शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नुकताच बुलढाणा जिल्हा दौरा झाला. तिथे महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्यांवर उद्धवजी म्हणाले की, ‘‘उत्तरेतला शेतकरी हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. याच शेतकर्यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वी मोदी सरकारला झुकवले होते. याला म्हणतात जिद्द!’’ पण महाराष्ट्रातील ही जिद्द गेली कुठे? माँसाहेब जिजाऊंनी आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची ऊर्जा, ताकद दिली. आपण हे विसरलो तर काय उपयोग? आपला शेतकरी जर आत्महत्येकडे वळत असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते? आपल्या पूर्वजांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, संघर्षासाठी दाखवलेली जिद्द गेली कुठे?
राज्यकर्त्यांनी न्याय्य तेच करावे. परंतु इथे सर्वत्र अन्यायच दिसतो आहे… कारण आज महाराष्ट्रात सर्वत्र अस्थितरतेचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. आरोग्य यंत्रणाच आयसीयूमध्ये आहे. शेतकर्यांचे प्रश्न दोन वर्षांपूर्वी जे होते तसेच आहेत. भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या नेत्यांना, खासदार व आमदारांना सीबीआय व ईडीचा धाक दाखवून पक्ष सोडण्यास भाग पाडले जात आहे. भाजपात घेऊन त्यांना पावन केले जाते.
बुलढाणा, हिंगोली, नंदूरबारसह काही ठिकाणी अन्नातून विषबाधेची घटना घडल्यावर उपचारासाठी डॉक्टर नव्हते. अशा बातम्या वृत्तपत्रात आल्या होत्या. गेल्या वर्षी ठाण्यात उन्हाच्या तडाख्याने व गर्दीमुळे सदस्यांचे बळी गेले होते याची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले. पण निष्पाप बळींचे काय? महाराष्ट्रातील असंवेदनशील शिंदे-फडणवीस सरकारने आयोजक व कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली नाही, तर उलट कॉन्ट्रॅक्टरला करोडो रुपये देण्यात आले. उलट्या काळजाच्या सरकारकडून यापेक्षा वेगळी काय अपेक्षा करायची! गेल्या वर्षी संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत मृत्यूचे तांडव घडले होते. बुलढाण्यातील विषबाधा झालेल्या रुग्णांवर रस्त्यावर उपचार केले गेले. झाडाच्या फांदीला सलाईन अडकवले होते. या विदारक परिस्थितीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. परंतु सरकार ढिम्म राहिले. पण महाराष्ट्रातील जनतेने या विरोधात आवाज उठवायला हवा होता, तसे घडले नाही. निष्पाप बळी गेलेल्यांसाठी न्याय मागण्याची जिद्द महाराष्ट्राकडून दाखवली गेली नाही.
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या व उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमध्ये दिवसाढवळ्या घरात घुसून पूर्वाश्रमीचे पत्रकार विनय पुणेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नागपुरात गेल्या २४ दिवसात १३ हत्या झाल्याने नागपूरकर हादरले आहेत. गृहमंत्री नागपूरचे असताना नागपूरमध्ये खुलेआम ‘गुंडाराज’ सुरू आहे. २०१४ सालापासून नागपूर हे गुंडांचे आश्रयस्थान बनले आहे.
गेल्या काही वर्षांत देशातील एकूण सहा लाख ८३ हजार कंपन्या बंद झाल्या आहेत. या बंद झालेल्या कंपन्यामधील ९ ते १० कोटी कामगार बेरोजगार झाल्याची माहिती लोकसभेत संबंधित मंत्र्यांनी दिली. यात महाराष्ट्रातील दीड लाखच्या आसपास कंपन्या बंद आहेत. बेरोजगारांची संख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी दोन कोटी नोकर्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली ‘मोदी गॅरंटी’ खोटी ठरली आहे. २०१४मध्ये बाहेरील काळा पैसा देशात आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे वचन मोदींनी दिले होते. पण आजपर्यंत एक दमडीही नागरिकांच्या खात्यात पडली नाही. महागाई कमी करणार, शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकर्यांची कर्जमाफी यासारख्या अनेक घोषणा केल्या पण एकही घोषणा पूर्ण केली नाही.
