‘राजाभाऊ चहा पाजा…’ केबिनमधून इन्स्पेक्टर रजत ओरडला आणि राजाभाऊ चहावाल्याला आवाज द्यायला धावले. रजत इन्स्पेक्टर असला, तरी हवालदार राजाराम मानेंना व्यवस्थित मान द्यायचा, आदर ठेवायचा. नुकत्याच जॉइन झालेल्या या तरुण इन्स्पेक्टरविषयी राजाभाऊंना देखील ममत्व होते. आधी तो स्वतःच दारात येऊन किंवा दुसर्या कोणाला तरी पाठवून चहा मागवायचा. मात्र राजाभाऊंनी हट्टाने ते काम स्वतःकडे घेतले होते. रजतकडे पाहिले की त्यांना त्यांच्या मुंबईत शिकत असलेल्या पोराची हमखास आठवण यायची आणि मग आपण जणू पोरासाठीच काम करतोय असा आनंद मिळत राहायचा. राजाभाऊ चहाला आवाज देत चौकीत शिरले आणि हवालदार शिंदेंनी हातातला फोन त्यांच्यासमोर धरला.
‘वायरलेसचा मेसेज आहे..’
‘हवालदार माने बोलतोय..’
‘आनंद नगर गल्ली नंबर चार, कृपावंत बिल्डिंग, फ्लॅट नंबर १६ इथे दोन प्रेतं मिळाली आहेत. खुनाचा गुन्हा झाला आहे.’ मानेंनी मेसेज ऐकला आणि थेट रजतच्या केबिनकडे धाव घेतली. अवघ्या पाच मिनिटांत सर्व तयारी करून, फोरेन्सिक टीमला निरोप धाडून पोलिस गुन्ह्याच्या ठिकाणी निघाले. पोलिसांची जीप बिल्डिंगखाली थांबली, तोवर बरीच गर्दी जमा झाली होती. गर्दीवर नियंत्रण मिळवत पोलिसांचा फौजफाटा इमारतीत शिरला आणि रजत अन त्याच्या टीमने फ्लॅटचा ताबा घेतला. हॉलच्या बर्याच वस्तू इकडे तिकडे विखरून पडलेल्या होत्या. हॉल आणि बेडरूमच्या दाराच्या मधोमध एका २१-२२ वर्षांच्या तरुणाचे प्रेत पडले होते. अंगावरील कपडे आणि चेहरा पूर्ण रक्ताने माखलेला होता. रक्ताचे ओघळ व्यवस्थित टाळत थोडे पुढे सरकत रजतने आतमध्ये डोकावले. बेडरूममध्ये बेडच्या शेजारी एक स्त्रीचे प्रेत पडले होते. तो उभा होता तिथून फक्त स्त्रीचे पाय आणि रक्ताचे ओघळ दिसत होते. पायातली जोडवी ती स्त्री असल्याचा पुरावा द्यायला पुरेशी होती. काही मिनिटांत फोरेन्सिकची टीम धडकली आणि घटनास्थळाचा ताबा त्यांच्याकडे देत रजतने बाहेरील लोकांकडे मोर्चा वळवला.
‘राजाभाऊ, काय बातमी?’
‘साहेब, नवरा बायको आणि त्यांचा नोकर तिघेच इथे राहत होते. कोणी म्हणते नोकर होता, कोणी म्हणते लांबचा भाचा होता. नक्की कोणाला काही माहिती नाही. डोक्याने थोडासा अधू देखील होता म्हणे. वर्षभरापूर्वी हे कुटुंब इथे राहायला आले. नवरा सेल्समन आहे आणि बायको घरीच असायची. चटण्या, लोणची घरच्या घरी बनवून विकायची. असे असले तरी फारशी कोणाशी बोलाचाल नव्हती. स्वत:हून कोणाकडे जायची नाही आणि कोणाला फार जवळ देखील येऊ द्यायची नाही. कामापुरते काम. पूर्वी ते ज्या शहरात राहायचे तिथे त्यांच्या या भाचा का नोकराविषयी बर्याच अफवा उठल्या होत्या म्हणे, अन् त्याचा त्यांना खूप त्रास झाला होता.’
‘अरे वा राजाभाऊ! तुम्ही तर सगळी कुंडली आणलीत की दहा मिनिटात.’
