युवा नेते प्रकाशराव जगदाळे यांच्या एका कार्यकर्त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. प्रकाशरावांना हा कार्यकर्ता डोईजड होऊ लागल्यामुळे त्यांनीच त्याला संपवला, असा आरोप त्यांचे कट्टर विरोधक अंकुशराव डोईफोडे यांनी केला होता. या राजकीय वादामुळे वातावरण ढवळून निघालं होतं. अशा परिस्थितीत इन्स्पेक्टर घोरपडेंकडे हे प्रकरण तपासासाठी आलं आणि त्यांनी पहिल्यापासून सगळ्या गोष्टींची चौकशी करायचं ठरवलं.
कनिष्ठ अधिकार्यांनी केलेल्या तपासकामात घोळ आहेत, हे त्यांच्या पहिल्याच दिवशी लक्षात आलं. खून झालेला तरुण कार्यकर्ता, म्हणजे बबन भोईर अगदी साध्या घरातून आलेला होता. एका प्रचारफेरीत जगदाळेंना तो भेटला.
“साहेब, आमच्या वस्तीत अजून सगळीकडे लाइट आलेली नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, गटारी भरून वाहतायत, गावात एक धड शाळा नाही, असं असताना कशी काय मतं द्यायची हो तुम्हाला?” असं त्यानं सगळ्यांसमोर, प्रकाशरावांना विचारलं होतं. प्रकाशरावांबरोबरचे कार्यकर्ते खवळले, पण प्रकाशरावांनी त्यांना शांत केलं.
“काय नाव तुझं, दादा?” त्यांनी बबनचा आदर राखत त्याला विचारलं.
“बबन भोईर. ह्याच वस्तीत राहतो मी.” त्यानं छाती पुढे काढून उत्तर दिलं.
प्रकाशरावांना त्याचं कौतुक वाटलं. बबन बीए झालेला होता.
“आमच्याबरोबर काम करणार का? पक्षाच्या कार्यालयातलं सगळं काम सांभाळायचं. प्रचार दौरा असेल, तेव्हा माझ्याबरोबर राहायचं. लागेल ती मदत करायची,” त्यांनी बबनला विचारलं. बबन लगेच तयार झाला.
बबनला नोकरी लागली. प्रकाशरावांनी टाकलेला विश्वास त्यानं सार्थ ठरवला. नियमितपणे पक्षाच्या कार्यालयात जायचं, तिथलं कामकाज बघायचं, समस्या घेऊन येणार्या लोकांची नीट नोंद करायची, अशी सगळी व्यवस्था बघण्यात तो तरबेज झाला.
अर्थातच, त्याच्या या कमी काळातल्या प्रगतीमुळे त्याचे काही शत्रूही निर्माण झाले. दिनेश वराडकर या कार्यकर्त्याला प्रकाशरावांचा उत्तराधिकारी बनायची स्वप्नं आधीपासूनच पडू लागली होती. मात्र त्यांनी त्याला आपल्यापासून कायमच ठराविक अंतरावर ठेवलं होतं. अचानक कानामागून येऊन तिखट झालेला बबन हा आता वराडकरच्या मार्गातला काटा होता.
प्रकाशरावांच्या रेस्ट हाऊसवरच बबनचा खून झाला होता. त्या रात्री बबन एकटाच तिथे होता. अधूनमधून तो रेस्ट हाऊसवरच्या एका छोट्या खोलीत राहत असे. त्याला पुढच्या शिक्षणासाठीही प्रकाशरावांनी प्रोत्साहन दिलं होतं.
“प्रकाशरावांचा तालुक्याच्या काही गावांचा दौरा होता साहेब. तो अर्धवट सोडून ते रात्री रेस्ट हाऊसवर आले होते. ते अचानक रेस्ट हाऊसवर आल्याबद्दल तिथल्या कार्यकर्त्यांनाही आश्चर्य वाटलं होतं,” हवालदार सावंतांनी इन्स्पेक्टर घोरपडेंना माहिती पुरवली.
“त्यावेळी बबनशी त्यांची भेट झाली होती?”
“होय. ते स्वतः बबनच्या खोलीत गेले, त्याच्याशी बंद दाराआड काहीतरी बोलणी झाली. पण ते काय बोलले, याची बाकीच्यांना काहीच कल्पना नाही.”
“ते प्रकाशराव सोडून दुसरं कुणीच सांगू शकणार नाही,” घोरपडे किंचित हसून म्हणाले, “ते सोडा. त्यानंतर तिथे काय झालं, ते सांगा.”
“नंतर काय घडलं, कुणालाच माहीत नाही. सकाळी त्याच रेस्ट हाउसमध्ये बबनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला.”
