हवामानबदलांचा भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतो. पावसावर तर सगळे जीवन अवलंबून आहे. तो न आल्याने आणि तो अति प्रमाणात आल्याने माणसांचं नुकसानच होतं. हे हजारो कोटी रुपयांचं नुकसान टाळण्यासाठी, शहरच टाळेबंद होण्याचे प्रकार टाळण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज आहे.
—-
माझा महाराष्ट्रातला एक मित्र चार वर्षांपासून कामाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात स्थायिक झाला आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारच्या वेळी त्याचा फोन आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर तो म्हणाला, यंदा आमच्याकडे पाऊसच दिसत नाही, जुलै महिन्यात चांगला पाऊस पडतो, या पावसाला काय झालंय? ऐन पावसाळ्यात आम्ही उकाड्याने हैराण होतो आहोत, हे सारं नेमकं कशामुळे घडतंय? या पावसाचं चाललंय काय? असे अनेक प्रश्न त्याने मला केले. मुळात हवामानात होत असणार्या बदलांमुळेच (क्लायमेट चेंज) आपल्याला पावसातले बदल पाहायला मिळत आहेत. अलीकडच्या काळात मुंबईसारख्या ठिकाणी अतिवृष्टीचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, त्याच्याही मुळाशी हे हवामान बदलच आहेत.
तसे पाहिले तर १९८०पासूनच हवामानातील बदलांचा परिणाम पावसावर होऊ लागला होता, आता तो आपल्याला अशा प्रकारच्या घटनांमधून प्रत्यक्ष स्वरूपात दिसत आहे. जास्त पावसामुळे पाणी साचणे, रस्त्यावर पूरसदृश स्थिती निर्माण होणे, अशा प्रकारांत वाढ होताना दिसत आहे. हे रोखण्यासाठी आपण वेळीच सक्षम उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात त्याचा मोठा फटका सहन करावा लागू शकतो. आमच्या तेव्हाच्या चर्चेनंतर तो मित्र क्षणभर चिंतेत पडला आणि म्हणाला, बरं आमच्याकडे पाऊस येईल ना? पावसाचा मोसम आहे, त्यामुळे तो व्हायला तर हवा, तो कधी सुरू होईल? माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. ते देणं आता अवघड झालेलं आहे.
हे सगळं तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे आपल्याकडे पावसाचा जो प्रचंड जोर मुंबई परिसरात आणि कोकणात दिसतोय, त्याने आपल्याला प्रश्न पडलाय की या पावसाला झालंय काय? इतका का वेड्यासारखा कोसळतोय. आठवड्यांचं टार्गेट, महिन्यांचं टार्गेट काही दिवसांतच का पूर्ण करतोय? दुसरीकडे चेन्नईमधल्या मित्राला प्रश्न पडलाय की पावसाने ओढ का दिली आहे? तो कुठे हरवला आहे? देशात काही ठिकाणी उष्णतेची लाट सुरू आहे भर पावसाळ्यात. त्यामुळे खरोखरच हा प्रश्न सगळ्यांना पडलाय की या पावसाला झालंय काय?
दक्षिण भारतात पावसाचा जोर का?
आपल्याकडे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत मान्सूनचा हंगाम असतो. त्यामध्ये जून महिन्यात १५ टक्के, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ७० टक्के आणि सप्टेंबरमध्ये १५ टक्के पाऊस पडतो. यंदा मात्र, यात बदल झाला आहे. देशभरात जुलैमध्ये उणे २५ टक्के पाऊस झाला आहे आणि जून आणि जुलैचा विचार केला, तर हे प्रमाण उणे सात टक्याच्या दरम्यान आहे. गेल्या दोन महिन्यात दक्षिण भारतात पावसाचा जोर चांगला राहिला असला तरी त्यामध्ये केरळचा समावेश नाही, आता हे असे कसे?. दक्षिण भारतातील तेलंगणा, तामिळनाडू, रायलसीमा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. याउलट केरळमध्ये यंदा आप्रिâकन प्रदेशातील धूळ किंवा एरोसोल हवेमुळे पाऊस कमी झाला आहे. धुळीमुळे ढगांची वाढ प्रतिबंधित झाली असून ढग हवेत विरून जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी पावसाचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी झाले आहे. पावसाळी ढगांच्या वाढीला त्या ठिकाणी पोषक वातावरण नाही. त्यामुळे तिथला पाऊस सध्या तरी थंडावलेला दिसत आहे. उत्तर कर्नाटकमध्ये देखील चांगला पाऊस होत आहे. हे झाले दक्षिणेकडेच… पण देशाच्या उत्तर भागातील परिस्थिती मात्र वेगळी आहे. भारतात पावसाळा असतो तेव्हा युरोपमध्ये उन्हाळा असतो. सध्या गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, काश्मीर या भागांतून पाऊस गायब झालेला आहे. इथे सध्या मोठ्या प्रमाणात उकाडा सुरू आहे. जून आणि आणि जुलै हे दोन्ही महिने या भागांत उष्णतेचे महिने ठरले आहेत. पावसाळ्याचे अजून दोन महिने बाकी आहेत, त्यात इथे काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अतिवृष्टीच्या घटना वाढतायत…
