किल्ल्यावर लगबग वाढलीय. कुणा गनिमांनी सुळक्यावरील फिरस्त्यांवर हल्ले करून काही निष्पाप प्रजाजनांना तरवारीचे घाव घालून ठार केलंय. त्यांच्या नातेवाईक आणि कुटुंबियांना तिथून सुखरूप आणल्यानंतर मृतांचे पार्थिव देह दफनविधीसाठी आणले गेलेत. ते किल्ल्यावरच्या मोकळ्या दफनभूमीत ठेवले गेलेत. त्या भ्याड हल्ल्याने पूर्ण किल्ल्यावर शोककळा पसरलीय. फिरस्त्यांना मूठमाती देण्यासाठी दफनभूमीत सर्व तयारी केली गेलीय. गडावरचे पहारे दुप्पट करवून घराघराची झडती आणि संशयितांची चौकशी केली जातेय. तसेच गडाबाहेरून आत आलेल्या आगंतुकांवर करडी नजर ठेवली जातेय. काही लोकांना केवळ संशयावरून शिपाई उचलून नेत आहेत. अगदी दफनभूमीत जास्तीच्या तुकड्या आल्यात. गडावरील सर्व सरदार-उमराव, दरबारी गण उपस्थित राहणार असल्याने अत्यावश्यक त्या सार्या दक्षता घेतल्या जात आहेत. चौकी पहारे वाढवले गेलेत. इकडे दिवाण यम्मतसा त्यांच्या अश्वावरून लवाजम्यासह दफनभूमीत पोहोचतात. मागोमाग दरबारीचे अनेक सरदार तिथे पोहोचतात.
तोच काही भाट पुढे होत खुशामतीचे पवाडे गाऊ लागतात.
‘…आणि या ठिकाणी आले यम्मतसाऽऽऽ
ते करतील गम्मत धाऽऽऽ
शत्रूला युद्धात करतील स्वाहाऽऽऽ
आणि…’
‘हेऽऽ आहे काऽऽय?’ तुसडेबाबा विस्मयचकित होऊन विचारतो.
‘ओ गप्प राहावा! प्रसंग काय? तुम्ही विचारता काय?’ चरणचुंबक त्याचा गच्च हात पकडतो.
‘अय हात सोड. अजून माझ्या बायकोने पण इतका गच्च हात पकडला नाहीय माझा! इथं गेलेल्यांना मूठमाती दिल्या जाणार आहे की आणखी काही? हेच कळेना मला! त्यात तुझी ‘फिलिंगंऽऽ’ भयाण वाटतेय.’ तुसडेबाबा हात झटकत शंकित मनाने भवताल बघतो.
‘तर याठिकाणी शूरांचे संकासुर, बोलघेवड्यांचे महापूर, आळशांतील आरंभशूर, पळपुट्यांतील प्रथमपीर सरदार यम्मतसा दिवाण तथा किल्लेदार माऊतींचे डावे-उजवे हात आलेले आहेत होऽऽऽ!’ कुठूनतरी गर्जना घुमते. दफनभूमीत आसनं टाकली जातात. बघे दाटीवाटीने मूठमाती देण्याच्या कार्यक्रमासाठी उत्सुकतेने गर्दी करवून समोर जागा मिळेल तिथे बसून घेतात. सरदार यम्मतसा डोक्यावरील पागोटे सावरत चहूबाजूंना चोरटी नजर फेकत संशयाने शरीराची वळकुटीकरून मोठ्या भव्य हिरेजडित खुर्चीत बसतात.
‘हा जो आपल्या गडावर भ्याड हल्ला झाला आहे. त्याला चोख असं उत्तर देण्याची धम्मक फक्त आपल्या सरदार यम्मतसा यांच्या निधड्या छातीत आहे…’ एक खुशमस्करा उभारून काहीबाही उत्स्फूर्त भाषण देऊ लागतो.
‘सरदार तो निधड्या छातीबद्दल बोलतोय. तुम्ही जरा छाती फुगवा,’ एक शिपाई सरदार यम्मतसांच्या कानात पुटपुटतो.
‘अय रे! कशी फुगवू? गनिमांनी छातीचा कोट करून मृत्यूला तोंड देणार्या हरेकाच्या छातीवर वार केलेत म्हणे. मी तसलं काही केल्याचं कुणाला कळलं तर?’ अवसान गळालेला सरदार यम्मतसा शिपायाला प्रतिप्रश्न करतो.