‘साहेब, माझ्या मित्राची मुलगी इथेच वरच्या मजल्यावर दिली आहे. मला बघून हसली आणि माझी ट्यूब पेटली. तिच्याकडून मग सगळी माहिती मिळाली.’
‘तुम्ही तिच्या नवर्याचा नंबर मिळवा आणि त्याला तातडीने बोलावून घ्या. थोड्याच वेळात फोरेन्सिकची कामं उरकली की मग आपण तपासाला सुरुवात करू.’
तासाभरात फोरेन्सिकचे रानडे घाम पुसत बाहेर आले आणि रजत त्यांच्या मानगुटीवर बसला.
‘हत्येच्या उद्देशानेच वार करण्यात आले आहेत हे नक्की. तरुणावर चार वार आणि छातीत चाकू खुपसण्यात आला आहे. डोक्यात तांब्याची फुलदाणी मारण्यात आली आहे. स्त्रीवर आठ वार करण्यात आले आहेत आणि गळा देखील साडीने आवळण्यात आला आहे. दोघेही वाचू नयेत असा पूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. बेडरूममधले कपाट विखुरलेले आहे. लॉकर तोडलेला आहे. आरोपी एकपेक्षा जास्ती असू शकतात. मात्र आरोपी अत्यंत हुशार आणि चलाख आहेत. हाताचे किंवा पायाचे, बुटाचे असे कोणतेही ठसे मागे सोडलेले नाहीत. झटापट जवळपास न झाल्यात जमा आहे. स्त्रीच्या नखांमध्ये किंवा हातात काही आढळून आले नाही. बाकी आता सविस्तर चाचण्या झाल्या की कळेलच,’ रानडेंनी एका दमात गोषवारा मांडला.
‘खुनाची अंदाजे वेळ?’
‘रात्री दीड ते तीन या वेळेत..’
फोटोग्राफरने देखील आपले काम संपवले आणि काही निरीक्षणे घेऊन रजतने दोन्ही प्रेते पुढील तपासणीसाठी रवाना केली.
हॉलप्रमाणे बेडरूममधले सामानही पूर्ण विखुरलेले होते. कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त करण्यात आले होते. लॉकर पूर्ण उघडा होता आणि काही कागदपत्रे सोडली तर तो पूर्ण रिकामा होता. जबरी चोरी आणि खून असे गुन्हे एकाच वेळी घडलेले होते. पुढचे काही दिवस किती धावपळ होणार आहे या कल्पनेनेच रजतला उत्साह आला होता.
‘साहेब, रघुनाथ म्हस्के नाव आहे या बाईच्या मिस्टरांचे. सोसायटी अध्यक्षांकडे त्यांचा नंबर मिळाला. ते गुजरातला निघाले होते, आता परत माघारी यायला निघाले आहेत,’ राजाभाऊंनी महत्त्वाची बातमी दिली. रघुनाथ म्हस्के येईपर्यंत आता केसच्या ज्या बाजू समोर आल्या होत्या तेवढ्याच विचारात घेत तपास पुढे सरकवायला लागणार होता.
आजूबाजूच्या भागात सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही हाताला लागते का, ते तपासायचे आदेश रजतने दिले होते. त्याप्रमाणे चार पोलिसांची टीम त्याचा तपास करत होती. म्हस्के राहत असलेल्या बिल्डिंगजवळ एक एटीएम सेंटर होते. त्या सेंटरच्या सीसीटीव्हीमध्ये आणि विरुद्ध बाजूला असलेल्या सोन्याच्या दुकानामधील सीसीटीव्हीमध्ये रात्री पावणे दोनच्या सुमाराला एक संशयित व्यक्ती पोलिसांना आढळून आली. तोंडाला रुमाल, डोक्यावर स्पोर्ट्स कॅप अशा वेषातील ती व्यक्ती म्हस्केंच्या इमारतीत शिरताना दिसली. मात्र अवघ्या सात मिनिटांत ती व्यक्ती पुन्हा बाहेर पडताना दिसली आणि रजत चक्रावला.
