अशी आहे ग्रहस्थिती
रवि-राहू-हर्षल मेषेत, बुध वृषभेत, केतू तुळेत, शनि-मंगळ कुंभेत, गुरु-शुक्र-नेपच्युन मीनेत, चंद्र मेषेत, सप्ताहाच्या मध्यास वृषभ राशीत, अखेरीस मिथुनेत. दिन विशेष – १ मे रोजी कामगार दिन, ३ मे रोजी अक्षयतृतिया, रमजान ईद, शनीचे कुंभेत राश्यांतर.
मेष – कायदेशीर लिखापढीमध्ये फसवले जाणार नाही, याची काळजी घ्या. अटी आणि नियमाच्या बाबतीत अजिबात गाफील राहू नका. राशिस्वामी मंगळ, लाभेश शनीचे स्वराशीत राश्यांतर त्यामुळे जर वायदा व्यवसायात योग्य ती काळजी घ्या. एखाद्या व्यवहारात चांगला फायदा होईल, पण विश्वास व्यवहारात आडवा येईल, त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. देवधर्मासाठी वेळ खर्च होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास होतील. सरकारी आणि राजकीय लोकांच्या गाठीभेटीमधून लाभ होतील. अनपेक्षित लाभ मिळतील. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे. नावलौकिकात भर पडेल. खर्चावर मर्यादा आणा. चैनीसाठी खर्च होईल.
वृषभ – आठवडा अकल्पित लाभाचा राहील. उच्च राशीत योगकारक शनि महाराज स्वराशीत असल्याने कला क्षेत्रात अनपेक्षित यश मिळेल. नव्या ऑफर्स येतील. नवे प्रोजेक्ट हाती येतील, त्यात भरघोस यश मिळेल. लेखक-पत्रकारांसाठी अनुकूल काळ राहील. विवाहेच्छुकांना चांगला काळ आहे. दशमात शनी-मंगळाची सुखस्थानावर दृष्टी राहणार आहे. कौटुंबिक वादविवाद, हेवेदावे यामुळे वातावरण बिघडेल, पण त्याकडे दुर्लक्ष करा. वडिलांबरोबर वाद टाळण्यासाठी १ ते ३ या तारखा सांभाळा. या कालावधीत मन चिंताग्रस्त राहील.
मिथुन – विनाकारण खर्च टाळा. प्रवासामुळे अनावश्यक खर्च वाढेल. घर सोडून मांडव घालू नका. अकारण कर्ज काढू नका, त्रास होईल. लाभातील रवि-राहू अनपेक्षित लाभ देतील. नवीन घराचे स्वप्न पूर्ण कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नवीन वस्तूची खरेदी होईल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. अपेक्षित ठिकाणी बदली होऊ शकते. सराफ, कापड व्यावसायिक, अत्तर व्यावसायिकांना चांगले लाभ मिळतील. कलाकारांना उत्तम काळ.
कर्क – कामाच्या ठिकाणी यश मिळवण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील. त्यामुळे हैराण व्हाल. अष्टमात शनि-मंगळ, दशमात राहू-रविमुळे व्यावसायिक अडचणी जाणवतील. सुखस्थानातील केतूमुळे कुटुंबात अशांतता तयार होईल. आरोग्याची काळजी घ्या. पथ्य पाळा. विषमज्वर, उष्णतेचे विकार निर्माण होऊ शकतात. भाग्यात राश्यांतर करून आलेले गुरु-शुक्र यांच्यामुळे समस्यांचे निवारण होईल. अनपेक्षितपणे नातेवाईकांची मदत मिळेल. शुभकार्य होईल. प्रवास होईल. लांबच्या ठिकाणी बदली होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
सिंह – मे महिन्याचे सुरुवातीचे तीन दिवस मानसिक अस्थिरता राहील. पण मन शांत ठेवा. नक्की मार्ग सापडेल. रवीचे भाग्यातले भ्रमण, सोबत चंद्र-राहू ग्रहणयोग, मंगळ-शनीसोबत कुंभेत सप्तमात. संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सोपे काम अवघड बनेल. ते पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. कायद्याच्या व्यवहारात अपयश पदरी पडू शकते. पत्नीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. परदेशातील व्यवसायात कटकटीचे प्रसंग उद्भवतील, पण यश नक्की मिळेल. महत्वाच्या कामांचा १५ मेनंतर विचार करावा.
