वंदना यांचा भंडार्यामध्ये दोन बेडरूमचा फ्लॅट होता. त्यांच्या यजमानांची पुण्याला बदली झाली होती. भंडार्यातला तो मोकळा फ्लॅट भाडयाने देण्याचा विचार वंदना यांनी सुरु केला होता. हा व्यवहार करताना त्यांना मध्ये एजंट नको होता, म्हणून याबाबतची जाहिरात त्यांनी एका संकेतस्थळावर दिली होती. वंदना यांचे पती नोकरीच्या ठिकाणी कामात होते, त्यामुळे त्यांना या व्यवहारात लक्ष घालणे शक्य झालेले नव्हते. भंडारा इथे हा व्यवहार करण्यासाठी वंदना यांच्याकडे कुणी भरवशाचा माणूसही नव्हता. त्यामुळे त्यांना हा वेबसाइटचा पर्याय चांगला वाटला होता.
वंदना यांनी वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या दोन तासांत त्यांना चांगला रिस्पॉन्स आला. लष्करातील एका अधिकार्याने हा फ्लॅट भाड्याने घेण्याची इच्छा वंदना यांच्याकडे प्रदर्शित केली. मला राहण्यासाठी तातडीने घर हवे आहे, असे सांगून त्याने हा व्यवहार लगेचच म्हणजे दुसर्या दिवशीच पूर्ण करून टाकू या, असे वंदना यांना सांगितले. लष्करी अधिकारी असल्याचे ओळखपत्रही त्याने वंदना यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवले होते. एक लाख रुपये डिपॉझिट आणि २० हजार रुपये भाडे असा व्यवहार ठरला, तो दोघांनी मान्य केला. व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी दोघांनी एकमेकांची बँक अकाउंट नंबर आपसात शेअर केले.
मी लष्करात काम करत असल्यामुळे मी थेट बँकेत पैसे टाकू शकत नाही. त्यामुळे हे सर्व आर्थिक व्यवहार हे माझ्या कार्यालयातील कॅशियरककडून पूर्ण केले जातील असे त्या अधिकार्याने वंदना याना सांगितले. हे बोलणे होऊन दोन तास होतात न होतात तोच त्या कॅशियरचा वंदना यांना फोन आला. त्यांच्या बँक खात्याची खात्री करण्यासाठी त्याने वंदना यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने एक रुपया टाकला. हा रुपया जमा झाला आहे की नाही याची फोन करुन खात्री केली. वंदना यांनी आपल्या खात्यात एक रुपया जमा झाला असल्याचे त्या कॅशियरला सांगितले. त्या अधिकार्याच्या बँक अकाउंटला वंदना यांचे खाते लिंक करण्यासाठी त्या कॅशियरने वंदना यांनाही एक रुपया टाकण्यास सांगितले. लष्करातील अधिकार्यांचे व्यवहार याच पद्धतीने केले जातात, असे सांगत या कॅशियरने वंदना यांचा विश्वास संपादन केला. लष्करी अधिकार्यांना इतका मोठा व्यवहार करता येत नाही, म्हणून तुम्ही पहिल्यांदा ६० हजार रुपयांची रक्कम अधिकार्याच्या बँक खात्यात टाका, तसे केले नाही तर हा व्यवहार पूर्ण होणे शक्य नाही, असे त्या कॅशियरने वंदना यांना सांगितले. वंदना यांनी हातातला भाडेकरू जाऊ नये, म्हणून कॅशियरने सांगितलेल्या खात्यामध्ये ६० हजार रुपये भरले. पण काही वेळाने त्या कॅशियरने फोन करून सांगितले की तुम्ही टाकलेले पैसे अद्याप जमा झालेले नाहीत, मी तुम्हाला दुसरा बँक नंबर देतो, त्यात ही रक्कम भरा… लष्करात शिस्त आणि वेळेला खूप महत्व आहे, त्यामुळे हा व्यवहार तुम्ही लवकर पूर्ण करा. त्यांनी नव्याने पैसे जमा केले. ही रक्कम त्यांनी आपल्या पतीच्या क्रेडिट कार्डवरून भरली होती. त्यानंतर पुन्हा काही तासांनी त्या कॅशियरचा फोन आला आणि तुम्हाला जीएसटी आणि मिल्ट्री टॅक्सपोटी २४ हजार रुपये भरावे लागणार आहेत, असे सांगत पुन्हा एकदा वंदना यांच्याकडे पैशाची मागणी केली.
