एखादा ग्राहक विमा योजना घ्यायला नाही म्हणाला की बाईंच्या डोळ्यातील मेघ बरसू लागत आणि मग समोरच्या माणसाला आपण असे काय विपरित केले म्हणून अवघडल्यासारखे होई. बरे हिला नक्की कशाचे वाईट वाटलेले आहे हे समोरच्याला कळेपर्यंत प्राण जायची वेळ येते.
– – –
मुंबईच्या ऑफिसमध्ये मी नव्यानेच रुजू झाले होते. ऑफिसातील सगळ्यांची अजून नीट ओळखही झालेली नव्हती. चेहरे तेवढे ठाऊक झाले होते. अशातच ऑफिसमधील सोमवंशी बाईंचे सासरे देवाघरी गेले. औपचारिकता म्हणून बाईंना त्यांच्या घरी भेटायला जायचे ठरले. मी नवीन असले तरी जायला हवे म्हणून गेले. आम्ही जवळपास दहा बाराजण होतो. सगळे बाईंच्या घरी पोचलो. तितक्यात आमच्यातील चाळीशीच्या आसपास असलेली एक बाई पटकन पुढे गेली आणि सोमवंशी बाईंच्या गळ्यात पडली. दुकानात ऑफर्स सुरू व्हायच्या वेळी दुकान उघडायची वाट बघणारी गर्दी बाहेर बसलेली असते. दुकान उघडल्यावर सगळ्यात चांगली वस्तू आपल्याला मिळावी म्हणून ज्या अजीजीने काही लोक धावतच दुकानात शिरतात तशी ही बाई घाईघाईने सोमवंशी बाईंच्या गळ्यात पडण्यासाठी धावलेली होती. जणू काही ती नसती धावली तर आम्ही सोमवंशी बाईंच्या गळ्यात पडण्याचा पहिला नंबर लावला असता.
सोमवंशी बाई या दिव्यासाठी तयार नव्हत्या. त्या एकदम घाबरल्या. पण त्यांच्या घाबरण्याकडे अजिबात लक्ष न देता चाळीशीने जोरजोरात रडायला सुरुवात केली. तो आवाज एवढा मोठा होता की सोमवंशी बाईच्या स्वर्गात गेलेल्या सासर्यांनाही आपण जरा लवकरच वर आलो असे वाटले असेल. आजूबाजूला बसलेले लोकदेखील चपापले.
मी हळूच शेजारी बसलेल्या चव्हाणांना विचारले, ‘या बाई सोमवंशी बाईंच्या जवळच्या नातेवाईक आहेत का?’
चव्हाणांनी उत्तर दिले, ‘नाही.’
चाळीशीचे रडणे इतके अस्सल होते की तिथे अशा गोष्टींची चौकशी करू नये याचे भान विसरून मी पुन्हा चव्हाणांना विचारले, ‘अहो मग, त्या एवढ्या का रडत आहेत? त्यांच्या ओळखीच्या आहेत का?’
पुन्हा चव्हाणांनी तितक्याच निर्विकारपणे उत्तर दिले, ‘नाही.’
‘अहो मग, मॅटर काय आहे? त्या का रडतायत एवढ्या?’
‘तो त्यांचा स्वभाव आहे.’
‘रडण्याचा?’
‘हो.’
ही माझी आणि ऋतुजाची पहिली नीट आणि थेट भेट होती. ते सासरे नक्की सोमवंशी बाईंचे होते की ऋतुजाचे असा प्रश्न पडावा एवढी ती तिथे रडली. सोमवंशी बाईंना सॉलिड कॉम्प्लेक्स आलेला असणार. सुरुवातीला प्रतिसाद म्हणून त्यांनी थोडं रडून बघितलं, पण ऋतुजाशी स्पर्धा करण्याची आपली पात्रता नाही याची त्यांना लवकरच जाणीव झाली आणि त्या स्वत:च पुढे होऊन ऋतुजाला शांत करू लागल्या.
