पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून इम्रान खान यांची झालेली गच्छंती भारतासाठी दिलासादायक ठरणारी आहे. पाकिस्तानी लष्करात रुंदावत चाललेल्या फुटीचे दर्शनही या प्रोजक्ट इम्रानच्या अपयशातून घडले आहे. पाकिस्तानातील ताज्या घडामोडींकडे म्हणूनही गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.
– – –
क्रिकेटपटू इम्रान खानच्या गच्छंतीमुळे पाकिस्तानातील ताज्या सत्तानाट्यातील एका प्रवेशावर नुकताच पडदा पडला आहे. इम्रानची गच्छंती होणार, हे जानेवारीच स्पष्ट होऊ लागले होते. तथापि, सत्तेत टिकून राहण्यासाठी तो जे काही करत होता, त्यामुळे या सत्तानाट्याचा अंत कसा होणार, याचा अंदाज बांधणे अवघड बनत होते. अगदी गेल्या रविवारी रात्रीपर्यंत या सत्तानाट्याबाबतची उत्कंठा कायम होती. मात्र, इम्रानविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर झाल्याची घोषणा रात्री बाराला झाली आणि एका प्रवेशावर पडदा पडला.
पाकिस्तानातील या सत्तानाट्याचा नेमका अर्थ काय, हे तपासून पाहणे अगत्याचे आहे. इम्रान सत्तेवर राहणे भारताच्या हिताचे आहे, असा एक मतप्रवाह आपल्याकडे होता. तथापि, केवळ अज्ञानातूनच हे प्रतिपादन केले जात होते, हे माझे ठाम मत आहे. पाकिस्तानातील सत्तेचे डायनॅमिक्स न कळणे, हे याचे प्रमुख कारण. पाकिस्तानवर आजही लष्कराची पकड कायम आहे, हे विधान सत्य असले तरी ते पूर्ण सत्य नाही. पाक लष्कर ही एकसंध संरचना नाही. त्यात गेल्या पाच दशकांत वेगवेगळे गटतट विकसित झाले आहेत. त्यातही प्रोफेशनल आणि कडवे धर्मवादी असे दोन ठळक गट आहेत. कोणत्याही लष्कराची काही व्यावसायिक नीतीमूल्ये असतात. त्यात थोडे डावे उजवे असले, तरी काही एक प्रमाणात या नीतीमूल्यांची ढोबळ चौकट असतेच. या चौकटीत काम करणारा मोठा गट जसा पाक लष्करात आहे, तसाच कडव्या धर्मवादी भूमिकेचा पुरस्कार करत जिहादी गटांशी सख्य करणारा गटही गेल्या काही काळात प्रभावी बनला आहे. या दोन गटांत गेल्या सहा महिन्यांतील झालेल्या वर्चस्वाच्या संघर्षाची परिणती इम्रानच्या गच्छंतीत झाली आहे.
पाकिस्तानला १९९२मध्ये विश्चचषक मिळवून देणारा देखणा आणि झुंजार क्रिकेटपटू ही इम्रानची इमेज इम्रानला लार्जर दॅन लाइफ (प्रत्यक्षाहूनि प्रतिमा उत्कट) बनवून गेली. इम्रानच्या याच वलयाचा वापर करून घेण्याची धूर्त खेळी पाक लष्कराने व विशेषत: इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या पाक गुप्तचर संघटनेने खेळली. त्यातूनच प्रोजेक्ट इम्रान आकारास आला होता. हा प्रोजेक्ट इम्रान समजून घेण्यासाठी म्हणून थोडे ताज्या इतिहासात डोकवावे लागेल.
