(दि न्यू मॉन्स्टर सर्कसचा भव्य दिव्य तंबू. काही रिंगमास्टर, अॅक्रोबॅट अर्थात कसरतपटू, आगाळू अर्थात आगीचे खेळ करणारे, दोरीवर चालणारे, वादक, संगीतकार, जादूगार, हुपर्स वगैरे नि सोबत बोळा कांदगावकर, कंदील भेळभांडे नि स्वतः सर्कसचे मालक तथा मुख्य जोकर कळबाज इंजनाळे काही खुर्च्यांवर बसलेले. पुढल्या टेबलवर काही मुखवटे, तोंडाला फासायचे वेगवेगळे रंग पडलेले. रंगीबेरंगी केसांचे विग पडलेले, जवळ पोशाखाचा ढीग पडलेला. हुला हुपर्सच्या रिंग पडलेल्या. दोर्यांच्या गुंडाळ्या पडलेल्या. कळबाज नव्या प्रयोगासाठी चेहरा रंगवत बसलेला.)
कळबाज : (चेहर्याला लावत असलेला रंग दाखवत) कंदील, बघ रे! (दीर्घ पॉज घेतो.) रंग छान लागलाय का ते?
कंदील : (खाली असलेली मान आवाजासरशी वर करत चेहर्याकडे नजर टाकतो, आणि दचकून ऐकाऐक मोठ्याने किंचाळत रडू लागतो.) भूऽऽऽऽतऽऽ! साऽऽहेऽबांना……..!!! (कंदीलची वाचा बसते. तो बेशुद्ध होतो.)
कळबाज : (अंमळ संतापून) आवरा रे याला! इतक्या दिवसांत (पुन्हा एक दीर्घ पॉज) कंदीलला अजून आमच्या सवयी कळू नयेत? (पॉज) आजवर सरड्याने जितके रंग बदलले नसतील (पॉज) इतके रंग आम्ही बदललेत. (पॉज) कधी वर्षाआड, कधी रोजच्या रोज!
बोळा : (कंदीलला पटकन कुशीत ओढत त्याला थोपटतो, तसा हळूहळू कंदील शांत होऊ लागतो.) साहेब, कंदीलचं चुकलंय खरं! पण तुम्हीही अलीकडं अनाकलनीय रंगसंगती चेहर्यावर लावत भीतीदायक चेहरा करून घेता. पूर्वी तुम्हाला बघून लोकं खळखळून हसायची, आताशा बघायलाही फारशी येत नाहीत!!!
कळबाज : (माथ्याला शेंदूर लावत) हे बघ (एक पॉज) आता काही लोकं म्हणतात (पॉज) मी लाचारी पत्करली (पॉज) मी बूट चाटले (पॉज). मी रंग बदलले (पॉज) मी ढंग बदलले (पॉज) वगैरे आरोप अगदी तू सुद्धा लावू शकतोस (पॉज). पण मी माझ्या मर्हाटी… (पॉज) काय म्हणालो मी? (मागून अनेकजण ‘मर्हाटी’ म्हणत बोललेला शब्द सुचवतात.) हांऽऽऽ जे काही असेल त्या प्रेक्षकांसाठी ‘हे’ वारंवार करेन. (एक दीर्घ पॉज घेत चहूबाजूला नजर फेकत) काऽऽऽय? मी चुकीचं बोलतोय का?
बोळा : (नकारार्थी मान हलवत) मी कधी असं म्हणू धजावेल का? मी फक्त आपल्याला हिणवणार्या विरोधकांची मतं सांगत होतो. मी माझ्या उभ्या आयुष्यात तुमच्यावर शंका घेतलीय का कधी?
कळबाज : (गालावर हसू आणत) शंका? (पॉज) मला पाळीव प्राण्यांवर पूर्ण विश्वास आहे. (पॉज) तू तर जाणतोसच! (पाळीव शब्द ऐकताच कंदील भेळभांडे सावरून बसतो.)
बोळा : (जरा काळजीने) साहेब, पण जरा चिंता आहे.
कळबाज : काय?
बोळा : (पडलेल्या चेहर्याने) आपले उत्पन्नाचे स्रोत, जमणारी गर्दी, मीडियातलं कव्हरेज, लोकांचं कुतूहल, विरोधकांतली चिंता असं सगळं घटत चाललंय.
