मनासारखी जमीन मिळणार, याचा आनंद महाजनांना झाला होता. पूर्वी घेऊन ठेवलेल्या जमिनीवर हा टुमदार बंगला उभा राहिला होता, आता शहराबाहेर जमीन घेऊन तिथे एक छोटं घर बांधायचं, थोडी शेती करायची, बाग करायची, काही झाडं लावायची, असा सुरेश महाजनांचा विचार होता. पण झालं भलतंच…
—-
`शहरापासून ६० ते ७० किलोमीटरच्या अंतरावर चांगल्या भागात जमीन खरेदी करायची आहे. जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणार्यांनी संपर्क साधावा,’ अशी पोस्ट सुरेश महाजनांनी सोशल मीडियाच्या एका ग्रुपवर टाकली आणि ते स्वतःवरच खूश झाले. आपल्या आलिशान बंगल्यावर त्यांनी एकदा नजर फिरवली. आयुष्यभर जी मेहनत केली, त्याचं चीज झाल्याचं समाधान त्यांच्या चेहर्यावर झळकत होतं. पाषाण भागात त्यांनी कधीकाळी घेऊन ठेवलेल्या जमिनीवर आता हा आधुनिक पद्धतीचा बंगला बांधला होता. घरात सगळ्या सुखसोयी होत्या. उत्तमातलं उत्तम फर्निचर त्यांनी घरात तयार करून घेतलं होतं. निवृत्तीनंतरचं आयुष्य पत्नी वसुधाबरोबर सुखानं घालवायचं, हे त्यांचं स्वप्न होतं आणि आता हेच स्वप्न साकार झाल्याचा अनुभव ते घेत होते.
महाजनांनी पोस्ट टाकली आणि तिला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या पोस्टवर ढिगानी प्रतिक्रिया आल्या. काही जणांनी स्वतःचे नंबर दिले होते, काहींनी त्यांच्या ओळखीच्या एजंट्सचा, मित्रांचा नंबर कळवला होता, काहींनी आपल्याकडे असलेल्या जागांचे फोटो टाकले होते, लिंक्स दिल्या होत्या. महाजनांनी स्वतःचा नंबरही त्यात दिला होता, त्यामुळे त्यांना थेट काही फोनही आले. अनेक प्रतिक्रिया आल्या, तरी त्यांचं समाधान मात्र झालेलं दिसत नव्हतं. कारण त्यातल्या कुणालाच त्यांनी स्वतःहून काही उलट प्रतिसाद दिलेला नव्हता. बहुधा ते आणखी चांगल्या पर्यायांची वाट बघत होते.
दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा एकदा पोस्टवरच्या प्रतिक्रिया बघितल्या. आणखी काही नव्या जागांचे तपशील, काही नवे नंबर्स, काही संदर्भ. महाजनांनी ते वाचून लॅपटॉप बंद करून ठेवला.
दुपारी जेवणं झाल्यावर महाजन थोडे विसावले होते, तेव्हा त्यांचा फोन वाजला.
“सुरेश महाजन साहेब बोलताय का?’’ पलीकडून आवाज आला.
“होय. बोला!’’
“साहेब, मी अजित बागडे बोलतोय. जमिनीचे छोटेमोठे व्यवहार करत असतो. साहेब, तुमची पोस्ट वाचली फेसबुकवर, म्हटलं तुम्हाला काही मदत करता आली तर बघावी!’’ त्या माणसानं सांगितलं.
“अरे वा, चालेल की! चांगली जमीन असेल, तर हवीच आहे मला!’’ महाजनांनीही उत्साह दाखवला.
“साधारण किती पैसे गुंतवायची तयारी आहे तुमची?’’
“जमीन चांगली आणि क्लिअर असेल, सौदा लगेच होणार असेल, तर ७० ते ८० लाखांपर्यंतसुद्धा गुंतवू शकतो.’’ महाजनांनी विश्वासानं सांगितलं. त्याचवेळी वसुधाबाई बाहेर आल्या. हा आकडा आणि त्यांचं फोनवरचं बोलणं वसुधाबाईंनी ऐकलं होतं. मध्येच त्या महाजनांना थांबवून काहीतरी बोलू लागल्या. महाजन लक्ष देईनात, तसं खाणाखुणा करून सांगू लागल्या. एवढा मोठा आकडा असा फोनवर कशाला सांगायचा, असं त्यांना म्हणायचं होतं.
“साहेब, बिझी आहात का? नंतर करू का फोन?’’ अजित बागडेनं नम्रपणे विचारलं.