कन्या – विपरीत राजयोग, अनपेक्षित शुभकार्य, असे अनुभव या आठवड्यात येतील. सुखद अनुभवांचा काळ असेल. परदेशगमनाच्या संधी चालून येतील. शनि-मंगळ षष्ठात असल्यामुळे शारीरिक कष्ट पडतील. शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते. परदेशगमनाच्या संधी चालून येतील. वाहन चालवताना काळजी घ्या. गर्भवतींनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. धावपळ टाळा. घरातून एखाद्या कार्याला विरोध होईल. कर्जाचे ओझे कमी करा.
तूळ – योगकारक शनी महाराजांचे स्वराशीतील भ्रमण शुभ असले तरी येणारा काळ हा संमिश्र घटनांचा राहील. सप्तमात रवि-राहू असल्याने १५ तारखेपर्यंत आरोग्याची काळजी घ्या. १ ते ३ तारखेपर्यंतचा काळ चिंताग्रस्त राहील. संततीच्या बाबतीत प्रश्न निर्माण होतील. नोकरीच्या ठिकाणी लाभ होतील. हॉटेल व्यावसायिकांना चांगला काळ आहे. मामाकडून चांगले सहकार्य मिळेल. भागीदारीत वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. काळजी घ्या.
वृश्चिक – स्वाभिमान बाजूला ठेवून सामंजस्याने काम करावे लागेल. मंगळाचे सुखस्थानातील भ्रमण, सोबत शनीचे राश्यांतर, व्ययात केतू, षष्ठात राहू त्यामुळे संयम पाळल्यास नको ती शुक्लकाष्ठे मागे लागणार नाहीत. कोर्ट-कचेरीपासून लांब राहा. पोलीस चौकीची पायरी चढवणारे प्रसंग टाळा. पंचमातील स्वराशीचा गुरु आणि उच्च शुक्र तुम्हाला तारून नेईल. व्यवसायात लाभ होतील, पण हेवेदावेही होतील. धार्मिक क्षेत्रात प्रगती कराल. विद्यार्थीवर्ग, कलाकार, गायक, रंगकर्मी, व्यावसायिक यांच्यासाठी लाभदायक आठवडा आहे.
धनू – आत्मविश्वास वाढेल, नवीन संधी चालून येतील. गुरुचे स्वराशीतील भ्रमण, सोबत उच्चीचा शुक्र यांचे चांगले सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी महागडी वस्तू खरेदी कराल. नव्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. सुधारलेल्या ग्रहस्थितीमुळे चांगले अनुभव येतील. स्वर्ग ठेंगणे वाटावे असा अनुभव येईल. छोट्या-मोठ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. मायग्रेन, पित्त, डोकेदुखी हे आजार त्रस्त करतील. कडक उन्हात फिरणे टाळा.
मकर – राशिस्वामी शनीचे कुंभेतील राश्यांतर, साडेसातीचा तिसरा टप्पा, सुखस्थानात स्थिरावलेला राहू त्यामुळे कौटुंबिक द्वेष वाढू शकतो. शनि-मंगळाची अष्टमावर दृष्टी प्रचंड मेहनत करायला लावणार आहे. अपघाताचे भय आहे. वाहन सावकाश चालवा. आई-वडिलांबरोबर तू-तू मैं-मैं चे प्रसंग घडू शकतात. नोकरीत प्रमोशन मिळेल. शब्द हे बाण आहेत, हे समजून संभाषण करा. कठीण प्रसंग निर्माण होऊ शकतो.
कुंभ – वाणीवर नियंत्रण ठेवा. उतावीळपणा, आक्रमकता यामुळे नुकसान होईल. स्वराशीचा गुरु आणि उच्च शुक्र यामुळे मिष्टान्नभोजनाचे योग आहेत. व्यावसायिकांना चांगले लाभ होतील. सप्तमावर शनि-मंगळाची दृष्टी, रवि-राहू पराक्रमात त्यामुळे दाम्पत्यजीवनात वादळ उठणार नाही याकडे लक्ष द्या. बँकेची कामे, कर्जे वेळेत मार्गी लागतील.
मीन – पाहुणे येति घरा तोचि दिवाळी दसरा. उच्चीचा शुक्र, राश्यांतर झालेले रवि-राहू, केतू, शनी यांच्यामुळे अनेक सुसंधी येतील. चांगले यश मिळेल. विवाहेच्छुंसाठी सुवर्णकाळ राहील. धार्मिक कार्यासाठी प्रवास होतील. समाजात पतप्रतिष्ठा वाढेल. उत्साहाच्या भरात आरोग्य सांभाळा. व्ययभावातून शनि-मंगळाची दृष्टी असल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. त्यातून पैसे खर्च होतील. भान ठेवून वागा. साडेसातीचा पहिला टप्पा २९ एप्रिलपासून सुरु झालेला आहे.