‘राजाभाऊ असा छोटासा फ्लॅट लुटायला पाच सहाजणांची टोळी तर येणार नाही ही खात्री होती. फार तर दोघे तिघे असतील असे वाटले होते. पण एक व्यक्ती असली, तरी गुपचुप घरात शिरणे तर शक्य नाही. बेल वाजवली असणार, कारण घराचे कुलूप शाबूत आहे. ओळख सांगून घरात घुसून दोनजणांचे खून करायचे, मौल्यवान वस्तू शोधायच्या, त्या पिशवीत भरायच्या आणि कोणालाही चाहूल न लागता पसार व्हायचे. हे सगळे करायला एका माणसाला अंदाजे किती वेळ लागेल?’ रजतच्या प्रश्नाने राजाभाऊंच्या डोक्याला देखील चालना मिळाली होती.
म्हस्के आल्याची बातमी मिळाली आणि तातडीने रजतने त्याला बोलावणे धाडले. चाळिशीच्या आसपासचा माणूस पूर्ण खचलेला होता. पडलेल्या खांद्यांनी आणि उदास चेहर्याने त्याने समोरची खुर्ची पकडली.
‘म्हस्के साहेब, मी तुमची मानसिक अवस्था समजू शकतो. पण आम्हाला देखील आमचे कर्तव्य पार पाडावे लागते.’ रजतच्या बोलण्यावर रघुनाथने फक्त मान डोलवली.
‘तुमचा कोणावर संशय?’ पुन्हा एकदा रघुनाथची मान नकारार्थी हालली.
‘मला जरा तुमच्या कुटुंबाविषयी सविस्तर माहिती द्याल का?’
‘आमच्या घरात मी, माझी बायको आणि आमचा मुलगा राघव असे तिघेच आहोत. म्हणजे होतो…’ बोलता बोलता रघुनाथच्या घशात दोघांच्या आठवणीने आवंढा आला.
‘राघव तुमचा सख्खा मुलगा?’
‘नाही. पण त्यापेक्षा जास्त होता. मी लहानपणापासून अनाथाश्रमात वाढलो. शिक्षणात मला फारशी गती नव्हती. कसे तरी १०वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि एका कंपनीत चपराशी म्हणून कामाला लागलो. तीन मित्र मिळून एका चाळीत राहायचो. तिथेच माझी आणि लताची ओळख झाली. तीही अनाथच पण मामीकडे कसेतरी दिवस ढकलत होती. आमचे सूर जुळले आणि आम्ही पळून जाऊन लग्न केले. दोनाचे चार हात एकत्र आले आणि आम्ही चाळीतून बाहेर पडून एका पत्र्याच्या खोलीत भाड्याने राहायला लागलो. तिथेच आम्हाला एके दिवशी राघव सापडला. आम्ही खूप शोध घेतला, पण त्याच्या नातेवाईकांचा काही तपास लागला नाही. मग आम्हीच त्याला आपला मानले आणि..’
‘यापूर्वी तुम्ही कुठे राहायला होतात?’
‘आम्ही याकूब नगरला राहायचो साहेब. तिथले शेजारी फार भांडकुदळ होते. त्यात आमचा राघव काहीसा डोक्याने अधू आहे. ते सतत त्याची थट्टा उडवायचे, तो आपल्या मुलीकडे घाणेरड्या नजरेने बघतो असा आरोप करायचे. शेवटी त्या त्रासाला कंटाळून आम्ही इकडे आलो. इथे आलो आणि हे असे घडले…’ रघुनाथचा बांध एकदम फुटला. त्याला धीर देत रजतने त्याला निरोप दिला आणि राजाभाऊंना आवाज दिला.
‘राजाभाऊ तुम्ही एक काम करा, हवालदार काटदरेंना याकूब नगरला पाठवा आणि हा शेजारी कोण आहे त्याची जरा माहिती काढा. या म्हस्के कुटुंबाबद्दलही काय माहिती मिळते का ते बघायला सांगा. तुम्ही आणि मी जरा हा रघुनाथ आणि लता यांची काय काय माहिती मिळते त्याचा शोध घेऊ.’
– – –
‘येस रजत, काय प्रगती?’ कमिशनर आचार्य उत्सुकतेने विचारते झाले. शहराच्या मध्यवस्तीत दोन खून पडल्याने प्रकरण जरा तापलेले होते.
