भारतातील फक्त केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांचा विचार केला तर, राज्ये ऐन हंगामात रोज १०० टन फणस विकतात, आणि त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे २० लाख डॉलर्सपर्यंत जाते. या दोन राज्यांचा आदर्श घेत जर आपण आज योग्य पावलं उचलली तर हरिश्चंद्र देसाई यांचा ‘महाराष्ट्रीयन’ फणस जगभरात पोहचेल आणि तोच ‘जॅकफ्रूट’ आपल्या शेतकर्यांना ‘जॅकपॉट’ मिळवून देईल.
– – –
‘मी १० वर्षांचा होतो तेव्हा, मला फणसाची नव्याने ओळख झाली. १९७२ चा दुष्काळ होता, त्याकाळात अन्नधान्य मिळणं मुश्किल झालं होतं. रेशनवर अमेरिकेतून आलेलं, ‘मिलो‘ हे डुकरांच खाद्य आपल्या देशात माणसांना खायला दिलं जात होतं. पण, कोकणच्या सुग्रास जेवणाची सर त्या सपक खाद्याला कशी येईल सांगा. त्या दुष्काळात आमच्या घरची चूल पेटवली ती परसातल्या फणसानं. सुमारे चार महिने माझी आई फणसाची उकड (भाजी) मोठ्या पातेल्यात बनवून, आम्हा सर्व भावंडांना खाऊ घालायची. या घटनेनं फणस हे केवळ फळ नसून, ‘अन्नच आहे‘ असं माझ्या मनात पक्कं झालं…’ महाराष्ट्रातील शेतकर्यांनी ज्यांना ‘फणस किंग’ असं नाव दिलं, असे हरिश्चंद्र देसाई, त्यांचं जीवन फणस या फळाने कसं व्यापून टाकलं आहे हे सांगत होते…
‘माझा जन्म एक मे १९६१ रोजी रत्नागिरीत हातखंबा येथे झाला. आम्ही एकूण पाच भावंडं. माझे वडील मुंबईत गिरगावात पान-तंबाखू दुकानात शंभर रुपये पगारावर कामाला होते, त्यातील तीस रुपये ते दर महिन्याला मनीऑर्डर करायचे. पण तीस रुपयांत पाच भावंडांचं शिक्षण आणि घरखर्च निघत नसे, त्यामुळे मी चौथीपासून हातखंबा तिठ्यावर बसून करवंदं विकायचो. रानातून गोळा केलेल्या ओल्या काजूगरांचं शंभर नगाचं पॅकेट बनवून ते मी पंचवीस पैशांना विकायचो. याच चौकात रात्री वासुदेव भुते यांची चहाची हातगाडी लागायची. तिथे थांबणार्या बसमधील माणसांना चहा विकण्याचे काम करायचो. एका चहामध्ये पाच पैसे असे रात्रभर जागून मला पन्नास-साठ पैसे मिळायचे, याच पैशांनी घरात शिधा आणला जायचा. अशी अनेक छोटी मोठी कामं करत मी माझं संपूर्ण शिक्षण करत होतो आणि कुटुंबाचा आर्थिक भार उचलत होतो. दहावीनंतर माझे अनेक शाळासोबती मुंबईला नोकरीला गेले, पण आपली गरीबी फक्त शिक्षणाने दूर होऊ शकते असं मला वाटायचं. दहावीला ६५ टक्के मिळवून मी शाळेत पहिला आलो. रत्नागिरीतील गोगटे कॉलेजला बीएससी पूर्ण केलं. पहिली नोकरी रत्नागिरी एमआयडीसीत कोकण कॅप्सूल कंपनीत मिळाली. नोकरीला चार वर्षे पूर्ण झाली असताना, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधून कॉल आला. इंटरव्ह्यू पास होऊन, १९८९ साली शिरोडा-सावंतवाडी ग्रामीण रुग्णालयात एक्स रे टेक्निशियन या पदावर नियुक्ती झाली. रुग्णालयात येणारा माणूस मजेसाठी येत नाही, त्यातून शासकीय रुग्णालयात येणारा माणूस हा गरीबच असतो. शारीरिक दुखणी घेऊन येणार्या अनेक परिचित, अपरिचित लोकांना मी माझ्या परीने जमेल तशी मदत केली. दोन वर्षांनी लांजा येथे बदली झाली आणि मी याच गावात स्थायिक झालो. १९९२ साली आरोग्य विभागात कामाला असलेली तन्मयी माझी लाईफ पार्टनर बनली. पार्टनर यासाठी सुद्धा म्हणतो आहे की, २००४ साली जेव्हा मला लांजा तालुक्यातील, झापडे गावात, आठ एकर जमीन चांगल्या किमतीत विकत मिळत होती. तेव्हा मी आमच्या सोसायटीतून कर्ज काढलं, पण रक्कम कमी पडत होती, त्यावेळी माझ्या बायकोने तिचे सर्व दागिने गहाण ठेवून जमीन विकत घ्यायला मदत केली. २०१०पासून मी नोकरी सांभाळून शेतजमिनीत लक्ष घालायला सुरुवात केली. जमलेलं माळरान साफसूफ करून जमीन तयार करून घेतली. लहानपणी दुष्काळाला सामोरं गेल्यापासून फणसाबद्दल आकर्षण होतंच. फणसाला भविष्यात चांगलं मार्केट येईल याची मला खात्री होती. त्या दृष्टीने शास्त्रीय अभ्यास आवश्यक होता, तो करून मगच फणस लागवड करावी असं ठरवलं. त्यासाठी फणसाच्या झाडांचा सर्व्हे करायला दर रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील निरनिराळ्या गावात मी बाईकवरून फिरायचो. गावातील पोलीस पाटील, गावकर यांना भेटून गावात किती फणसाची झाडं आहेत? त्यातील कापे किती आणि बरके किती? असे विचारायचो. सर्व्हे पूर्ण झाल्यावर लक्षात आलं की कोकणात फक्त आठ टक्के फणस कापे असून उर्वरित ब्याण्णव टक्के फणस बरका जातीचे आहेत. पण बाजारात डिमांड मात्र फक्त कापा फणसाचीच आहे. मी विचार केला, जर आपण फक्त कापा जातीची रोपं लावली तर चांगलं उत्पन्न मिळवता येईल, तसेच या फळाला त्याचं हक्काचं मार्केट देखील मिळेल. त्यासाठी आधी फणसाची कलमं तयार करणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन मी शास्त्रीय पद्धतीने ग्राफ्ट (कलम) करणार्या, तज्ज्ञ ग्राफ्टरचा शोध घ्यायला सुरुवात केली. दापोलीच्या, कोकण कृषिविद्यापीठात २०१४ साली एका सेमिनारमध्ये माझा शोध पूर्ण झाला. या सेमिनारला केरळमधील वीस लोकांनी हजेरी लावली होती. भारतात फणसाला राजाश्रय मिळवून देणार्या पद्रे सरांसोबत तिथे संवाद साधता आला. तिथेच गुरुराज या ग्राफ्टरशीही ओळख झाली. त्यांच्याकडे फणसाच्या अनेक व्हरायटी असल्याचं कळलं. सेमिनारमध्ये झालेल्या ओळखीवर, मी आणि पुतण्या संकेत, केरळला जाऊन त्यांच्याकडून चारशे रोपं ट्रेनने घेऊन आलो आणि ती शेतात लावायला सुरुवात केली.
