पहिला नि अखेरचा गव्हर्नमेण्ट सर्वण्ट आहे.’
पाक्षिक `प्रबोधन’ सुरू झालं. केशवराव प्रबोधनकार झाले. १६ सप्टेंबर १९२१ला पहिला अंक प्रसिद्ध झाला. आठ पानाचा अंक होता. `प्रबोधनचे ध्येय’ या पहिल्याच लेखाची सुरुवात प्रबोधनकारांनी `श्रीमन्मंगल गणाधिपतयेनमः बुद्धिदाता व विघ्नहर्ता श्रीगणेशदेवाच्या चरणी अनन्यभावाने माथा ठेऊन…’ केली होती. खणखणीत भाषा, दणदणीत विचार आणि कुणाची भीडभाड नसलेला स्वभाव यातून `प्रबोधन’चं वेगळेपण उठून दिसलं. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणांची गरज असल्याचं मत ठामपणे मांडलेलं होतं. उदाहरणादाखल, `सामाजिक उच्चनीच भेदभाव, आपण व आपला समाज इतर सर्व समाजापेक्षा उच्च दर्जाचा मानण्याची नाना फडणिशी आणि धार्मिक क्षेत्रात भिक्षुकशाहीची दिवसाढवळ्या भांगरेगिरी, या सर्व राष्ट्रविनाशक, समाजविध्वंसक व दास्यप्रवर्तक दोषांचा आमूलाग्र नायनाट झाल्याशिवाय स्वराज्याचे अमृत प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी हिन्दुस्थानाच्या घशांत कोंबले, तरी त्यापासून त्याचा लवमात्र उद्धार होणार नाही.’
दर महिन्याच्या १६ आणि १ तारखेला `प्रबोधन’ पाक्षिक प्रकाशित व्हायचं. पट्टीच्या गायकासारखे १ नोव्हेंबरच्या दुसर्याच अंकाच्या मैफिलीत प्रबोधनकार समेवर आले. निमित्तही तसंच घडलं होतं. कोल्हापुरात काही मराठा तरुणांनी अंबाबाईच्या गाभार्यात जाऊन पूजा केली. पण कोल्हापूर संस्थानच्या पोलिसांनी त्यांना तुरुंगात डांबलं. त्यावर प्रबोधनकारांनी `अंबाबाईचा नायटा’ नावाचं स्फुट लिहिलं. प्रबोधनकारांची शाहू महाराजांशी इतकी जवळीक होती की ते महाराजांच्या विरोधात लिहितील असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण चुकीला चूक म्हणाले नसते, तर ते प्रबोधनकार कसले? महाराज आहेत म्हणून सांभाळून टीका करावी, तर तेही नाही. इथेही जिव्हारी लागेल असाच घाव. भाषा तर इतकी कडक की हात लावला तर चटका बसेल. पुन्हा उदाहरणादाखल वाचायलाच हवा असा हा तुकडा, `जेथले देव व देवता या भिक्षुकी जेलरांच्या तुरुंगवासात खितपत पडल्या आहेत. ज्यांचे पूजन मराठ्यांसारख्या उच्चवर्णीय क्षत्रियांसही करता येत नाही. जेथे दुराग्रही जातिभेद नाठाळ पिसाळलेल्या कुत्र्यांप्रमाणे महाद्वारावर ब्राह्मणेतरांवर बेगुमानपणे तुटून पडत आहे. असल्या देवळांना पवित्र धार्मिक स्थळे समजण्यापेक्षा उनाडटप्पूंचे पांजरपोळ मानायला काही हरकत नाही. आणि असल्या या भिक्षुकी तुरुंगात पडलेल्या देवांना व देवतांना सडकेवरच्या मैल-फर्लांगदर्शक दगडधोंड्यांपेक्षा फाजील महत्त्वही कोणी देऊ नये. ज्या अंबाबाईला भिक्षुकांची कैद झुगारून देता येत नाही, ती अंबाबाई आम्हा दीन दुबळ्यांचे भवपाश तोडणार ती काय! ही शोचनीय दुःस्थिती पाहिली म्हणजे हिंदू देवळे जमीनदोस्त करणारे अफझुलखान, औरंगजेब एक प्रकाराने मोठे पुण्यात्मे होऊन गेले, असे वाटू लागते.’ असं लिहिणं हे प्रबोधनकारांचं मोठेपण होतं. पण त्यापेक्षाही मोठेपण शाहू महाराजांचं होतं. ते नाराज झाले नाहीत. ते स्वतः मुंबईला आल्यावर प्रबोधनकारांचं ऑफिस सुटायच्या वेळेला गाडी घेऊन त्यांची वाट बघत बसले. त्यांना गाडीत घालून पन्हाळा लॉजवर घेऊन आले. सगळा निर्वाळा करेपर्यंत मनसोक्त गप्पा मारत बसले.