“नाही नाही, बोला ना. तुमच्याकडे आहे का चांगली जमीन?’’ महाजनकाकांनी उत्साहानं विचारलं.
“हो, आहे ना! मावळ, भोर, सासवड, कामशेत, तुम्ही म्हणाल त्या ठिकाणची जमीन दाखवतो. हायवे टच दोन तीन प्लॉट आहेत साहेब, एक नंबर आहेत! तुम्हाला फोटो पाठवतो. पटलं तर बघा!’’
“काहीच हरकत नाही. पाठवा फोटो!’’ महाजनांनी सांगितलं.
“साहेब, पण तुम्ही व्यवहार कसा करणार? कर्ज घेणार, की…’’
“कॅश! पैसे तयार आहेत!’’ महाजनांनी त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच उत्साहानं सांगितलं.
“मग चालेल साहेब. आजच फोटो पाठवतो,’’ असं म्हणून पलीकडच्या माणसानं फोन कट केला.
मनासारखी जमीन मिळणार, याचा आनंद महाजनांना झाला होता. पूर्वी घेऊन ठेवलेल्या जमिनीवर हा टुमदार बंगला उभा राहिला होता, आता शहराबाहेर जमीन घेऊन तिथे एक छोटं घर बांधायचं, थोडी शेती करायची, बाग करायची, काही झाडं लावायची, असा त्यांचा विचार होता.
अजित बागडेनं प्रॉमिस केल्याप्रमाणे फोटो पाठवले, पण मोबाईलवर नाही, तर मेसेंजरवर. महाजनांना थोडं आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याबद्दल लगेच रिप्लाय करून विचारलंही.
“साहेब, फोटो मेसेंजरवरून पाठवायला सोपं जातं!’’ असं काहीतरी कारण एजंटनं सांगितलं.
“वसुधा, अगं हे फोटो बघितलेस का प्लॉटचे? कसले सुंदर आहेत!’’ त्यांनी उत्साहानं बायकोला फोटो दाखवले. त्यांनाही ते आवडले.
“माणसं चांगली आहेत, जागाही उत्तम आहे. मला वाटतंय सगळं जुळून आलंय. ह्यांच्याशी व्यवहार पक्का करून टाकावा!’’ महाजन आनंदानं म्हणाले.
“बघा, फायनल करायच्या आधी एकदा माणसांबद्दल खात्री करून घ्या. एवढी मोठी रक्कम आहे, काही घोळ व्हायला नको.’’ वसुधाबाईँनी त्यांना सावध केलं. महाजन मात्र पूर्णपणे हरखून गेले होते. फोटो तर त्यांना आवडलेच होते. तरीही वसुधाबाई म्हणत होत्या, त्यामुळे दोन दिवस विचार करू, एकदा जमीन प्रत्यक्ष बघून येऊ मग ठरवू, असा विचार त्यांनी केला.
“साहेब, तुम्ही म्हणाल तेव्हा जाऊ,’’ पुढच्यावेळी फोन केल्यावर अजित म्हणाला.
“या शनिवारी मला वेळ आहे. तेव्हा येऊ शकतो का?’’ महाजनांनी विचारलं.
“चालेल की, कळवतो,’’ म्हणून त्यानं फोन कट केला. यावेळी फोन नंबर वेगळाच होता. त्याचं महाजनांना थोडं आश्चर्य वाटलं, पण हे एजंट दोन तीन नंबर बाळगून असतात, याची त्यांना कल्पना होती.
त्याच दिवशी पुन्हा मेसेंजरवर निरोप आला.
“साहेब, शनिवारी जमत नाहीये. पुढच्या आठवड्यात चालेल का?’’ महाजनांनी त्यासाठी होकार देऊन टाकला. हा माणूस एकदा एका नंबरवरून फोन करतो, मग मेसेंजरवर निरोप पाठवतो, मग पुन्हा वेगळ्याच नंबरवरून फोन करतो, हे प्रकरण जरासं विचित्रच वाटत होतं.
महाजन निवृत्त झाले असले, तरी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये त्यांच्या क्षेत्रातल्या माहितीवरची लेक्चर द्यायला जात. शिवाय त्यांना भटकंतीची अतिशय आवड होती. पुढचे चार दिवस ते असेच कुठे कुठे बिझी होते. त्यामुळे एजंट अजितशी संपर्क काही झाला नाही. ते परत आल्यावर अजितचा फोन आलाच!