पाकिस्तानचे तत्कालीन लष्करशहा झिया उल हक यांच्या अपघाती निधनानंतर तेथे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्या (पीपीपी) बेनझीर भुत्तो सत्तेवर आल्या होत्या. त्याच सुमारास म्हणजे १९८७-८८च्या सुमारास शेजारच्या अफगाणिस्तानातही तत्कालीन सोव्हिएत रशियाविरुद्धचा अमेरिकेचा मुजाहिदीनांमार्फत सुरू असलेला संघर्ष निर्णायक टप्प्यावर आला होता. १९८९मध्ये सोव्हिएत महासंघाने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतल्याने मुजाहिदिनांचे महत्त्व आणि या तथाकथित चळवळीलाच एक प्रकारे पूर्णविराम मिळाला होता. या अफगाण संघर्षामुळे पाक लष्कराला मोठ्या प्रमाणावर पैसा, शस्त्रे आणि अमेरिकेचा पाठिंबा मिळत होता. अफगाण संघर्ष संपल्यानंतर पैसा आणि शस्त्रे मिळणार नाहीत, हे स्पष्ट झाल्याने आयएसआयची गोची झाली होती. त्याच सुमारास बेनझीर यांच्यासह देशातील अनेक नेत्यांनी अफगाणिस्तानात पाकने गुंतू नये, अशी भूमिका घेतली होती. मुख्य म्हणजे अशाच अनेक मुद्द्यांवर बेनझीर यांचे लष्कराशी खटके उडाल्याने लष्कराने बेनझीर यांची अवघ्या अडीच वर्षांतच पंतप्रधानपदावरून उचलबांगडी केली आणि त्यांच्या जागी पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते नवाझ शरीफ यांना सत्तेत बसवले.
नवाझ हे मुळातच झिया यांचे फाईंड. आधी झिया व नंतर लष्कराच्या पाठिंब्यावरच ते पाकिस्तानातील राजकारणात आले आणि स्थिरावले. पाकिस्तानातील सर्वाधिक महत्त्वाच्या पंजाब प्रांताचे ते मुख्यमंत्री बनले आणि पुढे पंतप्रधानही झाले. १९९०च्या प्रारंभी पंतप्रधानपदी आलेल्या नवाझ यांचेही पुढे लष्कराशी बिनसले आणि लष्कराने त्यांनाही पदावरून दूर केले. पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि मुस्लिम लीग हे पाक राजकारणातील दोन प्रमुख पक्ष आणि बेनझीर व नवाझ या दोनच नेत्यांभोवती फिरणार्या राजकारणाने लष्कराची कोंडी होत होती. त्यामुळे आपल्या इशार्यावर नाचणारा नवा भिडू लष्कर व विशेषत: आयएसआयला हवा होता. हा शोध इम्रानपाशी येऊन थांबला. इम्रानच्या प्रत्यक्षाहूनि उत्कट प्रतिमेचा वापर करून पाक राजकारणात तिसरा कोन निर्माण करता येईल तसेच, बेनझीर व नवाझ यांना शह देता येईल, हे हेरत आयएसआयने इम्रानची राजकीय कारकीर्द घडवणे सुरू केले. १९९०च्या दशकाच्या अखेरीस इम्रान राजकारणात आला खरा, पण त्यापूर्वीच त्याची इमेज बिल्डिंग सुरू करण्यात आली होती. लाहोरमध्ये त्याने आईच्या स्मृतीनिमित्त सुरू केलेल्या ‘शौकत खानम’ या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी हा यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. जगभरच्या पाकिस्तान्यांकडून पैसा गोळा करून हे रुग्णालय उभे करायला लागावे, इतकी इम्रानची खराब आर्थिक स्थिती नव्हती. पाकिस्तानातील एक दोन धनाढ्यांना हाताशी धरूनही तो हे वâाम करू शकला असता, तथापि, त्याचे नेतृत्व जगभर नेण्यासाठीच जगभर पैसे मागण्याचा कार्यक्रम राबवला गेला. असो.