याच अंकात प्रबोधनकारांनी लिहिलेलं आणखी एक स्फुट आहे, `मलाबारात मोपले आणि महाराष्ट्रात टोपले’. त्यात त्यांनी मुसलमानांनी केरळमध्ये केलेल्या हिंसाचाराच्या आणि मुंबईत ख्रिश्चन मिशनर्यांकडून होणार्या धर्मांतराच्या प्रयत्नांच्या विरोधात रणशिंग फुंकलं होतं. फक्त दुसर्याच अंकात नाही, तर पुढेही अनेकदा ते ही लाईन चालवताना दिसतात. ते हिंदू जात्यंधांसारखेच, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांधांविरोधात तुटून पडताना दिसतात. हे लिखाण टिपिकल सेक्युलर नाहीच नाही. उलट कट्टर हिंदुत्ववादी आहे. महात्मा फुलेंनी सत्यशोधक विचारांच्या गाभ्यात `ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणाशी, धरावे पोटाशी बंधूपरी’ अशी सर्वसमावेशकता रुजवली आहे. ही करुणा प्रबोधनकारांच्या फटक्यांमध्ये नाही. त्यात पत्रकाराचा रोकडा पंचनामा आहे. त्यामुळे सत्यशोधकी प्रवाहातले असूनही स्वतःचं वेगळं अस्तित्व राखून ठेवतात. पण इथे फारच इंटरेस्टिंग गोष्ट घडते, त्यांचं जहाल हिंदुत्व त्यांना हिंदू धर्मातल्या अन्यायाविरुद्ध टीका करण्याचा अधिकारच देतं. कुणी त्यांना सेक्युलर म्हणून बाजूला सारू शकत नाही. आपण हिंदू असल्याचं अभिमानाने सांगत ते भिक्षुकशाहीच्या चिंधड्या करत होते. त्यातून बहुजनी हिंदुत्वाचं जगावेगळं रसायन `प्रबोधन’मध्येच जन्म घेताना दिसतं. वा. रा. कोठारी, बाबासाहेब बोले, मो. तु. वानखडे ही ब्राह्मणेतर चळवळीतली मराठेतर नेतेमंडळी पुढच्या काळात हिंदुमहासभेकडे जाताना दिसतात. पण प्रबोधनकार त्यांच्या नादाला लागत नाहीत. स्वतःचं शेंडीजानव्याचं नसलेलं हिंदुत्व घट्ट धरून ठेवतात. पुढच्या पिढ्यांकडे सोपवतातही.
पहिल्या वर्षीच्या पाचव्या अंकापासून प्रबोधनकार `मानसिक दास्याविरुद्ध बंड’ नावाची एक लेखमाला लिहित होते. लिहिण्यात आणि जगण्यात विरोधाभास नसावा, असं त्यांना वाटत होतं, `एकीकडे नोकरी नि दुसरीकडे बहुजन समाज जागृतीचे कार्य, अशा परस्परविरुद्ध दोन टोकांवरच्या डगरीवरचा कसरती खेळ माझ्या स्वभावाला पटेनासा झाला. सद्सद्विवेकबुद्धी सारखी टोचण्या देऊ लागली. सभांतून सरकारी धोरणांवर टीका करायची आणि प्रबोधनात मानसिक दास्याविरुद्ध बंड या विषयावर स्पष्टोक्तीची लेखमाला लिहायची हे मला सहन होईना.’ सरकारच्या नोकरीला लाथ मारून बहुजन समाजाच्या सेवेला वाहून घे, असं त्यांच्या स्वाभिमानी मातोश्री सांगत होत्याच. प्रत्यक्ष राजीनाम्याची तारीख शनिमहात्म्य या पुस्तकात येते, ताr अशी, `१६ डिसेंबर १९२१पासून मानसिक दास्याविरुद्ध बण्ड ही लेखमाला सुरू झाली आणि तिचा ५वा अग्रलेखांक ता. १ मार्च १९२२ला प्रसिद्ध होण्यापूर्वीच ता. १० फेब्रुवारी १९२२ रोजी दुपारी बरोबर १२ वाजता, राहू, शनि आणि मंगळ या त्रिकुटाचे मेतकूट जमताच, अपमानाच्या क्षुल्लक सबबीवर मी ताडकन सरकारी नोकरीच्या दास्याची जाडजूड रौप्यशृंखला तोडून, तज्जन्य मानसिक दास्याविरुद्ध प्रत्यक्ष बंड केले.’
