चाळीस एकांकिका, बेचाळीस नाटके, आठ चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद, बारा मालिकांचे तीन हजार एपिसोड्स, शीर्षक गीते, जाहिरातींचे लेखन, निर्मिती, अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, ध्वनीसंयोजन, नभोनाट्य लेखन करणारे आनंद म्हसवेकर यांनी दृक-श्राव्य माध्यमातील असं एकही क्षेत्र नाही की जे त्यांनी हाताळले नाही. मात्र प्रचंड लेखन करूनही सर्व स्तरांवर दर्जेदार नाटककार म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्यांचे ‘यू टर्न’ हे नाटक रंगभूमीवर यावे लागले. मराठी रंगभूमीवर आठशे पन्नास प्रयोग, इतर पाच भाषांमध्ये रुपांतर आणि दोन हजार नऊ सालातील सत्तावीस पारितोषिके मिळवणार्या ‘यू टर्न’च्या खडतर पण यशस्वी प्रवासाची ‘डिंपल पब्लिकेशन’ने प्रकाशित केलेल्या ‘कुणा एकाची रंगयात्रा’ या स्वत: लेखकाने लिहिलेल्या दीर्घ आत्मकहाणीवर पुस्तकातील हे एक वेधक प्रकरण.
– – –
प्रत्येक लेखकाला त्याच्या एकाच कलाकृतीच्या नावाने ओळख मिळते. आनंद म्हसवेकर हा नाटककार त्याच्या ‘यू टर्न’ नाटकाने ओळखला जातो. ज्या नाटकाने याला मराठी रंगभूमीवर नाटककार म्हणून ओळख दिली, त्याच्या याच नाटकाच्या यशोगाथेने १९७९ ते २००९ या तीस वर्षांच्या रंगयात्रेचा शेवट करायला हवा, पण तो करण्याआधी ‘यू टर्न’ नाटकाच्या पुढील प्रवासातील काही अविस्मरणीय गोष्टी : ‘यू टर्न’चे पहिल्या प्रयोगाचे नेपथ्य, अगदी सुटसुटीत सहा फुटांच्या फ्लॅटचे होते. हे नेपथ्य छोट्या टेम्पोतून सहज नेता यायचे असे होते. तालमीच्या काळात याने डॉ. गिरीश ओकला जरी सांगितले होते की हे नाटक काही व्यावसायिकला धो धो चालणारे नाही, महिन्याला फार फार तर पाच सहा प्रयोग, पण याला या वर्षीची अॅवॉर्ड्स मात्र मिळतील. यातले याचे दुसरे वाक्य खरे ठरले, त्या वर्षीची सगळी पारितोषिके ‘यू टर्न’ला मिळाली होती. पण पहिले वाक्य खोटे ठरले, कारण नंतर नंतर या नाटकाचे महिन्याला वीस बावीस प्रयोग व्हायला लागले. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे या नाटकाचे मुंबईपेक्षा पुण्यात जास्त प्रयोग व्हायला लागले. महिन्याला दहा बारा प्रयोग एकट्या पुण्यातच असायचे. मग यांनी पुण्यासाठी दुसरे नेपथ्य तयार केले आणि ते पुण्यातच ठेवले. पुण्याचा प्रयोग असेल तेव्हा फक्त गोविंदची इनोव्हा एकच गाडी काढली जायची आणि त्यात सगळी टीम बसायची. नेपथ्य, लाईट्स आणि कधी कधी टेप ऑपरेटरसुद्धा हे पुण्यातले घ्यायचे. थोडक्यात पुण्यात ‘यू टर्न’चा सेकंड सेटअप तयार झाला. या नाटकाला मुंबईच्या बाहेरही चांगले प्रयोग मिळायला लागले. साडेसहाशे प्रयोगांत यांनी एकाही प्रयोगाला नाटकाची बस वापरली नाही. मुंबईच्या बाहेर लांबचा प्रवास असेल तर हे मग ट्रेनने प्रवास करायला लागले आणि आणखी एक… ट्रेनमध्ये किंवा फ्लाईटमध्ये नेता येऊ शकणारे फोल्डिंगचे नेपथ्य तयार करण्यात आले. म्हणजे या नाटकाचे एकूण तीन सेट तयार होते. एक मुंबईतला टेम्पोतून जाणारा, दुसरा पुण्यासाठी केलेला व पुण्यातच ठेवला जाणारा आणि तिसरा फोल्डिंगचा ट्रेन आणि विमानातून जाऊ शकणारा. एकाच वेळी नेपथ्याचे तीन तीन सेट असणारे हे मराठीतले एकमेव व्यावसायिक नाटक असावे.
