बेपत्ता झालेल्या योगिताचा पत्ता लागत नव्हता. मोबाईल स्विच ऑफ होता. दरम्यान, याच भागात राहणारा आणखी एक तरूण दोन दिवस घरी आला नसल्याचं समजलं आणि पोलिस चक्रावले. आता या दोघांनाही शोधून काढण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. या दोघांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याचाही शोध घ्यायचा होता. सगळी यंत्रणा त्या दृष्टीने कामाला लागली.
– – –
शहराच्या विशालनगर भागात राहणारी योगिता वाडेकर ही तरूण मुलगी अचानक बेपत्ता झाली आणि घरच्यांची झोप उडाली. आईवडिलांनी तिला शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं. तिच्या सगळ्या मैत्रिणींकडे चौकशी केली, नातेवाईकांना फोन झाले, पण योगिताबद्दल कुणालाच काही माहीत नव्हतं. संध्याकाळी क्लासला जाते म्हणून ती बाहेर पडली, ती आलीच नाही. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केल्यानंतर `कुठेतरी अडकली असेल, फोन बंद पडला असेल,` असं सांगून वडिलांनी आईची समजूत काढली खरी, पण त्यांच्याही मनात वेगळी भीती होतीच.
सकाळ झाली आणि योगिताचे वडील परशुराम यांनी पोलिस स्टेशन गाठलं. इन्स्पेक्टर मिरजकरांनी त्यांना केबिनमध्ये बोलावून घेतलं, धीर दिला, “घाबरू नका, आपण तुमच्या मुलीला शोधून काढू.“
त्यांच्या शब्दांनी वाडेकरांना किंचित दिलासा मिळाला.
“साहेब, अशी न सांगता कुठे राहत नाही हो ती. रात्रभर ती घरी आली नाही, त्या अर्थी काही…“ वाडेकरांना आता अश्रू आवरत नव्हते.
“मी सगळी यंत्रणा कामाला लावतो, तिला लवकरच शोधून काढू.“ त्यांचे आश्वासक शब्द पुन्हा वाडेकरांच्या कानावर पडले.
मिरजकरांनी आता योगिताबद्दल आणखी माहिती घ्यायला सुरुवात केली. हल्ली काही दिवस योगिता गप्प गप्प होती, हे मात्र वाडेकरांनी आवर्जून सांगितलं.
“त्याचं कारण तिला विचारलं होतं साहेब, पण तिनं कधी स्पष्टपणे सांगितलं नाही,“ वाडेकर कसंबसं स्वतःला सावरत म्हणाले.
मिरजकरांना अशा केस काही नवीन नव्हत्या. नशेच्या किंवा तारुण्याच्या धुंदीत ही मुलं कुठल्याही थराला जातात, कधी भरकटतात, कधी आत्महत्या करतात, कधी त्यांचा घात केला जातो, अशा शक्यताही त्यांच्या डोक्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र ते तसं काहीच बोलू शकले नाहीत. वाडेकरांना घरी पाठवून त्यांनी तपास यंत्रणा कामाला लावली. योगिताच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करायला सांगण्यात आलं. पोलिस कंट्रोल रूमला वर्दी दिली गेली.
पोलिसांनी भरपूर मेहनत घेतली, तरी योगिताचा चटकन पत्ता लागत नव्हता. मोबाईल स्विच ऑफ होता आणि लोकेशन ट्रेस व्हायला वेळ लागत होता. दरम्यान, विशालनगर भागात अचानक एक वेगळीच बातमी समोर आली, त्याने गोंधळ आणखी वाढला. याच भागात राहणारा विराज काणेकर हा तरूणही बेपत्ता झाला होता. योगिताच्या घरी चौकशीला आलेल्या पोलिसांच्या कानावर ही खबर गेली आणि त्यांची उत्सुकता वाढली. त्यांनी विराजच्या आईवडिलांनाच चौकशीला बोलावलं.
“तुमचा मुलगा दोन दिवस घरी आलेला नाही, ही खबर खरी आहे?“ मिरजकरांनी दरडावून विचारलं. विराजचे आईबाबा नुसतेच एकमेकांकडे बघत राहिले. आता मात्र मिरजकरांनी आणखी आवाज वाढवला, तेव्हा वडील बोलते झाले.
“हो साहेब, तो दोन दिवस घरी आलेला नाही.“
“घरी आलेला नाही म्हणजे? तुम्हाला त्याची काहीच काळजी नाही? आत्ता मी विचारल्यावर हे सांगताय? पोलिस कंप्लेंट केली होती का?“
“नाही साहेब.“ विराजची आई म्हणाली आणि मिरजकर आणखी चक्रावले.
