– राजेंद्र भामरे
एखाद्या गुन्ह्यात पुरावा मिळाला नाही तर गुन्हेगार त्यातून सहीसलामत सुटू शकते. त्यामुळे कोणत्याही केसचा तपास करत असताना त्यात चांगला भक्कम एव्हिडन्स हातात असायला लागतो. कधी कधी तो सहज हाती लागतो, कधी कधी त्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात, कधी नशिबाची चांगली साथ मिळते. तपासाचे कौशल्य आणि नशीबाने दिलेली साथ यामुळे देशभर गाजलेला, विदेशी माध्यमांनी दखल घेतलेला थोडी गुंतागुंत असणारा एक हाय प्रोफाइल खुनाच्या गुन्ह्याचा गुंता सोडवण्याचा असाच एक अनुभव मला आला तो मी हिंजवडी पोलिस ठाण्याचा वरिष्ठ निरीक्षक म्हणून काम करत असताना.
ते वर्ष होते २००७. एप्रिलचा महिना सुरू होता. उन्हाचा चटका वाढायला सुरुवात झाली होती. दुपारची वेळ होती, पंख्याच्या हवेत पोलिस ठाण्यात काम करत बसलो होतो. अचानक एक खबर आली, थेरगावच्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये एका तरुणाला फूड पॉयझनिंगमुळे अॅडमिट करण्यात आले होते. मळमळ उलट्या होऊन त्याचा तिथेच मृत्यू झाला होता. पोलिसांनी तिथे जाऊन तपासणी केली आणि या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला. त्याचवेळी मयत झालेल्या उदितचे वडील हे तिथे आले आणि त्यांनी उदितची मैत्रीण मनीषा आणि तिचा मित्र तुषार (दोघांची नावे बदललेली आहेत) यांच्याविरुद्ध खुनाचा (३०२) गुन्हा दाखल केला. हा गुन्हा निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. मात्र, मयत उदित हा हिंजवडीच्या भागात राहात होता, त्यामुळे तत्कालीन पोलीस उपायुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी या गुन्ह्याचा तपास मला करण्यास सांगितले. मी आणि माझ्या सहकार्यांनी तपासाला सुरुवात केली.
उदित आणि मनीषा हे दोघेही २४ वर्षांचे होते. दोघेही जम्मू-काश्मीरचे राहणारे. घरची परिस्थिती उत्तम होती. जम्मूतील कॉलेजमध्ये इंजीनिरिंगचा अभ्यास करत असतानाच या दोघाचे प्रेमसंबध निर्माण झाले होते. या दोघांचे लग्न करून देण्याचा निश्चय त्यांच्या घरच्यांनी केला होता. दोघांमध्ये प्रेम होते, त्यामुळे नेहमीच्या गाठीभेटी, फिरायला जाणे, गप्पा मारणे असे उपक्रम नियमितपणे सुरू होते. या दोघांची भेट झाली नाही, असा एकही दिवस गेला नसेल.
उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी दोघांनी वाकडमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट या शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. अभ्यासक्रम सुरू झाला, लेक्चर, प्रॅक्टिकल, अभ्यास असे रुटीन सुरू झाले. उदित आणि मनीषा दोघेजण एकाच वर्गात शिकत होते, त्यामुळे रोज सोबत कॉलेजला जात. इथे एक भलताच प्रकार सुरू झाला होता. आपण लग्नाचे जोडीदार आहोत, असे म्हणणार्या आणि आतापर्यंत उदितवर जीवापाड प्रेम करणार्या मनीषाने तुषार नावाच्या तरुणाशी सूत जुळवलं. त्यांच्यात प्रेमाचे नाते निर्माण केले. तुषार त्यांच्याच वर्गात शिकत होता.
तुषार हा राजस्थानच्या जयपूरचा मुलगा. शिक्षणासाठी पुण्यात आला होता. मनीषा आणि तुषारचे प्रेम वाढत चालले होते, तिचे उदितबरोबर ब्रेकअप झाले होते. मनीषा कॉलेजच्या भागात एका लेडीज हॉस्टेलमध्ये राहत होती, तर उदितही त्याच भागात फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होता. अभ्यासक्रमाचे वर्ष पूर्ण झाल्यावर मनीषा आणि तुषार दोघेही एका फर्ममध्ये इंटर्नशिप करण्यासाठी दिल्लीला गेले. तिथे ते आणखीनच जवळ आले आणि त्यांनी मंदिरात जाऊन गुपचूप लग्न केले. उदितने ही गोष्ट आपल्या घरच्यांना सांगितल्यावर घरच्यांनी, तू तिला पूर्णपणे विसरून जा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, असे सांगितले होते. दरम्यान, मनीषा आणि तुषार हे दोघेजण दिल्लीवरून पुण्याला परत आले. त्यांनी थेरगावमधील व्हाईट हाऊस लॉज मुक्कामासाठी गाठला. तिथे उतरताना तुषारने आपले नाव बदलले होते.