जनरल महमूद, जनरल पाशा या आयएसआयच्या तत्कालीन वरिष्ठांनी इम्रानच्या राजकीय कारकीर्दीस आकार देण्यासाठी अपार कष्ट घेतले. इम्रानला राजकीय यश मिळावे म्हणून आयएसआय सतत प्रयत्नशील राहिले. तथापि, नवाझ व बेनझीर या दोन नेत्यांचा राजकारणावरील प्रभाव कायमच राहिल्याने लष्कराला वाट पाहण्याशिवाय काही करता येण्यासारखे नव्हते. २०१८च्या निवडणुकीपूर्वी नवाझ यांना पुन्हा एकदा सत्तेतून हटवून तुरुंगात डांबण्यात आले. मात्र, त्यानंतरही नवाझ यांच्या पक्षाने त्या निवडणुकीत चांगले यश मिळवले. तथापि, नवाझ यांच्या पक्षास बहुमत न मिळाल्याने लष्कराने पुढाकार घेत इम्रानला पंतप्रधानपदी बसवले होते.
इम्रानने प्रारंभी लष्कराशी चांगलेच जुळवून घेतले. त्यामुळे हे बाहुले नेतृत्व लष्कराच्या गळ्यातला ताईत बनले. परंतु, इम्रान हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्वही आहे, याचा विसर त्याच्या गॉडफादरना पडला आणि तिथेच घोळ झाला. इम्रान अत्यंत अहंकारी आणि अहंमन्य आहे. हम करे सो कायदा, ही त्याची वृत्ती आहे. त्यामुळे अल्पावधीतच त्याने आपल्या राजकीय आकांचे म्हणणे धुडकावून लावण्यास सुरुवात केली. पाकिस्तानात सत्तेची सूत्रे हाती घेतली की तातडीने सौदी अरेबियात जाऊन सौदी राजांपुढे लोटांगण घालण्याची परंपरा आहे. इम्रानने ती पायदळी तुडवत सौदी राजांपुढे झुकण्यास नकार दिला. ‘प्रथम ग्रासे मक्षिका पात:’ म्हणतात, तसा लष्कराचा अल्पावधीतच मुखभंग झाला आणि पुढे अनेक धोरणांबाबत हे घडत गेले. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) हा प्रकल्प चीन आणि पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा. याच प्रकल्पांतर्गत चीन पाकला कर्जाच्या जाळ्यात ओढतो आहे. तथापि, याच प्रकल्पाला इम्रानने खो घातला आणि चिनी राज्यकर्ते व पाक लष्करातील विसंवादाला सुरवात झाली.
इम्रान असो की लष्करातील अन्य अनेक वरिष्ठ अधिकारी, या सर्वांची पहिली पसंती अमेरिका किंवा युरोपीय देश ही आहे. इम्रानची पहिली पत्नी आणि मुले ब्रिटनमध्येच आहेत, तर अनेक माजी लष्करप्रमुख आणि अतिवरिष्ठ लष्करी अधिकार्यांचे जमीनजुमले, गुंतवणुकी आणि कुटुंबे युरोप अमेरिकेतच आहेत. त्यामुळे पाक नेते किंवा लष्करी अधिकारी कधीही युरोप, अमेरिकेला दुखावण्याच्या भानगडीत पडत नाहीत. इम्रानच्या काळात हे चित्र बदलले. अमेरिका की चीन याचा निर्णय इम्रान घेऊच शकत नव्हता. पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण ठरवण्याचा अधिकार तेथील सरकारांना कधीच नव्हता. तसा तो इम्रानलाही नव्हता. लष्करातील दुफळीत पाकच्या परराष्ट्र धोरणाची वाट लागली आणि त्यातून चीनही नाही आणि युरोप, अमेरिकाही नाही, अशी स्थिती उदभवली. मात्र, याचे खापर इम्रानच्या माथी मारले गेले.
