‘बाप्पा’ म्हणजे ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास’ या तत्वाप्रमाणे खरंच मऊ आणि प्रेमळ. त्याचा उत्कलनबिंदू, म्हणजे रागाचा पारा क्वचितच चढायचा; किंबहुना कधी नाहीच, या वळणातला. कमी बोलणं आणि बोलला तर मोजकंच बोलणं. उगाच फुशारक्या मारणं वगैरे त्याच्या स्वभावात नव्हतं. याचा अर्थ तो अगदीच शामळू नव्हता… गिरगावातला खट्याळपणा त्याच्यातही होता.
—-
लेखक आपल्या गोष्टीनुसार नाटकातली अनेक पात्रं रंगवत असतो, पुढे ती तशी दिसणारी अथवा भूमिका करणारे अभिनेते मिळवणे ही जबाबदारी दिग्दर्शकाची असते. १९८३ साली ‘टूरटूर’ नाटक लिहीत असताना मी एक पात्र त्यात रंगवले होते, त्या पात्राचे वर्णन मी लिहिताना असे केले होते..
‘डाव्या विंगेतून एक काळा उंच धिप्पाड माणूस येतो आणि मुलांची बस जबरदस्तीने थांबवतो..’
पुढे दोन तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी घाबरवणार्या प्रसंगांमध्ये हा ‘काळा, उंच, धिप्पाड माणूस’ येतो आणि मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देतो.
लेखक म्हणून मी लिहून गेलो, ते वाटलेही मजेशीर, त्यातून वाचताना प्रसंगही छान उभा राहात असे. पण प्रत्यक्ष नाटकाचं कास्टिंग करताना मात्र नाकी नऊ आले. इतर मुलांचे कास्टिंग करताना रंग, रूप, उंची बघायची गरज नव्हती, त्यात फक्त ते किती सहज, सुंदर आणि टायमिंग असलेला विनोदी अभिनय करू शकत होते, एवढेच पाहायचे होते. पण हा जो काळा, उंच, धिप्पाड माणूस म्हणून मी जो वर्णन करून ठेवला होता, तो मला तसाच्या तसा हवा होता आणि एक दिवस तो नक्की मिळेल या आशेवर आम्ही, म्हणजे मी आणि लक्षा शोध घेत होतो.
तालमी सुरू झाल्या, पण अजून त्या ‘काळ्या उंच धिप्पाड’ माणसाचा शोध लागत नव्हता. एकदा सकाळी रिहर्सलला लक्षा आला आणि मला म्हणाला, ‘काल रात्री साहित्य संघात वरच्या कॅन्टीनमध्ये एक माणूस भेटला. अगदी तुला हवा तसा. काळा उंच आणि धिप्पाड. मी त्याला भेटायला बोलावलंय.’
‘पण तो कॅन्टीनमध्ये काय करत होता?’
‘चहा वगैरे देत होता.. पण हे बघ, ते आपल्याला काय करायचंय?.. साहित्य संघातल्या कॅन्टीनमध्ये होता म्हणजे अभिनय कशाशी खातात हे कमीत कमी माहिती असेलच, म्हणून बोलावलंय.. एकदा बघून घे..’
रिहर्सल रंगात आली होती.. तेवढ्यात एक माणूस (खरे तर मुलगाच.. पण तब्येतीमुळे प्रौढ वाटत होता) शोधक नजरेने प्रवेश करता झाला.
लक्षा त्याला माझ्याकडे घेऊन आला. ‘पुरू.. हा बघ.. काल मी म्हटले तो हा.’
खरंच तो मला हवा तसा दिसत होता.. काळा, उंच आणि धिप्पाड.. माझा विश्वास बसत नव्हता.. तो अगदी तसाच होता.. स्क्रिप्टमध्ये लिहिला होता तसा.
‘दीपक शिर्के.. गिरगावात राहतो.. यांच मटणाचं दुकान आहे, पण चालवायला दिलंय.. हा सध्या त्याच्या मित्राला मदत म्हणून संघाच्या कॅन्टीनवर आहे. पण याला नाटकात काम करायचे आहे. बघ.. तुला असाच हवा होता ना?’ लक्षाने त्याची ओळख करून दिली.. मी त्याच्याशी जुजबी बोललो, नाटकात कधी काम केले होते का वगैरे, पण त्याने शाळा आणि गणेशोत्सव यापलीकडे काही केले नव्हते. म्हटले, ठीक आहे, दिसणे तर आपल्याला हवे तसे आहे, बाकी बघू. असे म्हणून त्याला स्क्रिप्ट वाचायला दिली आणि रिहर्सल संपल्यावर तुला (तुझे संवाद) वाचायला सांगेन, म्हणून बसायला सांगितले.
