ती होती १९६१ या वर्षाची अखेर. वर्ष माणसासारखे असते, ते सुरुवातीला बालकावस्थेत असते आणि वर्षाची अखेर होईपर्यंत जख्ख म्हातारे होते, अशी पाश्चिमात्य धारणा आहे. तिला अनुसरून दर नववर्षस्वागताच्या किंवा सरत्या वर्षाला निरोप देणार्या अंकात बाळासाहेबांच्या कुंचल्यातून एक जिवंत चित्र साकारायचं… ते सरत्या वर्षात काय झालं, यावरही भाष्य करायचं आणि नव्या वर्षाकडून काय अपेक्षा आहेत, तेही मांडायचं… हे आहे १९६१ या वर्षाच्या अखेरीचे चित्र आणि नंतरचे वर्ष १९६२ होते हे लक्षात घेतले तर हे व्यंगचित्र किती दूरदृष्टीचे, नव्या वर्षाची जणू कुंडलीच मांडणारे होते, ते लक्षात येईल… १९६२ साली चीनने पहिल्यांदा आपला विश्वासघात केला आणि त्या अपराधाबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू यांना कधीही माफ न करणार्या, त्यांच्या नखाचीही सर नसताना त्यांच्यावर प्रच्छन्न टीका करणार्या विचारधारेचे तथाकथित ५६ इंची पाईकही आज तीच चूक करताना दिसत आहेत. नेहरूंनी किमान चीनने केलेली घुसखोरी लपवण्याचा प्रयत्न केला नाही; आज मात्र साक्षात सर्वोच्च नेतेच दडपून सांगतात की घुसखोरी झालीच नाही. त्यांचे साजिंदे लगेच बेशरम रंग वगैरे बालिश वाद उभे करून चिटभर बिकिनीच्या आड चीनचा विस्तारवाद दडवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. २०२२ साल आज संपत असताना २०२३ या नव्या वर्षाच्या हातात छोटेसे का होईना शस्त्र देऊन जाईल की नुसतेच लाल डोळे करण्याचा हास्यास्पद सल्ला देईल, ते सांगणे कठीण आहे.