मनीषा उदितला एकट्याला गाठून त्याला दम देणे, मेंटल टॉर्चर करणे असे प्रकार करू लागली. उदित तिच्या या त्रासाने खूपच हैराण झाला. हा प्रकार उदितने घरच्यांच्या कानावर घातला. रोजच्या त्रासामुळे उदितला अन्न गोड लागत नव्हते, घास घशाखाली उतरत नव्हता. यामधून सुटका करून घेण्यासाठी उदितने आपला मोबाईलचा नंबरही बदलला. पण मनीषा त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हती.
लॉजमध्ये आल्यानंतर मनीषाने एका अनोळखी मुलाला उदितच्या घरच्या लँडलाइनवर बनावट नावाने फोन करायला लावला.
‘हॅलो, मैं अमित बोल रहा हूं, उदित का नया नंबर मेरे पास नही है’ असे सांगून त्याने उदितचा नवा नंबर मिळवून तो मनीषाला दिला. त्यानंतर मनीषाने उदितला फोन केला आणि तुला भेटायचे आहे, असे प्रेमाने गोड बोलून सांगितले. तेव्हा, उदित आपल्या वर्गमैत्रिणीच्या रुमवर प्रोजेक्ट तयार करत बसलेला होता. आपल्याला मनीषाने मला चिंचवड स्टेशनच्या मॅकडोनाल्डला बोलावले आहे, मी तिकडे जातोय, असे तिला सांगून तो रवाना झाला. दरम्यान, उदितच्या आईला शंका आली की ज्या मुलाकडे उदितचा नवा नंबर नाही, त्याला आपल्या घराचा नंबर कसा काय माहित, बहुधा मनीषाचेच हे कृत्य असावे. म्हणून तिने उदितला फोन केला आणि ही हकीकत सांगितली, तेव्हा उदितने सांगितले की तिने मला भेटायला बोलावलेले असून मी तिकडेच निघालो आहे. मनीषाने बोलावलेल्या ठिकाणी उदित पोहोचला. त्यांच्या गप्पाटप्पा सुरू झाल्या. बोलण्याच्या भरात मनीषाने उदितला सांगितले, अरे कालच शिर्डीला गेले होते. तिथून तुझ्यासाठी प्रसाद आणला आहे, असे म्हणत त्याला पेढ्याचा प्रसाद खिलवला. त्या प्रसादात तिने ‘आर्सेनिक’ विष मिसळलेले होते. उदितने तो प्रसाद खाल्ला आणि गप्पा मारून तो तासाभराने वर्गमैत्रिणीच्या रुमवर आला. तिथे काही वेळ अभ्यास करत होता, दरम्यान, त्याला मळमळ होऊ लागल्याने तो घराकडे रवाना झाला. पार्किंगमध्ये पोहचलेला असताना त्याला आईचा फोन आला, तिने त्याला विचारले, मीटिंगमध्ये काय झाले, मनीषा काय म्हटली? परंतु त्याने, मला ‘प्रेशर’ आले आहे, त्यामुळे उद्या सकाळी तुझ्याशी बोलतो, असे सांगून फोन ठेवला. फ्लॅटमध्ये पोहचला तेव्हा, त्याचे रुममेट गप्पा मारत बसले होते. बाथरूममधून बाहेर आल्यावर त्याला काय होतंय असे विचारले. त्यावर तो म्हणाला, पोटात थोडी गडबड आहे व मळमळत होते. मनीषाने मला भेटायला बोलावले होते, तिने पेढ्याचा प्रसाद दिला होता, हे सांगितले. त्यानंतर उलटी आल्यामुळे पुन्हा तो बाथरूममध्ये गेला. बाहेर आल्यावर त्याला मित्रांनी दारूचा एक पेग बनवून दिला. पण तो एक घोट गेल्यानंतर त्याला ती दारू जाईना. म्हणून मित्रांनी त्याला इलेक्ट्रॉल पावडर पाण्यातून पिण्यास दिली. परंतु तरीही त्याची उलटी जुलाब थांबेनात. अखेरीस त्याला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्याला बिर्ला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले.
त्याला डॉक्टरांनी विचारपूस केली, तेव्हा त्याने सांगितले की, दुपारी जेवण, वडापाव, मनीषाने दिलेला पेढ्याचा प्रसाद, एक घोट दारू हे खानपान होते हे त्याने सांगितले. डॉक्टरनी त्याची नोंद केस हिस्टरीमध्ये केली. तो हॉस्पिटलमध्ये असल्याची गोष्ट त्याच्या पालकांकडे कळवण्यात आली. सकाळी त्याची तब्येत अधिक बिघडल्यामुळे त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याचा मित्र जसबीर यास एका पीसीओवरून कॉल आला. फोनकर्त्याने आपले नाव न सांगता उदितबाबत चौकशी केली.