बाकी सर्वजण आधीच दहा पंधरा दिवस रिहर्सल करीत होते, त्यामुळे एकमेकांमध्ये छान मिसळले होते. दीपक जरा टेन्स होता. खरे तर भूमिकाही त्याला सुटेबल होती, आवाज छान भारदस्त होता, पण का कुणास ठाऊक, त्याला भूमिकेची नाडी सापडत नव्हती. तो चाचपडत होता. मजा येत नव्हती. दोन-तीन दिवस झाले, रिहर्सल संपवून आम्ही निघत होतो, निघताना मी आणि लक्षा बोलत चाललो होतो, मी लक्षाला म्हटले, ‘अरे हा दीपक फक्त दिसतो त्या पात्रासारखा, पण पुढे त्याला आणखी दोन भूमिका करायच्या आहेत. एक गावचा पाटील आणि दुसरा त्या मुलीचा बाप, म्हणजे वेष बदलून तो बाप मुलीच्या सेफ्टीसाठी त्या बसच्या मागे लागलाय.. हे सर्व तो दाखवेल ना? मला जरा गडबड वाटतेय..’
तेवढ्यात माझे लक्ष मागे गेले, दीपक आमच्या मागून चालत येत होता, त्याने आमचे बोलणे ऐकले होते, त्यामुळे चेहर्यावर टेन्शन होते.
‘मला जरा बोलायचंय.. बोलू का?
‘हो बोल ना.!’ मी म्हटले..
‘मला प्लीज नाटकातून काढू नका हो.. खूप दिवसांनी असं नाटकात काम मिळालंय.. मी मेहनत करीन, तुम्ही म्हणाल तसे काम करीन, पण मला बदलू नका.. ह्या नाटकात काम करून मला मिळणारी ३० रुपये नाइट ही माझी पहिली कमाई असेल हो.. प्लीज मला नाटकात ठेवा..’
डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या त्याच्या.. मीही हादरलो.. एवढा पाहाडासारखा माणूस.. इतका हळवा?..
मी म्हटले, ‘अरे? छे छे, काढतोय कुठे? उलट तू हवाच आहेस मला.. फक्त तुझ्यावर जास्त मेहनत घ्यावी लागणार इतकेच! एक काम करूया आपण. रिहर्सल संपली की तू आणि मी तासभर रिहर्सल करू. होईल सगळं नीट..’ असं म्हणून वर मीच त्याला धीर दिला.. कारण मला तो हवाच होता.. त्याच्या दिसण्यामुळे आणि उंचीमुळे माझं अर्ध काम होणार होतं.. उरलेलं त्याला मेहनत घेऊन करायचं होतं.. बस्स..
त्यानंतर त्याच्या सेपरेट रिहर्सल घेऊन त्याला बर्यापैकी विश्वासात घेतलं.. पुढे पुढे चेतन दळवी, विजू केंकरे, विजू चव्हाण यांनी त्याला छानपैकी मिसळवून घेतले.. मूळचा गिरगावातला असल्यामुळे दीपक लवकर रुळला.. शिवाय मी त्याला आणखी एक गोष्ट दिली.. जे.जे.ला असताना आमच्या वर्गात हेमंत शिंदे हा आमचा मित्र, एक वाक्य कधीकधी तीन तीनदा बोलायचा.. म्हणजे.. ‘ए बेरड्या.. चल जाऊया जाऊया जाऊया.. मस्त पिक्चर आहे.. मजा येईल, मजा येईल, मजा येईल..’ हेमंत शिंदेचं ते तीनदा बोलणं अतिशय मोहक होतं.. दीपकने ती ढब उचलली आणि बापाची भूमिका तो चांगलीच वठवू लागला. त्याच्या प्रत्येक वाक्यातलं क्रियापद तो तीन वेळा म्हणायचा.. म्हणजे ‘आमची ही मुलगी राणी.. तुमच्या या मुलांच्या गाडीत बसली, बसली, बसली आणि तुमच्याबरोबर पंधरा दिवस फिरली, फिरली, फिरली..