“आणि विरोधी नेत्यांचा आरोप आहे, की प्रकाशरावांना बबन डोईजड व्हायला लागला होता, म्हणून त्यांनी स्वतः त्याला संपवला. बरोबर?” घोरपडेंनी विचारलं.
“होय साहेब.”
“पोस्ट मार्टेम रिपोर्ट काय म्हणतोय?”
“तुमच्या टेबलवर ठेवलाय साहेब.”
घोरपडेंनी लगेच रिपोर्ट हातात घेतला.
“सदर इसमाचा मृत्यू रात्री १२ ते १ या दरम्यान झाला असण्याची शक्यता आहे,” त्यांनी मोठ्याने वाचलं.
“आणि प्रकाशराव रेस्ट हाऊसवर किती वाजता आले होते, सावंत?”
“साधारण नऊच्या दरम्यान.”
“ते रेस्ट हाऊसवरून किती वाजता निघाले, ह्याचा काही अंदाज?”
“ते नेमकं माहीत नाही, साहेब.”
“मला माहितेय. प्रकाशराव रात्री साडेदहालाच तिथून निघाले. त्यांचे बबनबरोबर काही वाद झाले आणि त्यांनीच बबनला संपवला, असा आरोप असेल, तर त्याचा मृत्यू एवढ्या उशिरा कसा झाला?” घोरपडेंनी प्रश्न केला.
“काहीतरी गडबड आहे. एखाद्या नेत्याच्या कार्यकर्त्याचा त्याच्याच रेस्ट हाऊसवर खून झाल्यानंतर विरोधक आरोप करणारच. खरा गुन्हेगार शोधून काढणं हे आपलं काम आहे. आपल्याला पुढच्या चार दिवसांत भरपूर काम करायचं आहे. तयारी करा!” त्यांनी सगळ्या सहकार्यांना सूचना केल्या.
घोरपडेंनी घटनास्थळी पुन्हा भेट द्यायचं ठरवलं. रेस्ट हाऊसवर ते पोहोचले, तेव्हा जिथे खून झाला, ती बबनची खोली बंदच होती. घोरपडेंनी ती उघडायला लावली, आत प्रवेश केला. जागोजागी रक्ताचे डाग दिसत होते. खोलीतल्या रक्ताचे नमुने घेऊन ते आधीच तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट यायचं बाकी होतं. खोलीला लागूनच आतही एक छोटी खोली आणि बाथरूम होती. घोरपडेंनी आत प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की आतल्या खोलीला एक दार आहे. खून झाला, त्या रात्री ते उघडं होतं, असाही पंचनाम्यात उल्लेख होता. मात्र ते अधूनमधून उघडं राहत असे, त्यामुळे त्याची तपासात दखल घेतली गेली नव्हती. घोरपडे सरळ त्या दारातून बाहेर गेले. दाराच्या जवळच भिंतीत एक छोटी खिडकी होती. त्या खिडकीपाशी झडपांवर लागलेलं रक्त त्यांच्या चाणाक्ष नजरेने बरोबर हेरलं. रिपोर्टमध्ये ह्या रक्ताचे नमुने घेतल्याची नोंद नव्हती.
“ह्या रक्ताचे नमुनेही फॉरेन्सिककडे पाठवून द्या सावंत. कदाचित हेच रक्त आपल्याला खुन्यापर्यंत पोहोचवू शकतं.” ते म्हणाले. सावंतांनी लगेच आदेश मानून रक्ताचे नमुने गोळा करण्याची व्यवस्था केली.
प्रकाशरावांवर गंभीर आरोप झाल्याने आणि तालुक्यात त्यांच्या विरोधी वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांवरही दबाव होता. मात्र, कुठलंही चुकीचं पाऊल उचलून हे वातावरण आणखी चिघळावं, अशी घोरपडेंची अजिबात इच्छा नव्हती. त्यांनी थेट प्रकाशरावांचीच भेट घ्यायचं ठरवलं.
“बबन तुमचा विश्वासातला माणूस होता. आता तो या जगात नाही. त्याला न्याय मिळवून द्यायचा असेल, तर त्या रात्री तुमच्यात जे घडलं ते नेमकं आणि स्पष्ट सांगा,” घोरपडे म्हणाले.
“बबनच्या जाण्यानं माझं खूप मोठं नुकसान…” प्रकाशराव बोलू लागले, तेवढ्यात त्यांना तोडत घोरपडे म्हणाले, “त्याच्या श्रद्धांजली सभेत द्यायचं भाषण नको, प्रकाशराव. फक्त त्याच्या मृत्यूबद्दल काय माहितेय, तेवढं सांगा.”