नोकरी सोडली आणि प्रबोधनकार नव्या जोमाने कामाला लागले. त्यांनी `प्रबोधन’च्या कामासाठी दादरमधल्याच खांडके बिल्डिंगमध्ये एक ब्लॉक भाड्याने घेतला. पायाला भिंगरी लावलेल्या प्रबोधनकारांना गाठण्यासाठी ही प्रबोधन कचेरी सोयीची होती. त्यामुळे दादर परिसरातले अनेक तरूण चुंबकासारखे ओढले गेले. ते तिथेच बसून वाचन करत, अभ्यास करत, चर्चा करत. दिवस दिवस पडून राहत. `प्रबोधन’च्या अंकांचं पॅकिंग करत रात्री जागवत. त्या तरुणांनी आधी स्वाध्यायाश्रम आणि नंतर गोविंदाग्रज मंडळ संस्था सुरू केल्या. संस्थेच्या सांस्कृतिक उपक्रमांना हळूहळू प्रबोधनकारांनी चळवळीची दीक्षा दिली आणि हुंडा विध्वंसन संघ नावाच्या वादळाची सुरुवात झाली. एखाद्या लग्नात हुंडा घेतला असेल तर तिथे प्रबोधनकार आपली सेना घेऊन गाढवाची वरात काढत. गाढवाला मुंडावळ्या बांधलेल्या असत, हुंडेबाज गधडा अशी पाटी लावलेली असे. लग्नात घुसून धुमाकूळ घालत. हुंडा परत द्यायला लावला जाई. १९२२-२३च्या लग्नसराईत सीकेपींची २०-२५ लग्नं उधळली होती. या आंदोलनाचं वैचारिक नेतृत्व `प्रबोधन’ने केलं. इतिहासकार वा. सी. बेंद्रे सांगतात तसं या आंदोलनाने सीकेपी समाजातली हुंड्याची रूढी जवळपास संपवली. ज्येष्ठ संपादक श्री. शं. नवरे सांगतात, ते जास्त महत्त्वाचं आहे, `पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या समाज समता संघाला निष्ठावंत कार्यकर्ते पुरविण्याचे काम मुख्यतः स्वाध्यायाश्रम याच संस्थेने केले.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत सुरुवातीच्या काळात अनेक सीकेपी तरुण सक्रिय दिसतात. त्यांची तयारी प्रबोधनकारांनी करून घेतली होती.
दादरच्याच प्रबोधन कचेरीतून सलग दोन वर्षं `प्रबोधन’चे २४ अंक निघाले. `प्रबोधन’ स्थिरावलं होतं. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास लिहिणारे रा. के. लेले सांगतात `प्रबोधन’चा खप तीन हजारापर्यंत वाढला होता. तो या काळात असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे प्रबोधनकारांना हुरूप आला होता. पानं वाढवा अशी मागणी करणारी पत्रं `प्रबोधन’मध्ये सातत्याने छापून येत होती. पण स्वतंत्र छापखाना नसल्यामुळे ना पानं वाढवता येत होती, ना प्रती. छत्रपती शाहू त्यांना छापखान्यासाठी २० हजार रुपये देणगी आणि २० हजार रुपये बिनव्याजी कर्ज देणार होते. पण महाराजांचं अचानक निधन झालं. `प्रबोधन’चे एक चाहते आत्माराम चित्रे यांनी काळबादेवी इथे छापखानाही उभारून दिला. तिथे कामही सुरू झालं. पण महिन्याभरातच चित्रेंचंही निधन झालं. तोही कारखाना हातातून गेला. असे धक्के बसत असतानाच कर्मवीर भाऊराव पाटील एक आशेचा किरण घेऊन आले. प्रबोधनकार आणि भाऊराव ही जुनी जोडगोळी होती. काही करायचं असलं की भाऊराव प्रबोधनकारांना भेटायला येत. रयत शिक्षण संस्थेची आखणीही दादरच्या प्रबोधन कचेरीतच झाली होती.
