मॅन्युएल म्हणजे अफलातून एक व्यक्तिमत्व. सगळे त्याला मन्या हाक मारीत. गडी पिण्याचा शौकीन होता व टाळेबंदीच्या काळात बिचा-याची खूप कुचंबणा होत होती. पण मद्याचा शौक ही आपली खाजगी बाब आहे, या धोरणाशी तो चिकटून होता आणि येन केन प्रकारेण आपली हौस विविध शकला लढवून भागवीत होता.
एकदा पार्टीत जाम झोकून तो घरी परतत होता. वाटेत त्याने गस्त घालणारी पोलीसची गाडी पाहिली. गाडी लांब उभी केली आणि ड्रायवर सीट सोडून मागच्या सीटवर जाऊन बसला. रस्त्यात उभी असलेली कार बघून पोलिस ऑफिसर त्याच्या जवळ येत म्हणाला, ‘अल्कोहोल चाचणीसाठी गाडी बाजूला घ्या.’
मन्या तत्काळ उत्तरला, ‘साहेब, माझा ड्रायवर प्यायला होता आणि तुम्हाला दुरून बघताच तो घाबरून गाडी सोडून पळाला.’
‘मग तुम्ही गाडी तपासण्यासाठी पुढे आणा.’
‘माफ करा!’ मन्या नम्रपणे म्हणाला,’ एक आदर्श नागरिक म्हणून मी शासनाचे नियम काटेकोरपणे पाळतो. मीही ड्रिंक घेतले आहे आणि अशा अवस्थेत मी गाडी चालवणार नाही.’
त्या पोलिस अधिका-याने मन्याकडे आदराने पाहत म्हटले, ‘काही हरकत नाही. मी माझ्या हवालदारला सांगतो तुम्हाला तुमच्या घरी सोडायला.
—-
प्रकृतीअस्वास्थ्यमुळे मन्या डॉक्टरकडे गेला होता. डॉक्टर त्याला समजावत म्हणाले, ‘मॅन्युएल, तुम्ही पिण्याचे प्रमाण एक-चतुर्थांश कमी करा.’
‘ओके डॉक्टर,’ तो म्हणाला आणि त्याने व्हिस्कीत सोडा-पाणी मिसळणे बंद केले.
—-
आपल्या हुशारीचा मन्याला खूप गर्व होता आणि त्याबद्दल तो सतत फुशारक्या मारीत असे. एकदा मित्राला फोन करून तो म्हणाला, ‘काल पार्टीत मी फुगलो होतो. खाली आलो नि चावी लावून कार स्टार्ट केली. दिवे लावले आणि माझ्या लक्षात आले की आपण खूप प्यायलो आहोत. मी लगेच गाडी बंद केली आणि रिक्षा पकडून घरी आलो.’
‘अरे पण, पार्टी तर आपण तुझ्याच घरी केली होती,’ मित्र म्हणाला.
—-
एकदा त्याने डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी फोन केला.
‘डॉक्टर, टाळेबंदीत मी घराच्या बाहेर पडलोच नाही, पण आता एका महत्वाच्या कामासाठी मला बाजारात जावे लागणार आहे. कुठली काळजी घ्यावी लागेल?’
‘हे बघा, घाबरायचं काही कारण नाही,’ डॉक्टर म्हणाले. ‘फक्त मुखपट्टी लावा, हातांना रबरी मोजे घाला आणि जा बिनधास्त बाजारात.’
दुस-या दिवशी मन्या बाजारात गेला अन पाहतो तो काय, इतर लोक अंगावर कपडेसुद्धा घालून आले होते.’
—-
चंद्रावर पाणी आणि बर्फ असल्याचा शोध संशोधकांनी लावलाय, हे कळताच, मन्या म्हणाला, ‘चला, बरे झाले! त्यांना आणखी त्रास नको, बाटली व चखणा आपण घेऊन जाऊ.’
—-
सकाळी बायको जेवणात मीठ घालायला विसरली नि इकडे मन्या दिवसभर टेंशनमध्ये,’ तोंडाची चव गेली की काय?’
—-
आणि टाळेबंदीत एकलकोंडा बनलेला मन्या अलीकडे विचार करू लागला होता : ‘दुधाची पावडर’, ‘सूपची पावडर,’ ‘कॉफीची पावडर,’ ‘रसनाची पावडर’; मग दारूची पावडर का नको?
– जोसेफ तुस्कानो
(लेखक महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी भाषा विकास समिती’ तसेच ‘वयोवृद्ध कलाकार मानधन समिती’चे सदस्य आहेत.)