मी शेतात फणस लागवड करतोय ही बातमी जसजशी पंचक्रोशीत पसरली, तसतसे माझी फणसबाग बघायला अनेक गावकरी येऊ लागले. ‘हापूस आंबे, काजू अशी पैसे मिळवून देणारी फळे सोडून बाजारात बिलकुल उठाव नसलेला आणि गेल्या कित्येक वर्षांत कुणीही आपल्या जमिनीत न लावलेला फणस मी का लावतोय?‘ असा प्रश्न करू लागले आणि मी ऐकत नाही म्हटल्यावर मला वेड्यात काढून ते हसायला लागले. त्यांचही बरोबर होतं, कारण आजोबा, पणजोबांच्या काळात लावलेल्या जुन्या झाडांना पावसाळ्यात भरघोस फळे लागतात, गावात प्रत्येक परसात फणस, त्यामुळे मागणी कमी. कित्येक फळं तर झाडावरच पिकून खाली पडतात. धंद्याच्या दृष्टीने फणसाला मागणी फक्त वटपौर्णिमेला असते. त्याच्या आठ दिवस आधी मुंबईतील व्यापारी कोकणात येऊन दहा-वीस रुपयांत एक फणस विकत घेतात आणि मुंबईत नेऊन शंभर-दोनशे रुपयांना विकतात. गावकरीही वाया जाणार्या फळाला जे फुटकळ पैसे मिळतात ते घेऊन समाधान मानतात. यामुळे फणस लागवड हा आतबट्ट्याचा धंदा आहे अशीच सगळ्यांची समजूत होती. सुरुवातीच्या काळात मी फणस लागवड करतोय म्हणून हसणारी ती माणसं आज आज माझ्याकडून फणसाची रोपं घेऊन जातात.‘
फणसाचे झाड सहाव्या शतकापासून भारतात आहे, असं म्हटलं जातं. आपल्याकडील फणसाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत- पहिला बरका फणस, हा अधिक मधुर आणि रसाळ असतो. गरे चिकट पण गोड असतात. हा पचायला हलका असल्याने थोडा अधिक प्रमाणात खाल्ला तरी चालतो. दुसरा कापा फणस, हा कापायला थोडा सोपा असतो. गरे बरक्यापेक्षा कमी गोड आणि जाडसर असतात. याचे गरे जास्त काळ टिकतात, ते हात चिकट न करता खाता येतात, बरक्याप्रमाणे घशात विचित्र भावना निर्माण करत नाही, म्हणून याला मागणी अधिक आहे.
कोवळ्या फणसाची भाजी बनवली जाते, त्याला कुयरीची भाजी म्हणतात. फणसाचे गरे नारळाच्या तेलात तळून तळलेले कुरकुरीत गरे बनवतात. बरक्या फणसाचे गरे चाळणीवर चोळून रस काढला जातो, मग हा रस ताटात वाळवून चविष्ट फणसपोळ्या बनतात. तसेच फणसाच्या रसापासून सांदण हा उकडीचा प्रकार बनवला जातो. बरक्या फणसाचा रस, तांदळाच्या पिठासोबत मळून त्याचे तळलेले वडे (घारगे) बनवले जातात. फणसाच्या ताज्या बिया पाण्यात उकडून स्नॅक म्हणून खाता येतात. बिया उन्हात वाळवून नंतर त्या भाजीत किंवा चिकन रश्शात घालून आवडीने खाल्ल्या जातात.. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्री जेवणापर्यंत आणि ज्यूसपासून आइस्क्रीमपर्यंत फणस चविष्ट रुपात रसनातृप्ती करत असतो.
अशा या बहुरूपी नाना चवी असलेल्या फणसबागेची कौशल्यपूर्ण निर्मिती करण्याचं काम हरिश्चंद्र देसाई त्यांची नोकरी सांभाळून करत होते. आजवर महाराष्ट्रात कुणीही लावल्या नसतील एवढ्या फणसाच्या २५ जाती त्यांनी बागेत लावल्या. पण जगातील सर्व फणस प्रजाती आपल्या मातीत, रुजवण्याचं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यांच्या या धडपडीला घरातून कौतुक आणि पाठबळ मिळत होतंच, पण जेव्हा अॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग केलेल्या मुलाची त्यांना साथ मिळाली, तेव्हा त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांला नवी दिशा मिळाली.
