मुंबई ठाण्यासह सभोवतालच्या परिसरात सीमा आंदोलनाचे लोण पसरले. मराठी माणसाच्या अस्मितेला डंख मारल्यानंतर तो चवताळून उठला आणि शिवसेनेच्या आंदोलनाने ऊग्र रूप धारण केले.
दिवसा मोरारजी देसाई यांची गाडी अडवली त्याच रात्री उशिरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे नेते सर्वश्री दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशी यांना पोलिसांनी अटक केली. या तिघांनाही ९ फेब्रुवारी १९६९ रोजी पहाटे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नेण्यात आले. प्रचंड पोलीस बंदोबस्तात आणि नेहमीचे सर्व मार्ग टाळून या तिघांनाही पहाटेच्या सुमारास पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. केवळ या तीन नेत्यांनाच अटक केली होती असे नाही, शेकडो शिवसैनिकांना पकडून वेगवेगळ्या तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यात सुधीर जोशी आणि शिवसेनेचे अन्य नेतेसुद्धा होते. मुंबईच्या दंगलीचा वृत्तांत कानावर येत होता आणि ही दंगल आटोक्यात येईल असे वाटत नव्हते.
आपल्या नेत्यांना अटक झाली ही बातमी वार्यासारखी शहरभर पसरली आणि काहीशी आटोक्यात आल्यासारखी वाटणारी दंगल पुन्हा उसळली. आगीवर जमलेली राख दूर झाल्यावर वन्ही जसा चेतवला जातो, त्यातलाच हा प्रकार होता. जनता कमालीची क्षुब्ध झाली आणि पुन्हा हिंसाचार सुरू झाला. वरळीचा सेंच्युरी बझार उद्ध्वस्त झाला. माहीममध्ये तर रेल्वे स्थानक धोक्यात आले होते. मुंबईतला दादर भाग बहुतांशी बेचिराख झाला होता. ठाण्याचे नगरसेवक माधव वाघ यांनी पोलिसांच्या निषेधार्थ मोर्चा आयोजित केला होता. पण त्यावर बंदी घातली गेली.
दरम्यान, प्रजासमाजवादी पक्षाचे नेते खासदार बॅ. नाथ पै यांनी शिवसेनाप्रमुखांची तुरुंगात भेट घेतली. मुंबईतील दंगलीत झालेली प्राणहानी आणि वित्तहानीबद्दल आपणास दुःख होत असल्याचे बाळासाहेबांनी सांगितले. ‘कोणतीही चळवळ शांततेने चालावी अशी माझी इच्छा असते आणि प्रयत्न असतो,’ असे बाळासाहेब म्हणाले. या दंगलीच्या वेळी मला अटक करण्यात आल्याने लोकांना शांत राखण्याची संधी मला मिळाली नाही. मी बाहेर असतो तर मुंबईचे एवढे नुकसान झाले नसते, असे ते म्हणाले. लोकशाही मार्गाने चाललेले हे सीमाप्रश्नाचे आंदोलन भरकटू नये, समाजकंटकांच्या ताब्यात जाऊ नये, मुंबईत शांतता राहावी म्हणून शिवसेनाप्रमुखांनी ताबडतोब शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश तुरुंगातून काढले. त्यामध्ये शिवसैनिकांना उद्देशून म्हटले होते की, ‘कोणत्याही परिस्थितीत आपल्या लढ्याचा फायदा कम्युनिस्टांना उठवू देऊ नका.’ ११ तारखेला जे आकडे प्रसिद्ध झाले ते मृतांची संख्या ४० आणि जखमींची १५० असे होते. इंदिरा गांधी यांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना सूचना दिल्या की लष्कर किंवा केंद्रीय राखीव पोलीस दल बोलावून दंगल शमवावी. परंतु त्याची जरूरी पडली नाही. वणवा विझला. शिवसेनाप्रमुखांचे शांततेचे आवाहन हेच त्याचे कारण होते. दादरमध्ये तर ट्रान्सफर सीनच दिसला. दुपारनंतर आश्चर्यच झाले. हळूहळू दुकानदारांनी दुकाने उघडली. लोकांच्या जीवनावश्यक खरेदीसाठी रांगा लागल्या, पण विशेष म्हणजे रस्ते साफ करण्यात शिवसैनिकच आघाडीवर होते. रस्ते साफ करण्याचे आदेश शिवसेनेच्या फलकांवर दिसू लागले. सुमारे चार-पाच दिवस पेटत राहिलेली मुंबई विझली आणि नागरिकांनी शांततेचा निःश्वास टाकला. एकूण ६९जण या सीमा आंदोलनात हुतात्मे झाले.
जवळजवळ दोन महिने तुरुंगात असलेले दत्ताजी साळवी यांची १० एप्रिल १९६९ रोजी तुरुंगातून सुटका झाली. सिकंदराबाद एक्सप्रेसने ते मुंबईत आले. दादर स्टेशनवर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आपल्याला झालेला तुरुंगवास हा घोर अन्याय होता असे ते म्हणाले. ताबडतोब शिवाजी पार्कवर दत्ताजी साळवी यांची जाहीर सभा झाली. या सभेत दत्ताजींनी बाळासाहेब आणि मनोहर जोशी यांची त्वरित सुटका करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली. त्यांच्याबरोबर उपस्थित असणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते बापूसाहेब लाड यांनी ‘भगव्या झेंड्यापुढे लाल झेंडा नतमस्तक आहे,’ असे गौरवोद्गार काढले. त्याचप्रमाणे ‘आलमगीर’चे माजी संपादक चं. वि. बावडेकर यांचेही शिवसेनेच्या सीमा लढ्याला पाठिंबा देणारे भाषण झाले.
