‘स्वदेस’ चित्रपटात शाहरुख खान स्वतःच्या आलिशान व्हॅनमधून दुर्गम गावात कावेरी अम्माला भेटायला जातो तेव्हा कॅरॅव्हॅनमध्येच मुक्काम करतो.तशाच प्रकारच्या कॅरॅव्हॅनमधून पर्यटकांना गावोगावी फिरण्याचा आनंद देण्यासाठी राज्य सरकारने कॅरॅव्हॅनला पर्यटन योजना आखली आहे.
राज्यात अनलॉकनंतर पर्यटकांना काही अटींवर फिरण्याची राज्य सरकारने मुभा दिली पण कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे आजही अनेक पर्यटक स्वतःच्या खासगी वाहनाने फिरण्यास पसंती देतात. त्यामुळे राज्याच्या पर्यटन विभागाने कॅरॅव्हॅन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची योजना आखली आहे.त्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली.
पर्यटन व रोजगाराला चालना
कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे दोन भाग या धोरणात आहेत. यामुळे पर्यटकांना राज्यातील वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्य दुर्गम भागात जाऊनही न्याहाळता येईल. तसेच रोजगार देखील वाढेल.
कॅरॅव्हॅनमध्ये कोणत्या सुविधा
या व्हॅन्समध्ये बेड, किचन, टॉयलेट, सोफा, टेबल असेल. पर्यटकांना यामध्ये मुक्काम करता येईल. जेवणही तयार करता येईल. सिंगल एक्सेल कन्व्हेंशल कॅरॅव्हॅन, ट्विन एक्सल कॅरॅव्हॅन, टेन्ट ट्रेलर, फोल्डिंग कॅरॅव्हॅन, कॅम्प ट्रेलर अशा प्रकारचे कॅरॅव्हॅनचे विविध प्रकार असतील.
– कर सवलती
कॅरॅव्हॅन पार्क- कॅरॅव्हॅन पर्यटनाला प्रोत्साह देण्यासाठी मुद्रांक शुल्कामध्ये सूट, जीएसटी परतावा, विद्युत शुल्कामध्ये सूट दिली जाईल.
-कॅरॅव्हॅन पार्किंग कुठे
एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचा परिसर किंवा त्यांच्या मोकळ्या जमिनीवर तसेच कृषी पर्यटन केंद्रांच्या ठिकाणी.
-नोंदणी कुठे
कॅरॅव्हॅन पार्क व कॅराव्हॅन तसेच हायब्रीड कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी पर्यटन संचालनालयाकडे करावी लागेल. वेबसाईट www.maharashtratourism.gov.in
यासाठी नोंदणी शुल्क 5 हजार रु. व नुतनीकरणासाठी 2 हजार रु.
कॅरॅव्हॅन पार्क म्हणजे काय?
सर्व मूलभूत सोयी सुविधा असलेल्या जागेवर कॅरॅव्हॅन पार्क करून त्यामध्ये पर्यटकांना मुक्काम करता येईल. या ठिकाणी लहान मोठय़ा आकाराच्या कॅरॅव्हॅन उभ्या करता येतील असे पार्क खासगी किंवा सरकारी जमिनीवर स्वतः जमीन मालक किंवा विकासक उभारू शकतील. वाहनतळाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा तसेच स्वतंत्र पाणी, रस्ते व वीज जोडणी असेल. या ठिकाणी पर्यटक सुविधा केंद्र, उद्यान देखील असेल. कॅरॅव्हॅन पार्कच्या मालकांना पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल. पर्यटकांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे, दिव्यांग व्यक्तींसाठी व्हीलचेअर असावी. या योजनेसाठी आवश्यक परवानग्या स्थानिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जातील.