अंगभूत हुशारी आणि शिक्षणाच्या जोरावर मोठ्या शहरात चांगली नोकरी मिळण्याची खात्री असताना शेतीची वाट का निवडलीस, या प्रश्नावर मिथिलेश देसाई म्हणाला, ‘‘आई-वडिलांचे कष्ट मी लहानपणापासून पाहिले आहेत. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण गावी झाले. दहावीला ९० टक्के मिळवून मी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला, बारावीला ८८ टक्के आणि एन्ट्रन्स एक्झाममधे चांगला स्कोअर आल्यामुळे मला महाराष्ट्रातील कोणत्याही इंजिनीअरिंग कॉलेजला मेरिटवर प्रवेश मिळत होता. पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे मी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात अॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. तिथे शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. इंजिनीअरिंग पूर्ण करून यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करायला मी दिल्लीला गेलो. ऑगस्ट २०१७मध्ये मी सुट्टीत घरी आलो असताना बाबा केरळला, भारतातीलपहिल्या जागतिक फणस परिषदेला निघाले होते. त्यांनी विचारलं, येतोस का? नवीन काहीतरी शिकायला मिळेल या हेतूनं मी त्यांच्यासोबत वायनाड, केरळला गेलो. तुम्हाला सांगतो, या पाच दिवसात आम्हाला जणू खजिनाच मिळाला. फणसाचा जगाच्या पाठीवरील इतिहास, भूगोल समजला. तिथे जमलेल्या जगभरातील शेतकरी, शेतीतज्ज्ञ, फळ व्यापारी, भारत सरकारचे कृषी सचिव यांनी फणस या फळाला आज जगात काय महत्त्व आहे हे सांगितलं. तसेच गेल्या काही वर्षांत, फणसाला ‘सुपर फूड‘ म्हणून मान्यता मिळाल्याचंही कळलं. भविष्यात या फळाला किती मोठ्या प्रमाणात मागणी येणार आहे, याची रूपरेषा तिथे मांडली गेली. त्याच परिषदेत शेवटच्या दिवशी जगभरातील फणस उत्पादक शेतकर्यांनी स्वयंप्रेरणेने फणसावर केलेले विविध प्रयोग, त्यांना आलेल्या यशापयशाचे अनुभव सांगितले. दोन एमडी डॉक्टर्सनी फणस या फळातील अँटि ऑक्सिडंट्स डायबेटिस आणि कॅन्सरसाठी लाभदायी ठरू शकतात, याचे पेपर सादर केले. या फणस परिषदेने आम्हाला कोकणच्या मातीतील दुर्लक्षित फणसाकडे पाहण्याची नवीन दृष्टी दिली.
परिषदेहून घरी परतताना माझा करीयरबद्दलचा निर्णय झाला होता; आता यूपीएससी-एमपीएससी करायची नाही किंवा दुसरी कोणती नोकरी देखील करायची नाही, महिन्याला पाच हजार मिळू दे की पाच लाख, यापुढे मी स्वतःला फणस फळाला वाहून घेईन, असं ठरवलं. आईबाबांनी या निर्णयावर शिक्कमोर्तब केल्यावर मात्र आम्ही मागे वळून पाहिलं नाही. रात्रंदिवस फणसबागेत अगदी झपाटल्यासारखं काम सुरू केलं. जगात फणसाच्या एकूण १२८ जाती आहेत, यापैकी २५ जातीची झाडे बाबांनी आधीच लावली होती. मी जॉइन झाल्यावर आम्ही आतापर्यंत निरनिराळ्या ठिकाणांहून ८२ जातींची १४०० झाडे आणून आमच्या बागेत लावली आहेत. दोन फणसाच्या झाडांमध्ये वीस फूट जागा सोडलेली असते, या जागेत आम्ही हळद, लिंबू, आलं लावतो. या वर्षी मी हिमाचल प्रदेशातून आणलेल्या पाचशे सफरचंदांची लागवड करणार आहे. फणसाच्या प्रत्येक जातीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. जमिनीत बी रुजून आलेल्या, पारंपरिक झाडाला फळे यायला साधारण पंधरा ते वीस वर्षे लागतात, तर आम्ही लावलेल्या काही जातींच्या झाडांना