भाऊराव तेव्हा धनजीशा कुपर या उद्योजकासाठी सातारा रोडजवळच्या पाडळी या गावी नांगरांचा कारखाना उभारत होते. धनजीशा पारशी असले तरी त्यांचे वडील साधे सुतार होते. सातार्यातच लहानाचे मोठे झाले होते आणि ब्राह्मणेतर पक्षाचे नेते होते. पुढे ते मुंबई इलाख्याचे पहिले मुख्यमंत्रीही बनले. त्यांना पुढच्याच वर्षी पहिल्यांदा होऊ घातलेल्या लोकल कॉन्सिलच्या निवडणुका लढवायच्या होत्या. त्यासाठी त्यांना प्रबोधनकारांसारखा हरहुन्नरी आणि प्रसिद्ध पत्रकार सोबत हवा होता. जॉइन करण्यासाठी त्यांनी प्रबोधनकारांसमोर ठेवलेलं पॅकेज उत्तमच होतं. हवा तसा छापखाना, त्यासाठी हवा तितका पैसा, राहण्यासाठी घर, नांगर कारखान्याच्या जाहिरात खात्याची जबाबदारी, `प्रबोधन’च्या धोरणात लुडबुड नाही, सन्मानवेतन म्हणून दरमहा १५० रुपये, शिवाय छापखान्याच्या निव्वळ नफ्यात अर्धा वाटा. त्याला भुलून प्रबोधनकारांनी `प्रबोधन’चा कारभार सातार्याला हलवण्याचा निर्णय घेतला. पण प्रबोधनकारांसारखा निखारा सांभाळणं कोणत्याही राजकारण्यासाठी अशक्यच होतं. खटके उडाले. नको ते आरोप कानावर पडताच प्रबोधनकारांनी सगळा हिशेब केला. कफल्लक होऊन सातारा सोडला.
`प्रबोधन’ फक्त नऊ महिने सातार्यातून निघालं. या सगळ्याची कुणकुण कानी पडतात `प्रबोधन’वर प्रेम करणारे रामचंद्र उर्फ बापूसाहेब चित्रे यांनी पुण्यात कर्जात बुडालेला एक छापखाना विकत घेण्याची तयारी सुरू केली होती. त्याचा व्यवहार करण्यासाठी छापखान्याचा मालक सातारा रोडला प्रबोधनकारांना भेटायला आला होता. तो आला त्याच दिवशी प्रबोधनकारांच्या एका मुलीचं डायरियाने अचानक निधन झालं. तिचे अंत्यसंस्कार करत असतानाच ते छापखाना मालकाशी जड हृदयाने व्यवहाराच्या गोष्टीही करत होते. कारण तो छापखानेवाला घाईत होता. ते बघून प्रबोधनकारांच्या पत्नीने त्यांना सुनावलं, `प्रबोधनापुढे पोटच्या गोळ्याची सुद्धा यांना तिडीक येत नाही.’ तो उद्वेग स्वाभाविक असला तरी ते एका अर्थाने प्रबोधकारांच्या ध्येयनिष्ठेला अभिवादन होतं.