‘सर, हा रघुनाथ सरळमार्गी इसम आहे. आधी साधा ऑफिस बॉय होता पण हळूहळू प्रगती करत त्याच कंपनीत सेल्समन झाला आहे. बायको चटण्या, लोणची बनवून घरगुती व्यवसाय करायची. मुलगा मतिमंद होता. या कुटुंबाविषयी कोणाचे काही वाईट मत नाही. रादर ते कोणामध्ये फारसे मिसळतही नसत. बहुदा मुलाच्या अवस्थेमुळे.’
‘चोरीला काय काय गेले आहे?’
‘अशा कुटुंबाची मिळकत ती काय असणार साहेब? पाच सहा हजार रुपये कॅश होती, राघवला लहानपणी केलेले एक सोन्याचे वळे आणि लताबाईंची एक सोन्याची पाटली.’
‘घरात काही सापडले नाही म्हणून रागाच्या भरात चोराने दोघांना ठार केले असेल?’
‘मी तिथेच जरा गोंधळलो आहे. शहराच्या या भागात आजवर जे दरोडे पडले आहेत, घरफोड्या झाल्या आहेत त्या पूर्ण रेकी करून, कुटुंबाची माहिती घेऊन झाल्या आहेत. म्हस्के राहतात तो परिसर तर मध्यमवर्गातही मोडत नाही. अगदी हातावर पोट नाही हाच काय तो दिलासा. त्यातून ज्याच्यावर संशय आहे, ती व्यक्ती अवघ्या सहा ते सात मिनिटांत इमारतीमधून बाहेर पडली आहे.’
‘रजत, जे काय शोधायचे ते लवकर शोध. आपल्याकडे वेळ कमी आहे. लोकांच्यात विनाकारण भीती वाढायला नको.’
साहेबांच्या ऑफिसमधून आल्या आल्या रजतने एक कडक चहाची ऑर्डर दिली आणि तो खुर्चीत रेलून विचारात गुंगला. फर्मास चहाचा वास नाकात शिरला आणि त्याची तंद्री भंगली.
‘सरकारने सगळ्या कष्टकर्यांना आणि चाकरमान्यांना दर दोन तासाने एक चहा मोफत मिळण्याची काहीतरी पॉलिसी करायला पाहिजे बघा साहेब…’ राजाभाऊ गमतीने म्हणाले आणि रजत खळाळून हसला. हसता हसता तो एकदम गंभीर झाला.
‘राजाभाऊ, हा रघुनाथ विकतो काय हो?’
‘पॉलिसीच विकतो ना साहेब.’
‘मग बायकोपोराची पॉलिसी काढली असेल की. घ्या जरा तपास घ्या…’ रजतने त्याचे वाक्य संपवले आणि तेवढ्यात घाईघाईने हवालदार काटदरे आत शिरले.
‘साहेब, अशी माहिती आणली आहे की धक्काच बसेल.’
‘बोला काटदरे बोला…’
‘साहेब, मी याकूब नगरमध्ये म्हस्के कुटुंबाची चौकशी करायला गेलो होतो असे आपल्या एका खबरीला कळले. तो तेव्हा सासुरवाडीला गेला होता. त्याने आताच माहिती दिली की एकदा त्याने या म्हस्केच्या पत्र्याच्या खोलीच्या आसपास गण्या चंदनेला पाहिले होते.’
‘गण्या म्हणजे तो गांजा विकणारा?’
‘बरोबर साहेब!’
‘वा रे वा! एक काम करा, जरा ह्या रघुनाथ आणि लताचे बॅकग्राऊंड पुन्हा एकदा चेक करा. यावेळी पोलिस रेकॉर्डला पण काही माहिती मिळते का बघा.’
– – –
गस्तीवरून रजत परत आला आणि तेवढ्यात गाडी लावत राजाभाऊ आणि काटदरेही अवतरले.
‘काय खबर काटदरे?’
‘माहितीचा खजिना आणलाय साहेब. चला आत बसून बोलू.’
‘बोला, काय काय माहिती हाताला लागली?’
