व्यंगचित्रकार दिनाच्या संध्याकाळच्या सत्रात ‘चिंटू’ या हास्यचित्र मालिकेचे सहनिर्माते चारूहास पंडित यांची मुलाखत संजय मिस्त्री यांनी खेळीमेळीच्या वातावरणात घेतली. पंडित यांनी सृजन आर्ट ही आर्ट गॅलरी सुरू केली आहे. तसेच काष्ठचित्र या नवीन कलाप्रकारातली चित्रनिर्मितीही त्यांनी सुरू केली आहे. कार्टूनिस्ट कंबाईनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले आहे. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. चिंटू इतकी वर्षे लोकप्रिय का? तो कसा सुचला? फक्त चिंटूच का? त्याचबरोबर पॉकेट, राजकीय वा इतर शैली तुम्ही का हाताळली नाहीत? चिंटूखेरीज व्यंगचित्रकलेला तुम्ही आणखी काय देणार? असे मिश्किल, खोचक प्रश्न मिस्त्री यांनी विचारल्यामुळे ही मुलाखत चांगलीच रंगली.
मिस्त्री म्हणाले, चारूहास पंडित हे एकटे नाव नाहीये. त्यांच्यासोबत ‘प्रभाकर वाडेकर’ हे दुसरं नावही जोडलेलं आहे. या जोडीने चिंटू ही हास्यचित्र मालिका यशस्वी केली आहे. प्रत्येक व्यंगचित्रकाराला पॉकेट कार्टून किंवा राजकीय कार्टून्स काढण्याची ओढ असते. तुम्ही या लहान मुलांच्या व्यंगचित्र मालिकेत कसे अडकलात, या प्रश्नावर पंडित म्हणाले, व्यंगचित्रांची आवड हा माझा मूळ स्वभाव होता. लहानपणी जी व्यंगचित्रे बघितली, त्यांचा मनावर परिणाम झाला. हरिश्चंद्र लचके यांचं ‘हसा आणि लठ्ठ व्हा’ हे पुस्तक मी लहानपणी पहिल्यांदा पाहिल्याचं आठवतंय. ते पुस्तक मला खूप आवडायचं. दुसरं पुस्तक शि. द. फडणीस यांचं ‘हसरी गॅलरी’ हे मी त्या काळी पाहिलं होतं. कुठलाही शब्द न वापरता त्यांनी अतिशय सुंदर, मार्मिक विनोद त्यात केलेले होते. ही सिरिज मला आवडली होती. मोठा होत असतानाच माझ्या हातात ‘मार्मिक’ साप्ताहिक आलं. त्यात बाळासाहेबांची असतील, श्रीकांतजींची असतील, अशी जी कार्टून्स बघायचो ती बघतच मी मोठा झालो. तेव्हा त्यातली राजकीय कमेंट काही कळायची नाही, पण ती चित्रे पाहताना खूप मजा यायची. पुढे आर. के. लक्ष्मण यांचीही व्यंगचित्रे बघायचो. पण हे सगळं बघताना आपल्याला कार्टूनिस्ट व्हायचंय असा विचार कधी केला नव्हता. राजकीय कार्टूनिस्ट व्हायचं की सामाजिक कार्टूनिस्ट व्हायचं असा कधी विचारच केला नव्हता. पण कार्टूनची आवड होती.
मिस्त्री म्हणाले, काही व्यंगचित्रकारांना कल्पनाशक्तीचा अभाव असतो, पण हाताला चांगले वळण असते. काहीजणांकडे कल्पनाशक्ती भरपूर असते, पण त्यांना त्या कल्पना कागदावर उतरवता येत नाहीत. प्रभाकर वाडेकर आणि तुम्ही ‘चिंटू’ ही चित्रमालिका एकत्र चालवलीत. तुमच्यात असा काही प्रकार होता का? की तुम्ही दोघेही आलटून पालटून काम करत होतात? पंडित म्हणाले, आम्ही दोघेही एकमेकांच्या कामात लुडबूड करायचो. ही लुडबूड होती म्हणून आमचं काम एकजिनसी होतं. तुम्ही कुठलाही चिंटू बघितलात तरी कल्पना आणि चित्र हे तुम्हाला वेगळं करता येणार नाही. कल्पनेत मी असायचो आणि चित्रात तो असायचा. मुख्यत्वे लिखाणाचं काम प्रभाकर करायचा आणि चित्रे मी करायचो. पण लिखाणातही मी असायचो आणि चित्रातही तो असायचा. आम्ही गप्पा मारत एखाद्या कल्पनेवर काम करत होतो. कारण बावीस वर्षे सलग हे काम आम्ही केलं आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर या स्पर्धेचे एक परीक्षक प्रशांत कुलकर्णी यांनी व्यंगचित्र स्पर्धेचे विजेते निवडताना आलेले अनुभव सांगितले.