सातार्यातून प्रकाशित झालेल्या तिसर्या वर्षाच्या १७व्या अंकातच पुढचा अंक पुण्यातून प्रकाशित होणार असल्याची घोषणा झाली. त्यानुसार सदाशिव पेठेत घर आणि बुधवार पेठेत छापखाना असा संसार प्रबोधनकारांनी थाटला. पण पुण्यातल्या सनातनी ब्राह्मणांनी मूळ मालकाला छापखाना प्रबोधनकारांना न देण्यासाठी उचकवलं. त्याला बळी पडून त्याने छापखान्याला टाळं लावलं. सनातन्यांनी `प्रबोधन’च्या नावाची पाटीही भररस्त्यात जाळली. वर पुण्यात `प्रबोधन’ला जाळून खाक करू अशी शेखी मिरवली. त्यामुळे पुण्यातच `प्रबोधन’चा छापखाना उभारण्याची प्रतिज्ञा प्रबोधनकारांनी केली. तोवर `प्रबोधन’चा तिसर्या वर्षाचा शेवटचा एकच अंक प्रकाशित होऊ शकला. प्रबोधनकारांनी नव्या छापखान्यासाठी कर्ज आणि देणग्या मिळवल्या. त्यातून सदाशिव पेठेत छापखाना उभा करण्याची तयारी झाली. पण प्रबोधनकारांनी मुंबईतून विकत घेऊन पाठवलेलं ट्रेडल मशीनचं चाक रेल्वेने पुण्यात पोहचेपर्यंत तुटलं. शिवाय इतर पार्टही खिळखिळे झाले. तरीही धीर न सोडता प्रबोधनकारांनी भांडवल उभं करण्यासाठी धावाधाव सुरूच ठेवली. त्यासाठी मुंबईत असताना धावपळीमुळे ते आजारी पडले. शरीराचा उजवा भाग प्रचंड वेदना देऊ लागला. त्याचबरोबर डेंग्यू, कावीळ आणि मूळव्याधीने हल्ला केला. त्यातून बाहेर यायला चार महिने लागले. अर्धी मशिनरी पुण्यात, उरलेली अर्धी मुंबईत दुरूस्त होतेय, कारागिरांचे पगार थकलेत, उपचारासाठीही पैसे नाहीत अशी भयंकर परिस्थिती होती. पण यातून बाहेर येत १९२५च्या जानेवारीत ते कसेबसे पुण्याला पोचले. पुन्हा `प्रबोधन’ उभं करण्याच्या प्रयत्नांना लागले. पुढच्या चार महिन्यांत मशीन सातवेळा तुटलं. इतरही अडचणी येतच राहिल्या.
पण नऊ महिन्यांच्या खंडानंतर `प्रबोधन’ १९२५च्या एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा सुरू झालं. `प्रबोधनला देवाज्ञा झाली’ असे लेख लिहिणार्यांना प्रबोधनकारांनी उत्तर दिलं. प्रत्येक महिन्याला ४० पानांचा मासिक अंक येऊ लागला. प्रबोधनकार पुण्यात होते त्या काळात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद अगदी टोकाला पोहोचला होता. केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणेतर पक्षाचे तरूण नेते प्रबोधनकारांना भेटण्यासाठी जवळपास रोज प्रबोधन कचेरीत येत. शिवाय लोकमान्य टिळकांचे सुपुत्र रामभाऊ आणि श्रीधरपंत हेही असत. त्यामुळे ब्राह्मणेतर पक्षाच्या कारवायांचे सूत्रधार प्रबोधनकारच असल्याचा समज पुण्यात पसरला होता. त्यात दिनकरराव जवळकर यांनी लिहिलेल्या ‘देशाचे दुष्मन’ या पुस्तिकेने एकच गोंधळ उडवला. त्याविषयी य. दि. फडके लिहितात, `जवळकरांची शब्दकळाही ठाकर्यांच्या शब्दकळेसारखी तिखटजाळ आणि वाचताना प्रतिपक्षीयांना ठसका लागावा अशी होती… ब्रह्मवांत्युत्पन्न टिळक–चिपळूणकर असा जवळकरांनी केलेला उल्लेख ठाकर्यांची आठवण करून देणारा होता. कारण ब्रह्ममुखोत्पन्नऐवजी ब्रह्मवांत्युत्पन्न हा शब्द म्हणजे प्रबोधनकारांनी मराठी भाषेत टाकलेली नवी भर होती… देशाचे दुष्मन प्रकाशित झाल्यानंतर त्यावर दीनकर शंकर जवळकरांचे नाव असले तरी ते प्रबोधनकार ठाकरे यांनीच लिहिले आहे, अशी भालाकार भोपटकर वगैरे टिळकपक्षीयांची समजूत होती. त्यामुळे खुद्द प्रबोधनकारांनी ज्ञानप्रकाशमध्ये पत्र लिहून तो मी नव्हेच अशा आशयाचा खुलासा केला.’