उदित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अॅडमिट झाला असताना त्याच्या कॉलेजचे डायरेक्टर पिल्ले सर त्याच्या चौकशीसाठी आले होते. उदितला ऑक्सिजन मास्क लावलेला होता, पण तो पूर्णपणे शुद्धीत होता. त्यावेळी पिल्ले सरांनी त्याला तू ड्रग्स घेतलेस का, विषारी पदार्थाचे सेवन केले आहे का, अशी विचारणा केली. यावर उदितने स्वत:च्या हाताने ऑक्सिजन मास्क बाजूला केला आणि म्हणाला, ‘सर, मैंने खुद कुछ नहीं किया है, मैं पागल हूं क्या…’ असे उदित म्हणाला होता.
२४ एप्रिल रोजी डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले. मनीषा आणि तुषारने त्याला प्रसादातून विष दिले असावे, असा संशय उदितच्या आईवडिलांनी व्यक्त केला. परंतु, कुठलाही पुरावा समोर आलेला नव्हता. अकस्मात मृत्यू दाखल करून त्याचा तपास आम्ही सुरू केला.
दरम्यान, त्याच्या प्रेताचे पोस्टमार्टेम झाले. त्याचा व्हिसेरा व मनीषाची पर्स ज्यामधून तिने पेढ्याचा प्रसाद दिला होता. दोघेही केमिकल अनॅलिझर तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. काही दिवसातच त्याचा अहवाल आला. त्याच्या व्हिसेरामध्ये आर्सेनिक विष असल्याचे निष्पन्न झाले आणि मनीषाच्या पर्समध्ये आर्सेनिक विषाचे कण मिळाले. त्यावरून तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. उदितच्या घरी आलेला फोन आणि हॉस्पिटलमध्ये उदितचा जसबीर यांना आलेला फोन हा एकाच पीसीओवरून आलेला होता. तो पीसीओ मनीषा आणि तुषार उतरलेल्या लॉजच्या काही अंतरावर होता. ते फोन मनीषाने केल्याचे निष्पन्न झाले होते.
दरम्यान, तुषारने पोलिसांना आपण ऑफिसच्या कामासाठी पुण्यात आलो होतो असे सांगितले. परंतु, काम पुण्यात होते तर तो लांब थेरगावला का राहिला, लॉजवर ओळख लपवून खोटे नाव का दिले? याची तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. एक तपास टीम गुरगाव येथील त्याच्या कार्यालयात पाठवण्यात आली. त्यात तो ऑफिसच्या कामासाठी पुण्यात गेलेला नसून त्याने तीन दिवस बिनपगारी सुट्टी घेतली असल्याचे निष्पन्न झाले.
मनीषाने शेवटपर्यंत उदितला प्रसादातून विष दिल्याचे कबूल केले नाही. तसेच मयत उदितचे कुठलाही मृत्यूपूर्व जबाब झालेला नव्हता. यावरून कोर्टात सुनावणीच्या वेळी बचाव पक्षाने उदितने स्वत:हून विष पिऊन आत्महत्या केलेली आहे, असा बचाव मांडला. परंतु मा. कोर्टाने ते मान्य केले नाही. उदितने मित्रांना तसेच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यावर डॉक्टरांना सांगितलेल्या हिस्टरीमध्ये मनीषाने दिलेला प्रसाद खाल्ल्याचे सांगितले होते. तसेच डायरेक्टर पिल्ले सर यांना आपण विष किंवा ड्रग घेतलेले नाहीच, असे स्पष्ट सांगितले होते. मा. कोर्टाने याच गोष्टी मृत्यपूर्व जबाब म्हणून ग्राह्य धरल्या.
मा. कोर्टाच्या परवानगीने मनीषाची पॉलिग्राफ टेस्ट मुंबईमध्ये करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. म्हणून मा. सेशन जज शालिनी फणसाळकर जोशी यांनी मनीषा आणि तुषार यांना उदितच्या मृत्यूबाबत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा दिली. इंडियन एव्हिडन्स अॅक्टनुसार तज्ज्ञांनी दिलेले लेखी मत किंवा सर्टिफिकेट न्यायालयात ग्राह्य धरले जाते. त्यासाठी तज्ज्ञांना न्यायालयात बोलावण्यात येत नाही. या केसमध्ये सुनावणीच्या वेळी तज्ज्ञांना (केमिकल अॅनलायझर) यांना कोर्टात बोलावण्यात आल्याने त्याचा ऊहापोह न्यूयॉर्क टाइम्सने केला होता. पण या खटल्यात इतिहासामध्ये पहिल्यांदाच केमिकल अॅनलायझरला कोर्टात बोलावून त्याची साक्ष नोंदवण्यात आली होती. आरोपीच्या वतीने राज्यातील प्रसिद्ध विधिज्ञ विजयराव मोहिते यांनी काम पाहिले. विशेष सरकारी वकील नीलिमा वर्तक यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले होते. कोर्टाने मनीषा आणि तुषार या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)