मराठी व्यावसायिक, प्रायोगिक नाटकांकडे समाजमनाचा आरसा म्हणून बघितले जाते. त्यात नवनवीन प्रवाह येतच असतात. हे तसे सुदृढपणाचेच लक्षण म्हणावे लागेल. पण आजकाल प्रेम ते लग्न या भोवर्यात अनेक नाटके मनसोक्त फेर धरून मस्त नाचत असल्याचं चित्र दिसतेय. अगदी लग्नानंतर दुसर्यासोबत घरोंदा करण्यापासून ते लग्नाखेरीज नाते सांभाळणारी बेधडक कथानके आहेत. काहीत प्रेमविवाहाच्या टिप्स, पटवापटवीचे तंत्र आहे. ब्रेकअप, लव्हस्टोरी, तरुणींशी फ्लर्ट आहे. विसंगती आहे. समज-गैरसमज अन् नात्यातील तिढे आहेत. तरुणांप्रमाणे वयोवृद्धांचाही पुनर्विवाह सहजीवन, प्रेम, सबकुछ आहे; पण सारं काही प्रेम ते लग्न या भोवतीच!
आजच्या नाटकांच्या नावावरून नजर फिरविल्यास विषयाचा अंदाज अगदी सहज येतोय. ‘डायट लग्न’, ‘ढकीचं लग्न’, ‘पाहिले न मी तुला’, ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’, ‘किरकोळ नवरे’, ‘विषामृत’, ‘नियम व अटी लागू’, ‘आपण यांना पाहिलंत का?’, ‘वरवरचे वधूवर’, ‘जर तरची गोष्ट’, ‘स्थळ आले धावून’, ‘आबा की आयेगी बारात’… त्यात आणखीन एका नव्या नाटकाची भर पडली आहे. ‘ठरता ठरता ठरेना!’ या नाटकाची कथासंकल्पना स्वप्नील बारस्कर यांची असून अक्षय स्मिता श्रीनिवास यांची संहिता आहे!
पडदा उघडण्यापूर्वी पडद्यापुढे सूत्रधार प्रकटतो. गप्पाटप्पा, टिंगलटवाळी करीत फ्रेश मूडमध्ये तो संवाद साधतो. आजचे हे नाटक टिपिकल असल्याने आता तुमचे तिकिटांचे पैसे वायाच जाणार, असंही तो विश्वासात घेऊन सांगतो. नाटकांवर, पडदा उघडण्यापूर्वीच्या नेहमीच्या रटाळ सूचनांचीही तो खिल्ली उडवितो. स्वतःच पडदा उघडण्याची सूचना देतो. आणि निर्मात्याचे मानधनाचे पैसे वाचविण्यासाठी सूत्रधाराची भूमिका बदलून गेटअप क्रमांक दोन, ‘टॅक्सी ड्रायव्हर’च्या भूमिकेत शिरते. सुरुवातीला हा ‘प्रायोगिक’ टच असला तरी पुढे एकेका प्रसंगातून हे नाटक ‘लग्न’ जुळविण्यासाठीच्या एकेका धडपडींनी पूर्ण व्यापून जाते.
गार्गी देसाई ही रामचंद्र दीक्षित याची बहीण. भावाला लग्नाची मुलगी दाखविण्यासाठी टॅक्सीतून घेऊन जातेय. या प्रवासात भाऊचा वेंधळेपणा, अव्यवस्थित देहबोली, रंगसंगतीचा अभाव, शारिरिक व्यंगही उघड होतात. दोघेही अखेरीस कॉफी हाऊसमध्ये पोहचतात. तिथे शोभना ही लग्नाळू वधू आणि तिचे दोन अटॅक येऊन गेलेले बाबा भेटतात. रामचंद्राचा मुलगी बघण्याचा ७५वा अमृतमहोत्सवी कार्यक्रम पार पडतो. बघण्याचा कार्यक्रम दोन्हीकडून नापास! अर्थात नेहमीचाच अनुभव त्यांना मिळतो.
शोभना ही हायकोर्टात वकील. तिचं वय वाढत चाललंय. चाळीशी पार. पण प्रत्येकवेळी तिचं ‘वजन’ आड येतंय. तर दुसरीकडे रामचंद्र हा प्रौढ वर! कंपनीत ‘सिनियर’पदी नोकरीवर. थोडा तोतरा. पांढरी दाढी. आत्मविश्वास हरविलेला. त्याला सुंदर मुलगी हवीय. दोघांच्या पत्रिकेतले आकाशातले ग्रह आडवे येत नाहीत. पण मनातले ग्रह सुटता सुटत नाहीत.