घोरपडेंच्या या इशार्याने प्रकाशरावही जरा हलले, पण त्यांना समजून घेत पुढे बोलू लागले.
“परवाच्या रात्री मी तालुक्याच्या दौर्यावर होतो. पण जरा बरं नाहीसं झाल्यामुळे दौरा अर्धवट सोडावा लागला. दुसर्या दिवशीच्या नियोजनाचं बोलायचं होतं, म्हणून रेस्ट हाऊसवर बबनला भेटायला गेलो होतो.”
“नियोजनाचं बोलायला नेते आपल्या माणसाला भेटायला बोलावतात प्रकाशराव, स्वतः जात नाहीत!” घोरपडेंचा हा टोलाही प्रकाशरावांना लागला.
“रेस्ट हाऊसवर मी कधी जावं, कधी नाही, हे पोलिसांना विचारून ठरवायची मला गरज नाही. माझं तिथे काम होतं,” प्रकाशरावांचं हे रागावणं अपेक्षित असल्यामुळे घोरपडे गालातल्या गालात हसले.
“ठीकेय, बबनशी काय बोलणं झालं, ते सांगा.”
“सांगितलं ना? दुसर्या दिवसाच्या कार्यक्रमाचे काही निरोप द्यायचे होते, पुढच्या प्रचारदौर्याची आखणी करायची होती, त्याच्यावर बोललो आणि निघालो.”
“म्हणजे तुमचे आणि त्याचे काहीच वाद झाले नाहीत?”
“नाही. आमच्यात वाद नव्हतेच!”
“आयत्या वेळी निघालेला काही विषय?”
“नाही. काहीच नाही,” प्रकाशरावांनी नकारघंटा कायम ठेवली.
“मी आठवण करून देऊ का, प्रकाशराव?” घोरपडे म्हणाले, तसं प्रकाशरावांनी चमकून बघितलं.
“बबन जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाची निवडणूक लढवण्याचा विचार करत होता. त्यासाठी त्याची गावातल्या काही गटांशी चर्चा झाली होती. त्याचा जाब विचारायला तुम्ही गेला होतात. तिथे तुमचं भांडणही झालं.” घोरपडेंनी सगळे डिटेल्स पुरवल्यावर प्रकाशरावांचा चेहरा बदलला.
“ही माहिती कुठून मिळाली तुम्हाला?”
“तुमच्यासारखेच आम्हालाही आमचे सोर्स असतात प्रकाशराव. खरं आहे की नाही,तेवढं सांगा,” घोरपडे आता ठामपणे म्हणाले.
“हो, खरं आहे,” प्रकाशरावांचा स्वर किंचित बदलला होता.
प्रकाशरावांच्या नकळत बबनने जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वासाठी निवडणूक लढवायची तयारी सुरू केली, याचा त्यांना राग आला होता. त्यानं आपल्याला कल्पनाही दिला नाही, याचा राग जास्त होता. त्यांचे एकदोनदा उघड वादही झाले होते, पण तो काही बधत नव्हती. त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू होतं. निवडणूक लढवायची एवढ्यात घाई करू नको, असं त्यांना सांगायचं होतं, त्यासाठीच ते रेस्ट हाऊसवर आले होते.
बबनशी वाद झाले, हे प्रकाशरावांनी कबूल केलं, पण त्यापलीकडे काही घडल्याबद्दल ते अजिबात सांगायला तयार नव्हते. तसा ठोस पुरावाही नव्हता, त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकणं शक्य नव्हतं. घोरपडेंनी आता प्रकाशरावांचे विरोधक अंकुशराव डोईफोडेंचीही भेट घेतली. पन्नाशीला टेकलेले अंकुशराव यांचा बेरकीपणा घोरपडेंना पहिल्या भेटीतच लक्षात आला. त्यांच्याशी चर्चेतून फारसं काही हाताला लागलं नाही. राजकीय संधीचा फायदा घेऊन प्रकाशरावांना बदनाम करायचा प्रयत्न ते करतायंत हे उघड होतं. तरीही, प्रकाशरावांबद्दल संशय असल्याने पोलिसांना सगळ्या बाजूंनी तपास करावा लागणार होता.
खोलीतल्या रक्ताचे नमुने आले होते. प्रकाशरावांनी त्यांच्या सगळ्या जवळच्या लोकांच्या, अगदी स्वतःच्याही रक्ताचे नमुने दिले होते. खोलीत सापडलेल्या रक्ताचे नमुने त्यांचा कार्यकर्ता वराडकर याच्या रक्ताशी तंतोतंत जुळले. वराडकरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तो थोडा घाबरलाच होता.
“मी बबनचा खून केला नाहीये साहेब!” तो गयावया करून सांगायला लागला.