‘साहेब, हा रघुनाथ आणि ही लता दिसतात तेवढे साधे भोळे नाहीत बरं. लग्नानंतरच्या आयुष्यातील पहिली काही वर्षे दोघांनी इमाने इतबारे घालवली. मात्र लताला पैशाची प्रचंड हाव होती. त्यात आता मामीचे बंधन पण गळून पडले होते. दोघांनी बरेच हातपाय मारले. त्यात त्यांची ओळख गण्याशी झाली. गण्या तेव्हा घड्याळांची तस्करी करायचा. या दोघांनी गण्याचा धंदा चांगलाच वाढवला. लता चटण्या आणि लोणच्याच्या बरण्यांमधून माल आतबाहेर करायची तर रघुनाथ
ऑफिस बॉयच्या वेषात. अशातच रघुनाथचे नशीब फळफळले आणि त्याला थेट कंपनीमध्ये पॉलिसी विकणारा म्हणून बढती मिळाली. पण सहा महिन्यातच नशीब पुन्हा पालटले. गण्या आत गेला आणि त्याने दोघांना उरलेला पैसा द्यायला पण नकार दिला. वर पोलिसांना नाव सांगण्याची धमकी देखील दिली. घाबरलेले दोघे तो परिसर सोडून पळाले ते कायमचे.’
‘बंटी और बबली…’ हसत हसत रजत म्हणाला.
‘पुढचे ऐका साहेब. या राघवच्या नावावर ५० लाखाची पॉलिसी आहे, लताच्या नावावर पण ५० लाखाची आणि रघुनाथच्या नावावर २५ लाखाची. विशेष म्हणजे त्यांचे हप्तेदेखील नियमित भरले जात आहेत. राघवचे नाव मात्र राघव चव्हाण असे लावले आहे.’
‘गांजाच्या विक्रीतून आलेला पैसा असा वापरला असणार राजाभाऊ. पण मला एक कळत नाही की राघवची पॉलिसी कशी निघाली? तो तर डोक्याने अधू आहे. ही एक काही वेगळी भानगड आहे. चला जरा काय गोम आहे ते बघू.’ चौकीतून बाहेर पडलेला रजत थेट पॉलिसी ऑफिसात मॅनेजरच्या केबिनमध्ये शिरला.
‘मी इन्स्पेक्टर रजत..’
‘हो. तुम्ही फोन केला होता. बसा ना साहेब.’
‘मला राघव चव्हाणच्या पॉलिसीचे डिटेल्स बघायचे आहेत.’
‘तुम्ही सांगितले होते साहेब. हे बघा काढूनच ठेवले आहेत,’
मॅनेजरने रजतपुढे एक फाइल ठेवली. पुढची दहा मिनिटे रजत शांतपणे ती फाइल चाळत होता.
‘हा इन्शुरन्स रघुनाथने उतरवला होता?’
‘हो साहेब. राघव त्याच्याकडे कामाला होता. त्याचा दूरचा भाचा. त्याच्या बायकोला तो व्यवसायात मदत करत असे.’
‘पण राघव तर बुद्धीने थोडा अधू आहे मॅनेजर साहेब. अशावेळी त्याची पॉलिसी देताना…’
‘अहो कसे शक्य आहे साहेब? मला चांगले आठवते आहे, त्या दिवशी स्वत: माझ्यासमोर बसून सही करून गेला होता राघव. माझा वाढदिवस होता त्या दिवशी, त्यामुळे माझ्या चांगले लक्षात आहे.’
‘राघवच्या पॉलिसीचे पैसे रघुनाथ आणि लताला मिळणार होते. आणि लताच्या पॉलिसीचे?’
‘राघव आणि रघुनाथला.’
रजतने काही क्षण डोळे मिटून शांतपणे विचार केला. ‘मॅनेजर, त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज पाहत येईल?’
‘नक्की साहेब. आम्ही कमीत कमी सात वर्षाचे सर्व रेकॉर्ड जमा ठेवत असतो. फक्त तुम्हाला उद्यापर्यंत थांबायला लागेल, कारण मला ते हेड ऑफिसकडून मागवावे लागेल.’
‘ठीक आहे. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर ते मागवा.’
– – –
सीसीटीव्ही फुटेज सुरू झाले आणि रघुनाथच्या मागे एकजण मॅनेजरच्या टेबलकडे येताना दिसत होता.
‘हा बघा साहेब, हा आहे राघव,’ मॅनेजर त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाला. त्या व्यक्तीचा चेहरा ठळकपणे दिसला आणि काटदरे आणि राजाभाऊ एकाचवेळी दचकले.