‘ठाऊक आहे गं. तुला दु:ख बघवत नाही. चांगले होते सासरे माझे. पण वय झालं त्यांचं. कोणाच्या हातात काय आहे,’ असे सोमवंशी बाई म्हणत होत्या आणि त्यांच्या साडे सत्त्याण्णव वर्षे वय होऊन गेलेल्या सासर्यांसाठी ऋतुजा हमसून हमसून रडत होती.
ऋतुजाचे दु:ख तिथेच संपत नाही. त्यानंतर कितीतरी काळ ती सोमवंशी काकांच्या मृत्यूबद्दल खंतावत होती.
ऋतुजाला ऑफिसमध्ये सगळेच गळका नळ म्हणत. थोडेसे सुद्धा काही दु:खद घडले की हिच्या नळाची तोटी उघडलीच म्हणून समजावी. आणि ते पाणी फिल्टर काढून टाकलेल्या नळासारखे धबाधबा गळत असे. थांबा म्हटले तरी थांबणार नाही. कित्येक प्रसंगात तिला खरेच वाईट वाटते की आपली सवय आहे म्हणून ती रडते याचा अंदाज घेण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केला. पण ती खरोखरीच वाईट वाटल्याने रडत असे. ती फारच हळवी आहे.
दिसायला अत्यंत देखणी. मानेवर रुळणारे कुरळे काळे केस. कधी केस उघडे सोडलेले तर कधी त्याला क्लिप लावलेली. रुंद कपाळ. त्यावर बारीकशी टिकली. सुंदर चेहर्याला न शोभणारे बारीक डोळे. सरळ बारीक नाक. पातळ ओठ. अतिशय सुंदर जिवणी. सगळ्यात सुंदर होतं तिचं हसू. ती हसताना अतिशय छान दिसते. साधारण उंची. मध्यम बांधा. हळवे असणे हा साधारणतः गुण असला तरीही ऋतुजाच्या बाबतीत मात्र तो शंभर टक्के दुर्गुण होता. ऋतुजाला कुठेही दुःख दिसायची, जाणवायची खोटी, लगेच तिच्या डोळ्यांचा नळ गळू लागे.
ऋतुजाला कशाचे वाईट वाटेल आणि ती कधी रडायला सुरू करेल हे सांगताच यायचे नाही. अगदी जुन्या आठवणीत हरवली तरी आज ते माणूस जिवंत नाही म्हणून ती हळवी होई. एकदा तर आम्ही डबा खात बसलेलो होतो. चित्रे मॅडमनी डब्यात कारल्याची भाजी आणलेली होती. त्या भाजीचा घास तिने खाल्ला आणि जोरजोरात रडायला लागली. आम्हाला काहीच समजेना. तिला तिखट लागले आहे का, जीभ चावली गेली का, असे अनेक प्रश्न आम्हाला पडले. मी तर तिचे तोंड उघडून ‘जीभ दाखव, जीभ दाखव’ असा प्रयोगही करून बघितला. चित्रे मॅडमच्या डब्यातील भाजी खाऊन हे प्रकरण बिथरल्याने त्या तर एकदम गांगरून गेल्या होत्या. खूप प्रयत्नांती रडणे कमी झाल्यावर समजले की अशीच कारल्याची भाजी पंचवीस वर्षांपूर्वी त्यांच्या शेजारी राहणार्या एक आजी करायच्या. त्या आता या जगात नाहीत. या भाजीने त्यांची आठवण झाली आणि तिला रडू आलं… तिला उगाच ‘रोतीजा’ म्हणत नाहीत!
या आमच्या रोतीजाला कशाने रडू फुटेल सांगताच येणार नाही. कोणी एक शब्द बोलणे, तिच्या कुठल्या तरी प्रस्तावाला नकार देणे, कोणाच्या त्ारी मुलाला कमी गुण मिळाल्यावर त्या बाई मुलाला फोनवर झापत आहेत हे तिने ऐकणे असे काहीही कारण तिला पुरत असे. त्यामुळे तिला विपणन विभागातून काढून बॅक ऑफिसला घेतलेले होते. मार्केटिंग/ विपणनमध्ये असताना तिने कित्येक ग्राहकांना असेच बेजार केलेले होते. ती खरे तर खूप चांगली विक्रेती होती, तिचे आमच्या उत्पादनांचे ज्ञानदेखील उत्तम होते. पण एखादा ग्राहक विमा योजना घ्यायला नाही म्हणाला की बाईंच्या डोळ्यातील मेघ बरसू लागत आणि मग समोरच्या माणसाला आपण असे काय विपरित केले म्हणून अवघडल्यासारखे होई. एकदा तर ती असेच रडत असताना ग्राहकाच्या बायकोने बघितले आणि त्यावरून त्यांच्यात भांडण लागले.