“अहो, दोन दिवस तुमचा मुलगा गायब आहे आणि तुम्ही पोलिस कंप्लेंटही केली नाही म्हणता. एवढ्या थंडपणे कसं काय सांगू शकता तुम्ही? कुठे गेलाय तो? काही कल्पना आहे का?“
“नाही.“
“त्याचा काही निरोप? घरात तुमच्याशी काही भांडण झालं होतं का?“
“नाही, तसं हल्ली काही भांडण झालं नव्हतं.“
आता मात्र मिरजकरांचा संयम संपत चालला होता. भांडणही झालं नाही म्हणतात, दोन दिवस मुलगा गायब आहे तरी यांनी पोलिसांत तक्रार दिलेली नाही, आत्ताही यांच्या चेहर्यावर खूप अस्वस्थता आहे, असंही काही नाही… सगळंच समजण्यापलीकडचं होतं.
“तुमच्या मुलानं काही गुन्हा केलाय का? तो लपवण्यासाठी हा आटापिटा चाललाय का?“ मिरजकरांनी आता थेटच विचारलं आणि आईबाबांचे चेहरे जरा गंभीर झाले.
“साहेब, आत्ता त्यानं नेमकं काय केलंय आम्हाला माहीत नाही. पण गेले काही दिवस तो वाईट मुलांच्या संगतीत आहे. आम्हाला काही विचारत नाही, घरात काही सांगत नाही. उलट काही विचारलं तर उलट उत्तरं देतो. घरातून जबरदस्तीने पैसे नेतो. काही व्यसनंही लावून घेतली आहेत. घरातून चार चार दिवस गायब असतो, कधीतरी अचानक येतो, आत्ताही तो तसाच कुठेतरी गेला असेल, असं समजून आम्ही तक्रार दिली नव्हती,“ विराजच्या वडिलांनी हा खुलासा केल्यावर मात्र मिरजकरांना सगळ्या परिस्थितीचा अंदाज आला.
विराज मित्रांच्या नादाला लागून वाया गेलेला होता. आसपास गुंडगिरीही करत फिरायचा. कधी कुणाकडून जबरदस्तीने पैसे वसूल केले, कुणाशी मारामारी केली, दमदाटी केली, अशाही तक्रारी यायच्या. त्याचे आईवडील लोकांच्या हातापाया पडून ह्या तक्रारी मिटवायचे. विराजला समजावण्याचा प्रयत्नही करायचे, पण त्याने काहीच फरक पडत नव्हता. त्याचं वागणं दिवसेंदिवस बिघडतच चाललं होतं.
एकाच भागातल्या दोन व्यक्ती साधारण एकाच काळात गायब होणं ही काही चांगली गोष्ट नव्हती. पोलिसांसाठी या दोन्ही केस म्हणजे आव्हान होतं. या दोन्ही घटनांचा काही परस्परसंबंध असावा का, असाही विचार एकदा मिरजकरांच्या मनात येऊन गेला. अर्थात, याबद्दल ठोसपणे काहीच सांगता येत नव्हतं.
योगिताच्या मोबाईलचं लोकेशन सापडलं आणि पोलिसांची टीम योगिताच्या वडिलांना, वाडेकरांना घेऊनच त्या भागात गेली. त्या बिल्डिंगमध्ये शिरल्यावर वाडेकरांच्या चेहर्यावरचे भाव बदलल्याचं मिरजकरांना लगेच लक्षात आलं.
“याच बिल्डिंगमध्ये राहणारा एक मुलगा आमच्या योगिताच्या मागे लागला होता, साहेब. खूप त्रास देत होता तिला,“ त्यांनी सांगितलं आणि मिरजकरांना त्यांच्या अस्वस्थतेचं कारण समजलं. मोबाईलचं लोकेशन त्याच बिल्डिंगमध्ये दाखवत होतं, त्यामुळे सगळ्यात आधी पोलिसांनी वाडेकरांनी सांगितलेल्या त्या मुलाच्या फ्लॅटमध्येच चौकशी करायचं ठरवलं.
कुणाल नावाचा योगिताचा हा मित्र घरीच होता. दारात पोलिस आलेले बघून त्याला जरा आश्चर्य वाटलं. घरातल्यांनीही पोलिसांना सहकार्य केलं. वाडेकरांना कुणालचा चेहरा बघायचा नव्हता, त्यामुळे घरात यायचं त्यांनी टाळलं. मिरजकरांनी मात्र त्याच्याकडे चौकशीला सुरुवात केली. योगिताचा मोबाईल आपल्याच घरी असल्याचं त्यानं सरळ सांगून टाकलं.