तब्बल ७६ दिवसांनी २५ एप्रिल १९६९ रोजी बाळासाहेबांची सुटका झाली. शिवसेनाप्रमुखांच्या सुटकेनंतर मराठी माणसाचे मन उचंबळून आले. शिवसेनेची अत्यंत विराट सभा शिवतीर्थावर झाली. त्या सभेत बोलताना सर्वच नेते भावनाप्रधान झाले. शिवसेना नेते प्रमोद नवलकर म्हणाले, ‘तीन आठवड्यांपूर्वी आपण व्यथित होतो. बाळासाहेबांच्या अटकेचा अडीच महिन्यांचा काळ शिवसेनेला अग्निदिव्याचा गेला. पण त्यांची स्थानबद्धता शिवसेनेला वरदान ठरली. पुन्हा दुप्पट जोमाने मराठी मन उफाळून आल्याचे प्रत्यंतर समोर जमलेला लाखोंचा समुदायच देत आहे.’ प्रि. मनोहर जोशी यांनी भाषणात नेत्यांच्या स्थानबद्धतेच्या काळात शिवसेनेवर शिंतोडे उडवणार्यांचा सपाटून समाचार घेतला. दत्ताजी साळवी भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले, ‘‘शिवाजी पार्कची अवस्था आज ‘विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी’ अशी झाली आहे. आज आमचा चालता बोलता विठोबा इथे आला आहे. तो फार कडकडीत बोलतो. त्याच्या बोलण्याने दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतची सिंहासनं हादरतात. सरकारने अन्याय केला. पण न्यायदेवतेने न्याय दिला. आम्ही कुणाच्या मेहरबानीने सुटलो नाही. राज्यकर्ते अन्यायी असले तरी न्यायालयात न्यायदेवता आहे.’’ त्यांनी शिवसेनेच्या टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, या मुंबईत जे हत्याकांड झालं त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस कमिशनर इमॅन्युएल मोडक आहेत. त्याने दडपशाहीचा कठोर दंडुका वापरला. बाळासाहेब म्हणाले, ‘बेळगाव कारवारचा प्रश्न आम्ही रस्त्यावर येऊन सोडवू असं मी म्हटलं, असा पोलिसांचा दावा आहे. रस्त्यावर येणं याचा अर्थ म्हणजे दंगलच हा कुठच्या शहाण्याने अर्थ लावला हो? निदर्शनं काय घरात बसून करायची? मोर्चे काय बाथरूममध्ये काढायचे? या गोष्टी कोठे करतात? या गोष्टी करण्यासाठी रस्त्यावर यावंच लागतं तेच आम्ही केले.
सहा तपांपूर्वी ‘बाळ’ गंगाधर टिळक यांनी साम्राज्यशाहीच्या निषेधार्थ सिंह ‘केसरी’ ही निशाणी घेऊन आवाज उठवला होता, तर आता दुसर्या ‘बाळ’ ठाकरे यांनी मराठी माणसांवर होणार्या अन्यायाच्या विरोधात ‘वाघ’ ही निशाणी घेऊन मुंबापुरी पेटवली होती. वसंतराव नाईकांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले, पण जनतेने त्याला धूप घातले नाही. शेवटी बाळासाहेबांकडूनच निवेदन घेऊन शांततेचे आवाहन करण्यात आले. धुमसत असलेली मुंबई पुन्हा ताळ्यावर आली. लष्करालाही पाचारण करण्यात आले होते. सरकार मुंबईतील दंगल, जाळपोळ, हिंसाचार, लुटालूट थांबवण्यात पूर्णतया अयशस्वी ठरल्याने शेकापचे कृष्णराव धुळूप, जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी, कम्युनिस्टांचे बी. डी. किल्लेदार यांनी सरकारच्या विरोधात पावसाळी अधिवेशनात अविश्वासाचा ठराव आणला होता. शिवसेनाप्रमुख तब्बल ७६ दिवस तुरुंगात होते. ‘आम्ही सीमा प्रश्न लढ्यासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्यात, तुरुंगवास भोगला,’ अशा हाकाट्या पिटणार्या इतर राजकीय नेत्यांपेक्षा शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना नेत्यांनी जास्त काळ तुरुंगवास भोगला. याची जाणीव सीमावासीयांना आणि महाराष्ट्राला आहे. ‘मार्मिक’मध्ये सौ. मीनाताईंना वेळोवेळी बाळासाहेबांनी पाठविलेली पत्रे ‘गजाआडचे दिवस’ या मथळ्याखाली प्रसिद्ध होत होती. शिवसेनाप्रमुखांनी कारागृहातील ७६ दिवसांच्या वास्तव्यावर या पाठविलेल्या पत्रांचे पुस्तकात रुपांतर झाले. नंतर मुंबईच्या परचुरे प्रकाशनने ‘गजाआडचे दिवस’ हे पुस्तक प्रसिद्ध केले.
शिवसेनेच्या सीमा भागाच्या या तीव्र आंदोलनामुळे सीमा प्रश्नाला फार मोठी गती मिळाली. शिवसेनाप्रमुखांनी हा प्रश्न सोडून दिला नाही. वेगवेगळ्या प्रकारची चळवळ सीमा भाग महाराष्ट्रात येण्यासाठी सुरू राहिली. शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेने सीमाप्रश्न सुटेपर्यंत सतत प्रयत्न करण्याचे बेळगावच्या जनतेला अभिवादन दिले. १९६९चे वर्ष हे खर्या अर्थाने सीमाप्रश्नाला गती देणारे वर्ष ठरले.