झालं.. दीपकला नाडी गवसली आणि तो तिन्ही भूमिका मस्त करू लागला.. आणि पुढे दोनेक महिन्यांत पहिल्या प्रयोगापर्यंत दीपक शिर्के आमच्यात मस्तपैकी मिसळून, आमच्या सगळ्यांचा लाडका ‘बाप्पा’ झाला होता..
‘टूरटूर’ चे प्रयोग सुरू झाले.. प्रचंड कष्ट करून, जाहिराती करून नाटक लोकांपर्यंत पोहोचले, हिट झाले, सुपरहिट झाले, बाप्पा आमचा अत्यंत विश्वासू सहकारी झाला. बाप्पा खरा कळला तो दौर्यामध्ये. अत्यंत को-ऑपरेटिव्ह आणि शांत स्वभावामुळे ‘बाप्पा’ सर्वांना हवाहवासा वाटायचा. विजू केंकरे, विजू चव्हाण यांच्याशी त्याची खास दोस्ती झाली. शिवाय बॅकस्टेजवाले त्याचे खास मित्र. दौर्यात तो त्यांच्याबरोबरच जेवायला बसायचा. त्याचं कारण सावकाश पेयप्राशन आणि सावकाश जेवण. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे हे बाप्पाचे खास वळण.
खरे तर बाप्पाकडे पाहिल्यानंतर तो कुणी खास स्पेशलवाला पोलीस बिलीस आहे की काय असे वाटायचे. त्याच्या नजरेत त्याने तसा धाक कधीच आणला नाही, पण आणला असता तर नक्कीच लोक त्याला प्रथमदर्शनी घाबरले असते. पण ‘बाप्पा’ म्हणजे ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास’ या तत्वाप्रमाणे खरंच मऊ आणि प्रेमळ. त्याचा उत्कलनबिंदू, म्हणजे रागाचा पारा क्वचितच चढायचा; किंबहुना कधी नाहीच, या वळणातला. कमी बोलणं आणि बोलला तर मोजकंच बोलणं. उगाच फुशारक्या मारणं वगैरे त्याच्या स्वभावात नव्हतं. याचा अर्थ तो अगदीच शामळू नव्हता.. गिरगावातला खट्याळपणा त्याच्यातही होता.
बाप्पा जिथे राहायचा, त्या बिल्डिंगखाली तळमजल्यावर एक वाण्याचे दुकान होते. त्या वाण्याकडे दोन रुपयांचा ‘अशोक पाला’ मागितला, की तो वाणी, का कुणासा ठाऊक प्रचंड चिडायचा. ही गोष्ट बाप्पाने बरोबर हेरली होती.. त्याच्या बरोब्बर वर पहिल्या मजल्यावर राहणारा बाप्पा खाली खेळणार्या कुणा द्वाड मुलाला पकडून त्याला सांगायचा, ‘ए पोरा, जरा जा, आणि दोन सिगारेट घेऊन ये, आणि येताना त्या ‘वाण्या’ कडून दोन रुपयाचा अशोक पाला घेऊन ये.’ तो मुलगा जायचा आणि नंतर वाण्याकडे गेला की अशोक पाला मागताच चिडलेल्या वाण्याच्या शिव्या वर बसून ऐकत बाप्पा मजा घ्यायचा.. एके दिवशी मात्र बाप्पाची चांगलीच फजिती झाली… अलीकडे कोणी अशोक पाला मागायला आला की त्या वाण्याने एक शक्कल लढवली होती… बाप्पाने पाठवलेला तो दुसरा नवीन मुलगा वाण्याकडे गेला, त्याने वाण्याकडे अशोक पाला मागितला… वाण्याने नेहमीप्रमाणे न चिडता त्याला सांगितले की अशोक पाला शिल्लक नाही, संपला.. ‘हे ऐकून तो मुलगा पुढे दुसर्या दुकानात सिगारेट आणायला न जाता खालून जोरात ओरडला, ‘ए दीपेक .. अशोक पाला नायाय…’ म्हणून ओरडला. खिडकीत मजा बघायला उभा राहिलेला ‘बाप्पा’ आत पळून गेला, आणि वाणी सरळ दुकानावरून उठून खाली आला नी ‘बस क्या दीपक भाय.. ये तुम अच्चा नाही कर रहे…’ म्हणून बोंबलू लागला..
बाप्पाकडे हा छुपा खट्याळपणा भरपूर दडला होता.
