जगभरात क्रिप्टो करन्सीचा चांगला बोलबाला आहे. अल्पावधीत श्रीमंत होण्यासाठी अनेक तरुण बिटकॉइन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. बिटकॉइनमध्ये होणार्या व्यवहारांना मान्यता देण्यासाठी ज्या प्रक्रिया केल्या जातात त्यामध्ये ‘व्हॅलिडेशन’ ही प्रक्रिया महत्वाची असते. बिटकॉइन मिळवण्यासाठी किचकट असणारे कोडे (इनक्रिप्शन) सोडवून व्यवहारांना मान्यता दिली जाते. जी मंडळी ते काम करतील त्यांना बक्षीस म्हणून बिटकॉइन दिले जातात.
कोल्हापूरला राहणारा विनय देखील या बिटकॉइनच्या प्रेमात पडला होता. आयटी इंजीनियर असणार्या विनयला क्रिप्टो करन्सीविषयी खूपच आकर्षण निर्माण झाले होते. त्याने इंटरनेटवर बिटकॉइनबाबतची माहिती वाचली होती, त्यामध्ये त्याला क्रिप्टोग्राफी, पब्लिक लेजर, इन्क्रिप्शन, मायनिंग या शब्दांचा चांगलाच परिचय झाला होता. विनयचा जवळचा मित्र सदानंद याने त्याला सांगितले, ‘अमित हा माझा मित्र आहे, तो मोठ्या प्रमाणात मायनिंगचे काम करतो, त्याने पुण्यात त्याचे ऑफिस सुरु केलेले आहे. त्याने आपल्या ऑफिसात मोठे संगणक लावले आहेत. त्यामधून तो बिटकॉइनच्या स्वरूपात लाखो रुपयांची कमाई करतो. तुलाही श्रीमंत व्हायचे असेल तर तू त्यामध्ये गुंतवणूक का करत नाहीस?’ असा सवाल सदानंदने विनयला केला.
एक दिवस सुटी काढून विनय अमितचे ऑफिस पाहायला गेला. हा सगळा व्यवसाय खूप फायदेशीर आहे हे पहिल्याच भेटीत अमितने विनयला दिलं. वर बिटकॉइनमुळे विनयला आर्थिक फायदा कसा होऊ शकतो, भविष्यात त्याची लाइफस्टाइल पूर्णपणे कशी बदलू शकते, हेही सांगितलं. हे आकर्षक चित्र उभं करून त्यानेही विनयला तोच प्रश्न विचारला, जो सदानंदने विचारला होता… इथे गुंतवणूक करण्याचा विचार करायला तुला काय हरकत आहे?
विनय साहजिकच अगदी अलगदपणे या सगळ्याच्या मोहात पडला. आपल्याकडे पैसे आले की आपण आलिशान घर, गाडी घेऊ शकू, मुंबईमध्ये घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा मार्ग चांगला आहे. हमखास श्रीमंत होण्याच्या या स्वप्नात आणखी काहीजणांना जोडून घ्यायचं, असंही त्याने ठरवलं. आणखी तीन मित्रांना त्याने बिटकॉइन्समधून पैसे कमावण्याची आयडिया दिली. अमित मायनिंगमधून मिळणारे बिटकॉइन देण्यास तयार झाला होता, त्यामुळे भविष्यात आपण या व्यवसायाचे ज्ञान घेऊन यापेक्षा मोठा व्यवसाय करू शकू, असा विश्वास विनयमध्ये आला होता.
विनयचे वडील रेल्वेमधून नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांना पीएफ, ग्रॅच्युइटी यामधून चांगली रक्कम मिळाली होती. त्यामधली काही रक्कम वडिलांकडून घेऊन ती यामध्ये टाकता येऊ शकेल, असा विचार विनयने केला. त्याने उत्साहात येऊन घरी आईवडिलांना या व्यवसायाची माहिती देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्याबद्दल काही समजले नाही. विनय तुझ्यावर माझा विश्वास आहे, त्यामुळे तू म्हणशील ती पूर्व दिशा, असे म्हणत वडिलांनी त्याला २५ लाख रुपयांची रक्कम बिटकॉइन्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी दिली. आपला मुलगा चांगला आहे, हुशार आहे, तो उत्तम व्यवसाय करेल, या भांडवलावर भरपूर व्याज कमावेल, अशी खात्री वडिलांना होती. विनयबरोबर आणखी तीन मित्रांनी एकत्र येऊन ७५ लाख रुपये जमा केले आणि क्रिप्टो करन्सीत गुंतवायचे ठरवले.
विनय अमितकडे ही एकत्रित एक कोटी रुपयांची रक्कम गुंतवणुकीसाठी द्यायला गेला तेव्हा त्याने हे पैसे बिटकॉइनच्या स्वरूपात कसे ट्रान्सफर करायचे हे विनयला शिकवले. अमितच्या वॉलेटवर एक कोटी रुपये बिटकॉइनच्या स्वरूपात ट्रान्सफर केले होते. अमितने त्याला ब्लॉक चेन तंत्रज्ञानाची माहिती दिली, त्याचे कामकाज कसे चालते हे सांगितले. दोन ते तीन महिने विनय आणि त्याचे तीन मित्र याचा अभ्यास करत होते, पण त्यांना याची अधिकृत, खात्रीशीर माहिती काही केल्या मिळत नव्हती. अमितने सांगितले, आता बिटकॉइनला सरकारकडून अधिकृत मान्यता मिळणार आहे. जगभरात मागणी वाढतच असल्यामुळे त्याची किंमत वाढतच जाणार आहे. त्यामुळे तुला भविष्यकाळात मिळणारा नफा फार म्हणजे फार मोठा असेल, हे नक्की समज.