“साहेब, कालपास्नं फोन करतोय. तुमचा फोनच लागेना,’’ अजित थोडा कासावीस झाल्यासारखा वाटत होता.
“हो का? हां, बाहेर होतो जरा. बोला की.’’ महाजनांनी शांतपणे सांगितलं.
“साहेब, तुमचं काय ठरलं?’’
“अहो अजून जागा बघितलेय कुठे? आत्ताच कसं ठरवणार?’’
“तसं नाही, पण दुसरं एक गिर्हाईक मागे लागलंय. ते जास्त पैसे पण द्यायला तयार आहेत.’’
“असं का? बरं, मग त्यांना देऊन टाका जागा. आता काय करणार? तुमचं नुकसान नको व्हायला!’’ महाजन त्याला समजून घेत म्हणाले.
“नाही… तसं म्हणायचं नव्हतं साहेब. आपलं आधी बोलणं झालं होतं ना, त्यामुळे पहिला प्रेफरन्स तुम्हाला. साहेब, आपला शब्द पक्का असतो,’’ अजित उगाच स्वतःचं कौतुक करायला लागला, तेव्हा महाजनांनी त्याला थांबवलं.
“बरं, मग कसं करूया? कधी जायचं जागा बघायला?’’
“जाऊ की ह्या आठवड्यात मी कळवतो. पण साहेब, एक रिक्वेस्ट होती…’’
“हां, बोला की.’’
“ही जागा फायनल करायची असेल, तर थोडा अॅडव्हान्स भरून ठेवलात, तर बरं होईल.’’
“अॅडव्हान्स? किती?’’
“जास्त नाही, दहा हजार रुपये.’’
“एवढा मोठा व्यवहार आणि दहा हजार रुपयांत तुम्ही माझ्या नावानं जागा ठेवून देणार?’’ महाजनांनी मनातली शंका विचारली.
“होय साहेब, आपला शब्द आहे ना!’’ अजित म्हणाला.
“हरकत नाही.’’ महाजनांनी मान्यता दिली आणि यावेळी मात्र त्यांना लगेच आणखी एका नंबरवरून मेसेज आला.
“ह्या नंबरवर जो कोड दिलाय, तो स्कॅन करा, मग एक पिन नंबर येईल. त्याच्यानंतर तुम्ही दहा हजार रुपये भरायचे आहेत.’’ अजितनं सगळ्या सूचना समजावून सांगितल्या. लगेच पासकोडही पाठवला.
थोडा वेळ निघून गेला आणि अजितचा पुन्हा फोन आला.
“साहेब, तुम्ही कोड स्कॅन नाही केला अजून?’’ तो जरासा अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं.
“नाही, तो स्कॅन होतच नाहीये. काहीतरी प्रॉब्लेम येतोय.’’ महाजनांनी उत्तर दिलं.
“असं कसं होईल? मी नीट चेक करूनच पाठवला होता साहेब.’’
“आता मी खोटं बोलतोय का? बघा इथे येऊन!’’
“बरं, ठीकेय, मी दुसरा पाठवतो. तो नक्की ट्राय करा, काम होऊन जाईल.’’
“मला टेक्नॉलॉजीतलं एवढं काही कळत नाही, पण मी प्रयत्न करतो. नाहीच झालं, तर तुमचा एक नंबर देऊन ठेवा ना, चालू असलेला. तुम्ही दरवेळी वेगळ्या नंबरवरून फोन करता!’’
“अहो साहेब, आमच्या धंद्यात तर लई झंझटी आहेत, माहितेय ना तुम्हाला? म्हणून सारखे नंबर बदलायला लागतात.’’
“हो, पण माझ्यासारख्या क्लायंटला एकतरी नंबर देऊच शकता ना तुम्ही? तुमचे नंबर कायम बंद लागतात,’’ महाजन हटूनच बसले, तसा हो-नाही करत करत अजितने एक नंबर त्यांना दिला. तो कोड लगेच स्कॅन करून टाका, असंही सांगितलं.
महाजनांना थोड्याच वेळात नवा कोड मिळाला. त्यांनी लगेच अजितने दिलेल्या त्या दुसर्या नंबरवर फोन केला.
“हां, मिळालाय कोड. मी स्कॅन करतो, पण पुन्हा काही लागलं तर फोन करेन हां. फोन चालू आहे ना?’’ महाजनांनी पुन्हा एकदा खात्री केली. अजितने होकार दिल्यावर त्यांनी समाधानाने फोन ठेवला. पुन्हा स्कॅन करायचा प्रयत्न केला आणि कोड स्कॅन झाला.