तुम्हाला आठवत असेल २६ जुलै २००५ रोजी मुंबईतल्या सांताक्रूझमध्ये एका दिवसात ९३ सेंटिमीटर तर कुलाब्यात सात सेंटिमीटर पाऊस झाला होता. १९८०नंतरच्या काळात एका दिवसात ३० सेंटिमीटर पाऊस पडण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्यातच अशा जवळपास दहा घटना घडल्या असतील. मुंबई त्यातून सुटलेली नाही. मुंबईत जोरदार पाऊस झाला की दोन दिवस त्याची जोरदार चर्चा होते. इकडे पाणीसाठे आहेत. या भागातील नागरिक घरात अडकलेले आहेत, अशा बातम्या माध्यमांमधून झळकत असतात. पाऊस थांबला की ते सगळे हवेत विरून जाते. देशाची आर्थिक राजधानी असणार्या मुंबईत गेल्या काही वर्षांत होणार्या पावसाचा हा घातक पॅटर्न पाहिला तर आजघडीला इथे किमान १२ तास अगोदर कोणत्या भागात किती पाऊस होईल, कोणत्या भागात वॉटर लॉगिंग होऊ शकते, याची माहिती नागरिकांना देणारी सक्षम यंत्रणा असणे आवश्यक झाले आहे.
किनारी शेतीला धोका…
हवामानातील बदलांमुळे आगामी काळात समुद्राच्या पाण्याच्या पातळीत चार सेंटीमीटरपर्यंत वाढ होऊ शकते. परिणामी, समुद्रकिनार्यालगत जी गावे आहेत, ज्या ठिकाणी शेती आहे, त्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याखेरीज हवेमध्ये वाढत चाललेल्या धूलिकणांचा परिणाम पावसावर होत आहे. काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल साधण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून आपण वेळीच सक्षम उपाययोजना करण्याची गरज आहे.
चितळे समितीची शिफारस
जोरदार पाऊस झाल्यानंतर मुंबईत निर्माण होणार्या परिस्थितीबाबत उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने २००५मध्ये चितळे समितीची स्थापना केली होती, त्यामध्ये मुंबईसाठी हायड्रॉलॉजी युनिट उभारण्याची शिफारस करण्यात आली होती. इस्रोची मदत घेऊन मुंबईचा टोपोग्राफिक सर्वे करण्यात आला होता. त्यात उंच भाग कुठला आहे, उतार कोणत्या भागात आहे, पाणी साठण्याचे प्रकार कुठे होतात, किती फुटापर्यंत पाणी साठते, त्याठिकाणी कोणते उपाय करता येऊ शकतात, या युनिटमध्ये अभ्यास केला जाईल आणि त्यानुसार उपाय सुचवले जातील. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणार्या भारतातील हवामानतज्ज्ञांची मदत या अहवालासाठी घेतली गेली होती. पावसाचा आणि पूरस्थितीचा अचूक अंदाज देणारी यंत्रणा जगात कुठे कुठे कार्यरत आहे, याचा अभ्यास देखील त्यावेळी करण्यात आला होता. या समितीने तेव्हाच्या राज्य सरकारला शिफारसी केल्या होत्या. त्या अद्याप बासनातच बंद आहेत, असे दिसते.
पूर आणि पावसाचा आगाऊ अंदाज देणार्या यंत्रणा अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये कार्यरत आहेत. आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीत देखील त्या असायलाच हव्यात, नाही का?
मानसिकता बदलण्याची गरज…
हवामानातील बदल ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाही, हे एव्हाना सगळ्या जगाच्या लक्षात आलेलं आहे. या संकल्पनेची थट्टा उडवणारे देशही आता गंभीर होऊ लागले आहेत. हवामानबदलांचा भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतो. पावसावर तर सगळे जीवन अवलंबून आहे. तो न आल्याने आणि तो अति प्रमाणात आल्याने माणसांचं नुकसानच होतं. हे हजारो कोटी रुपयांचं नुकसान टाळण्यासाठी, शहरच टाळेबंद होण्याचे प्रकार टाळण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज आहे. नागरिकांना सुरक्षित ठेवायचे असेल तर सर्वांनीच मानसिकता बदलली पाहिजे. हवामानबदलांचा अभ्यास आणि त्यानुसार उपाययोजना प्राधान्यक्रमावर आणल्या पाहिजेत.
– डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी
(लेखक निवृत्त हवामान शास्त्रज्ञ आहेत.)
(शब्दांकन – सुधीर साबळे)