एकेकाळी मनमोहन देसाई यांचा अमर अकबर अँथनी हा सिनेमा खूपच गाजला होता. त्या काळात त्याला ब्लॉकबस्टर असं नाव दिलं जायचं. आजही त्या सिनेमातील एखादं गाणं लागलं तर जुन्या काळात सहजगत्या मन डोकावून जातं. माझ्या कामाच्या संदर्भात मला एकदा असेच अमर अकबर अँथनी पंधरा-सोळा वर्षांपूर्वी भेटले होते.
पुण्याजवळ दौंड रेल्वे स्टेशन नावाचं एक जंक्शन लागतं. इथे सगळी रेल्वेची वस्ती, म्हणजे रेल्वेशी संबंधित कामे करणार्या लोकांची. या गावी मला एका शाळेत व्याख्यान द्यायला बोलावलं होतं. इयत्ता दहावीची परीक्षा तीन महिन्यांनी होणार होती. पुढे काय शिकायचं? काय करायचं? याची उत्सुकता ताणलेली दोन तुकड्यांतील शंभर सव्वाशे मुले मुली माझ्यासमोर बसली होती. नेहमीप्रमाणे सुमारे तासभर माझे व्याख्यान झाले. दहावीनंतर काय काय करायचं याबद्दलच्या तुमच्या मनातली स्वप्नं, कल्पना, इच्छा तुम्ही बोला आता, अशा स्वरूपात मी प्रश्नोत्तरांसाठी विषय मुलं पालक व शिक्षकांसमोर ठेवला. शहरामध्ये सहसा अशा विषयावर ठरलेले प्रश्न येत असतात. म्हणजे इंजिनियर, डॉक्टर, परदेश, परदेशी भाषा शिक्षण आणि सगळ्यांच आवडतं ते आयटी किंवा कॉम्प्युटर. दौंडमधली मुले काय विचारतात, याची मलाच उत्सुकता होती. आणि मला तिथेच अमर, अकबर, अँथनी पहिल्यांदा भेटले.
रॉबी परेरा यांचा मुलगा रेहान, आमीर मणियार यांचा मुलगा समीर आणि भास्कर मोरे यांचा सोहन अशी तीन मुले माझ्यासमोर पहिल्या रांगेत उत्सुकतेने बसलेली होती. वडिलांच्या पूर्ण नावामुळे अमर अकबर अँथनी म्हणजे काय हे समजले ना! रेहान, समीर व सोहन एवढाच उल्लेख केला तर मात्र दौंडच्या एका शाळेतील तीन चुणचुणीत मुले इतकाच अर्थबोध होतो. हल्लीच्या प्रथेप्रमाणे मुले मुली फक्त स्वतःचं पहिलं नाव सांगतात अन आडनाव वगळतात. खरं तर किती छान आहे नाही ही पद्धत? पण त्यांच्या आई-वडिलांना आणि त्यांच्या आजी आजोबांना आडनावाशिवाय कधीच चैन पडत नाही, हे पण एक वास्तवच. असो.
तर सांगत काय होतो, प्रश्नमाला सुरू झाली. कोणाला काय आवडते? कोणाला काय बनायचे आहे? कोणाला काय शिकायचे आहे? अशा स्वरूपाचे सगळे प्रश्न आणि उत्तरे होती. माझा नेहमीचा अनुभव असा आहे की पहिल्या दोन रांगातील मुले पटापट प्रश्न विचारतात तर मागे बसलेली मुले मान खाली घालून ऐकत राहतात. त्या अनुभवाला धरूनच पहिल्या रांगेत बसलेल्या त्या तिघांनी हात वर केले आणि स्वतःला काय करायचे आहे ते सविस्तर सांगितले.
रेहानला हॉकी आणि फुटबॉल हे दोन खेळ खूप आवडत होते. त्याचे कारणसुद्धा त्यांनी सहजगत्या सांगून टाकले. माझे पप्पा रेल्वेकडून हॉकी खेळलेले उत्तम खेळाडू आहेत. त्यांना हॉकीपटू म्हणूनच रेल्वेत नोकरी पण मिळाली होती. नंतरचे रेहानचे वाक्य मात्र गमतीचे होते. पण त्यांचा आवडता खेळ मात्र फुटबॉलच राहिला आहे. मला मात्र फुटबॉलपटू व्हावेसे वाटते. पंधरा वर्षांपूर्वीच्या त्या काळात फुटबॉल हा महाराष्ट्रात फारसा प्रसिद्ध नव्हता. तरीही रेहानने दिलेले हे सविस्तर स्पष्टीकरण खूपच बोलके होते.
आता नंबर होता समीरचा. त्याचे वडील आमीर मणियार हे दौंडच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होते. शाळा संपल्यानंतर आयटीआयचा कोर्स करून ते नोकरीला लागले. वयाच्या १८व्या वर्षापासून नोकरीला लागल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांची छान जोड त्यांच्याकडे होती. समीरने सांगितले, त्याला जग फिरायला आवडेल पण स्वतःच्या पैशाने. त्यासाठी काय करायला लागेल, काय शिकायला लागेल, असा त्याचा मला थेट उलटा प्रश्न होता. स्वतःच्या पैशाने मला काम करायला आणि जग फिरायला आवडेल, असं सांगणारा दहावीचा मुलगा फार क्वचित भेटतो. त्यामुळे मला समीरचे कौतुक वाटले. तुझ्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देतो म्हणून मी सोहनकडे वळलो.
