• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ये मोह मोह के धागे…

- राजेश कोळंबकर (टेन्शन काय को लेने का?)

Nitin Phanse by Nitin Phanse
October 6, 2023
in भाष्य
0

आपल्याला अनेक प्रकारचे मोह होत असतात. कधी खाण्यापिण्याचा मोह होतो. कधी अधिकाधिक पैसे कमवण्याचा मोह होतो. चांगल्या मार्गाने आणि विवेक बाळगून पैसे कमवायला काहीच हरकत नाही. पण कधी कधी आपल्याला वाईट मार्गाने पैसा मिळवण्याचाही मोह होऊ शकतो.
काही मार्ग वाईट आहेत याविषयी शंका नसते, तर काही गोष्टी वाईट असतात, पण त्या अधिकृत असतात. ज्या लॉटरी, जुगार या स्वरूपाच्या असतात. ज्यात आर्थिक नुकसान होऊ शकते आणि आपल्याला सवय लागू शकते, व्यसन लागू शकते असा इशारा दिलेला असतो. आजच्या जगात या प्रकारांना एक वेगळं वलय आहे. सेलिब्रिटी या गेम्सची जाहिरात करत असतात.
पैसे मिळवण्याच्या अनेक मार्गापैकी एक विषय आहे शेअर बाजाराचा. अनेक लोकांचा तो मुख्य व्यवसाय आहे तर काहींचा तो जोड व्यवसाय आहे. आमचा मित्र कुणाल गेली काही वर्षे या शेअर मार्केटमध्ये अ‍ॅक्टिव्ह असतो. तो सांगतो की त्यात तो पैसे कमावतो कमी आणि गमावतो जास्त. मला यातलं काही फारसं कळत नसलं तरी यात अनुभव, अभ्यास महत्त्वाचा असतो असं सगळे म्हणतात आणि कुणाल स्वत:च सांगतो की त्याला वेळीच मोह आवरता येत नाही त्यामुळे तो स्वत:चं नुकसान करून घेतो. त्याचवेळी मोह आवरणारे या शेअर बाजाराच्या व्यवसायात व्यवस्थित पैसे कमवतात हेही आपल्याला माहीत आहे.
असो. कोणाला कसला मोह होईल आणि तो कोणत्या मोहाला कसा बळी पडेल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मोह असू शकतात. राहत इंदोरींच्या शब्दात सांगायचं तर ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ अशा प्रकारचा मोहही असू शकतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही.
मंडळी, आपल्याला होणारा प्रत्येक मोह हा वाईटच असेल असं नाही. एखाद्या ठिकाणी चमकण्याचा मोह, मैफल मारून नेण्याचा मोह, एखाद्या सेलिब्रिटीसोबत फोटो काढून घेण्याचा मोह, त्यांना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा मोह होऊ शकतो. यात वाईट नाही. पण काही मोह घातक असतात, ते टाळायला हवे हे आपल्याला पक्कं माहिती असतं. पण ते टाळणं आपल्याला कठीण जातं. ते कठीण असेलही पण अशक्य नसतं हे लक्षात घ्यायला हवं.
आपल्याला माहीत आहे की जे घातक आहे त्याचा मोह आपलं नुकसान करणार आहे. आपण अडचणीत येणार आहोत. आपलं मानसिक, शारीरिक, भावनिक, आर्थिक नुकसान होणार आहे. तर मग त्या मोहाबद्दल सजग राहून ते मोह आपण टाळायला नकोत का?
आपल्याला जे अनेक मोह होतात त्यापैकी एक मोह असतो खाण्या-पिण्याबाबतचा, जो अगदी सरळ आपल्या आरोग्याशी संबंधित असतो. आपल्याला आज काही आजार नसतील, तर ते उद्या होऊ नयेत, म्हणून खाण्या-पिण्याबद्दलचे मोह आपल्याला आवरावे लागतात अन् आज आपल्याला काही आजार असतील तर ते बळावू नयेत म्हणून खाण्यापिण्यावर निर्बंध घालावेच लागतात. आपल्याला आवडणारे गोड, तेलकट, खारट पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक असतात. ज्यांना डायबिटीस, ब्लडप्रेशर असतं, त्यांना ती पथ्ये असतातच, पण ज्यांना नसतात त्यांनीही जिभेवर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. पण काहीजणांना मोह आवरत नाही. ते म्हणतात खायचं नाही तर मग जगायचं कशाला? अहो जिवंत राहिलातच नाही तर खाणार कसे? अधिक जगू तर थोडं थोडं खाऊ ना?
लोक जंक फूड खातात. चीज बर्गर, पिझ्झा, बटाटावडा, तळलेले पदार्थ, गोडधोड, साखरयुक्त पदार्थ खातात. यामुळे वजन वाढतं. हृदयरोगाची शक्यता वाढते. अन्य गंभीर आजारही वाढू शकतात.
खाण्यावर नियंत्रण हवं हे सगळ्यांना पटतं. पण लोक सांगतात की हे पदार्थ पाहिले, त्यांचा गंध आला की मोह आवरत नाही. मंडळी, हे पदार्थ पाहायला काहीच हरकत नाही. त्यांचा गंध घ्यायलाही काही हरकत नाही. ते पाहणं, त्यांचा गंध घेणं काही हानीकारक नाहीये. हानीकारक आहे ते असे पदार्थ खाणं. ते कसं टाळणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