आयएसआयचे तत्कालीन प्रमुख जनरल हमीद गुल यांनी १९९२मध्ये स्ट्रॅटेजिक डेप्थ ही संकल्पना मांडून त्याभोवती पाकच्या परराष्ट्र धोरणाची गुंफण केली होती. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर ही ती डेप्थ होती. पर्यायाने अफगाणिस्तानवर वर्चस्व राखणे आणि त्यातून मध्य आशियापर्यंत पोहोचणे, पश्चिमेस इराण व आखाती देशांशी व्यापार व संबंध वाढवणे, असे या धोरणाचे एक स्वरूप होते. अफगाणिस्तानातील अमेरिकी हितसंबंधांचे रक्षण हा घटकही यात होता. आयएसआयने गेल्या तीन वर्षांत या डेप्थची व्याप्ती आणखी वाढवली आहे. आता केवळ अफगाणिस्तान नव्हे, तर चीन, इराण, तुर्कस्तान असा एक ब्लॉक तयार करून अमेरिकेलाच शह देण्याची तयारी आयएसआयने चालवली होती. या ब्लॉकमध्ये रशियालाही सहभागी करून घेत भारतालाही शह देण्याचा प्रयत्न होता. या सर्वांमागचा कर्ताधर्ता चीनच होता. अमेरिकेने चीनची पावले ओळखत पाकची सर्वार्थांनी कोंडी केली आहे. इम्रानच्या रशिया भेटीला एरवी कोणी (अगदी पुतीन यांनीही) किंमत दिली नसती, पण इम्रानच्या रशिया भेटीवरून का रण माजवले गेले, त्याचे उत्तर या प्रयत्नांत आहे.
मध्यंतरी मलेशिया, तुर्कस्तान व पाकिस्तानने मिळून एक नवा इस्लामी गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची पहिली बैठक क्वालालंपूरमध्ये होणार होती. या बैठकीत सहभागी होत आपण कसे पाकचे नेतृत्व जगापुढे आणणार आहोत, अशा वल्गना इम्रान करत होता. तथापि, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक नेशन्स (ओआयसी) या मुस्लिम देशांच्या संघटनेलाच त्यातून आव्हान उभे राहण्याची चिन्हे दिसून लागल्याने सौदीने डोळे वटारताच इम्रान चुपचाप बसला. अगदी क्वालालंपूरला जाण्यासाठी विमानतळावर पोचलेला इम्रान तातडीने माघारी फिरून घरी जाऊन बसला. पाकिस्तानची त्यातून चांगलीच शोभा झाली. या धरसोडीचा परिणाम पाक अर्थव्यवस्थेवर होत गेला आहे. अमेरिका, युरोप, चीन व सौदी असे आर्थिक पाठिराखे पाकने अल्पावधीत गमावले आहेत. लष्करातील दुफळीच त्याला कारणीभूत आहे.
विद्यमान लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे लष्करातील प्रोफेशनल ग्रूपचे मानले जातात, तर आयएसआयचे मावळते प्रमुख जनरल हमीद फैज हे कडव्या धर्मवादी विचारसरणीचे समर्थक मानले जातात. जनरल फैज यांच्याशी इम्रानचे घनिष्ठ संबंध आहेत. अफगाणिस्तानातील तालिबानी गटांत सलोखा स्थापन करण्यासाठी हेच जनरल फैज जनरल बाजवांना न सांगताच काबूलला गेले होते. तालिबान असो, की अन्य जिहादी संघटना किंवा गट असोत, त्यांना पोसलेच पाहिजे, ही या गटाची भूमिका आहे आणि तुर्कस्तान, इराण, चीन असा गट स्थापन करून अमेरिकेला शह देण्याची खेळी हाच गट खेळतो आहे. सहा महिन्यांपूर्वी याच गटाने तेहरिके लब्बैक पाकिस्तान या गटाचे पुनरुज्जीवन केले असून पंजाबच्या राजकारणातही उतरवले आहे. याच गटाच्या आग्रहाखातर इम्रानने लब्बैकशी राजकीय समझोताही केला आहे.
तेहरिके तालिबान पाकिस्तान ही अशीच उच्छादी संघटना आहे. पंजाब, बलुचिस्तान व खैबर पख्तुनख्वा प्रांतात या संघटनेने उच्छाद मांडला आहे. जनरल बाजवा यांच्या गटाने या तालिबानी गटांच्या बंदोबस्तासाठी पावले टाकताच, या गटांशी चर्चेसाठी आपण तयार आहोत, अशी घोषणा इम्रानने केली. एवढेच नव्हे, तर या गटांना माफी देण्यासही आपण तयार आहोत, असे त्याने जाहीर केले. पाकिस्तानने भारताबरोबरचे संबंध सुरळीत केले पाहिजेत, असे जनरल बाजवा सातत्याने सांगत आहेत. एवढेच नव्हे, तर सौदी अरेबिया, अमेरिका व युरोपबरोबरचे संबंध सुरळीत करण्यावरही ते भर देत आले आहेत. तथापि, जनरल फैज गट प्रत्येक वेळी इम्रानला पुढे करत बाजवांना शह देत गेल्याने पाक लष्करातील दुफळी अगदीच रुंदावत गेली आणि हा संघर्ष टोकदार बनत गेला.