—
शिवाजी साटम यांनी, हिंदी मालिकेत बिझी असल्यामुळे या नाटकात काम करायला असमर्थता दर्शवली. त्यानंतर याने रमेश भाटकरांना हे नाटक त्यांच्या घरी जाऊन वाचून दाखवले. त्यांना आवडले, पण काही वैयक्तिक अडचणींमुळे तेही हे नाटक करू शकले नाहीत. काही प्रयोगांनंतर ते शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला आले. नाटक पाहिले आणि खूप अस्वस्थ झाल्यासारखे वाटले, आणि याच्या खांद्यावर हात थोपटून निघून गेले. दुसर्या दिवशी रमेशजींचा याला फोन आला. म्हणाले, ‘आनंद, मी तुझ्या नाटकात रोल करायला हवा होता रे. मी आयुष्यात काहीतरी मिस केल्यासारखे वाटतंय. काल तुझे नाटक पाहिले, रात्री खूप अस्वस्थ होतो. तू मला दिलेले स्क्रिप्ट आहे माझ्याकडे, ते मी काढले आणि मध्यरात्री एकटाच घरातल्या एका खोलीत मोठमोठ्याने तुझ्या नाटकातले सगळे डॉयलॉग बोललो. मग जरा हलके वाटले.’ प्रत्येक माणसात एक लहान मूल असते याची भाटकरांनी याला आठवण करून दिली होती.
—
गुजराथी रंगभूमीवर ‘यू टर्न’ झाले त्या आधी याची पाच नाटके गुजराथीत झालेली होती. याचे अगदी पहिले व्यावसायिक नाटक ‘जोडी जमली तुझी माझी’. हे नाटक १९८८ साली गुजराथी रंगभूमीवर ‘मळे सूर तारो मारो’ या नावाने झाले. यात आताचा ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मधील दिलीप जोशी याने एक भूमिका केली होती. ‘जमलं बुवा एकदाचं’ या याच्या पहिल्या नाटकावर गुजराथीमध्ये ‘न करवामा नऊ गुण’ हे विनोदी नाटक झाले होते. ‘ओव्हरबोर्ड’ याने आधी गुजराथीसाठी ‘शामली’ नावाचे नाटक केले, ज्यात ‘सूर्य म्हणतो चांदणं दे’ या प्रायोगिक नाटकावर गुजराथीमध्ये ‘मोठा माणसो खोटा माणसो’ हे व्यावसायिक नाटक झाले आणि ते १२० प्रयोग हीट चालले. ‘अवे तो वसंत थईने आवो’ हे याने गुजराथीसाठी लिहिले, ज्याचे मराठी नाटक अजून आलेले नाही. हे सगळे एवढ्यासाठी सांगतोय की याने ‘यू टर्न’ हे दोन पात्रांचे नाटक लिहिले. ते मराठीत येण्यासाठीच याला खूप चपला आणि अनेक उंबरे झिजवावे लागले, मग गुजरातीमध्ये हे नाटक होणे अतिशय कठीण गोष्ट होती. पण शेवटी प्रत्येक नाटक स्वत:चे नशीब घेऊन येते हे खरे. हे नाटक गुजराथीमध्ये मोठे नाटककार प्रवीण सोलंकी यांनी पाहिले आणि त्यांना इतके आवडले की हे नाटक गुजराथीमध्ये झाले पाहिजे असा त्यांनी चंगच बांधला. प्रवीणभाईंची तोपर्यंत गुजराथी रंगभूमीवर १७० नाटके झालेली होती. हे नाटक गुजराथी रंगभूमीवर होणे चॅलेंजिंग एवढ्यासाठी होते की हा विषय किंवा या नाटकाची मांडणी गुजराथी रंगभूमीच्या पठडीतली नव्हती. पण प्रवीणभाईंनी अट्टाहासाने त्याचे गुजराथीमध्ये भाषांतर केले आणि फिरोज भगतला दिले. फिरोज भगत आणि ‘सास भी कभी बहू थी’मधली सासू, अपरा मेहताला यावेळी एक नाटक करायचेच होते. दोनच पात्रांचे, एकही घटना नसलेले नाटक फिरोज भगतला आवडले नाही, पण अपरा मेहताला ते नाटक प्रचंड आवडले आणि मग स्त्रीहट्ट म्हणून फिरोज ‘यू टर्न’ करण्याचा निर्णय घ्यावा लागला. फिरोज स्वत: निर्माता, दिग्दर्शक आणि नटही होता. या नाटकात अडचण अशी होती की मराठीप्रमाणेच याने या नाटकाचे गुजराथीमध्येही दिग्दर्शन मीच करणार अशी अट घातली होती. फिरोज भगतला ते मान्य नव्हते, पण प्रवीणभाईंनी फिरोजला खूप समजावले आणि कसेतरी तयार केले.