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. या शहरात ड्रग्जचा काळा धंदा जोरात सुरू आहे. ‘आय.टी. हब’ असलेले पुणे आता ‘ड्रग्जचे हब’ बनत चालले आहे. पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. लाखो कोटींचे ड्रग्ज पकडले गेले आहे. त्याआधी ललित पाटील ड्रग्ज प्रकरण घडले. पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात दिवसा-ढवळ्या गुंड एकमेकांवर गोळीबार करीत आहेत. गँगवारमुळे पुणे बदनाम होत आहे. याची पुणेकर उपमुख्यमंत्र्यांना ना चाड ना चीड आहे.
महाराष्ट्रावर अन्याय करणारे ‘दिल्ली’ हेच केंद्र आहे हे महाराष्ट्राला जेव्हा कळेल तेव्हा खर्या अर्थाने मराठी माणसाचे राज्य महाराष्ट्रावर येणे अशक्य नाही. ती जिद्द महाराष्ट्राने दाखविण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास सांगणारे आपण षंढ झालो आहोत का? इतिहासातील लढण्याची जिद्द पुन्हा दाखवण्याची गरज आहे.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि मग पुढच्या दीडशे वर्षांत महाराष्ट्राने भारतात तलवार गाजविली हा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सकल मराठी जन एकवटला होता. मुंबईसह महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही असा डाव मुंबईतील गुजराती व्यापार्यांनी, धनदांडग्यांनी रचला होता. त्याला अप्रत्यक्षपणे दिल्लीश्वरांचा पाठिंबा होता. तेव्हा मुंबईसह महाराष्ट्रासाठी मुंबईतील कामगार, चाकरमानी, मराठी माणूस एकवटला. महाराष्ट्रातील सामान्य शेतकरीही रस्त्यावर उतरला. मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे असे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाटत नव्हते. परंतु महाराष्ट्रातील जनरेट्यामुळे, प्रखर विरोधामुळे, मराठी माणसांच्या भक्कम एकजुटीमुळे त्यांना विचार बदलायला लागला. मुंबईसह महाराष्ट्रनिर्मितीसाठी जो लढा मराठी माणसांनी एकजुटीने दिला, संघर्ष केला त्याला नवभारताच्या इतिहासात तोड नाही. या लढ्यात १०५ लढवय्ये हुतात्मे झाले. हजारो जखमी झाले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पण मराठी माणसाने एका जिद्दीने मुंबईसह महाराष्ट्र निर्माण केले. पुढे संयुक्त महाराष्ट्र समिती टिकली नाही. मग मुंबईचे मराठीपण शिवसेनेने टिकवले. तेव्हापासून महाराष्ट्राचे हे मराठीपण शिवसेनेने जपले व जपत आहे.
आजही महाराष्ट्राची सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थिती संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापूर्वीसारखीच आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा यांना मुंबई शहराचे महत्त्व कमी करायचे आहे. त्यासाठी मुंबईतील उद्योगधंदे, कारखाने गुजरातला हलवले गेले. महाराष्ट्रात होणारे प्रकल्प गुजरात राज्यात नेले. संयुक्त महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या यशस्वी लढ्यामुळे मुंबई गुजरातला मिळाली नाही. याची सल मोदी-शहा यांच्या मनात आहे. म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी मुंबई-महाराष्ट्राला ओरबाडण्याचे काम जोरात सुरू आहे. मुंबईची आर्थिक रसद तोडून आर्थिक राजधानी असलेले मुंबईचे नाव पुसून अहमदाबादला देशाची आर्थिक राजधानी बनवण्याचा घाट घातला जात आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार आले तर या कामास अधिक गती प्राप्त होणार आहे. याची खूणगाठ मराठी माणसाने ठेवावी. तेव्हा या व्यापारी वृत्तीच्या राजकर्त्यांविरुद्ध लढण्याची जिद्द महाराष्ट्राने दाखवायला हवी. संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉ. एस. ए. डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या लढवय्या नेत्यांचे नेतृत्त्व लाभले होते. तेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आज दिल्लीश्वरांसमोर त्यांच्या महाराष्ट्रद्रोही हुकूमशाहीविरुद्ध लढा देण्यासाठी ६३ वर्षीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे ८३ वर्षीय नेते शरद पवार एका जिद्दीने हाती मशाल घेऊन तुतारी फुंकत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा नपुंसक नाही हे दाखवण्याची वेळ आली आहे.