पॉलिसी घ्यायला नकार दिल्याने ही बाई रडते आहे हे ग्राहकाच्या बायकोला पटेना. रडणे थांबल्यावर ऋतुजाने सांगून बघितले, पण बाई नवर्यावर चांगल्याच चिडलेल्या होत्या. असे कित्येक प्रसंग ऋतुजाने ओढवून घेतलेले आहेत.
कित्येकदा वाटे की ही खोटेपणाने रडते. पण तसे अजिबातच नसे. तिला खरेच आतून वाईट वाटलेले असे. ती खूप सहृदयी आहे. दुसर्याविषयी तिला आतून प्रेम आहे. पण ते प्रेम फक्त रडण्यातून वहात असे ही एकच अडचण होती.
आमच्या ऑफिसमधील एक व्यवस्थापक बदली होऊन नव्याने इथे रुजू झाले होते तेव्हाची गोष्ट. पहिल्या आठ दिवसातच एकदा त्यांनी ऋतुजाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले आणि कामात काहीतरी चूक झालेली आहे असे निदर्शनास आणून दिले. आपल्याकडून अशी चूक झालीच कशी म्हणून ऋतुजा स्वत:च स्वत:ला बोल लावून घेऊ लागली. व्यवस्थापक साहेब तिला खूप समजावून सांगत होते, ‘एवढं काही नाही मॅडम, अशा चुका होतच असतात. पुढच्या वेळी अशा चुका होणार नाहीत याची आपण काळजी घेऊया.’
साहेब असे समजावून सांगत होते की जणू काही चूक त्यांचीच आहे. तरीही ऋतुजा रडतच होती. जेव्हा तिचे रडणे खूपच वाढले तेव्हा साहेबांनी विनंती करून आम्हाला आत बोलावले आणि तिला आमच्याबरोबर बाहेर पाठवले. रडत बाहेर निघणार्या ऋतुजाला बघून साहेबांविषयी कोणाचे मत वेगळे होण्याची शक्यता आहे असे साहेबांना वाटू लागले. तिच्या रडण्याच्या भीतीने काही दिवसात साहेबांनी दुसर्या ऑफिसला बदली करून घेतली.
बरे हिला नक्की कशाचे वाईट वाटलेले आहे हे समोरच्याला कळेपर्यंत प्राण जायची वेळ येते. बसने देखील ती कुठे निघाली आणि रस्त्यात कुठे अपघात झालेला दिसला की बाई आरडाओरडा करून बस थांबवायला लावतात. त्या माणसाला मदत मिळेपर्यंत तिथेच थांबतात, रडून गोंधळ घालतात आणि मगच बस पुढे जाऊ शकते. वेदना मानसिक असो वा शारीरिक असो, त्या ऋतुजाला बघवत नाहीत म्हणजे नाहीत.
या वेदना स्वतः जाऊन बघायची हौस केवढी? नातेवाईक दूरच असो वा जवळचा. कोणाकडे काही दुःखदायक घडले की ऋतुजा तिथे हजर होणारच. मानसिक आधार द्यायला म्हणून ही जाते, पण तिलाच आधार देण्याची वेळ येते. एकदा तिच्या शेजारच्या एका केरळी मुलीच्या सासूबाई केरळमध्येच वारल्या. ‘तुझ्याबरोबर मी तुम्हा लोकांना आधार द्यायला येते’ असे म्हणून ऋतुजा हटूनच बसली. पण ऋतुजा किती हळवी आहे हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी तिला बरोबर नेले नाही. हट्टीपणा करून ऋतुजाने नवर्याला केरळ सहलीवर नेले आणि त्या मुलीच्या गावी जाऊन रडून आली.