सोहननी प्रथम स्वतःच्या अभ्यासाबद्दल मला थोडक्यात सांगितले, ज्याचा उल्लेख रेहान आणि समीर यांनी अजिबातच केला नव्हता. सोहनच्या शब्दात सांगायचं तर त्याला ७० टक्क्यांपेक्षा कमी मार्क कधीच नव्हते, पण ७५ टक्क्यांपेक्षा जास्तही कधी पडले नव्हते. खरं तर प्रामाणिकपणे हे सगळं सांगणारा या वयातला मुलगा शोधावा लागतो. पण यापुढे जाऊन सोहनने सांगितलेली त्याची अपेक्षा मात्र चक्रावून टाकणारी होती. मला दौंड जंक्शनचा स्टेशन मास्तर व्हायला आवडेल आणि जमलं तर पुणे किंवा सोलापूरचा स्टेशन मास्तर म्हणून काम करायला मला अभिमान वाटेल. सर्वच लहान मुले रेल्वे इंजीनचा ड्रायव्हर व्हायचे आहे असे सांगतात. पण सोहनसारखे बोलणारा मुलगा मला आजवरच काय, नंतरही भेटलेला नाही. साहजिकच सोहनला मी विचारले, तुझे बाबा काय करतात? तो म्हणाला, माझ्या बाबांचा दौंड स्टेशनवर पुस्तकाचा स्टॉल आहे. त्यापुढे जाऊन तो म्हणाला, ‘मलासुद्धा पुस्तके वाचण्याचे खूप वेड आहे. बाबा सुद्धा पुस्तके मागवताना मला नेहमीच विचारतात तुला काही हवे का?’ हा सारा मला चक्रावून टाकणारा, पण मनापासून आनंद देणारा प्रकार होता.
‘मार्मिक’च्या वाचकांची आता उत्सुकता वाढून या तिघांना मी काय सांगितले याचे उत्तर हवे असेल, त्याकडेच आता येतो.
भरपूर फुटबॉल खेळत पण रोज दोन तास अभ्यास करत रेहानने प्रथम बारावी संपवावी. त्या दरम्य्ाान त्याने अंडर नाइन्टीन या गटामध्ये प्रथम जिल्हा, मग महाराष्ट्र व त्यानंतर क्लब पातळीवर फुटबॉल खेळण्याचे उद्दिष्ट मनाशी ठेवावे. हे शक्य झाले तर फुटबॉलमधील त्याची करिअर सुरू होऊ शकते. फुटबॉलमधील करिअर करायची असेल तर क्लबसाठी फुटबॉल खेळताना बहि:स्थ रीतीने कला शाखेतील पदवी घेता येणे शक्य होते. एकीकडे पदवी व दुसरीकडे खेळाडू अशा दोन्हीमुळे त्याला नोकरी मिळण्याची खात्री निर्माण होते. सरकारी, निम-सरकारी वा कॉर्पोरेशन अशा आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवलेल्या असतात.
समीरसाठीचा सल्ला थोडा वेगळा होता. त्याने प्रथम बारावी कॉमर्स चांगल्या मार्काने पूर्ण करावे, असे त्याला सांगितले. त्यानंतर ट्रॅव्हल अँड टुरिझममधला पदवीचा अभ्यासक्रम किंवा कॉमर्समधील पदवी व खासगी ट्रॅव्हल अँड टूर्सचा अभ्यासक्रम करून त्यात नोकरीची शक्यता नक्की. फ्रंट ऑफिस, टूर असिस्टंट, टूर गाईड व काही वर्षांनी टूर मॅनेजर बनल्यावर तुझे स्वतःच्या पैशाने जग पाहण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल, याची खात्री बाळग असेही त्याला सांगितले.