अवध्या दीड वर्षात फळं येतात. दोन किलोचा फणस ते अगदी ५० किलोचा फणस अश्या वेगवेगळ्या व्हरायटीज् आम्ही एकत्रित केल्या आहेत. लाल, भगवा, चॉकलेटी, गुलाबी, अशा नेत्रसुखद रंगाच्या गर्यांचे फणस आमच्याकडे मिळतात, या प्रत्येकाची चव वेगळी असते. बिना आठळीचा अननसासारखा दिसणारा फणस, एक मीटर लांब आणि ५० किलोचे फळ देणारा मीटर जॅक, फणस कापताना हाताला चीक लागतो, म्हणून तो न खाणार्यांसाठी गमलेस हा बिनचिकाचा फणस, ज्यांना गोड खायला फारच आवडतं अशांसाठी जास्त गोडीचा हेमचंद्र फणस, असे विविध प्रकारचे फणस आम्ही बागेत लावले आहेत. या बागा संपूर्णपणे सेंद्रिय असून इतर फळबागांच्या तुलनेत इथे कीटकनाशकांचा वापर शून्य असतो. आमची फणसबाग बहरली तशी तिची ख्याती कानोकानी, अनेक ठिकाणी पोहचली. कोकणात येणारे अनेक पर्यटकही बाग पाहायला येऊ लागले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून शेतकरी येऊ लागले, त्यापैकी बर्याच शेतकर्यांनी आमच्या कामापासून प्रेरणा घेत आपल्या शेतात फणस लागवडीचा प्रयोग करायचं ठरवलं. त्यांना देण्यासाठी आम्ही सुरुवातीला एक हजार झाडांची नर्सरी केली, ती रोपं एकाच महिन्यात संपली. पुढील वर्षी तीन हजार रोपं विकली गेली. आणि गेल्या वर्षी तर आमच्या नर्सरीतील सुमारे पंधरा हजार झाडांची संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे एकर जमिनीत लागवड करण्यात आली आहे. आधी असा समज होता की फणस हे झाड फक्त कोकणपट्ट्यातच वाढू शकतं, पण आज निरनिराळ्या जातींची रोपं उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात फणसाचं झाड वाढू शकतं असा आमचा अनुभव आहे. महाराष्ट्रातील एकमेव ‘शासकीय मान्यताप्राप्त फणस नर्सरी’ अशी आमची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी गोवा सरकारने आमच्या नर्सरीतून तीन हजार रोपं नेली आणि तिथल्या शेतकर्यांना दिली. मला आमच्या झापडे गावात ‘जॅक फ्रूट रिसर्च सेंटर ऑफ साऊथ एशिया‘ काढून फणसावर अजून संशोधन करून नवीन व्हरायटीज् शोधायचे आहेत. शेतकर्यांसाठी ट्रेनिंग सेंटर, फूड प्रोसेसिंग प्लान्ट, बाग पाहायला येणार्या देश विदेशातील पर्यटकांसाठी उत्तम अॅग्रो टुरिझम सेंटर येत्या काही वर्षांत उभारणे हे माझं स्वप्न आहे.‘‘
आमच्या गप्पा सुरू असताना मिथिलेशचा फोन वाजला म्हणून मी हरिश्चंद्र देसाई यांच्याकडे पुन्हा वळलो, ते म्हणाले, ‘आरामात बसून पेन्शन खाण्याच्या वयात हा फणसाचा नवीन उपद्व्याप कशाला पाठिशी लावून घेत आहात,’ असा प्रश्न काही सहकारी विचारायचे, त्यांना काहीही उत्तर न देता मी माझं काम सुरू ठेवलं. ‘नोकरीतून निवृत्त होण्याच्या एक वर्ष आधी ९० टक्के पीएफ काढला आणि उरलेल्या शेतजमिनीवरील माळरान साफ करून तिथे ९०० फणसझाडांची लागवड केली. ३० एप्रिल २०१९ला सेवानिवृत्त झाल्यावर मिळालेली सर्व पुंजी मी या बागेत टाकली. या काळात तन्मयीच्या पगारावर घर चालायचं.‘