खंडोबावर, गणपतीवर श्रद्धा असलेला बाप्पा, उपासतापासही करीत असे. पण त्याचा उपास जगावेगळा आहे. आजही आहे. इतरांचे उपास हे सोमवार, शनिवार किंवा गुरुवारचे असतात. बाप्पाचा उपवास हा ‘रविवार’चा असतो. तोही शनिवारी रात्री बाराला सुरू करून रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत. त्यामुळे शनिवारी रात्री साडेआठचा ‘टूरटूर’चा प्रयोग लागला, की बाप्पा अस्वस्थ होत असे. कारण साडेआठऐवजी उशिरा म्हणजे, पावणेनऊ किंवा, नऊ वाजता सुरू झाल्यास, तो पावणेबाराच्या आत संपला तरच बाप्पाला शनिवारच्या रात्रीचा पिण्याचा आणि ‘मटन’ खाण्याचा प्रोग्राम करता येत असे. अगदी ‘पावणेबाराला प्रयोग संपला’ की बाप्पा घाईघाईने डबा उघडून नॉनव्हेज जेऊन घेत असे, आणि दुसर्या दिवसाच्या उपवासाला सामोरा जात असे. हाच ‘टूरटूर’चा प्रयोग शनिवारी रात्री पुण्याला लागला की बाप्पाला ‘डबल उपास’ घडे. कारण पुण्यात प्रयोग रात्री साडेनऊचे असतात. प्रयोग संपायला सव्वाबारा किंवा साडेबारा वाजायचे, आणि बाप्पाचा उपवास लांबायचा. मग बाप्पा रविवारी रात्री कधी एकदाचे बारा वाजतात आणि उपास सोडतो, अशी वाट बघायचा. तरी पण रविवारी रात्रीही पुण्यात प्रयोग असला तर मात्र बाप्पाला प्रदीर्घ लांबलेला उपवास सोडायला दीड दोन वाजायचे. कारण त्यात दोन दिवसाचे राहिलेले पेयप्राशन आणि भोजन सामावलेले असायचे.
‘टूरटूर’च्या अनेक जाहिराती गाजल्या. पण एक जाहिरात आजही लोकांच्या स्मरणात आहे. वर्तमानपत्रांना गणेश चतुर्थीची सुट्टी असते. त्यामुळे दुसर्या दिवशी वर्तमानपत्रे बंद असतात. आणि आमचा नेमका त्याच दिवशी दुपारी साहित्य संघात ‘टूरटूर’चा प्रयोग होता. म्हणून मी एक जाहिरात अशी केली की तिचे कात्रण जपून ठेवले जाईल आणि ती दुसर्या दिवशी पाहिली जाऊन लोक नाटकाला येतील. त्या जाहिरातीत श्रीगणेशाचे चित्र आउटलाइनमध्ये काढले होते आणि वर लिहिले होते, ‘ही जाहिरात रंगीत आहे, उद्या दुपारी दीड वाजता पाण्यात बुडवून पहा.’ आणि तसेच झाले. बर्याच लोकांनी, मुलांनी कात्रणे करून ठेवली आणि दुसर्या दिवशी पाण्यात बुडवून पहिली, पण चित्र रंगीत झाले नाही, मात्र साहित्य संघात प्रयोग असल्याचे तारखेसह ठासून दिसले, ते मात्र वाचले गेले. एवढ्यावरच लोक थांबले नाहीत, काही प्रेक्षक कात्रण घेऊन थियेटरवर आले, आणि मला (म्हणजे निर्मात्याला) शोधू लागले. मी पटकन एक चित्र रंगवून दीपक शिर्वेâकडे दिले आणि त्याला बुकिंगजवळ उभे केले. एक जण आला, तो बाप्पाकडे विचारणा करू लागला. आमचे चित्र रंगीत झाले नाही. बाप्पाने विचारले, ‘किती वाजता बुडवला हा पेपर पाण्यात?.. तो म्हणाला पावणेदोन वाजता.. मग बाप्पाने त्याला सांगितले.. ‘अरेरे, उशीर झाला.. हे बघ (खिशातले मी दिलेले रंगीत कात्रण काढून बाप्पाने दाखवले) मी बरोब्बर दीड वाजता पाण्यात बुडवला पेपर, माझा रंगीत झाला.. बाप्पाच्या प्रकृतीकडे बघून त्याने पुढे वाद घातला नाही, तडक निघून गेला आणि तिकीट काढून नाटकाला बसला.
बाप्पाच्या, रात्री उशिरा झोपणे, आणि सकाळी उशिरा उठणे, या गोष्टींचा मी धसका घेतला होता.