मंडळी, कोकणी, मालवणी माणसांना मासे खूप आवडतात. ओले मासे आवडतातच, पण सुके मासेही खूप आवडतात (हे भाजलेले सुके मासे तेलकट नसले तरी खारट असतात). इथे मला एक मालवणी मामा आठवतात. आजूबाजूला कोणी सुका बांगडा भाजला, त्याचा दरवळ त्यांच्या नाकाशी आला अन् जेवणाची वेळ होत आली असेल, तासाभराने ते जेवणारच असतील, घरात वरणभाताचं साधं जेवण तयार असेल तरी भाजलेल्या सुक्या माशाचा वास आल्यावर मामा मामीला सांगत ‘गो माका पटकन डाळभात वाढ, कोणीतरी सुखं बांगडो भाजलो हा. मी त्याच्या वासा वांगडा (वासासोबत) जेवतंय.’ शेजारी कुणाच्या तरी घरातून सुक्या माश्याचा गंध दरवळतोय आणि मामा त्या वासासोबत खुशीत येऊन जेवतोय हे मी स्वत: पाहिले आहे.
मामांची ही आयडिया मी स्वत:देखील अनेकदा वापरली आहे. आपल्याला जे पदार्थांचे गंध आवडतात, त्या गंधाचा आस्वाद घ्यायचा पण ते खायचे नाहीत. त्यांच्या वासासोबत जेवायचं. म्हणजे चायनीजच्या हॉटेलमध्ये अगदी कमी तेलाचा, साधा, अजिनोमोटोशी संबंध नसलेला, घातक रंगांशी संबंध नसलेला पुलाव बनवून मागवावा, आजूबाजूला डोळ्यांनी लाल भडक ट्रिपल राईस वगैरे दिसावा. तव्यात तो बनवण्याचा खडखडाट ऐकू यावा. त्याचा गंध यावा. पण तो घातक पदार्थ आपण खातच नाही आहोत. आपण खातोय अत्यंत कमी तेलाचा पुलाव. घातक असलेले आणि त्याच्या गंधाने खावेसे वाटणारे पदार्थ खाण्याचे टाळण्यासाठी हा असा विचार मी करत असतो.
मंडळी, वास आणि चव या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. लहानपणी मी काजूच्या (बोंडाच्या, फळाच्या) वासाने आकर्षित व्हायचो. काजूफळाचा गंध मला आवडायचा पण चव मात्र वेगळी असायची. ती मला आवडायची नाही. चला ते ही राहू दे. समजा एखादा पदार्थ घातक आहे. त्याचा गंधही आपल्याला आवडतो आणि चव तर त्याहून अधिक आवडते. पण बोटभर जिभेला आनंद देणार्‍या चवीमुळे त्याचे दुष्परिणाम संपूर्ण देहाला भोगावे लागत असतील तर आपण त्याचा विचार करायला हवा आणि त्या गोष्टी टाळायला हव्यात.
मंडळी, हे पदार्थ कधीच बिलकुल खायचेच नाहीत असं मी म्हणत नाही. ज्यांना पथ्य आहे. काही आजार आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चव बघण्यापुरतं कधीतरी अगदी नाममात्र पण मिटक्या मारत, आस्वाद घेत खायला काय हरकत आहे? ज्यांना काही आजार नाहीत पण आरोग्य सांभाळायचं आहे, त्यांनी मात्र शक्य होईल तितक्या कमी वेळा आणि कमी प्रमाणात हे घातक पदार्थ खावेत.
मंडळी, फक्त खाण्याचा नाही तर जीवनात वेगवेगळ्या क्षणी होणार्‍या वेगवेगळ्या मोहांच्या संदर्भात आपल्याला असं करता येईल का, की ते मोह आपल्याला आयुष्यभरासाठी नियंत्रित करायचे असं बिलकुल नाही. आपल्याला ते फक्त आज टाळायचे आहेत?
मी स्वत: हे माझ्या आचरणात आणतो. अहो मोह कोणाला होत नाही? मलाही होतो. कधीतरी चमचमीत तेलामिठाचं खावंसं वाटतं. काही पदार्थांचा गंध आला की मोह अनावर होतो. खाण्यापिण्याचाच नव्हे तर जेव्हा जेव्हा कोणत्याही प्रकारचा मोह होतो, अमुक खाऊया, तमुक पिऊया, असं करूया, तसं करूया, त्यावेळेला ‘एखाद्या वेळी करायला काय हरकत आहे, आज एक दिवस चालेल असं वाटतं तेव्हा मी स्वत:ला सांगतो. नक्की करू. हवं ते खाऊ. हवं ते पिऊ. हवं तसं वागू. हवं ते बोलू. हवे तसे भांडू. योग्य वाटत नाहीये, पण मनाला करावसं वाटतंय ते जरूर करू. कुठवर मन मारायचं? पण… पण फक्त आज नको. उद्या शंभर टक्के जे हवं ते करू, हवं ते खाऊ. आज मात्र स्वत:ला लगाम घालू.
मंडळी, ‘आज रोख, उद्या उधार’च्या चालीवरचा हा उपाय माझ्यासाठी तरी खूप उपयोगी पडला आहे. कित्येक वेळा मोह आवरल्यानंतर एखाद्या वेळेस थोडं का होईना जे आवडते ते खाण्यापिण्याचा, आवडतं ते करायचा मी मला अधिकार देऊन टाकतो. यामुळे माझं मोहावर नियंत्रण राहतं. (पण घातक गोष्टींच्या बाबतीत शक्यतो उद्या कधीच उजाडणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी.) ‘ये मोह मोह के धागे’ असं एक गाणं आहे. या ‘मोह मोह’च्या धाग्यांमध्ये आपण किती गुंतायचं, गुंतायचं की नाही हे आपणच ठरवायला हवं.

Previous Post

मॉरिशस-३

Next Post

लोककलाकारांचा अप्रतिम जागर!

Next Post

लोककलाकारांचा अप्रतिम जागर!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.