या दोघांची भेट एकदा समुद्रकिनारी होते. ती त्याच्या वाढदिवशी ‘मारी’ बिस्किटांचा केक करून आणते. भेटीगाठी सुरू होतात, कॉफी घेतात, गप्पा मारतात, पावसात भेटतात. नाच-कविता करतात, मैत्री वाढते. पण… पुढे लग्नाचे काय? हा प्रश्नचिन्ह आहेच. त्यात भर म्हणजे ऑफिसातल्या सोनिया या सुंदर तरुणीला रामचंद्र चक्क ‘प्रपोज’ करतो. पण ती सर्वांसमक्ष अपमान करते. तो खचतो. नोकरी सोडण्याचा विचार करतो. त्याला ऑफिसात टार्गेट, गिर्हाईक टाईमपास बनविले जाते. तो पुरता कोसळतो. शोभनाचा मानासिक आधार असला तरी ती ‘प्रपोज’ करण्याच्या प्रकारामुळे दुखावली गेलीय. शेवटी नाटकातलं नाटक ‘स्टॅन्डअप’चा शो! त्यात रामचंद्र आपल्या मुली बघण्याच्या अमृतमहोत्सवी प्रसंगातले एकेक भन्नाट किस्से सांगतो. शोभनाची वाट तो बघतो. दोघांमधला दुरावा संपतो काय? दोघांचं दिसणं, वागणं, बोलणं हे ‘नकारघंटा’ ते ‘सकारघंटे’पर्यंत पोहचतं का?
संकल्पना, लेखन, दिग्दर्शन यात नाट्य सादरीकरणाबद्दल एकवाक्यता दिसते, नेमकेपणा, पण वेगळेपणा एकूणच आविष्कारातून साकार करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या विषयांवरच्या नाटकांमध्ये हे नाटक लक्षवेधी ठरेल, यात शंकाच नाही.
समीप नाट्यगृहाची (इंटिमेट थिएटर) ही संकल्पना अनेकदा नाट्य रंगवताना पूरक ठरते, हे दिग्दर्शकाने पक्के मनावर घेतल्याचे दिसते. कुठलाही आडपडदा न आणता आशय भिडविण्याचा प्रयोग त्यातून होतो. प्रारंभ, मध्यंतरानंतर आणि शेवटी सूत्रधाराला प्रगट करून रसिकांशी थेट संवाद साधला गेलाय, तर नायक स्टँडअप कार्यक्रमात माइक हाती घेऊन गप्पा मारतो. शोभनाची प्रेक्षकांमधून दिलेली एंट्रीदेखील लक्षात राहाण्याजोगी. प्रेक्षकागृहातील दिवे लावा, पडदा उघडा वा बंद करा अशा काही सूचनांमध्ये तेच प्रयोजन आहे. सादरीकरणातील शैली भुरळ पाडणारी असून त्यात कुठेही कृत्रिमता वाटत नाही. आपणही या नाटकातील एक जवळचा भाग आहोत, ही भावना रसिकांच्या मनात त्यातूनच येते.
अचूक पात्रनिवड, खटकेबाज संवाद, शैलीतला ताजेपणा दिग्दर्शकाने जपला आहे. हशा, टाळ्या आणि नृत्ये याने प्रसंग उंचीवर जातात. अनेक जागा नेमक्या हेरण्यात आल्यात. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. मोडलेल्या किंवा बिघडलेल्या लग्नाची गोष्ट यात नाही, तर गंभाrर विषयातही मिश्कील, हळुवार हाताळणीतून वाटा शोधल्या आहेत.
कलाकारांची तयारीची टीम ही या नाटकाची जमेची बाजू म्हणावी लागेल. सागर देशमुख यांचा रामचंद्र दीक्षित आणि वनिता खरात यांची शोभना देसाई; बाह्यरूप तसेच मनातल्या भावभावना यांचं सर्वांगसुंदर दर्शन या दोघांच्या अभिनयातून दिसतं. नाटकात या दोघांचा उल्लेख ‘लग्नाच्या बाजारातील जुना माल’ असा करण्यात आला असला तरी हा जुना मालच नाटकात ‘मालामाल’ करतोय. अस्सल पुणेकर वकील असलेले सागर देशमुख यांनी यापूर्वी ‘व्यक्ती-वल्ली’त पु. ल. देशपांडे यांची, तर मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका केली होती. नाटक, सिनेमा, मालिकांत वावर असणार्या या अनुभवसंपन्न अभ्यासू रंगकर्मीने ‘रामचंद्र’ जिवंत केलाय. देहबोली शोभून दिसते. संवादफेक अप्रतिमच. वनिता खरात महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहचली आहे. सहा वर्षानंतर त्या पुन्हा रंगभूमीवर प्रगटल्या आहेत. दिसण्याला दिलेलं अवाजवी महत्त्व आणि त्यातून झालेला ताणतणाव अभिनयातून नेमका उभा राहातो. आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा हट के भूमिका. शंतनू रांगणेकर हा विनोदवीर, ज्याला टायमिंगचा अचूक सेन्स आहे. टॅक्सीवाला, सूत्रधार, कॅफेतला वेटर, चणेवाला, धर्मराज, चिन्मय अशा अनेक भूमिका त्यांनी ‘सही रे सही’ पेश केल्यात. बोलीभाषांवरचं प्रभुत्व जबरदस्तच. मृणाल मनोहर हिची सोनिया, अर्पिता घोगरदरेंची गार्गी देसाई आणि प्रदीप जोशींचा राहुल देसाई (बाबा) हे कलाकार या नाटकात उत्तम साथसोबत करतात.