तीन महिन्याचा अवधी उलटून गेल्यावर विनयने अमितला आमच्या खात्यामध्ये किती बिटकॉइन जमा झाले आहेत, याची विचारणा केली. तेव्हा अमित म्हणाला, तुला त्यासाठी वॉलेट तयार करावे लागेल. त्यासाठीही त्याने पैसे मागितले. विनय अमितला म्हणाला, आम्हाला या सगळ्याचे अधिकृत ज्ञान हवे, म्हणजे आम्हाला नेमक्या व्यवहारांची कल्पना येईल. आम्ही नेमकेपणाने काम करू शकू. अमित म्हणाला, माझी कंपनी या सगळ्या व्यवहारांचे ज्ञान देण्यासाठी सात दिवसांचे प्रशिक्षण घेते, त्यासाठीची फी आहे चार लाख रुपये. आता विनय चक्रावला. अमितला म्हणाला, अरे, आम्ही एवढी मोठी गुंतवणूक केली, तेव्हाच तू याबाबत काहीच कसं सांगितलं नाहीस? त्यावर अमित त्याला कठोर स्वरात म्हणाला, तुला पुढे जायचे असेल तर प्रशिक्षण घ्यावे लागेल, ते देखील पैसे भरून.
अमितच्या या बदललेल्या वागण्याबद्दल विनयला शंका आली. त्यामुळे याबाबत वकिलांचा सल्ला घेण्याचा निर्णय त्याने घेतला. वकिलाने सगळ्या व्यवहाराची छाननी केली, तेव्हा त्याला त्यात अनेक कायदेशीर त्रुटी आढळून आल्या. विनयने अमितला दिलेले पैसे हे कशासाठी दिले, याची काही नोंद नव्हती. या सगळ्या व्यवहाराची पावती किंवा अन्य काही रेकॉर्ड याला कोर्टात मान्यता मिळणार का, याबद्दल साशंकता होती. अमितला जे पैसे दिले आहेत त्याचे बिटकॉइन कोणी काढले तर समजून येणार कसे? बिटकॉइनच्या पैशाच्या मागे कोण आहे, याचा उलगडा होत नाही, त्यामुळे या व्यवहारांना कायदेशीर मान्यता नाही, याची माहिती विनयला वकिलांच्या सल्ल्यामधून मिळाली होती. बिटकॉइनचे व्यवहार व्यक्तीची ओळख लपवून केले जातात. त्यामुळे त्यात टाकलेले पैसे परत मिळवणे, त्यांचा शोध घेणे शक्य होत नाही.
वकिलांनी ही माहिती दिल्यानंतर विनयच्या पायाखालची वाळूच सरकली. आता काय करायचे, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला. आपल्या भरवशावर ज्या अन्य तीन मित्रांनी यात पैसे गुंतवले, त्यांना कसे सामोरे जायचे? वडिलांना काय सांगायचे? यावर मार्ग काढण्यासाठी विनयने थेट पोलिसात तक्रार करण्याचे ठरवले. आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रकाराची त्याने सायबर पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी अमितला ताब्यात घेऊन विचारपूस सुरु केली.
तेव्हा विनय याने केलेली तक्रार ही पूर्णपणे खोटी असून त्याने आपल्याकडे पैसे दिलेच नसल्याचे अमितने सांगितले. आपण त्याला कोणतीही गुंतवणुकीची ऑफर दिली नव्हती, हे सगळे पोलिसांच्या समोर सुरु होते. तेव्हा आपण फसवले गेल्याचे विनयच्या लक्षात आले. अमितवर करण्यात आलेले आरोप तो शेवटपर्यंत नाकारत राहिला, या व्यवहारात काही लिखापढी, करार, कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांच्या समोर या सगळ्या प्रकरणाचा तपास करताना अडचणी येत होत्या. कोणतीही ठोस कारवाई करता येत नव्हती. कोणतीही शहानिशा न करता आंधळा विश्वास ठेवून विनय तीन मित्रांना घेऊन यामध्ये बुडाला होता.
हे लक्षात ठेवा…
– आपण ज्या ठिकाणी गुंतवणूक करत आहोत त्याला भारतीय कायद्याने अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे का, याची तपासणी सर्वप्रथम करा.
– पैशाची देवाणघेवाण भारतीय रुपयांमध्ये करावी.
– कोणत्याही करन्सीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार अधिकृत एक्स्चेंजमार्फत केला जातो, हे नेहमी लक्षात ठेवा. आपण जो व्यवहार करत आहोत तो कोणत्या एक्स्चेंजमार्फत होत आहे, याची माहिती घेणे गरजेचे आहे.
– कधी बिटकॉइन वॉलेटला पैसे पाठवले तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. बिटकॉइन अड्रेसवर इनपुट-आउटपुट व्यवहाराची माहिती घेऊन जर ते वॉलेट केवायसी झालेले असेल, तरच त्याची नेमकी माहिती काही प्रमाणात मिळू शकते, अन्यथा अशा व्यवहारांमध्ये पैसे बुडण्याचीच शक्यता जास्त असते.