एवढ्या वेळात वंदना यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली होती. हा असा कसा व्यवहार सुरु आहे, आपली फसवणूक तर होत नाही ना, असा संशय त्यांना यायला लागला होता. त्यांनी आता अडकलेले पैसे परत द्या, असे त्या तथाकथित कॅशियरला सांगायला सुरुवात केली. पण, तो उलट दम भरू लागला की तुम्ही आमच्याकडे पैसे मागत असाल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. लष्करी अधिकार्याची फसवणूक केली म्हणून तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे वंदना घाबरून गेल्या होत्या. पतीला कोणतीही कल्पना न देता त्यांनी हा व्यवहार केला होता. या फसवणुकीची माहिती पती आणि पोलिसांना कशी द्यावी, अशी चिंता वंदना यांना सतावत होती. दरम्यान, त्यांना वेगवेगळ्या नंबरवरून पैशाची मागणी करणारे फोन येत होते. अखेरीस वंदना यांनी पतीला सर्व प्रकाराची कल्पना दिली आणि सायबर पोलिसांकडे घडलेल्या प्रकारची नोंद केली.
हा प्रकार समोरच्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवल्यामुळे झालेला होता. कोणत्याही वेबसाइटवर व्यवहार करताना कायम सजग राहणे आवश्यक आहे. लष्करी अधिकारी किंवा अन्य कोणीही असो, आर्थिक व्यवहार अशा प्रकारे होतो का, याची माहिती आपल्याला असायला हवी. अशा व्यक्तींच्या बरोबर व्यवहार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. मुळात या प्रकरणात वंदना यांनी घर भाड्याने देताना भाडेकरूशी थेट समोरासमोर भेट न होताच व्यवहार सुरू केला, ही सगळ्यात मोठी चूक होती. अशी चूक कोणताही घरमालक करत नाही. आपल्या बंगल्यात राहायला येणारी व्यक्ती कोण आहे, कशी दिसते, तिचा मूळ पत्ता काय, कागदपत्रे काय आहेत, हे तपासून मगच व्यवहाराकडे वळावे लागते. फोनवरून हे व्यवहार करणे मूर्खपणाचेच आहे. त्यात पुन्हा आपण घर भाड्याने देत आहोत, तर आपल्या खात्यात डिपॉझिट आणि भाडे यायला हवे. त्याऐवजी आपण कोणत्या तरी खात्यात पैसे भरले पाहिजेत, तेही इतक्या मोठ्या रकमेच्या स्वरूपात, अशी मागणी कोणीही केली तरी ती संशयास्पदच आहे. इतकी मोठी रक्कम भरल्यानंतर पुन्हा वेगळ्या खात्यात रक्कम भरण्याची चूक वंदना यांनी केली. अशा खात्यांमधून पैसे तात्काळ काढून घेतले जातात. ती बनावट निघतात आणि ती क्लोज केली गेली तरी तुमचे पैसे परत मिळत नाहीतच.
हे लक्षात ठेवा….
हा प्रकार व्हॉइस फिशिंगमध्ये मोडतो. त्याला ‘विशिंग’ असेही म्हणतात. या प्रकारामध्ये समोरच्या व्यक्तीला अत्यंत घाईघाईत व्यवहार करण्यास भाग पाडले जाते. बर्याचदा लष्करी अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी फसवणारी व्यक्ती खोटे ओळखपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवते. हे सारे समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यासाठी केलेले असते. तुम्ही पहिले पैसे द्या, नंतर मी तुमच्या खात्यात पैसे टाकतो, अशी पद्धत लष्करात आहे, असे सांगून सामान्य व्यक्तीच्या लष्कराविषयीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचा हा प्रकार आहे. कोणताही आर्थिक व्यवहार करण्याची सर्वत्र एकच पद्धत आहे, लष्करासाठी कोणतीही वेगळी पद्धत नाही, हे आपण कायम डोक्यात फिट्ट ठेवायला हवे. समोरील व्यक्ती व्यवहार करण्यासाठी वेगळी पद्धत सांगते, तेव्हा तो व्यवहार संशय निर्माण करणारा, फसवणारा आहे, हे आपण समजून घ्यायला हवे आणि तिथेच त्या व्यवहाराला पूर्णविराम द्यायला हवा.