‘सरदार हा गनीम उत्तरेचा नाहीय. किल्ल्याच्या पश्चिमेचा आहे. याला गल्लीतलं शेंबडं पोर तुडवून येईल,’ शिपाई सरदारांना धीर देतो.
‘मग हे सांगणार कधी तू?’ यम्मतसा मोकळेपणाने बसत निर्धास्त होत विचारतो, ‘मी उगाच घाबरुन डोळे झाकून बसलेलो होतो, माहितेय?’
‘…या ठिकाणी किल्लेदार माऊतींनी सरदार यम्मतसांना ह्याच विशेष कारणासाठी आपल्यात पाठवलं आहे. बघा, नुसत्या त्यांच्या येण्यामुळे किल्ल्याच्या पश्चिमेला तीव्र ऊन पडलंय. पानांनी सुकवा धरलाय. पाखरं त्यांची घरटी भीतीने हलवून पूर्वेकडे बांधत आहेत. त्यांच्या तोफा बारीक पडल्यात. तरवारी बोथट दिसत आहेत. पलिते विझलेत. एकूण पश्चिमेकडे नुसत्या हल्ल्याच्या शक्यतेने हाहाकार उडालेला आहे,’ खुशमस्करा बोलतोच आहे.
‘नेमका इथे दफनविधी होणार आहे की दुसरं काही?’ तुसडेबाबा उभा रहात प्रश्न करतो. लागलीच चरणचुंबक पुन्हा त्यांचा हात ओढतो.
‘तुम्हांला अडचण काय आहे बाबा? कळू दे ना वायव्य-पश्चिमीच्या गनिमांना! आमचा दरारा! सरदारांची धडाडी, त्यांची कीर्ती. आणि पराक्रम!’ चरणचुंबक समजावू बघतो.
‘त्याने काय होईल?’ तुसडेबाबा रोखून प्रश्न करतो. चरणचुंबक काही क्षण शांत होतो.
‘नुसते घाबरावयाला नकोत. चारदोन सहकारी मिळून आल्यास कापून तटबंदीवरून खाली फेका वा तोफेच्या तोंडी द्या! गनिमावर जरब बसली पाहिजे,’ एक जण उठून मागणी करतो.
‘हे बघा. अठरा अठरा तास चौकस असणार्या किल्लेदारांना त्या गनिमांनी आव्हान दिलंय. त्यात त्यांनी नावं विचारत संबंधी लोकानांच ठार केलंय. त्याने किल्लेदार रागाने लालेलाल झालेत. त्यांनी ठरवलंय, कुणालाही सोडणार नाही म्हणवून. फक्त त्यांच्या चार तासांच्या अनावर निद्रेतून बाहेर येताच ते मृतांच्या आप्तेष्टांना गळे पडून कडकडून भेटतील. तुम्हां-आम्हांला संबोधित करतील. गडाला संपूर्ण प्रकरणाबद्दल अवगत करतील,’ दुसरा भाट मोठ्याने घोषणा करतो.
‘नुसत्या असल्या तसल्या कारवाईने ही बेणी सुधारणार नाहीत. यांना घरात घुसून मारलं पाहिजे. हाणलं पाहिजे. यांचा दानापाणी बंद करायला पाहिजे. आणि किल्लेदार किलकिल्या नजरेनं जेव्हा बघतील तेव्हा आपोआप ते होईलच, पण तरीही…’ तिसरा भाट मोठमोठ्याने बोलतो.
‘मी म्हणतो, जे माऊतींचे संबंधी नाहीत. अश्या सर्वांना तरवारीने पाणी पाजलं पाहिजे. किंवा…’ एकजण कुठल्याशा कोपर्यातून चिरकतो.
‘बोला, माऊती! माऊती! बदला घ्या माऊती!’ मागून घोषणा चालू होतात.
‘नेमका दफनविधी करायचा आहे की नाही? की आधी दुसर्या कुणास दफन करायचे आहे?’ तुसडेबाबा जरा रागाने विचारतात.
‘ऐका! ऐका! आताच कळालेल्या बातमीनुसार पश्चिमेकडचे गनीम साधारण तीन फूट घरात मागे गेलेत. त्यांनी छावण्या सफेद कापडाने बांधल्याचं आढळतंय. यावरून ते दरदरून भिलेले आहेत, असं दिसतंय,’ एकजण ताजी खबर उपस्थितांना देतो.