जनरल बाजवांनी आधी आपली लष्करप्रमुखपदाची कारकीर्द वाढवून घेतली आणि पाठोपाठ जनरल फैज यांची पेशावरला कोअर कमांडर म्हणून बदली केली. त्यांच्या जागी कराची कोअरचे जनरल नदीम अंजुम यांना आणले गेले. तथापि, इम्रानने फैज यांच्या बदलीलाच विरोध करत, ती हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. लष्करासाठी ही धोक्याची घंटा होती आणि इम्रानचा प्रयत्न ही या संघर्षातील शेवटची काडी ठरली.
आताही गेल्या पंधरा दिवसांत घडलेले सत्तानाट्य लक्षात घेता या दोन्ही गटांतील संघर्ष वाढत गेल्याचेच दिसू येत होते. इम्रानला बळ देणारा फैज गट सत्ता काबीज करेल, अशीही एक वेळ आली होती. संसदेत इम्रानविरुद्धचा अविश्वास ठराव उपसभापतींनीच फेटाळून लावल्याने घटनात्मक पेच निर्माण झाला होता. उपसभापतींचे हे कृत्य घटनाबाह्य होते आणि तसा निकालही सर्वोच्च न्यायालयाने दिला खरा; तथापि, हा निर्णय देण्यास जो तीन दिवसांचा कालावधी लावला गेला, त्यातच हा संघर्ष किती तीव्र बनला होता हे कळून येईल.
इम्रान खानला पाकिस्तानी राजकारणात आणि अगदी युरोपातही तालिबान खान असेही म्हणतात. हा एकच संदर्भ लक्षात घेतला, तरी आताच्या संघर्षात इम्रानचे हरणे भारतासाठी किती महत्त्वाचे होते, हे समजून येईल. इम्रान सत्तेत राहणे याचा अर्थ भारतविरोधी आयएसआय गटाचे पाकिस्तानी सत्तेवरचे वर्चस्व राहणे, असा होत होता. आता प्रागतिक गटाने या गटाला बाजूला ठेवत सत्ता राखली आहे. असे असले, तरी इम्रान व त्याच्या पाठिराख्या लष्करी गटाने आताही आशा सोडलेली नाही. पाकिस्तानात धुमाकूळ घालीन, असा इशारा देत इम्रानने थेट बाजवा गटावर कडवी टीका सुरू केली आहे. बाजवा गटाने सध्या त्याकडे कानाडोळा केला असला, तरी या सर्वांतून पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात होणार हेही स्पष्ट आहे. मात्र, तूर्तास या कडव्या गटास माघार घ्यावी लागली आहे, हे वास्तव अधिक दिलासादायी आहे.
शाहबाज शरीफ यांना भारताविषयी फारसे प्रेम नाही, हे खरे आहे. तथापि, पाकिस्तानी व्यापार व उद्योग जगताची गरज लक्षात घेत ते भारतासह अमेरिका व युरोपीय देशांबरोबरचे संबंध सुरळीत करण्यास प्राधान्य देतील. जनरल बाजवा यांच्या गटाचीही तीच भूमिका आहे. मुख्य म्हणजे उभय देशांच्या सीमांवर आता काही काळ शांतता राहणे अपेक्षित आहे. पाकिस्तानने अशी भूमिका घेतल्यास चीनला एक प्रकारे परस्परच शह बसणार आहे. साहजिकच इम्रनची गच्छंती हा भारतासाठी दिलासा ठरला आहे.
९०११०३१३९६
[email protected]