अपरा मेहता यांना मराठी चांगले बोलता यायचे, त्यांच्या आई मराठी होत्या हे याला नंतर कळले. अपराताई याच्याशी मराठीतच बोलायच्या. गुजराथी ‘यू टर्न’ची रंगीत तालीम हा कधीच विसरू शकत नाही. प्रयोगाच्या एक दिवस आधी, ग्रँट रोडच्या तेजपाल हॉलमध्ये रंगीत तालीम. रंगीत तालमीला साधारण जेवढा काही गोंधळ असतो, त्यापेक्षा अधिक प्रॉब्लेम या गुजराथीच्या रंगीत तालमीत होते. सेटवर अर्धवट झालेला, दिग्दर्शक मराठी रंगभूमीवरचा असल्यामुळे गुजराथीला जो भडकपणा हवा असतो तो याच्यात नव्हता. लाईटवाल्याने पुरेशा तालमी पाहिलेल्या नव्हत्या. प्रोजेक्शनचे प्रॉब्लेम सुटलेले नव्हते, पण अजून एक दिवस हातात होता. फिरोज भगत पहिल्यापासूनच याच्या दिग्दर्शनावर नाराज होता. याला बर्याच गोष्टी पटलेल्या नव्हत्या तरी तो करत होता.
आपण निर्माता असून आपल्याला हे करावे लागते आहे हे त्याला खटकत होते आणि रंगीत तालमीला त्याचा बांध फुटला. रंगीत तालीम सुरू होण्याआधी तो बर्स्टआऊट झाला. उद्या हे नाटक हंड्रेड परसेंट हुटआऊट होणार आहे, माझे करीयर संपले, मोठमोठ्याने बडबडायला लागला. मग याच्यातला मराठी माणूस जागा झाला. यानेही आवाज चढवला. तू आता या क्षणी फक्त एक कलाकार आहेस ओके. शांत राहायचे. निर्माता म्हणून तुला जर वाटत असेल की तुझे पैसे वाया गेलेत किंवा जाणार आहेत तर आतापर्यंत झालेला सगळा खर्च मी देतो. आता प्लीज तू मेकअप रूममध्ये जा आणि उद्या पहिला प्रयोग होईपर्यंत तू फक्त अॅक्टर आहेस आणि मी सांगितल्याशिवाय स्टेजवर यायचे नाही… मी सांगेन तेवढेच करायचे. फिरोज लहान मुलासारखा पाय आपटत मेकअप रूममध्ये गेला आणि खरोखरीच दुसर्या दिवशी प्रयोगाच्या वेळी याने बोलावल्यावरच स्टेजवर आला. गुजराथीमधला शुभारंभाचा प्रयोग. लेखक प्रवीण सोलंकीसकट सगळे टेन्शनमध्ये, गुजराथी प्रेक्षक या नाटकाला कसे स्वीकारेल? या आधी फिरोज भगत आणि अपरा मेहता या जोडीने अनेक हीट नाटके गुजराथी रंगभूमीवर केली असल्यामुळे आणि अपरा टीव्हीवरच्या हीट ‘सास भी कभी बहू थी’मधली हीट सासू असल्याने पहिल्या प्रयोगालाही बर्यापैकी गर्दी होती.
पहिली बेल झाली, दुसरीही झाली, तिसरी बेल होऊन नाटक सुरू होण्याआधी याने सगळ्यांना स्टेजवर बोलावले. दिग्दर्शक म्हणून शुभेच्छा दिल्या. फिरोजलाही हसून हात मिळवला आणि तिसरी बेल द्यायच्या आधी प्रवीणभाई स्टेजवर बंद पडद्याच्या पुढे प्रेक्षकांसमोर गेले. त्यांनी हात जोडले आणि गुजरातीत बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘आज आपण पाहणार आहोत ते मी लिहिलेले एकशे एकाहत्तरावे नाटक आहे. आजपर्यंतची अनेक नाटके मी तुम्हाला आवडतील अशी, तुमच्या आवडत्या विषयावरची लिहिली. आज हे नाटक वेगळे आहे आणि ते माझ्या आवडीचे नाटक आहे. आज हे नाटक माझ्यासाठी तुम्ही बघणार आहात. ते तुम्हालाही नक्की आवडेल अशी मला खात्री आहे.’
प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. तिसरी बेल होऊन शुभारंभाच्या प्रयोगाचा पडदा उघडला आणि नाटक सुरू झाले. अपराच्या एण्ट्रीला कडकडून टाळ्या आल्या आणि नाटकातल्या पाचव्या वाक्याला पहिला लाफ्टर आला. त्यानंतर लोकांनी हशे आणि टाळ्या यांनी थिएटर दणाणून सोडले. मराठी प्रयोगापेक्षा जास्त चांगला रिस्पॉन्स गुजराथी प्रेक्षक देत होता. हा विंगेत उभे राहून नाटक पाहात होता. पहिला ब्लॅकआऊट झाल्यावर फिरोज कपडे बदलण्यासाठी आत आला, याला विंगेत उभे राहिलेले पाहिले आणि सगळं विसरून याला मिठी मारली. याने त्याला सावरले आणि जा कपडे चेंज कर, आपण नंतर बोलू. प्रयोग खूप चांगला झाला. गुजराथी लोकांनी वेगळ्या विषयाचे, वेगळ्या मांडणीसह स्वागत केले होते. या नाटकाचे गुजराथी रंगभूमीवर एकशेवीस प्रयोग झाले.