तुमचा पुढील बिझनेस प्लॅन काय आहे, हे विचारल्यावर देसाई म्हणाले, ‘लागवड केलेल्या सर्व झाडांना फळं धरली आहेत, पण आमचा फळे विकण्यापेक्षा, फूड प्रोसेसिंग मशीनवर फणसाचे विविध प्रकार करून विकण्याचा मानस आहे. फणसाच्या कुयरीची (टेंडर जॅक) रेडी टू इट भाजी बनवणे, डायबेटिस रुग्णांसाठी फणसाच्या कच्या गर्याची पावडर बनवणे, कच्च्या गर्याचे तळलेले गरे आपण खातोच, पण पिक्क्या गर्याचे कुरकुरीत चिप्स बनविणे, फणसाची बी (आठळी) खूप पौष्टिक असते, तिला रोस्ट चॉकलेट कोटिंग करणे, फणसाच्या बीवरील सालीत फायबर कंटेंट भरपूर असतो. ते गुरांचे खाद्य म्हणून विकता येईल. फणसाच्या बाहेरच्या काटेरी साल (चारखंड) गुरांना खाद्य म्हणून खायला घातले जाते. फणसाच्या लाकडाचा फर्निचरसाठी वापर होतो, हे सर्वज्ञात आहे, पण फणसाच्या पानांमध्येही काही औषधी गुण आहेत व त्यांनाही मागणी आहे हे ऐकून आम्हालाही थोडा धक्काच बसला होता. चार महिन्यांपूर्वीच आम्ही एक टन फणसाची पाने परदेशात एक्सपोर्ट केली आणि आता नवीन पाच टनाची ऑर्डर आली आहे. आम्ही बागेला भेट देणार्या सर्व पर्यटकांना फणस गिफ्ट म्हणून देतो. फक्त वटपौर्णिमेला दहा-वीस रुपयांत फणस विकणे, हा आमचा हेतू कधीच नव्हता. त्यापेक्षा याच फणसाचे गरे काढून चागलं पॅकिंग करून शहरात विकले तर एक डझन गर्यांना शंभर रुपये भाव मिळतो. या हिशेबाने एका फणसाचे दोन हजार रुपये होतात. येणार्या काही वर्षात एका फणसाचे तीन ते पाच हजार रुपये मिळाले पाहिजेत, हे माझे ध्येय आहे. आपल्याकडे नारळाला कल्पवृक्ष असं म्हणतात, पण मी मात्र अन्न म्हणून गोरगरीब लोकांसाठी उपयोगी ठरू शकणार्या आणि कोणताही भाग वाया न जाणार्या फणसाला कल्पवृक्ष मानतो.‘
नैसर्गिक फळांवर प्रक्रिया करून त्याचे बायप्रोडक्ट बनवले तर त्याचे आयुर्मान आणि किंमत वाढते. फणसापासून बनणार्या बायप्रोडक्टचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न आज अनेक जण करत आहेत. यापैकीच जेम्स जोसेफ हा मायक्रोसॉफ्ट कंपनीची नोकरी सोडून, फणसाचे पीठ तयार करून देश विदेशात विकतो आहे. हे पीठ गव्हाच्या पिठात मिक्स करून त्याच्या अधिक पौष्टिक चपात्या बनवता येतात, असा त्याचा दावा आहे. आज मांसाहार सोडून शाकाहारी होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. प्रोटिन आणि न्युट्रिशन देणार्या नॉनव्हेज जेवणाला पर्याय म्हणून शाकाहारी लोक फणसाच्या व्हेज मीटकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. ग्राहकांची हीच गरज ओळखून हाँगकाँग मधील कराना ही कंपनी, श्रीलंकेतील शेतकर्यांना सोबत घेऊन फणसापासून बनविलेले व्हेज मीट जगभरात विकत आहेत. फणस उत्पादनात अग्रेसर असणार्या बांगलादेशाला मागे टाकत, भारत आज जगात प्रथम क्रमांकाचा देश बनला आहे.
येत्या काही वर्षांत फणस या फळाला जागतिक पातळीवर मोठं मार्केट असणार आहे. एका मोठ्या फणसाच्या झाडाला पन्नास ते शंभर फळ धरतात. या झाडाचे आयुष्य कमीत कमी शंभर वर्षे आणि जास्तीत जास्त तीनशे वर्षे इतकं आहे. कोणताही मेन्टेनन्स नसलेल्या या झाडात येत्या काळात शेतकर्यांचं आर्थिक गणित बदलविण्याची क्षमता नक्कीच आहे. भारतातील फक्त केरळ आणि तामिळनाडू ही दोन राज्ये हंगामात रोज १०० टन फणस विकतात आणि त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे २० लाख डॉलरपर्यंत जाते. या राज्यांचा आदर्श घेत जर आपण आज योग्य पावलं उचलली तर हरिश्चंद्र देसाई यांनी व्यावसायिक पद्धतीने महाराष्ट्रात पोहचविलेला ‘महाराष्ट्रीयन’ फणस जगभरात पोहचेल, आणि तोच ‘जॅकफ्रूट’ आपल्या शेतकर्यांना ‘जॅकपॉट’ मिळवून देईल.