“बबनला जेवढं मारलंस, त्याच्या दुप्पट मार आत्ता खायला लागेल. तो टाळायचा असेल, तर सगळं कबूल कर!” घोरपडे त्याला दरडावत म्हणाले.
ती धमकी ऐकून वराडकरचा उरलासुरला धीर सुटला. त्या रात्री प्रकाशरावांनी बबनला समजावलं, पण तरीही तो ऐकत नव्हता. मग आपण स्वतः खोलीत घुसलो आणि बबनला तुडवला, असं त्यानं मान्य केलं.
“पण त्याला मरेपर्यंत मारलं नव्हतं साहेब. त्याला फक्त खोलीत कोंडून ठेवलं होतं. तो कसा मेला, माहीत नाही,” त्यानं सरळ सांगून टाकलं.
घोरपडेंना हवा असलेला रिपोर्ट अजून आला नव्हता. मागच्या बाजूच्या खिडकीवर सापडलेल्या रक्ताच्या नमुन्यांचा! तो हातात आला आणि वाचून ते खूश झाले. कदाचित त्यांच्या मनासारखंच सगळं घडत होतं.
“मेजर, गाडाr काढा!” त्यांनी सूचना केली आणि ते थेट अंकुशरावांच्या बंगल्यावर पोहोचले.
“घोरपडे साहेब, तुम्ही पुन्हा?” अंकुशरावांनी आश्चर्यानं विचारलं.
“हो, एक नवीन डेव्हलपमेंट आहे, तीच सांगायला आलो होतो. रेस्ट हाऊसवर मागच्या बाजूला काही रक्ताचे नमुने मिळाले होते आणि ते तुमचा कार्यकर्ता प्रवीण याच्या रक्ताशी मॅच झालेत,” असं घोरपडेंनी सांगितल्यावर अंकुशराव उसळले.
“काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? त्याचं रक्त कधी घेतलंत तुम्ही?” अंकुशराव म्हणाले.
“तेवढं विचारू नका.” घोरपडे शांतपणे म्हणाले, “प्रवीणनं तुमच्याच सांगण्यावरून बबनचा खून केलाय, हेसुद्धा आम्हाला समजलंय अंकुशराव.” असं सांगून घोरपडेंनी अंकुशरावांच्या नावाने आणलेलं वॉरंटच दाखवलं.
“मी त्याला मारायचं काय कारण आहे?” अंकुशराव तरीही चरफडत म्हणाले.
“त्याचं कारण तुम्हाला नाही, तुमच्या मुलीला विचारलंय मी साहेब.” घोरपडे म्हणाले आणि अंकुशरावांचं अवसान गळालं.
बबन अंकुशरावांच्या मुलीच्या प्रेमात पडला होता, ते अंकुशरावांना अजिबात मान्य नव्हतं. त्याला समजावूनही तो ऐकत नव्हता, म्हणून त्यांना त्याचा काटा काढायचा होता. प्रकाशरावही त्याच्यावर कुठल्यातरी कारणावरून खवळले आहेत, याची त्यांना खबर होती. बबनला संपवायचा, पण त्याचं बालंट प्रकाशरावांवर आणायचं, हे त्यांनी ठरवलं होतं. म्हणूनच त्या दिवशी प्रवीणला त्यांनी पाळतीवर ठेवला होता. प्रकाशरावांच्या माणसानं बबनला मारहाण केली, पण ती जीवघेणी नव्हती. रात्री उशिरा मागच्या दारानं प्रवीण आत घुसला आणि त्यानं बबनला बेदम मारलं, त्यातच त्याचा मृत्यू झाला.
अंकुशरावांच्या मुलीला बाहेर गाठून घोरपडेंनी तिच्याकडून सगळी माहिती काढली होती. बबन गेल्यामुळे ती आधीच खचून गेली होती. तिनं सगळी कबुली देऊन टाकली. अंकुशरावांनीच आठ दिवसांपूर्वी घेतलेल्या रक्तदान शिबिरातून पोलिसांनी प्रवीणच्या रक्ताचे नमुने मिळवले. ते मॅच झाल्यावर या खुनात त्याचा आणि अंकुशरावांचा हात असल्याचं स्पष्ट झालं. स्वतः अंकुशराव तिथेच हजर असल्याचंही त्यांना मोबाईल लोकेशनवरून सिद्ध करता येणार होतं. राजकारण खेळून आपलं पाप पचवण्यासाठी अंकुशरावांनी खेळलेली मोठी खेळी अखेर उघड झाली होती.
– अभिजित पेंढारकर
(लेखक मालिका व चित्रपट क्षेत्रात नामवंत संवादलेखक आहेत)