टॅक्सीतला प्रवास आणि पडद्यावर मुंबईदर्शन तसेच समुद्रकिनारीचे प्रसंग आणि ‘कॉफी हाऊस’ ही स्थळं नेपथ्यकार प्रसाद वालावलकार, प्रकाशयोजनाकार अमोघ फडके यांनी कौशल्याने उभी केली आहेत. नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्य यांच्या नृत्यरचना अप्रतिमच. अन्य तांत्रिक बाजू नाट्याला पूरक आहेत. नाटकाचा लेखक पुण्याचा तर दिग्दर्शन मुंबईचं, हे सूत्रधाराच्या तोंडी असलेले पालुपद खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतो. गोपाळ मराठे यांनी निर्मितीमूल्यांत जराही कसूर केलेली नाही. नाटकाचे मूळ नाव ‘जोकर’ असं होतं, पण ते बदलून ‘ठरता ठरता ठरेना!’ असं करण्यात आलंय. नावातच सारी काही गंमत असते, हेच खरे!
रामचंद्राच्या ‘स्टॅन्ड अप’ शोमध्ये तसेच मुली दाखविण्याच्या धावत्या प्रसंगातून अनेक कथानके नजरेत भरतात. एवढी त्यात विविधता आहे. नाटक गच्च भरलेले आहे. संहिताकाराचा या विषयावर एखादा प्रबंध सहज होऊ शकेल, एवढं संशोधन, निरिक्षण त्यात दिसतेय. सुन्न करून खिळवून ठेवणारा अनुभवही नाटकातून जरूर मिळतो, पण ते शोकात्मिकेकडे झुकणारं नाही, याचीही पूरेपूर खबरदारी घेण्यात आलीय.
या नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर एका नाटकाची आठवण आली. शिरीष लाटकर यांचे ‘खळी’ हे नाटक, जे काही वर्षापूर्वी ‘नाट्यमंदार’ने रंगभूमीवर आणले होते. त्यातही रखडलेल्या लग्नाचे कथानक गुंफलेले. जोडीदाराबदलच्या अपेक्षांमुळे लग्न न झालेली वधू आहे. स्वतः सुंदर. एकेकाळी कॉलेजची ‘ब्युटी क्वीन’ असणारी ही तरुणी, पण आपल्यापेक्षा जास्त देखणा व सधन नवरा असावा या अपेक्षेमुळे तिचं लग्न रखडलेलं. आता ती प्रौढत्वाकडे झुकलेली. याच नाटकात एक भाऊ-बहीण आहेत. घरच्या जबाबदार्यांमुळे भावाचं लग्न रखडलेलं. कुटुंबप्रमुख म्हणून वावरल्यामुळे स्वतःचं लग्न करण्याची इच्छा संपलेली. तिसरीकडे एका भावाच्या तरुण बहिणीचं लग्न जमविण्यासाठी तिला नटवणं, सजवणं त्याची जबाबदारी बनते. असे हे तिघेजण यांचं लग्न रखडण्याची कारणे वेगळी होती. या नाट्यात विवाहित बहीण भावाच्या लग्नासाठी पळापळ करतेय. ‘स्थळ’ शोधायला मदतच करतेय. पण ‘ठरता ठरता ठरेना’ची गोष्ट त्यातून साकार होतेय.
विवाहाच्या उंबरठ्यावर वर्षानुवर्षे वाट बघणार्या वधू-वरांची समस्या ही खरोखरच जगावेगळी आहे. त्यात भर म्हणजे, शारीरिक व्यंग असणारे ‘वर-वधू’ हे कायम रखडले जातात. मग त्यांची मानसिक कुचंबणा होते. आत्मविश्वास जातो. सतत लग्नाचा विषय सतावतो त्यातून जगापुढे वावरताना दडपण येते आणि तन-मनाचा कोंडमारा होतो. जगण्याची आशा संपते. वयात आल्यावर कुणीही एकाकी राहू शकत नाही. हा निसर्गनियमच आहे. वधूवरांना ओढ लग्नाची, असंच म्हणावं लागेल. अशा लग्नाच्या मंडपात अडकलेल्या रखडलेल्या लग्नाळूंना ऑल द बेस्ट!
ठरता ठरता ठरेना!
लेखन : अक्षय स्मिता श्रीनिवास
दिग्दर्शन : स्वप्नील बारस्कर
संगीत : अभिजीत पेंढारकर
नेपथ्य : प्रसाद वालावलकर
प्रकाश : अमोघ फडके
नृत्ये : मयूर वैद्य
सूत्रधार : नितीन नाईक
निर्माते : गोपाळ मराठे
प्रस्तृती : सरगम क्रिएशन्स