सोहन हे सगळं उत्सुकतेने ऐकत होता, पण त्याच्यासाठीचा कोणताच मार्ग यामध्ये त्याला सापडला नव्हता. त्याची उत्सुकता ताणली गेली होती. सोहानला सांगितले की तुझे मार्क चांगलेच आहेत. ते कमी आहेत हे पहिल्यांदा मनातून काढून टाक. मार्क आणि अभ्यास यापेक्षा तुला जरा वेगळ्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी शब्दसंपत्ती वाढवणे व त्यावर आधारित विचारलेल्या उतार्यांची तर्वेâविचारक्षमता वापरून उत्तरे देणे यासाठीची तयारी करायची आहे. स्पर्धा परीक्षांची पुस्तके रोज अर्धा तास वाचायला तू सुरुवात करावीस. एकीकडे कला शाखेची किंवा हवी असल्यास कॉमर्सची ७० टक्के मार्काची पदवी हे तुझे ध्येय ठेव. तोंडी आकडेमोड, पाढे, काळ काम वेगाची गणिते सोडवायची सततची सवय ठेव. रेल्वे बोर्ड दरवर्षी नियमितपणे तिकीट तपासणी, स्टेशन मास्तर, गार्ड अशा पदांसाठी परीक्षा घेत असते. या सर्व परीक्षा तू दे. ज्यातून प्रथम नोकरी मिळेल ती स्वीकारावी. पुन्हा स्टेशन मास्तर पदासाठीच्या परीक्षांना प्रयत्न करायला हरकत नाही. प्रथम प्रयत्नात स्टेशन मास्तरची परीक्षा पास झालास तर फारच छान. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव. या परीक्षांना मराठी मुले-मुली फारशा मोठ्या संख्येने बसत नाहीत. तुझी खरी स्पर्धा अखिल भारतीय पातळीवरच्या अन्य उमेदवारांशी आहे. पाच ते सहा वर्षे पदवी घेताना व त्यानंतरची दोन-तीन वर्षे प्रयत्न केल्यावर तुला यश नक्की मिळेल. हे सगळं सांगून झाल्यावर माझा दौंडचा कार्यक्रम संपला.
मी परत कामाला लागलो. सुमारे पंधरा-सोळा वर्षाचा काळही पाहता पाहता पुढे गेला. एखादा कार्यक्रम झाल्यानंतर त्यात भेटलेल्या व्यक्तींकडून फीडबॅक मिळण्याची शक्यता तशी फारशी नसतेच. हा अनुभव कायमचाच. खरं सांगायचं तर दौंडला भेटलेले अमर, अकबर, अँथनी अर्थात रेहान परेरा, समीर मणियार, सोहन मोरे हे आता विस्मरणात गेलेले होते.
माझा एक मित्र नुकताच युरोपची दूर करून परत आलेला होता. पंधरा दिवसांच्या टूरमधील त्याच्या गाईडबद्दल तो अतिशय कौतुकाने आठवण काढून मला माहिती देत होता. किती छान व्यवस्था होती, यापेक्षा गाईडने कशी नेमकी छान माहिती दिली याचे त्याला खूप कौतुक वाटत होते. या सगळ्या सांगण्याला मित्राची पत्नीसुद्धा सहजगत्या दुजोरा देत होती व तीही कौतुक करत होती. शेवटची आणि गमतीची गोष्ट म्हणजे हा गाईड दौंडसारख्या अगदी छोट्या गावातून इथपर्यंत पोचून युरोप दाखवण्यापर्यंत तय्यार झाला आहे हे मित्राच्या तोंडून आले आणि मी उत्स्फूर्तपणे त्याला प्रश्न विचारला, समीर नाव होते का त्याचे? आता चकित होण्याची मित्राची वेळ होती. ‘तुला कसे माहिती त्याचे नाव? तू तर काही युरोपला गेलेला नाहीस आणि दौंडला जाण्याचे कारणही नाही.’ मी फक्त हसलो आणि मित्राला सांगितले समीरचा नंबर तुझ्याकडे असला तर त्याला सांग आपण दोघे मित्र आहोत. बाकी सगळे तोच तुला सांगेल.
असाच एक दिवस पेपरमधील क्रीडा क्षेत्रातील बातम्या वाचताना रेहानचे नाव वाचायला मिळाले. एका फुटबॉल क्लबचा कॅप्टन म्हणून तो खेळत होता. अर्थातच त्याचीही सुंदर करिअर सुरू झालेली होती. फुटबॉलचे विविध क्लब खेळाडूंना भली मोठी बिदागी देऊन करार करतात. त्यातील सर्वोच्च स्थानी तो पोचला होता.
याच सुमारास ट्रिपकरता म्हणून मी कर्नाटकात निघालो होतो. सकाळी एका स्टेशनवर गाडी थांबली. नाश्ता करायला काय मिळते आहे म्हणून मी शोधत असताना मागून हाक आली. ‘गीत सर काय शोधताय?’ चेहरा ओळखीचा वाटत होता, पण नाव काही आठवेना. अंगावर मात्र स्टेशन मास्तरचा ड्रेस होता. प्रसन्नपणे हसत त्यांनी सांगितले ‘मी दौंडचा सोहन, आठवते का सर तुम्हाला?’
अकबर माझ्या मित्राला भेटला होता. अँथनी पेपरमध्ये गाजत होता. आणि अमर मला भलत्याच रेल्वे स्टेशनवर समोर ओळख देऊन हसत होता.
तात्पर्य : अभ्यास व मार्क यापेक्षा नेमकी व आवडीची दिशा महत्त्वाची. आवड असेल तर प्रगतीला वेग येतो करिअर उत्तम होते. स्पर्धा प्रत्येकच क्षेत्रात असते. रेहानला फुटबॉलमध्ये, समीरला टूर गाईडचे काम करताना युरोपमध्ये तर सोहनला स्टेशन मास्तरच्या परीक्षेसाठी स्पर्धेला तोंड द्यावेच लागले. पण तिघांचीही पदवीदरम्यान त्याची तयारी झाली होती. अर्थातच यश चालत आले.