यम्मतसा सदरहू प्रकार सस्मित वदनाने बघतो. आणि एक सरदारास खुणावतो. सरदार घाईने डोळ्यांतला कचरा काढत पुढे होतो.
‘तर आपण इथे आपापल्या आप्तेष्टांना दफन करण्यास जमला आहात, पण यानिमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही पश्चिमेकडील झरे अडवून गनिमांना योग्य तो धडा शिकवू,’ सरदार बोलता बोलता यम्मतसांकडे बघत अडखळत घोषणा करतो.
‘इतकंच नाही, आम्ही दुप्पटीने तुकड्या तैनात करून सदरहू सुळक्याची कसून तपासणी करत आहोत. तिथे तोफा नेऊन ठेवल्या आहेत. शक्य तितक्या लवकर आम्ही बदला घेऊ,’ दुसरा सरदार तावातावाने बोलतो.
‘ही जी लोकं तिथून आणली आहेत, त्यांनी कधी खेचरावर मांड टाकली नसेल. त्यांना आमच्या दाढीवाल्यांनी अरबी घोड्यावर बसवून आणलंय. वाचलेल्या लोकांना वाचवलंय,’ कुणी तिसर्या चौथ्या रांगेतून बोंब मारतो.
‘हे कोण बोललं?’ चरणचुंबक मान फिरवून बघू लागतो, ‘फक्त आणि फक्त आमच्या माऊतींनी लोकांना वाचवलंय. हे काय कुणीही किल्लेदारांचं श्रेय घ्यावं का?’ तो चरफडतो.
‘ते महत्त्वाचं आहे का? इथं दफनविधी होणार कधी आहे?’ तुसडेबाबा चिडून विचारतात. पण यम्मतसांच्या खुणेनंतर दफनविधी सुरू होतो. अधूनमधून घोषणा, फुलांची उधळण वगैरे बघता शोक ‘सोहळा’ भासावा. सरदार उमराव उगीच रडवे चेहरे करत दफनविधी करू जातात. दफनविधी पार पडतो. सर्वजण काही क्षण स्तब्ध उभे राहत मृतांना आदरांजली वाहतात. त्यानंतर पुन्हा किल्लेदारांचे गुणगान सुरू होतात.
तुसडेबाबा कपाळाला हात लावतात. दोन क्षण शांत बसून उठतात आणि मोक्याच्या जागेवर जाऊन मोठ्याने बोलू लागतात.
‘हे बंधूंनो! आपल्यावरचा हा हल्ला पहिला नाही. या आधीही असे भ्याड हल्ले वेळोवेळी झालेत. फक्त ह्या वेळी त्यांनी नावं विचारून कत्तली केल्यात म्हणून आपणच आपल्या एकजुटीला बाधा पोहोचवून आपल्याच लोकांकडे शंकेनं बघून त्यांच्या फुटीच्या विषाला खतपाणी घालतोय. हे आधी बंद व्हायला हवं. आणि नुसतं किल्लेदार हे करणार, ते करणार म्हणत निवांत बसण्यापेक्षा त्यांनी प्रत्येक हल्ल्यातील घुसखोरांना शोधलंय का? घुसखोरांचे येण्याजाण्याचे मार्ग शोधले गेलेत का? त्यांना रसद पुरवणारे आपल्यातले फितूर सापडलेत का? त्यांचं मागेच दानापाणी बंद केल्या गेल्याच्या घोषणा झाल्या होत्या. त्या अफवा होत्या की आणखी काही? हे आम्ही शोधणार का? मागील हल्ल्यातील काही लोकं मोकाट सुटलीत वा सोडली गेलीत. त्यांना शिक्षा होणार कधी? की दरवेळी आम्ही वरून तोफ गोळे डागून खालच्यांना शिक्षा देणार की त्यांची इथली बिळं उकरून ती कायमची लिंपणार? किती दिवस आपण ह्या भेकड दुर्बळ गनीमांचे भ्याड हल्ले पचवायचे? की विलेक्शणचा मोसम साजरा करण्यासाठी अश्या हल्ल्यांना सहन करत राहणार?’ तुसडेबाबा महत्त्वाचे प्रश्न करतो. पण त्याची उत्तरं तिथल्या कुणाकडेही नाही.