नाताळची सुटी हा हिंदी सिनेमात प्रेक्षकांची गर्दी खेचण्याचा काळ. या काळात रिलीज होणार्या सिनेमांविषयी एक वेगळी उत्सुकता असते. पठाण आणि जवान या सिनेमांतून अनेक वर्षांचा यशाचा दुष्काळ संपवून टाकणारा शाहरूख खान आणि अपयश ज्याला माहितीच नाही, असा दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना एकत्र आणणार्या ‘डंकी’ या सिनेमाविषयी म्हणूनच खूप कुतूहल होतं. या दोघांची एकत्रित पहिली कामगिरी म्हणून पाहिलं तर ‘डंकी’ हा पैसावसूल आणि समाधानकारक सिनेमा आहे.
आफ्रिकेत जन्माला आलेली मानवजात भटकत भटकत सगळ्या पृथ्वीवर पसरली. अनुकूल ठिकाणी स्थलांतर ही जीवसृष्टीची मूलभूत प्रवृत्ती आहे. गेल्या एकशे चाळीस वर्षांत ही परिस्थिती बदलली. प्रगत देश आपल्या सीमा बंद करून त्यांना हवं तेव्हा हुशार, पैसेवाल्या आणि अंगमेहनतीची कामं करणार्या कामगारांना आपल्याकडे प्रवेश देऊ लागले. परदेशी स्थायिक झालेल्या नातेवाईकांची प्रगती पाहून तरूण पिढीला उज्ज्वल भविष्यासाठी आपणही तिथं जावं असं वाटणं स्वाभाविक आहे. पण उत्तम शिक्षण नसलेल्या आणि गुणांचा अभाव असलेल्या बेरोजगार तरुणांना प्रगत देशाचा व्हिसा मिळणं कठीण. मग बेकायदा मार्गाने अनेक देशांच्या सीमा ओलांडून प्रगत देशात घुसखोरी करणं (डाँकी रूट्स) हा पर्याय निवडला जातो. या सामाजिक विषयावर ‘डंकी’ भाष्य करतो.
पंजाबमधील लल्टू गावात आलेल्या एका माजी सैनिकाच्या, हार्डीच्या (शाहरुख खान) मदतीने मनू (तापसी पन्नू), बग्गू, बल्लू आणि सुखी (विकी कौशल) हे सगळे पाकिस्तान-इराण-तुर्की-इंग्लंड अशा धोकादायक मार्गाने इंग्लंडला जायचा निर्णय घेतात. या प्रवासात त्यांच्यावर जीवघेणे प्रसंग ओढवतात. त्यांच्यावर मात करून हे स्वप्नाळू तरूण इंग्लंडला सहीसलामत पोहोचतात का, तिथे काय होतं, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हा चित्रपट पाहताना मिळतील.
बेकायदा मार्गाने प्रवास करताना स्थलांतरितांना मरणयातना भोगाव्या लागतात. अनेकांचा वाटेतच मृत्यू होतो. यातून वाचून नशिबानं पोहचलं तरी तिथं जगण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. व्यावसायिक चित्रपटात हा विषय निवडण्याची आर्थिक रिस्क घेतल्याबद्दल राजकुमार हिरानी यांचे विशेष कौतुक. पण ‘थ्री इडियट्स’, ‘मुन्नाभाई’ चित्रपटमालिका यांच्यासारखी गोळीबंद पटकथा ‘डंकी’मध्ये नाही. सिनेमा आजच्या काळात आणि नव्वदीच्या काळात घडतो. १९९५सालातील स्थलांतरित तरुणांची मानसिकता मांडताना हिरानी फक्त आर्थिक परिस्थिती हे एकमेव कारण प्रकर्षानं दाखवतात. (टॉम हँक्सच्या ‘टर्मिनल’ सिनेमात गुप्ता नावाचा माणूस विमानतळावर लादी पुसण्याचं काम करताना दाखवला होता. त्या काळात गुप्ता नावाचा माणूस भारतात तरी अशा प्रकारचं काम करताना कधीच दिसला नसता.) त्या काळातील राजकीय, सामजिक परिस्थितीवर देखील पटकथेत भर दिला गेला असता आणि आजच्या बदललेल्या परिस्थितीशी सांगड घातली असती तर पटकथा आणखी खुलली असती. शाहरुख आणि तापसी यांच्यातील प्रेमकथेलाही फारसा वाव दिला गेलेला नाही. पटकथेतील कमतरता खुमासदार संवादात भरून निघाली आहे. गंभीर विषयाला सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नर्मविनोदी संवादाचा तडका देण्याची हिरानी रेसिपी इथेही दिसते.
परदेशी जाण्याचं स्वप्न बाळगणार्या तरुणांना सर्वात जास्त अडचण जाणवते ती ‘इंग्रजी’ भाषेची, शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी डिक्शनरीमधील प्रत्येक शब्द गाण्यातून बोलायचा झाला तर आपल्याला दोन लाख गाणी पाठ करावी लागतील, असा प्रश्न विकी कौशलला पडतो. यातून झटपट इंग्रजी जुगाडातून विसा ऑफिसमध्ये घडणारे प्रासंगिक विनोद खळखळून हसवतात. सिनेमाचा पूर्वार्ध लांबलेला असला तरी मध्यंतरानंतरचा स्थलांतराचा प्रवास वेगवान, उत्कंठावर्धक आणि डोळ्यांच्या कडा ओल्या करणारा आहे. चित्रपट संपल्यावर काही वास्तव फोटोग्राफमधून ‘डंकी’चा खरा अर्थ समोर मांडलाय. तेव्हा या विषयाचं गांभीर्य अधिक कळतं.
याच वर्षात ‘जवान’ आणि ‘पठाण’ असे ब्लॉकब्लस्टर देणार्या शाहरुखने हुकमी यश मिळवणार्या मारधाड आणि अॅक्शन जॉनरपेक्षा वेगळा जॉनर निवडला आहे. इथे शाहरुख ‘लार्जर दॅन लाईफ’ इमेज बाजूला सारून एका सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसतो. सर्व भावभावना पोहोचवण्यात तो यशस्वी झाला आहे. तापसी पन्नू, अनिल ग्रोवर, विक्रम कोचर यांनी भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. छोट्याशा भूमिकेत निखिल रत्नपारखी आणि ज्योती सुभाष हे मराठी कलावंतही लक्षात राहतात. या सर्वांवर कडी केलीय ती विकी कौशलने. विकीने या छोट्या पण महत्वपूर्ण भूमिकेत अशी काय कमाल केलीय की संपूर्ण सिनेमाभर तो लक्षात राहतो. ‘लुटपुट गया’, ‘माही’ ही गाणी चांगली जमली आहेत.
आजवर हिंदी सिनेमात प्रामुख्याने परदेशी भारतीयांच्या सक्सेस स्टोरीज दाखविण्यात आल्या आहेत. परदेशाच्या आकर्षणाची आजवर न दिसलेली बाजू ‘डंकी’ दाखवतो. नाताळच्या सुट्टीत हिंसाचार, रक्तपात नसलेला कौटुंबिक सिनेमा कुटुंबीयांसह पाहायचा असेल तर ‘डंकी’ला पर्याय नाही.