जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीम थडीच्या तट्टांना या, यमुनेचे पाणी पाजा
।। जय जय महाराष्ट्र माझा ।।
राजा बढे अर्थात राजाराम नीळकंठ बढे हे `जय जय महाराष्ट्र माझा’ गीत लिहून मराठी माणसाच्या हृदयात कायमचं स्थान मिळवून बसले आहेत. राजा बढेंची ७ एप्रिलला पुण्यतिथी झाली. १ फेब्रुवारी १९१२ रोजी नागपूर येथे जन्मलेले राजाभाऊ, तरुणपणी मुंबईतल्या चित्रपटसृष्टीकडे वळले आणि नंतर पक्के मुंबईकर झाले. पत्रकार ते भावगीतकार म्हणून केलेल्या प्रवासात अनेक गाणी त्यांनी लिहिली. परंतु `जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने खर्या अर्थाने त्यांना लौकिक प्राप्त झाला. जगातील प्रत्येक मराठी माणसाच्या ओठावर हे अभिमानगीत आहे. कारण ते शौर्याचे, अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे.
शाहीर साबळे यांच्या पहाडी आवाजातील हे स्फूर्तीदायक महाराष्ट्रगीत, गेली ६२ वर्षे मराठी माणसाच्या हृदयिंसहासनावर राज्य करीत आहे. या गीताची ७८ आर.एम.पी. रेकॉर्ड बनविण्याची जबाबदारी एचएमव्ही कंपनीने ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्यावर सोपविली होती. या रेकॉर्डसाठी खळेंना दोन गाणी हवी होती. त्यावेळी चकोर आजगावकरांकडे `महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान, माझे राष्ट्र महान’ हे गाणे होते. परंतु खळेकाकांना दुसरे गाणे मिळत नव्हते. शेवटी ते कविवर्य राजा बढे यांच्याकडे गेले. राजा बढेंना एक महाराष्ट्रगीत लिहिण्याची विनंती केली. राजा बढेंनी कसलेही आढेवेढे न घेता रात्रीचा दिवस करून अवघ्या दीड दिवसात `जय जय महाराष्ट्र माझा’ हे अजरामर गीत लिहून दिले.
१९६० सालीच `जय जय महाराष्ट्र माझा’ची रेकॉर्ड निघाली, सर्वत्र वाजू लागली. या रेकॉर्डच्या अनेक प्रती निघाल्या तोही एक `रेकॉर्डच’ आहे. हे महाराष्ट्रगीत, प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुगविणारे होते. त्यामुळे ते प्रत्येक मराठी माणसाच्या ओठावर रुळण्यास वेळ लागला नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक सभा-समारंभात `जय जय महाराष्ट्र माझा’चा ध्वनी घुमू लागला. हे महाराष्ट्रगीत गाणार्या शाहीर साबळेंची गाननिष्ठा पाहून, कविवर्य राजा बढे यांनी `पाहून कौतुक तुझे अखंडित कष्ट, करि कुर्निसात तुज, तुझाच हा महाराष्ट्र’ ही कविता करून त्यांच्या कलेला दाद दिली.
शाहीर साबळेंनी हे गीत गायले. परंतु सुरूवातीला एचएमव्ही कंपनीच्या मनात दुसराच गायक होता. श्रीनिवास खळेंनी मात्र साबळेंच्या नावाचा आग्रह धरला. तो शेवटी एचएमव्हीला मान्य करावा लागला. खळेंना ग्रीन सिग्नल मिळाला आणि खळेंनी कामास सुरूवात केली. त्याच दरम्यान दादरला हिंदू कॉलनीत किंग जॉर्ज शाळेच्या आवारात, `यमराज्यात एक दिवस’ या लोकनाट्याचे प्रयोग सुरू होते. तिथे शाहीर साबळेंना श्रीनिवास खळे भेटले. दिवस कमी होते आणि साबळ्यांचे प्रयोग चालू होते. अशा व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून हे गीत गायचे होते. सरावासही कमी वेळ मिळाला. कलाकार फोटो स्टुडिओच्या पोटमाळ्यावर, अत्यंत अरुंद जागेत एका हार्मोनियमच्या साथीने शाहीर साबळेंनी दोन दिवस सराव केला. यानंतर चमत्कार घडला. हे गीत अगदी एकही रिटेक न होता रेकॉर्ड झाले. जयवंत कुलकर्णी, सुमन पुरोहित यांनी या ऐतिहासिक गाण्याला कोरस दिला होता. ते सर्व क्षण मंत्रमुग्ध करणारे होते. एक ऐतिहासिक अजरामर गीत आकार घेत होते, साकारत होते.
त्याकाळी `जय जय महाराष्ट्र’गीत वाजल्यानंतरच आरटीओ कार्यालये उघडू लागली. कुठल्याही पक्षाची सभा असो, सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रम असो, महाराष्ट्रगीताशिवाय कार्यक्रम साजरा होतच नाही. महाराष्ट्रातच नव्हे देश-परदेशात हे महाराष्ट्र गीत म्हटले जाते. या भूतलावर शेवटचा मराठी माणूस असेपर्यंत `गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत गायले जाणार आहे.