कोरोनाकाळाने दिलेली सगळ्यात महत्त्वाची शिकवण म्हणजे आयुष्यात काय हवं, काय जगायला आवश्यक आहे आणि काय अनावश्यक आहे, याचं दिलेलं भान. पूर्वी नाटक, सिनेमा, मॉल, पिकनिक, हॉटेलिंग यांना अनेकजण सर्वाधिक प्राधान्य देताना दिसायचे. कोरोना आल्यानंतर हे चित्र क्षणात बदलून गेले. गरजेपुरता भाजीपाला आणि किराणा सामान एवढ्याच गरजा मर्यादित झाल्या.
—-
मंदारला दर पंधरा दिवसांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा किंवा नाटक पाहण्याची सवय होती, महिन्यातून दोन वेळा तो हा उपक्रम न चुकता करायचा. अनेक वर्षांपासून त्यात कधी खंड पडल्याचे त्याला आठवत नाही. गेल्या वर्षी कोरोना आला, त्यानंतर सगळीकडे लॉकडाऊन लागला आणि लोक घरात बंद झाले. थिएटरला कुलूप लागले, त्यामुळे मंदारची सवय बंद झाली. याला कारणीभूत ठरला कोरोना आणि त्याने आणलेली टाळेबंदी. त्यामुळे मंदारचा खर्च कमी झाला आणि घरातल्या टीव्हीवर दिसणारे कार्यक्रम पाहून मनोरंजनाची भूक भागवावी लागत आहे. या उदाहरणावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल… इतर कशानेही झाला नसता असा हा बदल कोरोनाने त्याच्यात घडवून आणला…
कोरोनाचं आगमन झालं आणि त्याची एकंदर घातकता कळली, तेव्हा जाणत्यांनी सांगितलं होतं की जगात आता मूलभूत बदल होतील, माणसांमध्येही काही बदल घडतील. कोरोनापूर्व जग आणि कोरोनोत्तर जग यांच्यात फरक असणार आहे. तो प्रत्येकाला समजून घ्यावा लागणार आहे.
कोरोनाने अनेकांच्या आयुष्यात आणलेला बदल म्हणजे मृत्यूची जाणीव. आजवर आजारपण, अपघात, वृद्धापकाळ यांनी आसपास मृत्यू होतच होते. त्यातले काही आकस्मिक आणि त्यामुळे धक्कादायकही असत. पण कोरोनाने अशा माणसांना इतक्या वेगाने हिरावून नेलं की त्याचा हा आघात समजलाच नाही. त्यात कोरोनाने कित्येकांवर एकाकी मृत्यू लादला. कोरोनाच्या साध्या लक्षणांनी रुग्णालयात जाणार्या माणसाला जवळच्या माणसांपासून दुरावलं जाणंच सहन होण्याच्या पलीकडचं होतं. आजार बळावला तर आपण यांना कधीही पाहू शकणार नाही, या कल्पनेने अनेकांच्या हृदयावर ताण आला. जे मरण पावले, त्यांचं धड अंतिम दर्शन घेण्याची सोय नाही, अंत्यसंस्कारांची सोय नाही, चारजणांच्या उपस्थितीत उरकून टाकले अंतिम संस्कार, असे प्रकार घडले. असं मृत्यूचं भयाण दर्शन महायुद्ध भोगलेल्यांनाच झालं होतं, युद्ध भोगत असलेल्यांनाच ते होतं- कोरोनाने ते सार्वत्रिक केलं. जगण्यामरण्याचे सगळेच संदर्भ बदलून टाकले.
कोरोनाने माणसांच्या मनावर केलेले परिणाम आणि माणसांत घडवलेले बदल त्यांना स्वत:लाच धड माहिती नाहीत. यातले काही ठळक बदल पुढीलप्रमाणे आहेत.
चार्वाकवृत्ती बळावली…
चार्वाकाने सांगितलं होतं की ऋण काढून तूप प्या, मेल्यावरचं कुणाला माहिती, आज काय ते जगून घ्या. कोरोनाने अचानक जवळची माणसं हिरावून नेलेली माणसं संवेदनाबधीर झालेली आहेत. मृत्यू कधीही येऊ शकतो, कुणालाही गाठू शकतो. आपल्याकडची सत्ता-संपत्ती, भविष्याच्या योजना हे सगळं निरर्थक आहे. आहे ते आयुष्य मौजमजेत जगावं, असा विचार करून अनेकजण कौटुंबिक जीवनापासून दुरावतायत, नीतीमत्ता, मूल्यं, कायदे यांना झुगारून देऊ लागले आहेत. हल्ली आपल्याला जे आवडते आहे, जे करायचे होते, ते करायला अनेकजण प्राधान्य देत आहेत. आपल्याकडे आयुष्य कमी आहे, कधी संपेल याचा पत्ता नाही, याची भयाण जाणीव लोकांना कोरोनामुळे झालेली आहे. आहे त्या जीवनाचा मनमुराद आनंद घेण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. याचा एक परिणाम म्हणजे घरात, समाजात, वैयक्तिक जीवनात मोठ्यांचा धाक कमी होतो आहे. हेच सगळे बदल पाश्चिमात्य देशांमध्ये महायुद्धांनी घडवून आणले होते, हे इथे लक्षात घेतले पाहिजे.
कोरोनाने माणसांना घरात कोंडून प्रत्येकाभोवती एक अदृश्य बुडबुडा तयार केला. अनेकांना त्याची सवय झाली आहे. मी आणि माझं छोटं जग यापलीकडे अनेकांना काहीच दिसेनासं झालं आहे. कोरोना नसता तरी आधुनिक जीवनशैलीमुळे २०२५पर्यंत मानसिक आरोग्याचे प्रश्न भेडसावणार्यांची संख्या खूप वाढेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. कोरोनोत्तर जगात ही परिस्थिती २०२२लाच येऊन ठेपेल, असं सांगितलं जात आहे.