त्यांच्या अकाउंटमधून दहा हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. महाजनांनी समाधानानं तो मेसेज बघितला. काही आपली कामं केली, तेवढ्यात पुन्हा त्यांचा मेसेज टोन वाजला. त्यांच्या अकाउंटवरून काही व्यवहार करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो फसला होता. पुन्हा थोड्या वेळानं दुसर्या बँकेच्या अकाउंटवरून तोच मेसेज! अर्थातच, चोरट्यांची टोळी त्या स्कॅनचा गैरवापर करून पैसे काढायला बघत होती.
असे विचित्र मेसेज येऊनसुद्धा त्यांचा चेहरा गोंधळलेला वाटला नाही. त्यांनी शांतपणे एक नंबर डायल केला.
“साहेब, मी सुरेश महाजन बोलतोय. दोन मेसेज आलेत बरं का, तुम्ही सांगितलेत, तसे.’’ महाजन म्हणाले. पलीकडे पोलिसांच्या सायबर क्राइम सेलचे इन्स्पेक्टर सोलकर खूश झाले होते.
“गुड. आमचं लक्ष आहेच. आता कुणाचा फोन आला, तर उचलू नका.’’ सोलकरांनी निरोप दिल्यावर महाजनांनी त्याला होकार दिला.
महाजनांचा दिवसभर थोडा अस्वस्थतेच गेला. दुसर्या दिवशी सकाळी सकाळी इन्स्पेक्टर सोलकर स्वतःच महाजनांच्या घरी दाखल झाले.
“महाजन साहेब, तुमचे दहा हजार परत मिळणार आणि तुमच्यासारख्या अनेकांचे लुटलेले लाखो रुपयेसुद्धा!’’ सोलकरांनी सांगितलं, तेव्हा महाजनांचा चेहरा उजळला.
“अहो काय म्हणतायंत हे? कसले पैसे? कुणी लुटलं होतं?’’ वसुधाबाईंना काहीच लक्षात येत नव्हतं.
“सांगतो!’’ सोलकर शांतपणे म्हणाले, “जमीन खरेदीविक्रीचं गाजर दाखवून लोकांच्या अकाउंटमधून पैसे लुटणारी एक टोळी सध्या धुमाकूळ घालत होती. त्यांना पकडणं आवश्यक होतं. पण ते कुठे सापडत नव्हते. जास्त हुशार होते, सारखे नंबर बदल, लोकेशन बदल, असं चाललं होतं. त्यांना पकडण्यासाठी एक गेम खेळायचा होता. त्यासाठी आम्ही महाजन साहेबांना रिक्वेस्ट केली होती.’’
“हो आणि मी ती मान्य केली. जमिनीसाठी पैसे गुंतवायची तयारी आहे, अशी बोगस पोस्ट टाकली आणि पोलिसांना हव्या असलेल्या त्या माणसानं बरोबर काँटॅक्ट केलं,’’ महाजनांनी आणखी खुलासा केला.
“हो, आणि त्याला अडकवण्यासाठी आमच्या सांगण्याप्रमाणे ह्यांनी बोलवत, झुलवत ठेवलं. ते सारखे फोन नंबर बदलत राहिले, पण महाजन साहेबांनी त्यांच्याकडून एक वर्किंग नंबर काढून घेतला आणि त्यावरूनच त्यांना ट्रेस करणं सोपं गेलं. त्या टोळीतले चौघेही आता आमच्या ताब्यात आहेत,’’ सोलकरांनी ही माहिती दिल्यावर वसुधाताईंना धक्काच बसला.
“आपले काही पैसे तर गेले नाहीत ना?’’ त्यांनी काळजीनं विचारलं.
“नाही. दहा हजार गेले, ते परत मिळतील. साहेबांनी मला बाकीचे सगळेच पैसे अकाउंटमधून काढून घ्यायला सांगितलं होतं, त्यामुळे चोरट्यांचे सगळेच प्रयत्न फसले!’’ महाजनांनी ही अतिरिक्त माहिती पुरवल्यावर वसुधाताईंना आणखी आनंद झाला.
“बरं, तुला म्हणून सांगतो, जमीन घ्यायला ५०-६० लाख रुपये खरंच नाहीयेत हं माझ्याकडे! उगाच गैरसमज नको.’’ असं महाजनांनी सांगितलं आणि सगळे हसायला लागले!
– अभिजित पेंढारकर
(लेखक मालिका व चित्रपट क्षेत्रात नामवंत संवादलेखक आहेत)