‘राजाभाऊ काय झाले?’
‘साहेब, हा मनोज शेट्टी. तडीपार आहे दोन वर्षांपासून. गांजा विक्री, हातभट्टी, हाफ मर्डर, हफ्ता वसुली अशा अनेक केस आहेत याच्यावर. हा रघुनाथला कुठे सापडला?’
‘गांजाच्या धंद्यात ओळख झाली असणार. सगळ्यांना कामाला लावा. आजच्या आज उचला ह्याला आणि रघुनाथवर पण नजर ठेवा.’
पुढच्या बारा तासात पोलिसांनी अविश्रांत मेहनत घेत सगळे शहर पालथे घातले आणि अचूकपणे मनोजला उचलले. त्यानंतर पुढचे दोन तास त्याची दारू उतरवण्यात खर्ची घालायला लागले ते वेगळे. शेवटी शुद्धीत आल्यावर त्याला रजतसमोर बसवण्यात आले. रजतने प्रश्न वगैरे काही न विचारता, आधी मनोजच्या सणसण दोन कानफडात शिलगावल्या. निर्ढावलेला मनोज मख्खपणे बसून राहिला होता. रजतने त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला, पण ‘आपण रघुनाथला ओळखतो’ यापलीकडे मनोजची गाडी सरकेना. या दगडाला मारून काही उपयोग नाही हे रजतने ओळखले. त्याने भात्यातले हुकुमी अस्त्र बाहेर काढले.
‘काटदरे, हा मनोज काही सांगेल असे वाटत नाही. तेव्हा सरळ रघुनाथची जबानी कोर्टासमोर ठेवा. रघुनाथला धमकावणे, त्याच्या बायकोचा आणि मुलाचा खून करणे या आरोपाखाली याला अटक करा आणि त्या रघुनाथला बिचार्याला द्या सोडून.’
‘कोण बिचारा? तोऽऽ रघ्या?’ पिसाळलेल्या आवाजात मनोज ओरडला आणि आपला बाण वर्मी लागल्याचे रजतच्या लक्षात आले.
‘अरे बायको-पोराच्या खुनाचे दु:ख पचवणार्याला काय म्हणायचे मग?’
‘खून झाले नाही हो साहेब… या रघुनाथने करवले. स्वत:च्या बायकोला डबलक्रॉस केलंय याने.’
‘काय ते नीट सांग.’
‘या रघ्याची अन् त्याच्या बायकोची चार वर्षापूर्वी माझ्याशी ओळख झाली. दोघे जाम डोके लावून धंदा करायचे. पण पुढच्याच वर्षी मी तडीपार झालो अ् संपर्क तुटला. गेल्या वर्षी हा रघुनाथ मला शोधत आला. त्याने मला दहा लाखाचे आमिष दाखवले. प्लॅन एकदम सोपा होता. त्याच्या घरातल्या त्या येड्याच्या नावाने काहीतरी कागदपत्रे करायची होती. ती केली की तो मेल्यावर पन्नास लाख रुपये मिळणार होते. एकदा कागदपत्रे बनली की मग सालभर शांत बसायचे आणि मग एक दिवस संधी साधून त्या येड्याला उडवायचे असा प्लॅन होता त्या लताचा.’
‘लताचा प्लॅन?’ रजतला आश्चर्याचा धक्का बसला.
‘ती बाई लै करामती होती साहेब. हा सगळा प्लॅन तिचाच. मी चोर बनून यायचे होते. तोवर त्या येड्याला लताने मारायचे अन घर अस्ताव्यस्त करून ठेवायचे होते. मग मी लताला बेशुद्ध करून घरातले सामान घेऊन बाहेरुन कडी लावून पळून जायचे असे ठरले होते. बाहेर कडी बघून लताचा कोणाला संशय आला नसता आणि सगळे व्यवस्थित पार पडले असते. रघुनाथ देखील त्याचवेळी दोन दिवसाच्या ऑफिसच्या कामाला बाहेर पडणार होता.’
‘पण मग लताचा खून..’
‘लताचा प्लॅन जबरदस्त होता साहेब, फक्त त्याचा शेवट रघुनाथने बदलला…’