‘टूरटूर’चा सकाळी ११चा प्रयोग असला की बाप्पाला आणि आम्हाला टेन्शन यायचे. बाप्पा अकराच्या प्रयोगाला धावत पळत यायचा. त्याच्या सुस्त, शांत, स्वभावात आणखी एक गोष्ट होती, ती म्हणजे तंद्रीमध्ये जाऊन विसरणे. एकदा ‘टूरटूर’चा साहित्य संघात सायंकाळी सातचा प्रयोग होता, बाप्पा मात्र आरामात नेहमीप्रमाणे प्रयोग नाही असे समजून दादरला छबिलदासच्या आजूबाजूला भटकत होता. छबिलदासला उभ्या असलेल्या नाटकवाल्यांपैकी कोणीतरी बाप्पाला सांगितले, अरे इकडे काय करतोयस? आज तुझा प्रयोग आहे ना?’ ‘कुठे?.. बाप्पाने दचकून विचारले.. ‘कुठे काय? साहित्य संघात.. बाप्पा तशीच ट्रेन पकडून साहित्य संघात पोहोचला.. नशीब त्याची एन्ट्री उशिरा होती, बरोब्बर एन्ट्रीला पोहोचला आणि जणू काहीच झाले नाही, असा प्रयोग केला.
पहिला ब्रेक ‘टूरटूर’..
दुसरा ‘एक शून्य शून्य’
‘टूरटूर’ मधील बाप्पाची ती काळा, उंच, धिप्पाड ‘एन्ट्री’ नाटकाचं खास आकर्षण ठरली. दूरदर्शनमधील एक निष्णात कॅमेरामन बी. पी. सिंग यांनी दूरदर्शनसाठी एक मालिका दिग्दर्शित केली, माझा मित्र बबन दळवी हा त्याचे संवाद लिहित होता व पार्श्वसंगीत करीत होता. त्याने ‘टूरटूर’ अनेकवेळा पहिले होते, बी. पी. सिंगच्या मालिकेसाठी तो दीपक शिर्वेâला घेऊन गेला. त्यात त्याने केलेली हवालदाराची भूमिका दीपकला घराघरात घेऊन गेली.. त्यामुळे ‘एक शून्य शून्य’ नावाने दीपक ओळखला जाऊ लागला. नाटकाचे प्रयोग सुरूच होते. मध्यंतराच्या आधी बाप्पाची ‘एन्ट्री’ असे. त्याची एन्ट्री होताच प्रेक्षकांमध्ये एकच कुजबुज सुरू होऊ लागली.. तोपर्यंत ‘लक्षा’सुद्धा मराठी चित्रपटांमध्ये स्टार झाला होता.. लक्षा आणि सुधीरचं ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ जोरात चाललं होतं. विजय कदमचं ‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्य जोरात होतं. विजय चव्हाण ‘मोरूची मावशी’ गाजवत होता आणि प्रशांत दामलेचं ‘ब्रह्मचारी’ आलं होतं.. ‘टूरटूर’चे प्रयोग स्टारस्टडेड होऊ लागले. सगळ्यांना मी त्यांची नाटके करायला सोडत होतो, रिप्लेसमेंट करून प्रयोग करीत होतो. तेवढ्यात आणखी एक गोष्ट घडली..
हिंदीतला मोठा ब्रेक ‘हम’
बाप्पाला, म्हणजे दीपक शिर्केला ‘हम’ या अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात चक्क अमिताभच्या वडिलांची भूमिका मिळाली.. उभा आडवा बाप्प्पा त्या महानायकाचा बाप शोभत होता.. सिनेमा रिलीज झाला.. हिट झाला.. त्यातला बाप्पाही गाजला.. आता तर बाप्पाच्या ‘टूरटूर’मधल्या एन्ट्रीला जोरदार टाळ्या पडायच्या..