प्रबोधनकारांचा छापखाना अगदी ब्राह्मणी वस्तीमध्ये होता. त्यामुळे त्यांना या सगळ्याचा त्रास भोगावा लागत असे. एका निषेधाच्या सभेवरून येणार्या सनातन्यांनी `प्रबोधन’च्या छापखान्यावर जाऊन जवळपास दोन तास शिव्याशाप दिले. तोडफोड केली. पुढच्याच आठवड्यात प्रबोधनकार पर्वतीजवळ फिरायला गेले असताना तीन चार जणांनी लाठीहल्ला केला. पण प्रबोधनकारांनी वॉकिंग स्टिकमधली गुप्ती बाहेर काढल्याने ते पळून गेले. खोटी निमंत्रणपत्रिका बनवून छापखान्याला पोलिसी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्नही केला. गोडबोले नावाचा एक गुंड प्रबोधनकारांना भेटायला आला. छापखान्यातल्या कामगारांमुळे तो काही करू शकला नाही. पुढे पोलिसांना सांगून त्याचा बंदोबस्त करावा लागला. त्यांच्या लिखाणाला प्रक्षोभक ठरवून कोर्टात जाण्याचेही प्रयत्न केले. छापखान्यात आगीचा गोळा टाकून कागदाच्या थप्प्यांना आगही लावण्यात आली. शिवाय मेलेली कुजलेली कुत्री दारासमोर फेकण्यात आली. एकदा तर मेलेलं गाढवही टाकण्यात आलं. अनेकदा पैसे देऊनही छपाईसाठी चांगला कागद मिळून दिला जात नसे. तसंच पुण्यातल्या ब्राह्मण एजंटांनी `प्रबोधन`वर बहिष्कारही घालून बघितला. `प्रबोधन’चे अंक विकाल तर केसरी, ज्ञानप्रकाशचे अंक मिळणार नाहीत, असा दबाव त्यांनी विक्रेत्यांवर आणला. पण `प्रबोधन’ छापखान्यातल्या कामगारांनी अंक चौकाचौकात विकून त्यावर मात केली. तसंच चांगलं कमिशन दिल्याने विक्रेतेही नरम पडले. अनेकदा तर अंक वाचकांपर्यंत जाऊ नयेत यासाठी एकगठ्ठा विकतही घेतले जात. जिवे मारण्याच्या धमक्या तर पहिल्या वर्षापासूनच सुरू होत्या.
खुद्द सदाशिव पेठेत राहून ब्राह्मणेतरी विचारांचे मासिक `प्रबोधन’चे २२ आणि `साप्ताहिक लोकहितवादी’चे १३ अंक प्रकाशित करणं, यासाठीची हिंमत कळण्यासाठी तो काळ समजून घ्यावा लागेल. या काळाने प्रबोधनकारांना सनातनी ब्राह्मणी विचारांमधला जहरी विखार अनुभवता आला. त्याचे समाजावरचे दुष्परिणाम जवळून बघता आले. त्याचा खोलवर विचार करत त्य्ााच्या मुळापर्यंत जाता आले. पुण्याने प्रबोधनकारांच्या विचारांमधले विरोधाभास संपवत त्यांना महात्मा फुलेंच्या विचारांच्या अधिक जवळ नेलं. त्याचं दर्शन `प्रबोधन’च्या पाचव्या वर्षांच्या अंकांमध्ये दिसू लागलं. `देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या एका लेखाचा दाखला त्यासाठी पुरेसा आहे. त्याआधीच्या वर्षी इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर यांना खुनी ठरवणार्या बावला मुमताज प्रकरणात `प्रबोधन’ची लोकप्रियता वाढली होती. पण द बॉम्बे क्रॉनिकल या वर्तमानपत्राचे प्रख्यात ब्रिटिश संपादक बी. जी. हॉर्निमन एका लेखाच्या संदर्भात प्रबोधनकारांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. त्यासाठी वकील द्यायला प्रबोधनकारांकडे पैसे नव्हते. अनेक `प्रबोधन’प्रेमी मदत करण्यासाठी पुढे आले. पण ती अपुरी होती. याच खटल्यासाठी ७ नोव्हेंबर १९२७ला मुंबईत आल्यावर प्रबोधनकार पुन्हा एकदा गंभीर आजारी पडले. ते एकटेच नाहीत तर पत्नी, मुली आणि मुलगा असं संपूर्ण कुटुंबच वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त झाले. त्यामुळे मुंबईत अडकलेले प्रबोधनकार पुन्हा `प्रबोधन’ चालवण्यासाठी पुण्यात जाऊ शकले नाहीत.