ती घरी भेटायला आली होती, तेव्हा मोबाईल तिथेच विसरून गेली, हेही त्यानं सांगितलं. त्याचे आईवडील योगिताला ओळखत होते, पण तिच्या मोबाईलबद्दल मात्र त्यांना कल्पना नव्हती. ते कुणालकडून त्यांनाही आत्ताच समजत होतं. एकूणच ह्या प्रकरणातला गुंता वाढत चालला होता.
“तिचा मोबाईल तुझ्याकडे राहिला, तर तू तिला तो परत नेऊन का दिला नाहीस?“ मिरजकरांनी जरा रागानंच विचारलं.
“सर, तिच्या घरातल्यांना मी आवडत नाही. तिच्या वडिलांनी एकदोनदा मला तसं बोलूनही दाखवलं होतं. म्हणून मला वाटलं, की योगिता परत येईल मोबाईल न्यायला. तिच्याकडे कदाचित दुसरा फोन असेल, तो ती वापरत असेल,“ कुणालनं खुलासा केला, पण त्यावर मिरजकरांचा चटकन विश्वास बसला नाही. काहीतरी गडबड आहे, हा मुलगा सगळं स्पष्ट सांगत नाहीये, हे त्यांच्या लक्षात आलं.
योगिता आणि कुणालची वाढत असलेली मैत्री वाडेकरांना अजिबात पसंत नव्हती. त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली, तेव्हा त्यांनी कुणालपाशी खूप बडबड करून त्याचा अपमान केला होता. पुन्हा योगिताशी संपर्क ठेवायचा नाही, असा दमही दिला होता. तरीही त्यांच्या भेटीगाठी सुरूच होत्या, हेही मिरजकरांना लक्षात आलं.
गरज लागली तर तुला पोलिस स्टेशनला चौकशीला यावं लागेल, असं त्यांनी कुणालला स्पष्टपणे सांगितलं. योगिताचा मोबाईलही ताब्यात घेतला.
योगिताचा शोध घेणं आता सोपं होईल, असं वाटत असतानाच त्याच दिवशी संध्याकाळी वाडेकरांनाचा पोलिस स्टेशनमध्ये फोन आला.
“आमची मुलगी सुखरूप परत आलेय, साहेब!“ वाडेकरांनी अतिशय उत्साहाने बातमी दिली आणि मिरजकरांनाही आश्चर्य वाटलं.
योगिता आपणहून घरी आली होती. अर्थातच नॉर्मल नव्हती, थोडी थकलेली, अस्वस्थ वाटत होती. मात्र दोन दिवस आपण कुठे होते, हे काही केल्या सांगत नव्हती. ती घरी परत आली, याचाच वाडेकरांना आनंद होता. आता त्यांना त्यांची तक्रार मागे घ्यायची होती. ती कुठे गेली, का गेली, घरी का कळवलं नाही वगैरे प्रश्नांच्या खोलात त्यांना शिरायचं नव्हतं. त्यांनी तसं पोलिसांना स्पष्टपणे कळवून टाकलं. पोलिसांच्या दृष्टीने एक केस बंद झाली होती. मात्र, तरीही मिरजकरांच्या मनातले प्रश्न काही संपले नव्हते. प्रकरणाच्या मुळाशी जायची त्यांना सवय होती आणि यातलं जे काही गूढ आहे, ते शोधून काढायचं त्यांचं नक्की होतं.
दुसर्याच दिवशी आणखी एक बातमी येऊन धडकली. शहराच्या बाहेर एका नदीच्या काठावर एक प्रेत सापडलं होतं. त्याच्या वर्णनावरून तो तरूण माणूस असावा, हे लक्षात येत होतं. पंचनामा, पोस्ट मार्टेमसाठी ते पाठवणं वगैरे सोपस्कार पोलिसांनी पाडले होते. तरुणाच्या वर्णनावरून आणि त्याच्याकडे मिळालेल्या वस्तूंवरून मिरजकरांना जो संशय येत होता, तो खरा ठरला. हा तरुण म्हणजे विशालनगरमधून गायब झालेला विराज काणेकर हाच होता. योगिता सुखरूप परत आली होती, पण विराज मात्र कधीच परत येणार नव्हता.