त्यानंतर बाप्पा सुटलाच.. त्याच्या एकूण दिसण्यामुळे आणि अभिनयक्षमतेमुळे म्हणा, बाप्पा हिंदी-मराठी चित्रपटात व्यस्त होऊ लागला. नाटकाच्या दौर्यात, ज्या अवाढव्य शरीरामुळे आणि उंचीमुळे, बसमध्ये आडवे झोपता येत नव्हते, तेच शरीर आणि तोच ‘लुक’ दीपक शिर्केला हिंदीमध्ये व्हिलनची कामे देऊ लागला. तेव्हा मात्र बाप्पा जसा वेळ मिळेल तसे ‘टूरटूर’चे प्रयोग करायचा.. ‘पुरू, मी शेवटपर्यंत ‘टूरटूर’मध्ये काम करणार, शूटिंग क्लॅश होत असेल तर मी सांगेन, प्लीज अॅडजस्ट कर, पण ‘प्रयोग’ मीच करणार. तो पर्यंत बाप्पा अत्यंत जिवाभावाचा मित्रही झाला होता. माझ्या ‘मुंबई मुंबई’, ‘सखी प्रिय सखी’, ‘विच्छा माझी पुरी करा’, या नाटकांमध्ये महत्वाच्या भूमिका त्याने केल्या. ‘हमाल! दे धमाल’. ‘शेम टू शेम’, ‘एक फुल चार हाफ’, या सिनेमातून भूमिकाही केल्या. बारा वर्षांनी, म्हणजे १९९५ साली ‘टूरटूर’ नाटकाचा शेवटचा प्रयोग करून बंद केले तेव्हा ३० रुपये नाइटने काम करायला सुरू केलेला बाप्पा, स्वत:च्या अलिशान गाडीतून, पुढे ड्रायव्हर आणि मागे आरामात बसून प्रयोगाला आला होता. येताना माझ्यासाठी एक छानसे गिफ्ट आणले होते.
ब्रेक के बाद..
मितभाषी, आपल्याच मूडमध्ये असलेला, हळवा, सहृदय बाप्पा, मराठी-हिंदीच नव्हे, तर तमिळ, तेलगु, तुळू, मल्याळी, भोजपुरी, बिहारी अशा विविध भाषांमधल्या अनेक चित्रपटांमध्ये चमकला. पन्नासेक मराठी चित्रपट, सव्वाशे हिंदी आणि इतर भाषेतले मिळून बाप्पाच्या नावावर आज दोनअडीचशे चित्रपट आहेत. सगळीकडे बाप्पाने गोड स्वभावाने सर्वाना जिंकले आहे. कित्येक हिंदी-मराठी निर्मात्यांनी बाप्पाला आपल्या चित्रपटांमध्ये रिपीट करून भूमिका दिल्या आहेत. रामगोपाल वर्मा, अमिताभ बच्चन यांच्या अनेक सिनेमांत तो असतो. बच्चनसाहेबांच्या गुड बुक्समध्ये तो आहे. एकदा बाप्पाला जबरदस्त अपघात झाला, डोळा जायबंदी झाला, चष्म्याच्या काचा डोळ्यात गेल्या, पण बाप्पा हॉस्पिटलमधून इलाज करून तडक ‘खुदागवाह’च्या सेटवर शूटिंगला गेला.. त्याची अवस्था बघून बच्चनसाहेबांनी त्याला घरी जाऊन आराम करायला सांगितले, शिवाय निर्मात्याला सांगून तारखा पुढे ढकलल्या. अपघातानंतर कलावंताची काय अवस्था होते, हे बच्चन साहेबांशिवाय कोणाला जास्त कळणार?
२००० साली बाप्पाचे लग्न उच्चविद्याविभूषित अशा डॉ. गार्गी यांच्याशी झाले. त्या सध्या ‘कोकण कृषी विद्यापीठा’च्या एच.ओ.डी. आहेत. दापोली, पनवेल, गुहागर अशा ठिकाणी पोस्टिंग होत सध्या कोलाड, रोहा येथे कार्यरत आहेत. बाप्पाची आई आणि भाऊ आजही गिरगावात त्या त्यांच्या जुन्या मूळ घरात आहेत. बाप्पा तिकडे जाऊन येऊन असतो. आणि पत्नीचे पोस्टिंग जिथे असेल तिथे वास्तव्य करून हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटसृष्टीत अत्यंत शिस्तीत काम करीत असतो.
कधी मधी बाप्पाचा फोन येतो.. काही नवं आणि वेगळं करणार असशील तर सांग.. मी आहे..
‘बाप्पा’ म्हणजे ‘दीपक शिर्के’ हा मला वसंत सबनीसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’मधील महाराष्ट्राचं वर्णन केलेल्या चार ओळींसारखा वाटतो..
‘वरून रांगडा कणखर काळा, ओबड धोबड मातीचा,
अंतरात परि संत नांदती, बोल सांगती मोलाचा…!
– पुरुषोत्तम बेर्डे
(लेखक नाट्य व चित्रपटसृष्टीतील सिद्धहस्त अष्टपैलू कलावंत आहेत)