मुलाने वडिलांवर अंतिम संस्कार केले नाहीत, असं कोरोनापूर्व काळात घडलं असतं, तर कोणालाही ते फारच चुकीचं वाटलं असतं. गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी रूग्णालयात दाखल असणार्या रुग्णाला भेटायला नातेवाईक गेले नाहीत तर ती त्यांची संवेदनशून्यता आहे, असे वाटले असते. पण कोरोनानंतर हे सगळं सहजगत्या स्वीकारलं गेलं आहे. कित्येकांचे अंत्यसंस्कार, अंतिम कार्य अशाच प्रकारे होऊन गेली. अनेकांचे नातेवाईक असूनही मृतदेह बेवारस ठरले, कारण कोरोनाचं भय. शेवटी सामाजिक संस्थांनी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले. आजारी माणसाला प्रत्यक्ष भेटण्याचा आग्रह आता कुणी धरत नाही. भेटायला येणार्यालाही कोरोनाची भीती आणि येणार्यांमुळे आधीच आजारी असलेल्या माणसाला इन्फेक्शन झालं तर काय घ्या, असं त्याच्या नातेवाईकांना भय. आता लोक फोनवरून, व्हिडिओ कॉलवरूनच भेटतात, विचारपूस करतात.
कोरोनापूर्व काळात लोक रस्त्यात थुंकत होते, आताही थुंकतातच. पचापचा थुंकत फिरणार्यांना मनाची लाज नसतेच. जनाचीही नव्हती. कोणी टोकलं तर रस्ता तुझ्या बापाचा आहे का, असं विचारण्यापर्यंत या मस्तवालांची मजल जात होती. जणू रस्ता म्हणजे याच्या वडिलांनी बनवून दिलेली पिकदाणीच आहे! आताही निलाजरे पानमावे खाऊन किंवा खोकल्याचे खाकरे काढून थुंकत असतातच. पण यांच्यातल्या काहीजणांना तरी थोडी लाज वाटायला लागली आहे. काहींवर सामाजिक दबाव आहे. आता कुणी टोकलं आणि आपण त्याची अक्कल काढायला लागलो, तर बाकीचे येऊन झापतील, अशी भीती वाटायला लागली आहे. कोरोनापासून लांब राहण्यासाठी सरकारने मास्कचा वापर करण्याची सक्ती केली, तेव्हा सुरुवातीला अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग झाले, मात्र, रोग जसा वाढत गेला तसे लोकच एकमेकांना मास्कची आठवण करून देऊ लागले आहेत. आता विनामास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणं जवळपास अशक्य झालेलं आहे. व्यक्तीच्या निवडस्वातंत्र्यापेक्षा सार्वजनिक आरोग्य अधिक महत्वाचं ठरत आहे.
सामाजिक अंतर आणि लग्न समारंभ
कोरोनामुळे प्रत्येकावर सहा फुटाचे अंतर ठेवण्याचे बंधन घालण्यात आले, त्यामुळे सभा-समारंभांवर मर्यादा आल्या. लग्नात फक्त ५० जणांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली. कोरोना येण्याआधी कोणत्याही कारणाने कोणी मोजक्या ५० पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ केला असता, तर लोकांनी असे कुठे लग्न असते का म्हणून नावे ठेवली असती. मात्र, टाळेबंदीतून सुटका झाल्यानंतरही अनेक लोकांना सोहळ्यांचा अवास्तव खर्च टाळणारं हे स्वरूप स्वीकारावंसं वाटायला लागलं आहे. तिसर्या लाटेचा धोका आहे, हे एक कारण आहेच. पण, जिथे शक्य आहे तिथे अनावश्यक गर्दी करा कशाला, जे ऑनलाइन होऊ शकतं, ते ऑफलाइन करा कशाला, असा विचार बळावत चालला आहे. सभा-समारंभाच्या ठिकानी वावरतानाही आता योग्य काळजी घेण्याची सवय होते आहे.
जीने को क्या चाहिए?
कोरोनाकाळाने दिलेली सगळ्यात महत्त्वाची शिकवण म्हणजे आयुष्यात काय हवं, काय जगायला आवश्यक आहे आणि काय अनावश्यक आहे, याचं दिलेलं भान. पूर्वी नाटक, सिनेमा, मॉल, पिकनिक, हॉटेलिंग यांना अनेकजण सर्वाधिक प्राधान्य देताना दिसायचे. कोरोना आल्यानंतर हे चित्र क्षणात बदलून गेले. गरजेपुरता भाजीपाला आणि किराणा सामान एवढ्याच गरजा मर्यादित झाल्या. सव्वा वर्षांपासून त्याची सवय झाली आहे. बाकी गोष्टी थांबल्यामुळे पैशांची बचत देखील होत आहे. उत्पन्नाचे मार्ग आटल्यामुळे त्याची गरजही आहे. चैनीच्या, चंगळीच्या वस्तूंची खरेदी लांबणीवर पडली आहे किंवा रद्द झाली आहे. थोडा है, थोडे की जरूरत है, जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है, हे लोकांना कळायला लागलं.
कोरोनोत्तर काळात जगातली अनेक समीकरणं बदलणार आहेत. जग अस्थिर होण्याची शक्यता आहे. मानवी मूल्यांना आव्हान देणारी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे मन:स्वास्थ उत्तम ठेवा, भरपूर व्यायाम करा, स्वतःला फिट ठेवा, सकारात्मक विचार करा आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या या गर्तेतून सहीसलामत बाहेर पडा…
(लेखक पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.)
शब्दांकन – सुधीर साबळे