वेगवेगळ्या निमित्ताने रडण्याच्या ऋतुजाच्या अशा कित्येक घटना आहेत. तिच्या या रडण्यापायी तिची खूप चेष्टा होते. तिचे रडणे नाटकी आहे असे सगळ्यांना वाटते. पण त्यामागे एक महत्वाची गोष्ट झाकली जाते आणि ती म्हणजे तिचे काम. ऋतुजा अत्यंत कष्टाळू आहे. जीवतोड कष्ट उपसते. पण एकदा का अश्रुधुराचे नळकांडे फुटले की मग ऋतुजा रोतीजामध्ये कधी रुपांतरित होते ते कळतच नाही. आपल्याला दुःख सहन होत नाही तर त्याच्या वाटेला जाऊ नये तर तसे होतच नाही. उलटपक्षी जिथे कुठे दुःख असेल तिथे बाई पोचणार, अश्रू ढाळणार. कुणाकडे काही झाले की डबे द्यायला ही पुढे असते. कोणाबरोबर काही झाले की ऋतुजा रडेल म्हणून तिला सांगितले जात नाही. पण जसेही तिला कळते, ती क्षणाचाही विचार न करता तिथे जायला निघते. अखिल जगातील जनतेला रडून आधार देणे हे आपले आद्यकर्तव्य ती बजावतेच. बरे कालानुरूप दुःख कमी होईल वगैरे काही भानगड नाहीच. कोणाची आठवण निघाली तरी हिला आवरणे कठीण. कित्येकदा तर आम्ही तिला कारणच विचारत नसू. बर्याचदा ती रडत असे देशपांड्यांकडची बातमी ऐकून आणि आम्ही तिची समजूत घालत असू कुलकर्ण्यांच्या बातमीसाठी.
लग्नात ऋतुजा मुलाकडच्या बाजूने असो वा मुलीकडच्या- ती रडते म्हणजे रडते. इकडे अक्षता पडल्या की तिकडे हिची टिपे गळायला सुरुवात झालीच पाहिजे. कित्येकदा तर मुलगी रडत नाही, पण ऋतुजा मात्र शंभर नंबरी हुकुमाचा एक्का आहे. मुलाकडचे, मुलीकडचे सगळे मिळून ऋतुजाची समजूत घालतात आणि मगच मुलीची पाठवणी होते. मला तर वाटते की ऋतुजाला स्वतःच्या लग्नात सांगितलेच नसेल की तिचेच लग्न आहे. नाहीतर लग्न ठरल्या क्षणापासून ती रडली असती. आम्हीदेखील त्याबद्दल काहीही विचारत नाही. नाहीतर पुन्हा एकदा पाठवणी होईल आणि पुन्हा एकदा तिला रडावे लागेल.
रडण्यावरून आपली चेष्टा होते हे तिला ठाऊक आहे, त्याबद्दलही वाईट वाटून तिचे कित्येकदा रडून झालेले आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन झाले आहे. पण तिच्यात काहीही बदल झालेला नाही. काही लोक असतातच असे. मला तर वाटते की प्रत्येक घटनेत ऋतुजा स्वतःला तिथे कल्पिते आणि मग तिचा बांध फुटतो. तिच्या सहृदयी असण्याची आजुबाजूच्या लोकांना आता सवय झाली आहे. होता होईल तेवढे तिला सगळे सांभाळून घेतात.
माझी त्या ऑफिसातून बदली झाली ती माझी आणि ऋतुजाची शेवटची भेट. तेव्हाही ती अशीच रडली होती. पण फरक एवढाच होता की त्या दिवशी मी देखील रडले होते. रडून झाल्यावर ती म्हणालीही, ‘तुझी आज रोतीजा झाली गं.’ पुन्हा तिला आता भेटणारच नाहीये. तिला सोडून निघताना जीव पिळवटतो. तिची काळजी वाटते. माणसाने इतके हळवे असू नये.
मी काय म्हणते, तुम्ही आमच्या जुन्या ऑफिसात गेलात आणि सहजच तुम्हाला माझी आठवण झाली आणि ती आठवण ऑफिसमध्ये सांगितल्यावर जी जोरजोरात रडेल, तीच आमची रोतीजा!!!