(दोनचार खाटांवर काहीजण बसलेले. मध्ये एका टेबलवर ‘बसण्याची’ सगळी सामग्री.)
गिरधर : काही म्हणा! शिलू नाचली असती तर प्रोग्राम एक नंबर झाला असता!
चिंधुशेठ : तिचं तोंड चालतं फक्त!
चौखांबे : ह्यावेळी मिळेल का हो तुम्हाला तिकीट?
चिंधुशेठ : आवो, विषय चालू आहे काय? तुम्ही बोलताय काय?
लाळघोटे : हे विचारणं झालं का? आता तिकिटं वाटायला त्यांच्याकडेच असणार आहेत.
गिरधर : त्यात ज्येष्ठता!
चौखांबे : मागील निवडणुकीत देखील असं बरंच काही होतं की गाठीला? तरी तिकीट कापलं होतंच ना?
चिंधुशेठ : चौखांबे, तुम्ही प्रश्न फार विचारतात बुवा!
चौखांबे : आता आमचा पेशाच प्रश्न करण्याचा आहे, त्याला कोण काय करणार?
लाळघोटे : हल्ली महापालिकेवर फार मोर्चे येताय. तिथं उभं राहून विचारायचे की प्रश्न?
चौखांबे : आंदोलनकर्त्यांच्या समस्या ऐकल्यावर पुन्हा प्रश्न घेऊन चिंधुशेठकडेच यावं लागेल की! प्रतिक्रिया घ्यायला? उत्तरं मागायला?
गिरधर : एकूण काही झालं तरी फिरून तुम्हाला शेठकडेच यायचं आहे तर…
चौखांबे : आता आमचं कामच असं आहे, त्याला कोण काय करणार?
लाळघोटे : साधारण काय खाल्ल्यावर तुम्हाला प्रश्न पडतात हो? नाही म्हणजे दिवसभरात एवढे प्रश्न पाडून घ्यायचे. पुन्हा ते एकेकाला पकडून विचारायचे. हे अखंड न थकता करायचं, साधं काम नाही बुवा!
चौखांबे : पत्रकारिता म्हणतात त्याला! सोप्पं थोडंच असणार आहे का?
गिरधर : मागं ते उपोषणकर्त्यांच्या मंडपात पोलिसांनी चारदोन लाठ्या चालवल्यात तर तुम्ही का हो लगेच व्हिडिओ रेकॉर्ड केले?
चौखांबे : आता घ्या! मोठ्या शेठचे नुसते वॉक ते व्याकपर्यंतचे फुटकळ व्हिडिओ रिवाईंड करू करू आम्ही दाखवतो. ते नाही दिसत तुम्हाला?
चिंधुशेठ : हळू बोला हो! ऐकंल कुणी!
लाळघोटे : बाकी चिंधुशेठ, बोकड मात्र भारी शिजेल होता हो! मी नुस्ता हिरड्यांनी चावला!
गिरधर : येत्या इलेक्शनच्या पार्ट्यांना असलं मटण ठेवलं तर मत फिक्स आपल्याला.
चिंधुशेठ : पण अपोझिशन ताकत लावू राहिलं ना? मतविभागणी टळली तर आपलं अवघड होईल.
लाळघोटे : त्याच्यात तुमच्या त्या सेन्सिटिव्ह नगरातल्या दोन अपार्टमेंटमधली पोरं झुंजवली ना, तर मतविभागणी नक्की होईल हो!
चौखांबे : चला, मला एक बातमी देणार म्हणजे तुम्ही?
गिरधर : श्श्शू! कुठं काय हो बातमी बातमी करत बसता? उद्या आपण चौघं चांगले दोस्त आहोत. याचीही बातमी कराल तुम्ही!
चिंधुशेठ : पण चौखांबे, एक विचारलं तर चालेल का?
चौखांबे : बस्स का? विचारा ना राव!
चिंधुशेठ : तुम्ही फक्त त्या बातम्या जास्त दाखवत गेला तर…
चौखांबे : कुठल्या हो?
चिंधुशेठ : ‘ह्या अभिनेत्रीचं हे पाहून तुम्ही व्हाल थक्क!’, ‘ह्या अभिनेत्रीने ट्विटरला लावली आग, पाहून व्हाल खाक!’, ‘ह्या खेळाडूची बायको दिसते हॉट, पाहून घ्याल विषाचा घ्वाट!’ असल्या बातम्या?
चौखांबे : त्यानं व्ह्यू, एंगेजमेंट वाढते. पण वाचक, प्रेक्षक यांना ते पटणार आहे का?
लाळघोटे : पब्लिकला चिंधुशेठनं बाई ठेवली तरी बी पटणार नाही वा बुवा ठेवला तरी पटणार नाही! लोकांचं उदाहरण देऊ नका चौखांबे!
गिरधर : तसंही चिंधुशेठचं वय काही ठेवायचं थोडंच राहिलं का?
चिंधुशेठ : अय गिर्या! म्हसणात गेलो का मी? म्हणे वय राहिलं नाही ते?
गिरधर : ओ, माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नाहीय हो!
चौखांबे : (मोबाईलमध्ये बघत) घ्या, सुनावणीची तारीख आली. इथं बसल्या बसल्या चिंधुशेठ एक बाईट द्या मला!
चिंधुशेठ : मी बाईट देईन, पण त्यात तुम्ही काही वेडेवाकडे प्रश्न विचारायचे नाही.
चौखांबे : ह्यॅ? त्यात काय मजा?
चिंधुशेठ : अहो, त्यात तुमची मजा घडवतो मी!
चौखांबे : म्हणजे काय करायचं मी?
चिंधुशेठ : विरोधी पार्टीवाले बोंबाबोंब करताय ना?
लाळघोटे : आपण विरोधात असताना जो नरड्याचा तंबोरा केला होता, ती सर नाही यायची त्यांना!
चौखांबे : हो, म्हणजे काही पदयात्रा, मीटिंग, आणि पत्रकार परिषदा चालुय त्यांच्या.
चिंधुशेठ : काही लोकं आमच्या पार्टीविरुद्ध आंदोलनं करताय?
चौखांबे : हो, कारभाराबद्दल काही समस्या आहेत त्यांना!
चिंधुशेठ : आणि आणखी काही थोडंफार असेल. इलेक्शन होईपर्यंत यांना कव्हरेज द्यायचं नाही.
गिरधर : नेहमीप्रमाणे!
चौखांबे : नाही देणार कव्हरेज! पण मजा काय घडवणार तुम्ही?
चिंधुशेठ : तुम्हाला स्पेशल ढाब्यावर नेणार!
चौखांबे : मग आता हाये कुठं मी? तुमच्या पुढं ढाब्यावरच तर आहे!!!