देशप्रेमानं भरलेले ऐतिहासिक चित्रपट म्हणजे हमखास यश असा समज उराशी बाळगून मागील काही वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित मराठी सिनेमांची लाट आली आहे. रावरंभा हा या ‘शिवराय युनिव्हर्स’च्या यादीतला नवा चित्रपट. इतिहास आणि काल्पनिक कथा यांची सरमिसळ करून एक रंजक कथा इथे मांडण्यात आली आहे.
हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या (शंतनू मोघे) राज्याभिषेकाच्या काळातील आहे. चित्रपटाची सुरुवात रायगडच्या टकमक टोकावर होते. घोडा टकमक टोकाच्या काठावर दोन पायांवर उभा करण्याचे आव्हान आहे. जो मावळा जिंकेल त्यांना महाराजांच्या सैन्यात सामील होण्याची संधी मिळणार आहे. दैवापूरचा रावजी (ओम भुतकर) हे आव्हान अगदी सहजतेने पूर्ण करतो आणि त्याचबरोबर सेनापती सरनोबत प्रतापराव (अशोक समर्थ) यांचा विश्वास जिंकतो. महाराज देखील दुसर्या एका प्रसंगात रावजीच्या प्रतिभेवर खूश होऊन त्याला मानाचं सोन्याचं कडं देऊन आशीर्वाद देतात. रावजी सरनोबतांचा वैयक्तिक अंगरक्षक बनतो. तो गावी परतल्यावर त्याचं उत्साहात स्वागत होतं.
इथे चित्रपटातील प्रेमकथेचा सुरुवात होते. रंभा (मोनालिसा बागल) त्याची आतुरतेने वाट पाहतेय. रावजीला ही रंभा आवडते. याच गावातील जालिंदरची (संतोष जुवेकर) रंभावर वासना आहे आणि पैशासाठी तो स्वराज्याशी गद्दारी करू शकतो. स्वराज्यावर चालून आलेला आदिलशाहीचा सरदार बहलोल खान आणि स्वराज्यद्रोही जालिंदर यांच्या कारस्थानाच्या झंझावातात स्वराज्य आणि प्रेमकथा दोन्ही टिकून राहतात का, याची कहाणी म्हणजे हा चित्रपट.
लेखक प्रताप गंगावणे यांनी या कथेत मोठा पट मांडला आहे. भरपूर पात्रांच्या गर्दीत काही वेळा मूळ प्रेमकथा बाजूला सारली जाते, पण पटकथेतील रंजक वळणं सिनेमात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतात. ‘झाला बोभाटा’, ‘बेभान’ आणि ‘भिरकीट’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक अनुप अशोक जगदाळे यांनी या ऐतिहासिक चित्रपटातही उत्तम कामगिरी केली आहे. हातात धरलेला साप असो की लढाईचे प्रसंग. सिनेमातील व्हीएफएक्सने मात्र घोर निराशा केली आहे. टेलीव्हिजन मालिकेतही हल्ली बरे व्हीएफएक्स असतात. चित्रपटातील शेवटची लढाई लांबली आहे.
ओम भुतकर यांना त्यांच्यावरील ‘मुळशी पॅटर्न’मधील भूमिकेचा छाप पुसण्यात इथे यश मिळालं आहे. मोनालिसा बागल हिने रंभा आत्मविश्वासानं साकारली आहे. प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ यांचा भारावून टाकणारा वावर आणि भारदस्त आवाजाने प्रेक्षक ऐतिहासिक काळात जातो. इतर काही ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज रागीट दिसतात. शंतनू मोघे प्रेमळ तरीही कणखर महाराज साकारताना दिसतात आणि भावतात. किरण माने, अपूर्वा नेमळेकर छोट्या भूमिकेत छाप सोडतात. या सर्वात लक्षात राहतो तो संतोष जुवेकर. डोळ्यात वासना, अंगात लाचारी, कपटी, ढोंगी अशा अनेक मुद्राभिनयाने संतोषने जालिंदर हे पात्र संस्मरणीय केले आहे.
संजय जाधव यांच्या छायांकनामुळे सिनेमा प्रेक्षणीय दिसतो. चित्रपटाचे संगीत श्रवणीय आहे. ‘एक रंभा, एक राव, दोन जीव, एक नाव’ हे गाणं चित्रपट संपल्यावर मनात रुंजी घालतं. एकंदरीत उत्तम अभिनयासाठी आणि इतिहासातील न उलगडलेली प्रेम कहाणी पाहण्यासाठी एकदा रावरंभा पाहायला हरकत नाही.