कळबाज : काय? (पॉज) म्हणजे माझ्या सर्कसला, त्यात काम करणार्या कलावंतांना, त्यांच्या कामाला काही किंमत मिळणार आहे की नाही? (पॉज) तसं होणार नसेल तर मी कुणाचेही पाय चाटायला तयार आहे. (पॉज) पण याद राखा, ज्याचे म्हणून मी आजवर पाय धरलेत, स्वार्थासाठी वेळप्रसंगी मी त्यांचे पायदेखील ओढू शकतो. किंवा ओढलेत. (पॉज) नव्हे!! ती माझी खासियत आहे.
कंदील : पण मालक साहेब, आजकाल आपल्याला सर्कशीच्या सुपार्या मिळण्याऐवजी लढण्यासाठी विडे उचलण्याचे सल्ले दिले जाताय. (पाणावलेले डोळे पुसत) काही जण आपल्याला त्यावरून हिणवतात. मी तरी बोलतो त्यांना, ‘बघा हं! अजून तुम्ही साहेबांना कमी समजू नका.’ माझ्या बोलण्यावर ते आणखी चिडवत राहतात. फिदीफिदी हसतात. त्यामुळे आपल्याला भेटणार्या सुपार्या देखील कमी झाल्यात.
कळबाज : (अतिशय चिंतेने) काय? सुपार्या कमी झाल्यात? (पॉज) आम्ही उमेदीच्या दिवसांत जादूचे प्रयोग सर्कशीत दाखवायचो, ते पुन्हा दाखवावे लागतील असं दिसतंय.
कंदील : (चाचरत) मालक साहेब, एक सल्ला होता.
कळबाज : काय?
कंदील : (धाडस करत) आपण पुन्हा जादूचे प्रयोग करूच नयेत असं.
कळबाज : पण का करू नयेत, आम्ही जादूचे प्रयोग? (पॉज) हां, आता आम्हाला काहींसारखी हातचलाखी जमली नसेल. (पॉज) आमच्यात ती चपळाई नसेल. (पॉज) आमच्या ट्रिक अतिशय सुमार, परंपरागत वगैरे असतील. (पॉज) म्हणून आम्ही जादूचे प्रयोग करू नये? (पॉज) आणि सध्या जे कोणी करताय, ते तरी काय असं वेगळं करताय?
बोळा : साहेब, त्याचं असंय ना? आपले पहिले काही प्रयोग तुम्हाला आठवत असतीलच. म्हणजे तुम्ही यांना-त्यांना सुतासारखं सरळ करून दाखवणार होतात?
कंदील : (बोळाच्या आड लपत) पण आपलंच लुळं पडलं तर कुणाचं सूत सरळ करणार ना? (तोच मागे हशा पिकतो.)
बोळा : जादूने निळी प्रिंट तयार करून काढणार होतात? तिच्या प्रतीक्षेत तुमचे प्रेक्षक अनेकानेक दिवस कारेक्रम हाऊसफुल्ल करायची…
कंदील : (बोळाच्या आडून) ती निळी प्रिंट, निळ्या चलतचित्रफिती प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी कधी दिसलीच नाही… (मागून हशा उठतो.)
बोळा : त्यात आपण शॅडो दरबार भरवून नि त्यातून लोकहितैषी कामं करवून दाखवणार होतात… ह्या घोषणेने तर तत्कालीन सुभेदार फुलचंद डबीर सुद्धा धास्तावले होते…
कळबाज : कंदील, मोकळ्यात येऊन बोल! (पॉज) कोण काय बोलतं, (पॉज) कोण काय करतं (पाॅज) ह्या सर्व गोष्टींचा हिशेब माझ्याकडे असतोच. (पॉज) आणि योग्य वेळी, योग्य ठिकाणी मी त्याला उत्तर देतोच. (पॉज) लाव रे तो…
कंदील : (चपापतो. मान खाली घालून उभारतो.) पण मालक साहेब, आपले जादूचे प्रयोग फसल्यानेच आपण जोकर बनून मनोरंजनाचे काम एकहाती हाती घेतले नि आपल्या सर्कसची भरभराट झाली की!
बोळा : विशेष म्हणजे आपल्या सर्कसने २०१४च्या नौरंगजेबाच्या तख्तपोशी वेळच्या लढाईत जे कार्यक्रम घेतले ते फार मनोरंजक होते, असं आजही दख्खनेत बोललं जातंच की!