एकाच भागातील असण्यापलीकडे या दोघांच्या केसमध्ये काही परस्परसंबंध नाही, असंच वाटू शकलं असतं, पण मिरजकरांना पहिल्यापासून त्यात काहीतरी जाणवत होतं आणि त्या दृष्टीने त्यांचा तपासही सुरू होता. योगिताचे कॉल रेकॉर्ड्स हाती आले होते. कुणालकडे ती त्या दिवशी का गेली, याबद्दलही निश्चित काहीच समजलं नव्हतं. मात्र, त्या दिवशी आणि त्याच्या आधीही ती त्याच्या संपर्कात होती, हे रेकॉर्डवरून स्पष्ट होत होतं. आणखी एका नंबरवरून तिला अधूनमधून कॉल्स येत होते, हेही दिसलं आणि त्या नंबरची चौकशी केल्यावर तो विराजचा आहे, हेही लक्षात आलं. आता मात्र मिरजकरांच्या डोक्यात काही गोष्टींची लिंक स्पष्टपणे लागायला लागली होती.
विराजच्या मृतदेहावर झटापटीच्या काही खुणा होत्या. पोलिसांनी त्याच्या जवळच्या सगळ्यांच्याच केसांचे आणि रक्ताचे नमुने तपासण्यासाठी घेतले होते. योगितालाही त्यांनी नमुने द्यायला लावले. त्यासाठी विरोध झाला, पण पोलिसांनी तिकडे फार लक्ष दिलं नाही.
विराज ज्या दिवसापासून गायब झाला, त्याच दिवशी त्याचं, योगिता आणि कुणाल यांचंही लोकेशन एकच होतं, हेही पोलिसांना रिपोर्ट्समध्ये सापडलं आणि मिरजकरांच्या डोक्यातला संशय पक्का झाला. त्यांनी योगिताला चौकशीसाठी बोलावून घेतलं. दोन दिवस आपण नक्की कुठे होतो, का निघून गेलो होतो, या प्रश्नांची तिनं आधी उत्तरं टाळली, पण पोलिसांच्या प्रश्नांच्या फैरीपुढे तिचा संयम टिकणं अवघडच होतं.
`आमच्याकडे सगळेच पुरावे आहेत. तुम्ही स्वतःच सगळं सांगितलंत, तर जास्त बरं,` असं सांगितल्यावर मात्र योगिताला रडू कोसळलं. कुणाललाही पोलिसांनी बोलावून घेतलं होतं. आता दोघांना काहीच लपवण्यासारखं राहिलं नव्हतं.
“साहेब, विराज एक नंबरचा हलकट माणूस होता. माझं आणि योगिताचं एकमेकांवर प्रेम होतं. विराजला मात्र ते बघवत नव्हतं. तो योगिताला त्रास देत होता,“ एवढं बोलून कुणाल थांबला. मिरजकरांनी आणखी छेडलं, तेव्हा त्यानं दबकत आणखी काही गोष्टी सांगितल्या. त्या दोघांवर विराजची सतत नजर होती. एकदा विराजच्या घरी योगिता आली असताना कुणालनं त्यांना पकडलं होतं. काहीतरी बहाण्याने तो घरी शिरला आणि त्या दोघांचा व्हिडिओही त्याने तयार केला होता. हा व्हिडिओ अर्थातच समोर आला, तर दोघांची बदनामी होणार होती. विराजला पैसे उकळण्यासाठी निमित्त हवंच होतं. त्यानं या दोघांना धमकवायला, त्यांच्याकडून पैसे काढायला सुरुवात केली. शेवटी तर योगिताकडे तो आणखीही मागण्या करू लागला, तेव्हा दोघांचा संयम संपला. आता ह्याचं ऐकत राहिलो, तर हा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करेल, हे कुणालला लक्षात आलं.
विराजला संपवण्याचा प्लॅन कुणालने आखला आणि त्यासाठी योगितानेही साथ दिली. पैसे देण्याच्या बहाण्याने विराजला शहराबाहेर एका मोकळ्या भागात नेऊन कुणालने दोरीने त्याचा गळा आवळला. दोघांनी मिळून त्याचं प्रेत नदीत फेकून दिलं. तो लवकर सापडणार नाही, अशीच त्यांना आशा होती, पण प्रेत सापडलं आणि दोघांचा कावा उघड झाला. योगिताने स्वतःच गायब व्हायचं, नंतर परत यायचं, म्हणजे तिच्यावर काही संशय येणार नाही, पोलिसांकडून तपास झालाच तर त्यांचाही गोंधळ होईल, असाही काहीतरी विचार त्या दोघांनी केला होता. म्हणूनच योगिताने तिचा फोनही बंद करून कुणालकडेच ठेवून दिला होता.
पोलिसांकडे पुरावे होतेच, पण या दोघांकडून जी कबुली हवी होती, ती पोलिसांनी मिळवली आणि या प्रकरणाचं गूढ उकललं.