`प्रबोधन’ जवळपास दोन वर्ष बंद होतं. या काळात प्रबोधनकारांनी शनिमहात्म्य आणि शेतकर्यांचे स्वराज्य ही दोन महत्त्वाची पुस्तकं लिहिली. शिवाय दादरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवातले ब्राह्मणी वर्चस्व मोडीत काढण्यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत चळवळ चालवली आणि त्यातून १९२६मध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात केली. त्यानंतर प्रबोधन १९२९च्या दसर्याला पुन्हा सुरू झाला. क्रान्त्यंक असं नाव होतं. किल्ल्यातून बाहेर येणारा वाघ त्यावर दिसत होता. प्रबोधनकार नावाच्या वाघानेही नव्याने डरकाळी फोडली होती. पण हे `प्रबोधन’चं शेवटचं पर्व होतं. शेवटच्या सहा अंकात एक वेगळेच प्रबोधनकार दिसतात. क्रान्त्यांकानंतर प्रत्येक अंकात विचारांची क्रांती स्पष्ट दिसत राहिली. हिंदवी नीळकण्ठीझम हा हिंदुत्वाचा व्यापक अविष्कार त्यात होता. ते लिहितात, `आक्रमणाला समोर येईल त्या संस्कृतीतले चांगले घ्यायचे आणि चोथा भिरकावून द्यायचा, हा नीळकण्ठीझमचा धर्म आहे. हिंदुस्थानावर अनेक परधर्माची परचक्रे आली त्या सगळ्यांना पचनी पाडून हिंदू धर्म आणि संस्कृती आजही आपापल्या पायांवर ताठ उभी आहे.’
`प्रबोधन’ची सुरवात गणपतीला स्मरून करणारे प्रबोधनकार नोव्हेंबर १९२९च्या अंकात नवी सुरुवात करताना लिहितात, `कोणत्याही कार्याच्या प्रारंभी– मग ते बॉम्ब फेकण्याचे असो नाहीतर बोंब मारण्याचे असो– कोणत्या तरी देवदेवतेचे नामस्मरणपूर्वक वन्दन करण्याचा हिन्दुजनांचा शिष्ट संप्रदाय आहे. यापूर्वीच्या माझ्या प्रत्येक ग्रंथारंभी हा शिष्टाचार मी भक्तीपूर्वक इमानेइतबारे पाळलेला आहे… पण प्रागतिक मनुष्याने मतांच्या ठरावीकपणाला चिकटून बसण्याइतका मनाचा दुबळेपणा दाखविणे म्हणजे जगात जगण्याची नालायकी सिद्ध करण्यासारखे आहे. कालपर्यंत मी देवदेवतांचे अस्तित्व मानणारा होतो. आज मी देवविषयक सर्व भावनांच्या छाताडावर बॉम्ब फेकणारा लालबुंद क्रान्तिकारक बनलो आहे.’ मार्च १९३०च्या शेवटच्या अंकात ते त्याच्याही पुढे जातात, `प्रबोधन’ निरीश्वरवादी आहे. त्याचे सत्यशोधन सत्यशोधक समाजाच्याही पुढे गेलेले आहे. देव मानवात दलाल नको, या काथ्याकुटापेक्षा देवालाच उखडला तर दलाल उरतोच कोठे?’ इथे `श्रीमन्मंगल गणाधिपतयेनमः बुद्धिदाता व विघ्नहर्ता श्रीगणेशदेवाच्या चरणी अनन्यभावाने माथा ठेऊन…’ सुरुवात झालेल्या `प्रबोधन’च्या लिखाणाचं एक वर्तुळ पूर्ण होतं. बदलांचं महत्त्व ओळखणारं `प्रबोधन’ बदललं होतं. प्रबोधनकार बदलले होते. हा प्रवास संपादकाच्या अविरत संघर्षाचा होता. तो संघर्षाचा प्रवास बाहेरही सुरू होता आणि आतही. `प्रबोधन’ थांबलं, पण तो प्रवास सुरू राहिला. आजही सुरू आहे.