कंदील : आणि त्यावेळेपासूनच आपल्याला अधिकाधिक सुपार्या मिळाल्या. दर पंचवार्षिकच्या लोकयात्रेत आपल्याला गावोगाव विशेष बोलावणं येऊ लागलं. आपल्या सर्कशीतील हिंस्र प्राण्यांच्या कसरती, तारेवरच्या, दोरीवरच्या कसरती आगीचे खेळ, रिंग फिरवत गिरक्या घेणारे हुपर्स वगैरे यांपेक्षा तुमच्या हसवण्याच्या कलेने, नकलेच्या कसबीने आपले सगळे शो हाऊसफुल्ल होत होते…
कळबाज : होत होते म्हणजे? (पॉज) इथून पुढे होणार नाहीत असं आहे का? (पॉज) मी आजही, कुठल्याही ठिकाणी कार्यक्रम घेतला तर साडेनऊ टाळ्या आणि किमान तीन शिट्ट्या घेऊच शकतो. (पॉज) कळेचा वारसा कुणाकडे असेल तर तो माझ्याकडेच आहे. (पॉज) हे मला दाखवायची गरज नाही.
बोळा : (काही सुचवू बघतो.) पण साहेब, मला वाटतं ह्या वेळच्या सार्वत्रिक लढाईत उतरून आपण एकदोन ठाणं जिंकून घ्यावं. आणि ही सर्कस कायमची बंद करावी.
कंदील : (शंकेने) ते इतकं सोपं आहे का? तुम्ही मला अजून तलवार पकडायचं शिकवलं नाहीय. एकदोन ठाणं जिंकायला काय गुदगुल्या करून शत्रू नामोहरम करायचा का? इथं लढाईत कुणाकडे काय अस्त्र-शस्त्र असेल काही सांगता येतं का?
कळबाज : सर्कस बंद करावी म्हणजे? (पॉज) डंमित आता कुठे सर्कस समजून घेतोय, प्राण्यांचे चारा-पाण्याचे खर्च सांभाळतोय. (पॉज) आणि तुम्ही म्हणता मी हे दुकान बंद करू? का?
बोळा : (निश्चयीपणे) त्याला काय? एखादं ठाणं त्याच्यासाठी देखील जिंकायचा प्रयत्न करू आपण! पण हे असं सुपार्यांच्या भरवश्यावर दारोदार फिरणं बंद करूया आपण.
(तोच कळबाजचा फोन खणाणतो. तो घाईने फोन उचलून कोपर्यात जातो. आणि केवळ अर्धा मिनिटांत पुन्हा माघारी येतो. त्याच्या चेहर्यावरून आता आनंद ओसंडून वाहतोय, असं दिसतंय.)
कळबाज : (आनंदाच्या भरात) ऐऽऽऽ पाणी आण!
कंदील : (चक्रावून) पाणी? पाणी कशाला?
कळबाज : (संयतपणे) सध्यातरी तोंड धुवायला.
बोळा : पण आता थोड्या वेळात आपला नियोजित कार्यक्रम आहे की?
कळबाज : (बेफिकीरीने) ते नंतर बघुयात!
कंदील : एक फोननंतर असं काय बदललं? नेमकं कोण होतं पलीकडून? आणि काय म्हणाले ते? की तुम्ही अगदी बेफिकीर झालात?
कळबाज : वजीर अमानतुल्ला शामेनी यांचा कॉल होता तो!
बोळा : (आश्चर्याने) काय सांगता? काय म्हणाले ते?
कळबाज : (चेहर्यावरला आनंद ओसंडून वाहतोय.) ते ना? ‘या!’ म्हणाले!
कंदील : मग तुम्ही लगेच जाताय? तो दगाबाज माणूस आहे. दिलेला शब्द फिरवणारा. खुनशी. आणि…
बोळा : पण गेलाच तर मनसबदार्या, वा दरबारीची वस्त्रं वगैरे काही मिळवून या!
(तोच धापा टाकत तिकीटमास्तर आत पळत येतो.)
कंदील : ओ, इतके पळत का आलात?
तिकीटमास्तर : वाईट बातमीय!
बोळा : (उत्सुकतेने) काय?
तिकीटमास्तर : गावकर्यांनी ‘या!’ म्हणून निरोप धाडलाय.
कळबाज : पण आता तर शामेनींनी दिल्ली दरबारात ‘या!’ म्हणून सांगितलंय. तेव्हा आता एकाच वेळी दोन ठिकाणी जाऊ कसा मी?
तिकीटमास्तर : नाही, गावकर्यांनी ‘या!’ म्हणजे ‘निघा!’ म्हणून सांगितलंय! ते म्हणताय, सुपारीबाजांना आम्ही आमच्या गावात स्थान देणार नाही!
(सगळे स्तंभित अवस्थेत एकमेकांकडे पाहतायत!)